चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 14, 2021 | Category : Current Affairs


कर्नाटकात जायला आता RTPCR चाचणीचं बंधन नाही; जाणून घ्या शासनाचे नवे आदेश :
 • कर्नाटकात जाताय? तर आता बिनधास्त जा. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी करोनाच्या RTPCR चाचणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विजयादशमीच्या दिवशी म्हैसूर येथे होणारा शाही दसरा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या अनेकांना कर्नाटकचे द्वार बिनदिक्कत उघडले. बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

 • कर्नाटक राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात प्रवेश करण्यासाठी RTPCR चाचणी सक्तीची करण्यात आली होती. त्यासाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे चेक पोस्ट नाका उभारण्यात आला होता. चाचणी केली असेल तरच तिथून प्रवेश दिला जात होता. अन्यथा पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवले होते.

 • पण आता महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवेश करताना RTPCR चाचणी मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचे चेक पोस्ट हटवले जाणार आहेत.

‘भारतात लसीकरणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी’ :
 • करोना काळात भारताने पहिला काळ गेल्यानंतर आता लसीकरणात चांगली कामगिरी केली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्यास मदत होईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. २०२१ मधील अंदाज नाणेनिधीने जाहीर केले असून त्यात भारताचा विकास दर ९.५ टक्के राहील असा अंदाज मंगळवारी वर्तवण्यात आला होता.

 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे की, आम्ही या वर्षी भारतासाठीचा अंदाज बदलेला नाही. आमचा विकासाचा अंदाज कायम आहे. भारत अतिशय कठीण अशा दुसऱ्या लाटेतून बाहेर आला असून जुलैत त्यामुळे आर्थिक प्रगतीला खीळ बसली होती पण आता आम्ही आर्थिक विकास दराच्या अंदाजात बदल केलेला नाही.

 • जुलै महिन्यात भारताच्या विकास दराचा अंदाज कमी करण्यात आला होता. नाणेनिधी व जागतिक बँक यांची वार्षिक बैठक होण्यापूर्वी २०२१ मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज ९.५ टक्के देण्यात आला असून २०२२ मध्ये तो ८.५ टक्के देण्यात आला आहे. जगाचा विकास दर २०२१ मध्ये ५.९ टक्के असणार असून २०२२ मध्ये तो ४.९ टक्के असण्याची शक्यता आहे. 

 • गोपीनाथ यांनी सांगितले की, भारताने अतिशय आव्हानात्मक परिस्थितीला तोंड दिले असून आर्थिक बाजारपेठांनी पुन्हा उभारी घेतली आहे. भारतीत लसीकरणाचा दर जास्त असून त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत झाली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक स्टडीजचे मल्हार नाबर यांनी म्हटले आहे की, करोना काळात भारताने चांगली कामगिरी केली असली, तरी आणखी उपाययोजना करण्यास जागा आहे.

“अरुणाचल प्रदेशला चीनची मान्यता नाही”; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या दौऱ्यावर चीनचा आक्षेप :
 • देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उपराष्ट्रपतींच्या या भेटीवर चीनने आपला आक्षेप व्यक्त केला आहे. त्यानंतर बुधवारी भारतानेही चीनच्या या आक्षेपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही अशा टिप्पण्या नाकारतो.

 • अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय नेते नियमितपणे राज्याला भेट देतात, जसे ते भारतातील इतर कोणत्याही राज्यात करतात, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

 • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नऊ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान त्यांनी राज्य विधानसभेच्या विशेष सत्रालाही संबोधित केले.

 • विशेष सत्राला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी अरुणाचल प्रदेशचा वारसा सविस्तर मांडला होता. आता अलिकडच्या वर्षांत बदलाच्या दिशेने आणि विकासाची गती वाढवताना नवीन बदल होत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात बदल; मुंबईकर क्रिकेटपटूला मिळालं स्थान :
 • आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी काही दिवसांचाच अवधी उरला असताना भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नवा भारतीय संघ जाहीर केला. यात मुंबईकर अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरला १५ सदस्यीय भारतीय संघात जागा मिळाली आहे.

 • शार्दुलने अक्षर पटेलची जागा घेतली आहे. मागील काही काळापासून शार्दुलने गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही आपली कमाल दाखवली आहे. इंग्लंड दौरा आणि त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर शार्दुलने निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले.

 • संघातील हा बदल हार्दिक पंड्याच्या फिटनेसच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आयपीएल २०२१ मध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजीबरोबरच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या शार्दुलला संघात स्थान देण्यात आले आहे.

 • पहिल्यांदा वर्ल्डकप संघ जाहीर झाला, तेव्हा शार्दुल स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता. आता अक्षरने त्याची जागा घेतली आहे. आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि के. गौथम हे खेळाडू दुबईत संघाच्या बायो बबलमध्ये सामील होतील आणि टीम इंडियाला त्यांच्या तयारीमध्ये मदत करतील.

विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी : रोनाल्डोच्या विक्रमी हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगालचा दिमाखदार विजय :
 • कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगालने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीच्या लढतीत लक्झेम्बर्गचा ५-० असा धुव्वा उडवला. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक (१०) हॅट्ट्रिकचा विक्रम आपल्या नावे केला.

 • या सामन्यात आठव्या आणि १३व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. दोन्ही वेळा रोनाल्डोने चेंडू यशस्वीरीत्या गोलजाळ्यात धाडला.

 • १७व्या मिनिटाला त्याचा मँचेस्टर युनायटेड संघातील सहकारी ब्रुनो फर्नाडेझने गोल केल्याने मध्यंतराला पोर्तुगालकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात जाओ पालहिन्हाने चौथ्या गोलची भर घातली. त्यानंतर रोनाल्डोने संघाचा पाचवा गोल करताना वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.

वाढत्या इंधन दरामुळे ‘एसटी’ची डिझेलला सोडचिठ्ठी, काही वर्षात सर्व एसटी बस या पर्यावरणपुरक इंधनावर धावणार :
 • इंधन दरवाढीचा फटका हा सर्वांनाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसला आहे. यामधून ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहीनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा सुटली नाहीये. करोना काळ, टाळेबंदी आणि त्यात इंधन दरवाढ यामुळे एसटी महामंडळाचे पेकाट मोडले आहे. एसटी महामंडळाच्या एकुण खर्चापैकी डिझेलवर होणारा खर्च हा ३४ टक्के होता, सध्याच्या काळात हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

 • आता राज्यात सर्व काही सुरळित सुरु झालं असलं तरी अजुनही एसटी सेवा प्रवाशांच्या प्रतिसादा अभावी पूर्वीप्रमाणे पुर्ण क्षमतेने धावत नाहीये. थोडक्यात एसटीच्या उत्पन वाढीवर मोठ्या मर्यादा आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांबरोबर वेतन करार, सरकारकडचे थकीत अनुदान या सर्वांमुळे एसटीचा तोटा हा ५ हजार कोटींच्या पुढे पोहचला आहे.

 • म्हणूनच एसटी महामंडळाने ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी एक हजार बस या सीएनजीसाठी परावर्तित केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे असून एकुण १४० कोटी रुपये खर्च येणार आहे.

 • या निर्णयामुळे येत्या काळात डिझेलवरील खर्चाची बचत होणार आहे. सीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात या सीएनजी बस धावणार आहेत.

१४ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)