करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी करोना लस विकसित करणाऱ्यांमध्ये भारत बायोटेकदेखील आघाडीवर आहे. मात्र नुकतंच भारत बायोटेकने स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी याआधी ७५० स्वयंसेवकांवर चाचणी करणार होती, पण आता फक्त ३८० स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय चाचणी घेतली जाणाऱ्या साइट्सची संख्याही कमी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांमधील सेरोकोव्हर्जन किंवा इम्यूनोजेनिसिटीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ निरोगी स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता. सध्या स्वयंसेवकांना डोस देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरु होती. स्वयंसेवकांना ताप आणि शारिरीक वेदना याशिवाय इतर कोणताही मोठा त्रास जाणवला नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
कोव्हॅक्सिन ही एक 2-डोसची लस असून १४ दिवसांच्या अंतराने दिली जाण्याची योजना आहे. दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डेटा अद्याप प्रसिद्ध किंवा सार्वजनिक करण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी संख्या कमी केल्याने दुसऱ्या टप्पा लवकर संपेल आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. यामुळे कोव्हॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीचा संपूर्ण कालावधीदेखील कमी होईल. भारतात सध्या तीन लस वैद्यकीय टप्प्यात असून प्राथमिक निष्कर्ष हाती येण्यामध्ये जानेवारी उजाडेल आणि अंतिम निकाल मार्चच्या अखेर हाती येईल असं तज्ञांचं म्हणणं आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी, काँग्रेसचे पी. एल. पुनिया, राजबब्बर, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, भाजपचे नीरज शेखर यांच्यासह ११ राज्यसभा सदस्य २५ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेसाठी ९ नोहेंबर रोजी निवडणूक होईल.
सपचे पाच, भाजप व बसप, काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्यांच्या सहा वर्षांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. सध्या ३९५ सदस्यसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडे मित्र पक्षांसह ३१८ मते आहेत.
पहिल्या पसंतीची ३७ मते गरजेची आहेत. त्यामुळे भाजपचे किमान ८ उमेदवार राज्यसभेवर निवडून येऊ शकतात. यात सर्वाधिक नुकसान सपचे होणार आहे. सपने रामगोपाल यादव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. सपकडे ४८ जागा आहेत. काँग्रेसकडे केवळ सात मते आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावर उमेदवार जिंकून आणणे कठीण आहे.
बिहारमध्ये २८ ऑक्टोबर, ३ व ७ नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे. ३ नोव्हेंबर रोजी १० राज्यांतील ५४ विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. जूनमध्ये १९ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक घेण्यात आली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला होता. त्याचवेळी पुढची परीक्षा कधी होईल ते जाहीर करण्यात येईल असं सांगितलं होतं. तसंच पुढच्या परीक्षेची तारीख रद्द होणार नाही असंही स्पष्ट केलं होतं. दरम्यान नोव्हेंबरमध्ये होणारी परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती. आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. विनायक मेटे यांनी ही मागणी लावून धरली होती. आता या परीक्षांच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत असंही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएसीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सातत्याने मराठा समाजाकडून होत होती. दरम्यान यासंदर्भातला निर्णय ठाकरे सरकारने ९ तारखेला जाहीर केला. त्यामध्ये ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातली करोना स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं ठाकरे सरकारने जाहीर केलं होतं.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.