चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 एप्रिल 2023

Date : 15 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर; पंतप्रधान मोदी नाही, तर भारतातून ‘या’ दोन व्यक्तींचा समावेश
  • ‘टाइम’ मॅगेझीनने जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील राष्ट्रप्रमुख, उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. या यादीत भारतातून केवळ दोन व्यक्तींचा समावेश झाला आहे. यात अभिनेता शाहरूख खान आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याआधी या यादीत समावेश असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यावर्षी यादीत समावेश नाही.
  • शाहरूख आणि राजामौली यांच्याशिवाय या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, टेस्लाचा प्रमुख एलॉन मस्क, किंग्ज चार्ल्स, लेखक सलमान रश्दी, न्यायमूर्ती पद्मलक्ष्मी इत्यादींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा प्रभावी व्यक्तींच्या यादीत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रमी १६ लोकांचा समावेश आहे.

शाहरूख खानला सर्वाधिक मतं

  • ‘टाइम’ हे एक अमेरिकेतील प्रतिष्ठित मासिक आहे. दरवर्षी या मासिकाकडून जगातील सर्वात प्रभावशाली अशा १०० लोकांची यादी जाहीर केली जाते, यात अनेक मोठ्या लोकांचा समावेश असतो. या मॅगझीनचा वाचकवर्ग यासाठी मतदान करतो. २०२३ च्या यादीसाठी झालेल्या मतदानात सर्वात जास्त मतं ही शाहरुख खानला मिळाली आहे. या मतांची संख्या तब्बल १.२ मिलियन म्हणजेच १२ लाख इतकी आहे. हे एकूण मतदानाच्या ४ टक्के मतं आहेत. एका अमेरिकी मासिकात एवढ् मोठ्या प्रमाणात शाहरुख खानला मिळालेल्या मतांवरून पुन्हा एकदा त्याची जागतिक पातळीवरील लोकप्रियता आणि प्रभाव अधोरेखित झाला आहे.
भारताच्या १२ हजार वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सचा डोळा, केंद्राकडून अलर्ट जारी
  • केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यारित असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ सी) ने गुरुवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील सरकारांना एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. इंडोनेशियातील काही हॅकर ग्रुप भारतातील जवळपास १२ हजार सरकारी वेबसाईट्सवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तांत्रिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनीकंट्रोलने यांसदर्भातील वृत्त दिले आहे.
  • राज्य आणि केंद्र सरकारची अनेक संकेतस्थळे हॅकर्सकडून लक्ष्य करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही संकेतस्थळावर हल्ला होणार नाही यासाठी दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सूचना

  • अनोळखी क्रमांक किंवा इमेलमधून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंकवर क्लिक केल्यास सायबर अटॅक होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे संवेदनशील संकेतस्थळाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तसंच, सर्व सॉफ्टवेअरचे अद्ययावतीकरण सुरू आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या पिंगसेफ कंपनीचे संस्थापक आनंद प्रकाश यांनी दिली आहे.

याआधीही झाले आहेत सायबर हल्ले

  • मलेशिअन हॅकर्सने गेल्यावर्षी भारतीय संकेतस्थळांना लक्ष्य केलं होतं. भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केला होता. त्याचाच परिणाम म्हणून मलेशिअन हॅकर्सने भारताच्या सरकारी संकेतस्थळावर सायबर हल्ला केला. इस्रायलमधील भारतीय दूतावास आणि राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेचेही संकेतस्थळ मलेशिअन हॅकर ग्रुप ड्रॅगन फोर्सकडून हॅक करण्यात आले होते.
करोनामुळे देशभरात एका दिवसांत २० मृत्यू, नव्या रुग्णांचा आकडाही ११ हजार पार; सक्रिय रुग्ण किती?
  • करोना प्रतिबंधक उपाय, लसीकरण यामुळे भारताने करोना संसर्गावर आळा घातला होता. मात्र, आता पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच, गेल्या २४ तासांत देशभरात नव्या ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाली आहे.
  • गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाल्याने आता एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ६२२ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात देशात २० मृतांची नोंद करण्यात आली आहे.

करोना रुग्णांचा आलेख चढताच

  • देशभरात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नव्या रुग्णांचा आलेख चढा राहिला आहे. त्यामुळे करोनाची नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, करोना प्रतिबंधक नियमांचं पालन केल्यास संसर्ग टाळता येईल, असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. करोनावर आळा घालण्याकरता केंद्र सरकारकडून नव्याने उपाययोजना आखल्या जात आहेत. बुधवारी देशात सात हजार ८३० नवे रुग्ण सापडले होते. तर, गुरुवारी १० हजार रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली होती. आज ११ हजार रुग्णांची नोंद झाल्याने देशात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कुठे किती मृत्यू?

  • छत्तीसगडमध्ये दोन, दिल्लीत तीन, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिसा, पुद्दूचेरी, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश येथे प्रत्येकी एक, राजस्थानमध्ये तीन, पंजाबमध्ये दोन मृत्यू करोनामुळे झाले आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

  • महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी महाराष्ट्रात करोनाच्या १११५ नव्या रुग्णांची वाढ झाली होती. तर, गुरुवारीही करोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा हजारपार गेला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात १ हजार ८६ करोनाचे नवे रुग्ण सापडले. तर, यापैकी मुंबईतील २७४ रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रात एका मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ५७०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत १६३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
‘एक जागा, एक उमेदवार!’ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमारांचा नेमका फॉर्म्युला काय?
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या राजधानी दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादवदेखील त्यांच्यासोबत होते. संध्याकाळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर नितीश कुमार यांची निवडणुकीची योजना सध्या चर्चेत आहे. नितीश यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की, नितीश यांना २०२४ च्या निवडणुकीता मोठ्या विरोधी ऐक्याचे शिल्पकार व्हायचे आहे.
  • जे पक्ष काँग्रेस आणि भाजपापासून अंतर राखून आहेत त्यांना एकत्र आणण्याचं कामही नितीश कुमार करणार आहेत. म्हणूनच नितीश यांनी काल अरविंद केजरीवाल यांचीदेखील भेट घेतली. केजरीवाल हे भाजपावर सातत्याने हल्लाबोल करत असतात, परंतु ते काँग्रेसपासूनही अंतर राखून आहेत. काँग्रेसने उद्धव ठाकरे (शिवसेना), झारखंड मुक्ती मोर्चा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना सोबत घेण्याची जबाबदारी घेतली आहे. तर नितीश यांनी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव आणि डाव्या पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. जनता दल युनायटेडने याला नितीश फॉर्म्युला म्हटलं आहे.
  • नितीश यांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मी त्यांच्यासोबत आहे. विरोधकांनी एकत्र येऊन केंद्रातील सरकार बदलणं अत्यंत गरजेचं आहे. नितीश कुमार यांच्या फॉर्म्युलानुसार विरोधी पक्षांची योजना आहे की, भाजपाच्या उमेदवाराविरोधात एकच उमेदवार उभा करावा. या योजनेची पुष्टी करताना जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, “२०२४ मध्ये नरेंद्र मोदींविरुद्ध विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एका जागेवर एकच उमेदवार उभा करणे.”
  • १९७७ आणि १९८९ मध्ये देखील या सूत्राच्या सहाय्याने विरोधी पक्षांनी विजय मिळवला होता. दोन्ही वेळा सत्तेतल्या काँग्रेस पक्षाला पराभूत व्हावं लागलं होतं. परंतु दोन्ही वेळा दोन ते तीन वर्षात काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली होती. जनता दलमधील सूत्रांनी सांगितलं की, एका जागेवर एकच उमेदवार उभा करणे हीच योजना सध्या आपल्याकडे आहे.

विरोधकांचा चेहरा कोण असणार?

  • नितीश कुमार सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु चेहऱ्याबद्दल उल्लेख टाळत आहेत. विरोधकांचा मुख्य चेहरा कोण असेल याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. नितीश कुमार यांनी काही बैठकांनंतरही पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याचा उल्लेख केला नाही. तसेच हाच प्रश्न केजरीवाल यांना विचारला तेव्हा नितीश कुमार यांनी हा प्रश्न थांबवला. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, विरोधी पक्षांचं पंतप्रधानपदाबाबत एकमत झालेलं नाही.
पुणे : उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीच्या प्रणालीसाठीची निविदा प्रक्रिया
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी  अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑनलाइन उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठीचे निविदा प्रक्रियेला सुरू केली असून, आता दुसऱ्या सत्राच्या परीक्षेपासून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.

  • राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. त्याच धर्तीवर निकाल जलद जाहीर व्हावेत आणि शैक्षणिक सत्र पूर्वपदावर येण्यासाठी पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत करून त्या संगणक, लॅपटॉपद्वारे तपासता येतील. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगाने होईल.  विद्यापीठाची शैक्षणिक सत्रातील विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे.

  • उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सत्र परीक्षा सुरू होत आहे. जसे परीक्षा सुरू होतील, त्याच वेळेपासून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल लागेल. तसेच ऑनलाइन तपासणी असल्याने निकालाचे गुणपत्रिकाही छपाईही वेळेपूर्वीच होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


 

एलॉन मस्कने दाखवली ट्विटर विकत घेण्याची तयारी; देऊ केली अब्जावधी डॉलर्सची किंमत :
  • टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरला ४१ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे. इलॉन मस्कने प्रति शेअर ५४.२० डॉलर्स या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आहे. जे १ एप्रिल २०२२ च्या ट्विटरच्या शेअरच्या क्लोजिंग दरापेक्षा ३८ टक्के अधिक आहे.

  • गुरुवारी एका नियामक फाइलिंगमध्ये मस्कच्या ऑफरचा खुलासा करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी ट्विटरच्या बोर्डात सहभागी होण्याची ऑफर नाकारली होती. एलॉन मस्कच्या या ऑफरनंतर, प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरच्या स्टॉकमध्ये १२% वाढ होत आहे.

  • एलॉन मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, माझी गुंतवणूक केल्यापासून, मला आता हे समजले आहे की कंपनी सध्याच्या स्वरूपात ही सामाजिक गरज पूर्ण करणार नाही . ट्विटरला खाजगी कंपनी बनवण्याची गरज आहे. मस्क म्हणाले, “माझी ऑफर ही माझी सर्वोत्कृष्ट आणि अंतिम ऑफर आहे आणि ती स्वीकारली गेली नाही, तर मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल.”

  • यापूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पराग अग्रवाल यांनी ट्विट करून लिहिले की, एलॉन मस्कच्या बोर्डात सामील होण्याबाबत मी त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली. आम्ही सहयोग करण्यास आणि जोखीम स्पष्ट करण्यास उत्सुक होतो.

देशाला पुढे नेण्यात प्रत्येक पंतप्रधानांचे योगदान; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : तीन मूर्ती भवनातील ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन :
  • देशाचे बहुतांश पंतप्रधान शेतकरी, ग्रामीण, गरीब कुटुंबातून आले होते. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य घरातील व्यक्तीदेखील देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते हा विश्वास त्यांनी तरुण पिढीला दिला, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरते.

  • प्रत्येक पंतप्रधानाने आपापल्या कार्यकाळात अनेक आव्हानांना सामोरे जात देशाला पुढे नेले, काही अपवाद वगळले तर देशाने लोकशाही परंपरा दृढ केली, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘पंतप्रधान संग्रहालया’च्या उद्घाटनप्रसंगी काढले

  • स्वातंत्र्यलढा, संविधानाची निर्मितीप्रक्रिया आणि देशाच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानातून भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासाचे महत्त्व सांगणाऱ्या ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन गुरुवारी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

  • देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांचे भव्य संग्रहालय असलेल्या दिल्लीतील तीन मूर्ती भवनाच्या आवारात मोदींच्या ‘मार्गदर्शना’खाली नवे पंतप्रधान संग्रहालय उभे राहिले असून ते पाहण्यासाठी मोदींनी पहिले तिकीट काढले.

ट्विटर खरेदीसाठी टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क इच्छुक; ४३.३९ अब्ज डॉलरचा प्रस्ताव :
  • टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी गुरुवारी प्रस्ताव दिला आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.

  • दोन आठवडय़ांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले आहेत. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरच्या खरेदीसाठी हा सर्वोत्तम आणि शेवटचा प्रस्ताव असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या समभागाने ९ टक्क्यांची उसळी घेतली.

  • कार्यशील लोकशाहीसाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही एक सामाजिक गरज आहे. मात्र कंपनीमध्ये गेल्या आठवडय़ात गुंतवणूक केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या असून कंपनीमध्ये मोठे बदल होणे अत्यावश्यक आहे. याचबरोबर कंपनीची सध्याची कामाची पद्धत बदलण्याची गरज असून ती तशीच ठेवल्यास कंपनीची प्रगती होणे अशक्य आहे.

  • कंपनीमध्ये प्रचंड क्षमता असून कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. मी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कंपनीत एक भागधारक म्हणून राहण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल - लिव्हरपूल उपांत्य फेरीत :

 

  • लिव्हरपूलने बुधवारी बेन्फिकाविरुद्ध झालेली उपांत्यपूर्व फेरीतील दुसरी लढत ३-३ अशी बरोबरीत सोडवली असली तरीही ६-४ अशा एकूण गोलफरकाआधारे त्यांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉलची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांचा सामना व्हिलारेयालशी होणार आहे.

  • लिव्हरपूलने उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत ३-१ असा विजय मिळवला होता. त्या लढतीत एक गोल करणाऱ्या इब्राहिम कोनाटेने बुधवारी झालेल्या लढतीतही २१व्या मिनिटाला गोल केला. त्याशिवाय रोबेटरे फिरमिनोने सामन्याच्या उत्तरार्धात ५५व्या आणि ६५व्या मिनिटाला दोन गोल केले.

  • बेन्फिकाला गोंकालो रामोसने ३२व्या मिनिटाला गोल करत १-१ असे बरोबरीत आणले. मात्र, लिव्हरपूलने दोन गोल करत ३-१ अशी आघाडी घेतली. बेन्फिकाकडून बदली खेळाडू म्हणून आलेल्या रोमान यारेमचुक (७३ वे मि.) आणि डार्विन नुनेज (८२ वे मि.) यांनी गोल मारत सामना ३-३ असा बरोबरीत आणला.

  • मँचेस्टर सिटी आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतरही मँचेस्टर सिटीने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मँचेस्टर सिटीचा उपांत्य फेरीत रेयाल माद्रिदशी सामना होणार आहे. मँचेस्टर सिटीने उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत १-० असा विजय मिळवला होता.

  • मँचेस्टर सिटीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, अ‍ॅटलेटिको माद्रिदने त्यांना गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही. पूर्वार्धात अ‍ॅटलेटिकोच्या आघाडीच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. उत्तरार्धात ग्रिझमनला ५७व्या मिनिटाला गोल करण्याची संधी चालून आली, पण त्याला यश मिळाले नाही.

१५ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.