चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ सप्टेंबर २०२१

Date : 14 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा ४, ५ आणि ६ डिसेंबरला होणार :
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे, असे देखील कळवण्यात आले आहे.

  • याबाबत आयोगाकडून काढण्याता आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

  • तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा : युक्रेनला नमवून भारत उपांत्य फेरीत :
  • गतवर्षी संयुक्त विजेतेपद पटकावणाऱ्या भारताने बरोबरीची कोंडी फोडणाऱ्या निर्णायक अतिजलद (ब्लिट्झ) लढतीत युक्रेनवर ५-१ असा दणदणीत विजय मिळवून ‘फिडे’ बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारताच्या विजयात द्रोणावल्ली हरिकाच्या तीन विजयांचा सिंहाचा वाटा आहे. आता मंगळवारी भारताची अमेरिकेशी गाठ पडणार आहे, तर दुसरी उपांत्य लढत चीन आणि रशिया यांच्यात होईल.

  • उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या डावात भारताने युक्रेनचा ४-२ असा आरामात पराभव केला. परंतु दुसऱ्या डावात युक्रेनने ३.५-२.५ अशा फरकाने भारतावर मात केली. त्यामुळे बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या लढतीत भारताने युक्रेनला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. या लढतीमधील पहिल्या सामन्यात विदित गुजराथीने व्हेसली इव्हानच्यूकला बरोबरीत रोखले.

  • मग दुसऱ्या सामन्यात बी. अधिबानने किरिल शेव्हचेन्कोवर विजय मिळवत भारताची आघाडी वाढवली. तिसऱ्या सामन्यात कोनेरू हम्पीने युलिजा ओस्माकशी बरोबरी साधली. त्यानंतर उर्वरित तीन लढतींमध्ये हरिका, निहाल सरिन आणि आर. वैशाली यांनी अनुक्रमे नतालिया बुस्का, प्लॅटन गॅलपेरिन आणि मारिया बेर्डनिक यांच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

  • त्याआधी, पहिल्या डावातील विजयात हरिका आणि सरिन यांनी विजय नोंदवले, तर विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्णा, हम्पी आणि वैशाली यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले. मग दुसऱ्या डावात युक्रेनने आनंदला बरोबरीत रोखून प्रारंभ केला. पण विदित आणि हम्पीच्या पराभवामुळे युक्रेनने आघाडी मिळवली. हरिका आणि आर. प्रज्ञानंद यांच्या विजयामुळे भारताने युक्रेनला वर्चस्व गाजवू दिले नाही. पण अखेरच्या सामन्यात वैशालीने मारियाकडून हार पत्करल्यामुळे दुसरा डाव युक्रेनने जिंकला आणि बरोबरीची कोंडी निर्णायक लढतीद्वारे फोडण्यात आली.

लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO ने केले अभिनंदन :
  • देशात आतापर्यंत करोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, “या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात ७५ कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. तसेच करोना साथीची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षाच्या अखेरीस ६० टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे आहेत.”

  • आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.”

  • WHO ने केले भारताचे अभिनंदन - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले आहे आहे. करोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतूक केले. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने करोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष करोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पुर्ण केला आहे.”

उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी :
  • लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असून हे क्षेपणास्त्र नव्याने तयार करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसानंतर उत्तर कोरियाने ही चाचणी केली असून त्यामुळे लष्करी क्षमता वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाचे हे पहिले अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असू शकेल.

  • या प्रक्षेपणाची दृश्यचित्रे दाखवण्यात आली. त्यात चलत क्षेपणास्त्रवाहकाचा समावेश होता.  कोरियाच्या मध्यवर्ती वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की गेली दोन वर्षे हे क्षेपणास्त्र तयार करण्याचे काम चालू होते. त्याची क्षमता १५०० कि.मी वरील लक्ष्य भेदण्याची असून शनिवारी व रविवारी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

  • उत्तर कोरियाने म्हटले आहे, की देशाचे नेते किम जोंग उन यांनी लष्करी क्षमता वाढवण्याचे आदेश दिले असून  या चाचणीने त्या प्रयत्नात भर पडली आहे. अमेरिका सध्या उत्तर कोरियाशी अणु वाटाघाटी करीत असताना उत्तर कोरियाने ही चाचणी केली आहे.

  • दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमेरिका व दक्षिण कोरियाचे  गुप्तचर या घटनेचा तपास करीत आहेत. हिंद प्रशांत कमांडने म्हटले आहे, की उत्तर कोरियाच्या कारवायांवर आमचे बारकाईने लक्ष असून तो देश लष्करी कार्यक्रम विकसित करीत असून त्याचा अमेरिका व मित्र देशांना धोका आहे. किम यांनी सत्ताधारी पक्षाच्या अधिवेशनात जानेवारी महिन्यामध्ये अण्वस्त्र क्षमता वाढवण्याचे आदेश दिले होते, तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही सूतोवाच केले होते.

करोनापासून वाचण्यासाठी किती काळ मास्क घालावा लागेल? केंद्र सरकारने दिले उत्तर :
  • गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. करोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टीं सातत्याने पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा एक भाग बनल्या आहेत.

  • करोनावरील लस घेऊन लोक स्वतःचे रक्षण करत आहेत. मात्र लसीकरणानंतरही संसर्ग रोखण्यासाठी सर्व गोष्टी पाळण्याचा सल्ला तज्ञांमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे मास्कपासून सुटका कधी असा प्रश्न लोकांकडून वारंवार विचारला जात आहे. लोकांना मास्कशिवाय ते कधी फिरू शकतील हे जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आता नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

  • व्ही के पॉल यांच्या मते, करोनावर मात करण्यासाठी लस, औषध आणि करोना निर्बंधाचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. जर करोनाचा पराभव करायचा असेल तर या सर्व गोष्टी एकत्र पाळाव्या लागतील, त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत भारतातील लोकांना मास्कचा वापर करावा लागेल.

  • आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पॉल यांनी इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप टळली नाही, पुढील काळ धोकादायक आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. व्ही. के. पॉल यांनी, “मास्कपासून सध्यातरी सुटका होणार नाही. आपल्याला पुढील वर्षातही मास्क घालणे सुरू ठेवावे लागेल,” असे म्हटले आहे.

ठरलं…मोदी करणार अमेरिकेचा दौरा; बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच भेट :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. ‘क्वाड’ देशांच्या परिषदेत नरेंद्र मोदी सहभागी होणार असून पहिल्यांदाच देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुढील आठवड्यात या परिषदेचं आयोजन केलं असून केंद्र सरकारने मोदींच्या उपस्थितीला दुजोरा दिला आहे.

  • २४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही परिषद होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुमा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित असतील. “या बैठकीत नेते १२ मार्चला झालेल्या पहिल्या व्हर्च्यूअल परिषदेनंतर झालेली प्रगती तसंच सामायिक हिताचे प्रादेशिक मुद्दे यावर चर्चा करतील,” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

  • “करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून यावेळी मार्च महिन्यात लसीसंबंधी करण्यात आलेल्या घोषणेसंबंधी यावेळी आढावा घेण्यात येईल,” असंही सांगण्यात आलं आहे. भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर याचा फटका बसला होता. याशिवाय बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरात टाळेबंदी :
  • न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या ऑकलंडमध्ये कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली असून ती २१ सप्टेंबरपर्यंत अमलात राहणार आहे. सोमवारी तेथे करोनाचे ३३ रुग्ण सापडले आहेत.

  • करोनाच्या साथीत अनेकांनी केलेला त्याग आम्ही वाया घालवू इच्छित नाही, त्यामुळे पातळी ३ निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे न्यूझीलंडच्या  पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी सांगितले.

  • न्यूझीलंडचा उर्वरित भाग पातळी २ निर्बंधाखाली राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • ऑकलंडमध्ये करोनाची साथ पसरली  असून त्या भागात करोनाचे जास्त रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. ऑकलंडमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातून आलेल्या काही व्यक्तींमध्ये करोना दिसून आला होता. त्यामुळे सोमवारी एकूण रुग्णांची संख्या ९५५ झाली होती. त्यातील २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

१४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.