चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ नोव्हेंबर २०२०

Date : 14 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अ‍ॅरिझोनामध्ये बायडेन विजयी :
  • अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी अ‍ॅरिझोनातील निवडणूक कमी मताधिक्याने जिंकली आहे. राज्यातील  ११ प्रतिनिधी मते त्यांना मिळाली असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांनी निर्णायक विजय मिळवला.  डेमोक्रॅटिक पक्षाला सात दशकांत अ‍ॅरिझोनामध्ये मिळालेला हा दुसरा विजय आहे. एकेकाळी तो रिपब्लिकनांचा बालेकिल्ला होता.

  • मतमोजणी ३ नोव्हेंबरला सुरू  झाल्यानंतर नवव्या दिवशी अ‍ॅरिझोनाचा निकाल लागला आहे. राज्यातील ११ प्रतिनिधी मते बायडेन यांना मिळाल्याने आता २९०-२१७ असे प्रातिनिधिक मतांचे बलाबल आहे. बायडेन यांना अ‍ॅरिझोनात ११००० मतांनी म्हणजे ०.३ टक्क्य़ांच्या फरकाने विजय मिळाला आहे.

  • १९९६ मध्ये अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अ‍ॅरिझोनातून विजय मिळवला होता असे दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. बायडेन यांनी तीनशे मतांच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवली आहे. अ‍ॅरिझोनात १९९६ नंतर डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळाला नव्हता. हिलरी क्लिंटन यांचा २०१६ मध्ये ट्रम्प यांनी अ‍ॅरिझोनात पराभव केला होता.

  • डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय हा मॅरीकोपा भागातील मतदानामुळे झाला आहे. अ‍ॅरिझोनात १९४८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे हॅरी ट्रमन यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर १९९६ मध्ये बिल क्लिंटन व आता बायडेन यांनी विजय संपादन केला. बहुमतासाठी ५३८ पैकी २७० मते आवश्यक असतात, ती बायडेन यांना आधीच मिळाली असल्याने त्यांना माध्यमांनी विजयी जाहीर केले.

रशियाच्या लशीच्या भारतात चाचण्या :
  • हैदराबाद : रशियाची ‘स्पुटनिक-५’ ही करोना प्रतिबंधक लस भारतात आली असून ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’ या कंपनीला या लशीच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी’ करणार आहे.

  • समाजमाध्यमांवर याबाबत चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात ‘स्पुटनिक -५’असे ठळक अक्षरात लिहिलेल्या कुप्यांची खोकी  एका लहान ट्रकमधून खाली उतरवली जात असताना दिसत आहेत.

  • ‘दी न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे,की ‘डॉ. रेड्डीज’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतात स्पुटनिक ५ लस दाखल झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. रशियाच्या ‘गेमालेया नॅशनल रीसर्च इन्स्टिटयूट’ या संस्थेची ही लस ९२ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा :
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

  • यापूर्वी आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यापुढची बैठक १५ नोव्हेंबरला होणार आहे अशीही माहिती नितीश कुमार यांनी दिली.

  •  

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल ११ नोव्हेंबरच्या पहाटे लागला. या निकालात एनडीएलाच बहुमत मिळालं आहे. मात्र भाजपाच्या जागा वाढल्या आहेत तर जदयूच्या जागा कमी झाल्या आहेत. असं असलं तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील हे भाजपाने स्पष्ट केलं आहे.

  • असं असलं तरीही जदयूच्या जागा कमी झाल्याने नितीश कुमार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता बिहारमध्ये सत्ता स्थापन होताना काही नाट्यमय घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंतप्रधान मोदी यंदा जैसलमेर सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी :
  • दरसालप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी यंदा ते राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवर पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना उपस्थित आहेत.

  • राजस्थानमधील जैसलमेर येथून भारत-पाकिस्तानची सीमारेषा जाते. या ठिकाणी सीमेवर बीएसएफचे जवान तैनात आहेत. प्रसिद्ध तनोट माता मंदिरही याच ठिकाणी आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी येथील लोंगेवाला भागात बीएसएफच्या जवानांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली तसेच दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटप करणार आहेत.

  • गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. सैन्याच्या गणवेशात ते जवानांमध्ये जाऊन त्यांना मिठाईचे वाटप केले होते. तत्पूर्वी २०१८ मध्ये त्यांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

‘सर्वाधिक अंधश्रद्धा वैद्यकीय क्षेत्रात’ :
  •  देशात धर्माच्या खालोखाल सर्वात जास्त अंधश्रद्धा या वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अंधश्रद्धा रोखणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

  • आरोग्य या विषयासाठी वाहिलेल्या ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी विरारमध्ये झाले. विरार येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी हे संपादक असलेल्या या दिवाळी अंकाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

  • संरक्षण आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून कुबेर म्हणाले,‘ वैद्यकीय क्षेत्रातील अंधश्रद्धेमुळे अनारोग्य तयार झाले तितके औषध कंपन्यांमुळे झालेले नाही. ऐकीव माहितीवर नखांवर नख घासणे, स्मरणशक्ती वाढविणारी औषधे घेणाऱ्यांच्या संख्येवरूनच या अंधश्रद्धांची कल्पना करता येईल.’

  • अफवांचा बुडबुडा विचारांच्या टाचणीने फोडता येऊ शकतो. पण, नवीन प्रश्न विचारण्याची लोकांमधील जाणीवच हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. समूहाचे मानसशास्त्र अफवांवर आहे. अशा वेळी जनजागृती करणे हे कठीण काम असल्याचे त्यांनी नमूद केले.

१४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.