चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ एप्रिल २०२१

Date : 15 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चालू तिमाहीत ‘स्पुटनिक व्ही’ची आयात :
  • रशियाच्या करोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत सुरू होणार आहे. यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने तयारी सुरू केली आहे.

  • एप्रिलअखेरपर्यंत ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या आयातीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मात्र, या लसमात्रा वापरास उपलब्ध कधी उपलब्ध होतील, याचा निर्णय सरकारवर अवलंबून असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या लशीच्या साठवणुकीसाठी असलेली उणे १८ अंश सेल्सिअसची अवस्था २ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत नेण्याची तयारी होत असल्याचे या औषध उत्पादक कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

  • ही लस रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडाकडून (आरडीआयएफ) आयात केली जाणार असून, भारताला लशीच्या १२५ दशलक्ष मात्रा पुरवण्याच्या करारांतर्गत उणे १८ ते उणे २२ अंश तापमान कायम राखून त्या येथे आणल्या जातील, असे डॉ. रेड्डीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सप्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय :
  • दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

  • दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारत दोन अंकी पदकसंख्या गाठेल :
  • यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारत दोन अंकी पदकसंख्या गाठेल, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.

  • ‘‘ऑलिम्पिकच्या तयारीसाठी देशातील क्रीडापटूंना सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा संस्मरणीय करण्याची जबाबदारी त्यांची असेल,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. ऑलिम्पिकला १०० दिवस बाकी असल्यानिमित्ताने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. ऑलिम्पिकला २३ जुलैपासून प्रारंभ होणार आहे.

  • ‘‘टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी विक्रमी पदकांचे ठरेल. भारतीय खेळाडू दोन अंकी पदकसंख्या गाठतील, अशी आशा आहे. खेळाडूंना आवश्यक ते सर्व पाठबळ मिळेल, पण त्यांच्याकडून प्रयत्नांत कोणतीही कसूर होता कामा नये,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. देशातील करोना साथीपासून सावधगिरी बाळगावी, असा सल्लाही रिजिजू यांनी खेळाडूंना दिला.

  • या कार्यक्रमाला क्रीडा सचिव रवी मित्तल, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा उपस्थित होते.

‘मोदी यांच्याकडून पाकिस्तानला लष्करी प्रत्युत्तराची शक्यता जास्त’ :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी बळाचा वापर करून प्रत्युत्तर देण्याची शक्यता यापूर्वीच्या काळापेक्षा अधिक असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने काँग्रेसला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

  • भारत व पाकिस्तान यांच्यात सरधोपट युद्ध होण्याची शक्यता नसली, तरी दोन्ही देशांमधील संकटे अधिक तीव्र झाल्याने ती चिघळण्याचे चक्र सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ओडीएन) कार्यालयाने अमेरिकी काँग्रेसला सादर केलेल्या ‘थ्रेट अ‍ॅसेसमेंट रिपोर्ट’मध्ये नमूद केले आहे.

  • ‘काश्मीरमधील हिंसक असंतोष किंवा भारतात घडवून आणलेला दहशतवादी हल्ला हे तणावाचे संभाव्य मुद्दे असून, वाढलेल्या तणावामुळे या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये संघर्ष उद््भवण्याचा धोका वाढला आहे’, असेही या अहवालात म्हटले आहे.

  • भारताने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या  दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध रसातळाला गेलेअसून, तेव्हापासून दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत उच्चायुक्त नेमलेले नाहीत.

देशात दिवसभरात १,८४,३७२ बाधित :
  • देशात करोनाचा वेगाने फैलाव होत असून, महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

  • गेल्या २४ तासांत करोनाने १,०२७ जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील करोनाबळींचा हा उच्चांक आहे. मृतांची एकूण संख्या एक लाख ७२ हजार ०८५ वर पोहोचली आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ वर पोहोचली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १३ लाखांहून अधिक झाली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ९.८४ टक्के आहे.

  • देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली  जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात २०,५१२ नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत तिथे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्ये १५६ करोनाबळींची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला.

 ‘भारत हाच विश्वासू सहकारी, गैरसमज नाहीत’ :
  • भारत हा आपला ‘विश्वासू सहकारी’ असून, दोन्ही देशांमध्ये काही मतभेद किंवा गैरसमज नाहीत, असे रशियाने बुधवारी सांगितले. पाकिस्तानसोबत ‘स्वतंत्र’ संबंधांच्या आधारे आपले ‘मर्यादित सहकार्य’ आहे, असेही त्या देशाने स्पष्ट केले.

  • नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी पाळण्याबाबत २००३ साली केलेल्या कराराचे पालन करण्याबद्दल भारत व पाकिस्तान यांनी अलीकडेच व्यक्त केलेल्या बांधिलकीचे रशियन राजदूतावासाचे उपप्रमुख रोम बाबुश्किन यांनी स्वागत केले आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी हे ‘महत्त्वाचे पाऊल’ असल्याचे सांगितले.

  • पाश्चिमात्य देशांचे हिंद- प्रशांत धोरण ‘धोकादायक’, तसेच शीतयुद्धाची मानसिकता पुनरुज्जीवित करणारे असल्याचे सांगून बाबुश्किन यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव्ह यांनी त्यावर टीका केली.

  • अफगाणिस्तानसोबत प्रादेशिक मतैक्य घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा भारत हा एक भाग असलाच पाहिजे; तसेच अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेबाबत भारत व रशिया यांचा दृष्टिकोन समान आहे, असे बाबुश्किन म्हणाले.

१५ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.