चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 14, 2022 | Category : Current Affairs


ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:इंग्लंडचा ऐतिहासिक विश्वविजय :
 • इंग्लंडच्या मर्यादित षटकांतील क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा आणखी एक अध्याय रविवारी लिहिला गेला. डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनचा (३/१२) भेदक मारा आणि दडपणाखाली आपला खेळ उंचावण्यासाठी ओळखला जाणाऱ्या बेन स्टोक्सच्या (४९ चेंडूंत नाबाद ५२ धावा) अर्धशतकामुळे इंग्लंडने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून मात करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच या विश्वविजयासह इंग्लंडने नवा इतिहासही रचला. एकाच वेळी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडे बाळगणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.

 • इंग्लंडने २०१९मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. हा अनुभव यंदा त्यांच्या कामी आला. पाकिस्तानचा संघ १९९२च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक होता. मात्र, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) झालेल्या अंतिम सामन्यात बाबर आझमचा पाकिस्तान संघ २० षटकांत ८ बाद १३७ धावाच करू शकला. त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडला या धावा करण्यासाठी झुंजवले. मात्र, अखेरीस २०१९च्या विश्वचषकाप्रमाणे डावखुऱ्या स्टोक्सच्या निर्णायक योगदानामुळे इंग्लंडला विजय मिळवणे शक्य झाले. इंग्लंडने १३८ धावांचे लक्ष्य १९ षटकांत गाठले आणि २०१० नंतर दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.

 • ‘एमसीजी’वर झालेल्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट होते. मात्र, पावसाने व्यत्यय आणला नाही. परंतु ढगाळ वातावरण आणि हिरवीगार खेळपट्टी लक्षात घेऊन इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी िस्वगचा चांगला वापर करत पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांना सतावले. डावाच्या पाचव्या षटकात करनने रिझवानला (१४ चेंडूंत १५) माघारी पाठवले.

‘मुंबई इंडियन्स’नंतर मुकेश अंबानींना हवीये ‘लिव्हरपूल’चीही मालकी! फुटबॉल क्लबकडे केली विचारणा :
 • जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या लिव्हरपूलला लवकरच नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. ‘द मिरर’च्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी लिव्हरपूल क्लब खरेदी करण्याासाठी इच्छूक असून त्यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असल्याची माहिती आहे. सध्या लिव्हरपूलची मालकी फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे असून त्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये हा क्लब खरेदी केला होता. दरम्यान, फेनवे स्पोर्ट्स ग्रुप हा क्लब विकण्याच्या तयारीत असून त्याची किंमत ४ कोटी पौंड ठेवली असल्याची माहिती आहे.

 • मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत उद्योपतींपैकी एक असून फोर्बच्या यादीनुसार ते आठव्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सने १२ वर्षांपूर्वीही लिव्हरपूल क्लबमध्ये भागीदारी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रिलायन्स आणि सहारा ग्रुप मिळून लिव्हरपूल विकत घेण्याच्या तयारीत होते. मात्र, आता केवळ रिलायन्सकडून हा क्लब खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 • दरम्यान, मागील काही वर्षांपासून रिलायन्स ग्रुपने खेळावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्सग्रुपकडे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचीही मालकी आहे. तसेच इंडियन फुटबॉल सुपर लीग स्थापन करण्यातही रिलायन्सची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

भारत-ब्रिटनला परस्परांची आता अधिक आवश्यकता - जॉन्सन :
 • ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनचे संबंध अभूतपूर्व स्वरूपात पुढे जाणार आहेत, असा विश्वास ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी व्यक्त केला. दोन्ही देशांना परस्परांची कधी नव्हती एवढी आवश्यकता आहे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

 • दोन्ही देशांनी मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पुढील दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही, असे जॉन्सन यांनी सांगितले.

 • एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, आपण धोकादायक आणि कठीण कालखंडातून जात आहोत. दोन्ही देशांना परस्परांची पूर्वीपेक्षा अधिक आवश्यकता आहे.

ट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय :
 • ट्विटरनं या आठवड्यात लॉन्च केलेलं ट्विटर ‘ब्लू टीक’ सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द केलं आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे. युजर्संकडून मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर होत असल्याचंही पुढे आले आहे. ज्या ग्राहकांनी याआधी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे.

 • या प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ट्विटर ब्लू सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हे बॅज तयार केले होते.

 • व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’चा युजर्सकडून गैरवापर - व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली आहे. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली आहे. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डची खिल्ली उडवली आहे.

 • ‘ट्विटर ब्लू’ काय आहे - या सेवेअंतर्गत ट्विटर युजर्संना कुठल्याही पडताळणी प्रक्रियेशिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार आहे. या सेवेचे सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्संना ट्विटरच्या इतर सेवांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या सेवेमुळे काही युजर्संमध्ये मतभेद आहेत. ट्विटर पैसे आकारून सर्वांना हा बॅज देत असल्यामुळे या सेवेचा गैरवापर होऊ शकतो, अशी शंका काही युजर्संना आहे. ‘रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये ‘ट्विटर ब्लू’ युजर्संना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय युजर्संना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यास युजर्सची सुटका होणार आहे.

१४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)