चालू घडामोडी आणि दिनविशेष - 14 ऑक्टोबर 2023

Date : 14 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अहमदाबादेत क्रिकेटोत्सव!
  • एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन आता आठवडाभराहूनही अधिक कालावधी झाला असला, तरी या स्पर्धेबाबत तितकीशी उत्सुकता पाहायला मिळालेली नाही. परंतु भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आज, शनिवारी अहमदाबाद येथील एक लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरताच या स्पर्धेबाबतचा उत्साह शिगेला पोहोचणे अपेक्षित आहे.
  • हा सामना याची देही, याची डोळा पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी अहमदाबादकडे कूच केले आहे. मुंबईकडून अहमदाबादकडे सर्वच रेल्वेगाडय़ा चाहत्यांची भरगच्च पहायला मिळाल्या. या सामन्यात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण अहमदाबाद भारत-पाक सामन्याने रंगून गेले आहे. काही दिवसांपूर्वी सामन्यात घातपात घडवून आणण्याबाबत ई-मेल आला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्टेडियम परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासह सामना पाहण्यासाठी अनेक नामांकितांची उपस्थिती अपेक्षित असल्याने चोख तपासणीनंतरच सर्वांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे.
  • सामन्यापूर्वी १२.४० वाजल्यापासून सिनेसृष्टीतील कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. अहमदाबाद येथील हॉटेल, लॉज यासह मिळेल त्या ठिकाणी चाहते राहण्याची व्यवस्था करत आहेत. राहण्याच्या सोयीसाठी चाहत्यांना दुप्पट रक्कम मोजावी लागत आहे.
दसरा, दिवाळी, छठसाठी 30 विशेष गाड्या
  • प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दसरा, दिवाळी, छठसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सोमवार आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३०० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०२१४० सुपरफास्ट स्पेशल २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी दुपारी दीड वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०२१४४ सुपरफास्ट स्पेशल १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४३ सुपरफास्ट स्पेशल २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
“भारत-पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव”, मुनगंटीवारांची माहिती
  • छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखे लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत आगमन झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.
  • विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार पंकज भोयर, आश्विनी जिचकार, भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर, बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजप महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे, नीलेश किटे, सुभाष कासनगोटूवार, ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार उपस्थित होते.
  • यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तूही लवकरच भारतात आणण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर मी भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने मी भारावलोय. आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सीमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
Global Hunger Index मध्ये भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण; १२५ देशांमध्ये १११व्या स्थानी!
  • जागतिक उपासमार निर्देशांक अर्थात Global Hunger Index 2023 मध्ये भारताची मोठी घसरण झाली असून १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे. त्यामुळे भारतातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी हे मुद्दे पुन्हा एकादा ऐरणीवर आले आहेत. भारतानं या निर्देशांकासाठी आवश्यक आकडेवारीमध्ये २८.७ मानांकन मिळवलं असून त्याआधारे भारतात उपासमारीची भीषण स्थिती असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र, एकीकडे जागतिक पातळीवर हा निर्देशांक काढला जात असताना दुसरीकडे भारतानं मात्र या निर्देशांकातील आकडे चुकीचे असल्याचं सांगत ते फेटाळले आहेत.

काय सांगतो जागतिक उपासमार निर्देशांक?

  • या निर्देशांकानुसार भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण झाली आहे. यादीनुसार, पाकिस्तान १०२व्या स्थानी, बांगलादेश ८१व्या स्थानी तर नेपाळ ६९व्या स्थानी आहे. एकीकडे आशिया खंडातील आपल्या शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत भारताचं स्थान बरंच खाली घसरलं असताना दुसरीकडे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांपेक्षा भारताचं मानांकन चांगलं असल्याचंही यादीतून स्पष्ट झालं आहे. या देशांना सरासरी प्रत्येकी २७ इतकं मानांकन मिळालं आहे.

भारतातील कुपोषण, बालमृत्यूवर चिंता

  • दरम्यान, या निर्देशांकानुसार, भारतातील कुपोषणाचं प्रमाण हे तब्बल १६.६ टक्के इतकं असून पाच वर्षांखालील बालमृत्यूंचं प्रमाण ३.१ टक्के इतकं नोंद करण्यात आलं आहे. मुलांच्या उंचीच्या प्रमाणात त्यांच्या अपेक्षित वजनात दिसणारी घट या आधारावर मोजण्यात येणाऱ्या निर्देशांकाकातही भारतातील कुपोषणाचं प्रमाण १८.७ टक्के इतकं नोंद करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर बातमी दिली आहे.

भारत सरकारनं आकडेवारी फेटाळली!

  • दरम्यान, जागतिक उपासमार निर्देशांकातून भारतातील कुपोषणाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असताना दुसरीकडे भारतानं ही आकडेवारी चुकीची असल्याचं सांगून फेटाळली आहे. हे निर्देशांक ठरवताना चुकीच्या पद्धतीचा वापर करण्यात आल्याची भूमिका केंद्रीय महिला व बालकल्याण विभागानं घेतली आहे.
साताऱ्यातील ऐतिहासिक विहीर झळकणार पोस्टकार्डवर
  • साताऱ्यातील जलमंदिर परिसरातील बाजीराव विहीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरातन विहिरीचे छायाचित्र राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याने पोस्टकार्डवर छापण्यास सुरुवात केली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद व सातारच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचा सन्मान असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिद्ध होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र बारव संवर्धन समितीचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर, धनंजय अवसरे, हेमंत लंगडे यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.
  • उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली याच व्यक्तींच्या पुढाकाराने सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची स्वच्छता जपली जाते. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ विहिरीच्या छायाचित्राचा समावेश पुस्तिकात करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रत्येक एका स्टेपवेलचा समावेश आहे. तर, परभणी जिल्ह्यातील चार स्टेपवेल अशा एकूण आठ स्टेपवेलचा समावेश यंदा होऊ शकला आहे. त्यामध्ये सातारच्या बाजीराव विहिरीच्या छायाचित्र पोस्टकार्डवर प्रसिद्ध झाले आहे.
  • छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी आणि बाजीराव विहिर  बांधण्यात आली होती. ही बाजीराव विहिर १०० फूट खोल आहे, तर हीचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे. या विहिरीस ९ कमानी आहेत, तसेच या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे दगडामध्ये राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आलेले आहे. या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी ज्यावेळी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच बाजीराव विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात  होते.

 

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा - मुंबईचा सलग दुसरा विजय :
  • डावखुऱ्या यशस्वी जैस्वालच्या (४४ चेंडूंत नाबाद ६६ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर मुंबईने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात मध्य प्रदेशला ८ गडी आणि १८ चेंडू राखून पराभूत केले. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात मध्य प्रदेशने दिलेले १८२ धावांचे लक्ष्य मुंबईने १७ षटकांत गाठले.

  • सलामीवीर पृथ्वी शॉ (१२ चेंडूंत २९) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (१७ चेंडूंत ३०) यांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर यशस्वीने सर्फराज खानच्या (१८ चेंडूंत ३०) साथीने ६२ धावांची भागीदारी रचत मुंबईला विजयासमीप नेले. सर्फराज बाद झाल्यावर यशस्वीला अमन खानची (११ चेंडूंत नाबाद २१) उत्तम साथ लाभल्याने मुंबईने सहज विजय मिळवला. यशस्वीने नाबाद ६६ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले.

  • तत्पूर्वी, मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८१ अशी धावसंख्या केली. चंचल राठोड (१०) आणि शुभम शर्मा (१९) लवकर बाद झाले. मात्र, नुकताच भारतीय संघात प्रवेश मिळवणारा रजत पाटीदार (३५ चेंडूंत ६७) आणि डावखुरा वेंकटेश अय्यर (३५ चेंडूंत ५७) यांच्या अर्धशतकांमुळे मध्य प्रदेशला १८० धावांचा टप्पा ओलांडता आला.

  • मध्य प्रदेश : २० षटकांत ७ बाद १८१ (रजत पाटीदार ६७, वेंकटेश अय्यर ५७; तुषार देशपांडे ३/२६, शिवम दुबे १/२३) पराभूत वि. मुंबई : १७ षटकांत २ बाद १८२ (यशस्वी जैस्वाल नाबाद ६६, सर्फराज खान ३०; शुभम शर्मा १/१८)

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले क्षेपणास्र; १७० तोफागोळ्यांचा मारा, दोन्ही देशांमधील तणाव वाढला :
  • समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. या परिसरात उत्तर कोरियाने लढाऊ विमानं उडवल्याचा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी उत्तर कोरियाच्या राजधानीतून क्षेपणास्त्र झेपावले, असे दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे.

  • सीमाभागातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागातून तोफगोळ्यांच्या १७० मारा करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी केला आहे. २०१८ मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामधील लष्करी कराराद्वारे तणाव निवळल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सागरी बफर झोनमध्ये हे तोफगोळे पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. हे दोन्ही देशांमधील लष्करी कराराचे उल्लंघन असल्याचे दक्षिण कोरियाचे संयुक्त दलाचे प्रमुख म्हणाले आहेत.

  • ४ ऑक्टोबरला उत्तर कोरियाने मध्यम तीव्रतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. त्याआधी या देशाकडून लष्करी कवायती करण्यात आल्या होत्या. उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या केला जात आहेत. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अलिकडेच उत्तर कोरियाने जपानवर क्षेपणास्त्र डागले होते. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियानेही क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या आहेत. या देशांनी संयुक्त लष्करी सरावही केला आहे.

  • उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताकडून निषेध नोंदवण्यात आला होता. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांती आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले होते. या घटनेचा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतासह ११ देशांनी संयुक्त निवेदन जारी करत निषेध नोंदवला होता.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - सेनादलाचा विजेतेपदाचा चौकार, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी :
  • सात वर्षांच्या कालखंडानंतर पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा सेनादलाने बाजी मारली. सेनादलाने ६१ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३२ कांस्य अशा एकूण १२८ पदकांसह सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. या स्पर्धाचा समारोप सोहळा बुधवारी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते पार पडला. 

  • महाराष्ट्राला ३९ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६३ कांस्य अशा सर्वाधिक १४० पदकांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हरयाणाने ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्य अशा ११६ पदकांसह तिसरे स्थान मिळविले. महाराष्ट्राने आपल्या मोहिमेची सांगताही सोनेरी यशाने केली. बॉक्सिंगमध्ये निखिल दुबेने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. महाष्ट्राला पहिल्याच दिवशी नेमबाजीत रुद्रांक्ष पाटीलने सुवर्णपदक मिळवून दिले होते.

२८ क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राला पदके

  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्राने २८ क्रीडा प्रकारांत किमान एक पदक मिळविले. यामध्ये सर्वाधिक २२ पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य, १२ कांस्य) जलतरणात पटकावली. त्यानंतर योगासनात १४ आणि मल्लखांबमध्ये १२ पदके मिळविली. महाराष्ट्राला सर्वाधिक ६ सुवर्णपदके मल्लखांबमध्ये मिळाली.

  • निखिलचे ऐतिहासिक सुवर्णयश निखिलची उपांत्य लढत पाहण्यासाठी त्याचे प्रशिक्षक धनंजय तिवारी मोटारसायकलने मुंबईहून गुजरातला निघाले होते. मात्र, वाटेत त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त निखिलला उपांत्य लढतीपूर्वीच कळाले होते. मात्र, निखिलने दु:ख विसरून उपांत्य लढत जिंकली आणि त्यानंतर बुधवारी अंतिम फेरीतही मिझोरमच्या मलसाव मितलुंगचा धुव्वा उडवून त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविले. निखिलच्या आक्रमक खेळापुढे मलसाव निष्प्रभ ठरला. त्यामुळे पंचांनी निखिलच्या बाजूने ५-० असा कौल दिला.

करकपातीवरून ब्रिटनच्या पंतप्रधान अडचणीत; स्वपक्षीय प्रतिनिधींकडून लक्ष्य :
  • ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस आपल्या करकपात धोरणामुळे अडचणीत सापडल्या आहेत. सत्ताधारी हुजूर पक्षाच्याच खासदारांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली असताना त्यांचे मंत्री बचावासाठी पुढे सरसावले आहेत. अवघ्या महिन्याभरापूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या ट्रस यांची पक्षातील लोकप्रियता झपाटय़ाने घटली आहे. त्यांचे करकपातीचे धोरण हे केवळ श्रीमंतांच्या फायद्याचे ठरत असून याचा मजूर पक्षालाच लाभ होत असल्याचे मत हुजूर पक्षाचे प्रतिनिधी मांडत आहेत.

  • गेल्या महिनाअखेरीस ट्रस यांनी मांडलेला ‘छोटा अर्थसंकल्प’ वादात सापडला. त्यानंतर त्यातील तरतुदी मागे घेण्याची नामुष्की अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्यावर आली. या घडामोडींनंतर परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवर्ली यांनी ट्रस यांचा बचाव करताना स्वपक्षीयांना इशारा दिला.

  • ‘‘आपल्याला बाजारामध्ये स्थिरता आणायची आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे ट्रस यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवण्याचा प्रयत्न केवळ राजकीय नव्हे, तर आर्थिकदृष्टय़ाही चुकीचा ठरेल. अर्थव्यवस्थेचा विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट असले पाहिजे,’’ असे ते म्हणाले. ट्रस यांनी महिनाभरात घेतलेल्या निर्णयांवर हुजूर पक्षाच्या ‘१९२२ कमिटी ऑफ बॅकबेंचर’ या गटाने नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे.

  • प्रक्रिया काय - हुजूर पक्षाच्या घटनेनुसार एकदा निवड झाल्यानंतर १२ महिने नेतेपदावरून कुणाला हटवता येत नाही. मात्र ‘१९२२ कमिटी ऑफ बॅकबेंचर’ या समितीमध्ये विरोधात मतदान झाले, तर त्या नेत्याला हटवले जाऊ शकते.

१४ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.