चालू घडामोडी आणि दिनविशेष - 14 जून 2023

Date : 14 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य बावीस अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १५ जूनपासून
  • सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्पा म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसाठी या परीक्षेतील गुण महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार सीईटी सेलकडून बावीस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
  • एमबीए, एमसीए, विधी हे पाच वर्षीय अभ्यासक्रम, कृषी, अभियांत्रिकी, फार्मसी यासाठी १५ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. तर हॉटेल मनेजमेंट, नियोजन, बी.टेक, फाईन आर्टस व अन्य अभ्यासक्रमांची नोंदणी १६ जूनपासून सुरू होईल.
  • केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.
‘NEET’चा निकाल जाहीर; राज्यातील श्रीनिकेत रवी, तनिष्क भगत, रिद्धी वजारींगकर देशातील पहिल्या पन्नासमध्ये
  • वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) बुधवारी मंगळवारी रात्री प्रसिद्ध केला. त्यात ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले असून राज्यातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ९९.९९ पर्सेंटाइल मिळवलेल्या देशातील पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील श्रीनिकेत रवीने सातवा, तनिष्क भगतने २७वा आणि रिद्धी वजारींगकरने ४४वा क्रमांक मिळवला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत.
  • एनटीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  यंदा देशभरातील ४ हजार ९७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. २० लाख८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले. तामिळनाडूच्या प्रभंजन जे आणि बोरा वरूण चक्रवर्ती यांनी संयुक्तरित्या देशात पहिला क्रमांक मिळवला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नीटसाठीच्या नोंदणीसह पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.  
  • देशात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १ लाख ३९ हजार ९६१ विद्यार्थी पात्र ठरले. राज्यातील २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २ लाख ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. श्रीनिकेत रवीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. राज्यातील आर्या पाटील, हादी सोलकर यांनी अपंग प्रवर्गातील, पलक शहाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील, आयुष रामटेकेने अनुसूचित जाती प्रवर्गातील, शिवम पाटील इतर मागास वर्ग प्रवर्गातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.
किरकोळ महागाईदराचा दोन वर्षांतील नीचांक, मे महिन्यात ४.२५ टक्क्यांवर
  • भाजीपाला, तृणधान्य किमती घसरल्यामुळे सरलेल्या मे महिन्यात किरकोळ महागाई दर २५ महिन्यांच्या नीचांकी ४.२५ टक्क्यांवर नोंदवला गेला. महागाई दरात घसरणीचा हा क्रम सलग चौथ्या महिन्यात कायम असून, रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील मर्यादा पातळी अर्थात सहा टक्क्यांखाली तो नोंदवला जाण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.
  • ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर आधीच्या एप्रिल महिन्यात ४.७ टक्के पातळीवर होता, तर गेल्या वर्षी म्हणजे मे २०२२ मध्ये तो ७.०४ टक्के अशा चिंताजनक पातळीवर होता. एप्रिल २०२१ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ४.२३ टक्क्यांच्या महागाई दरानंतर नोंदवला गेलेला सर्वात कमी दर आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये महागाई दर ४ टक्क्यांच्या पातळीखाली नोंदवला गेला होता.
  • अन्नधान्य घटकाच्या किमती घट झाल्याचा परिणाम मे महिन्याच्या एकंदर महागाई दरातील घसरणीत दिसून आला. एप्रिलमध्ये ३.८४ टक्के नोंदवलेली अन्नधान्यांच्या किमतीतील वाढ ही मे महिन्यात २.९१ टक्क्यांवर घसरली. ग्राहक किंमत निर्देशांकांत जवळपास निम्मा वाटा हा अन्नधान्य घटकाचा आहे. बरोबरीने इंधन आणि विजेच्या महागाईचा दरही एप्रिलमधील ५.५२ टक्क्यांवरून मागील महिन्यात ४.६४ टक्क्यांवर आला.

व्याजदर कपात शक्य?

  • गेल्या आठवडय़ात रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६.५ टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवून चलनवाढीतील ताज्या उताराच्या शाश्वततेबद्दल साशंकता व्यक्त केली. ’महागाईवर ‘अर्जुनासारखा नेम’ रोखून धरणे गरजेचे असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते.
  • ’चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ चलनवाढीचा दर सरासरी ५.१ टक्के आणि एप्रिल ते जून तिमाहीत तो ४.६ टक्क्यांवर राहण्याचे मध्यवर्ती बँकेचे अनुमान आहे. प्रत्यक्षात मे महिन्याची आकडेवारी ही या अंदाजाहून अधिक घसरण दर्शविणारी आहे.’एल-निनोच्या परिणामाच्या शक्यता असतानाही यंदा पाऊसपाणी सामान्य राहिल्यास, महागाई दराच्या घसरणीचा क्रम टिकून राहील आणि नजीकच्या काळात व्याजदर कपातही दिसून येईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबई, पुण्यासह सात शहरांसाठी केंद्राच्या आपत्ती निवारण योजना; अमित शाहंची घोषणा
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सर्व राज्यांतील अग्निशमन सेवा आधुनिक करण्यासाठी, सात प्रमुख शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी आणि १७ राज्यांतील भूस्खलन रोखण्यासाठी आठ हजार कोटींहून अधिक किमतीच्या तीन मोठय़ा योजना जाहीर केल्या.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना शाह यांनी देशात कुठेही कुठल्याही आपत्तीत एकही नागरिक मृत्युमुखी पडू नये, यासाठी पावले उचलण्याचे आवाहनही केले.
  • शहा यांनी सांगितले, की राज्यांमध्ये अग्निशमन सेवेच्या विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांची मदत दिली जाईल. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांतील पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींची तरतूद केली आहे.
  • भूस्खलन रोखण्यासाठी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ८२५ कोटी रुपयांचा ‘राष्ट्रीय भूस्खलन जोखीम प्रतिबंधक प्रकल्प’ सुरू करण्यात येणार आहेत. आपत्तीमुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये यासाठी आपला प्रयत्न असायला हवा. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व राज्यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्या राज्यांत अणुऊर्जा प्रकल्प उभारले जात आहे, तेथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पाहणी दौरे केले गेले आहेत. अशा राज्यांत आपत्तीच्या काळात बचावासाठी करावयाच्या उपायांची विशिष्ट पद्धत कळवण्यात आली आहे.

 

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा - महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी :
  • महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदके पटकावली. मात्र हरयाणाच्या बॉक्सिंगपटूंनी महाराष्ट्राच्या तुलनेत दर्जेदार कामगिरी केली. त्यामुळे स्पर्धेअंती महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर हरयाणाने बाजी मारली.

  • या स्पर्धेतील अग्रस्थानासाठी महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात अखेरच्या दिवसापर्यंत चढाओढ सुरू होती. मात्र यजमान हरयाणाला अखेरीस वरचढ ठरण्यात यश आले. अंतिम पदकतालिकेत अग्रस्थान पटकावणाऱ्या हरयाणाच्या खात्यावर ५२ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४६ कांस्य अशी एकूण १३७ पदके होती. तर दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्राने ४५ सुवर्ण, ४० रौप्य आणि ४० कांस्यपदकांसह एकूण १२५ पदके पटकावली.

  • सोमवारी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात ओडिशावर २१-२० असा निसटता विजय नोंदवत जेतेपद मिळवले. या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मि. संरक्षण), प्रीती काळे (१:४५, २:४० मि. संरक्षण आणि २ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • मुलांच्या अंतिम सामन्यातही महाराष्ट्राने ओडिशाला १४-११ असे एक डाव आणि तीन गुणांच्या फरकाने नमवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. या सामन्यात शुभम थोरात (२ मि. संरक्षण आणि २ बळी), नरेंद्र कातकडे (२ मि. संरक्षण आणि २ बळी) यांनी चमकदार कामगिरी केली.
एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स नियोजित वेळेनुसार भारताला मिळणार :
  • एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु असताना भारत देशाला रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी ७५ वर्षे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर रशियामधील डायजेस्ट या नियतकालीकामध्ये अलिपोव यांनी वरील भाष्य केले आहे.

  • भारताने २०१८ साली एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी पाच मिलियन अमेरिकी डॉलर्सचा रशियासोबत करार केला होता. या करारांतर्गत भारताला ५ एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या. मात्र मागील काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. तसेच अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक तसेच विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या मिसाईल सिस्टिम्सचा भारताला पुरवठा होण्यास विलंब होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता रशियाचे राजदूत अलिपोव यांनी भारताला या एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम्सचा पुरवठा वेळेत होईल असे सांगितले आहे.

  • तसेच अलिपोव यांनी डायजेस्ट या मासिकात लिहिलेल्या लेखामध्ये भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक तसेच अन्य संबंधावरही विस्तृत भाष्य केलं आहे. त्यांनी १९५०-६० या काळात भारत देशातील औद्योगिकीकरण तसेच उर्जा प्रकल्प उभारणी याचा उल्लेख केला. तसेच त्यांनी १९६० साली मुंबई येथे आयआयटीची स्थापना, १९७१ साली शांतता, मैत्री आणि सहकार्याचा करण्यात आलेला करार, १९८४ साली सोयुझ टी-११ अंतराळ यानामधून पहिल्या भारतीय अंतराळवीराचे उड्डाण, २००० साली भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या धोरणात्मक भागिदारीचा करार या सर्वांचा उल्लेख केला.

पंतप्रधान आज देहूमध्ये :
  • जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

  • नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत.

  • दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून १० मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.

बारावी विज्ञान शाखेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थीसंख्येत २० हजारांनी वाढ :
  • राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत २०२० च्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेत मराठी माध्यम निवडलेल्या विद्यार्थिसंख्येत सुमारे २० हजारांनी वाढ झाली आहे. तर यंदा विज्ञान शाखेचा मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा निकाल जवळपास सारखाच आहे.

  • यंदा विज्ञान शाखेत ६ लाख २४ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परीक्षा दिलेल्या ६ लाख २२ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख १२ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी माध्यमातून ४ लाख १९ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ४ लाख १८ हजार १४७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर ४ लाख १० हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.०९ आहे. तर मराठी माध्यमातून नोंदणी केलेल्या १ लाख ८८ हजार ८१० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८८ हजार १२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९८.८६ टक्के, म्हणजेच १ लाख ८६ हजार ९७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत विज्ञान शाखेत एकूण ५ लाख ६० हजार ५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

  • प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५ लाख ५८ हजार ६०९ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४१ हजार ४०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. इंग्रजी माध्यम घेतलेल्या ३ लाख ७६ हजार ४१२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ५०८ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ६३ हजार ९६५ विद्यार्थी, म्हणजेच ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मराठी माध्यमातून १ लाख ६८ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ६८ हजार २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९७.२४ टक्के, म्हणजे १ लाख ६३ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२० मध्ये वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमातून २ लाख ४ हजार ८११, तर मराठी माध्यमातून १ लाख २७ हजार ८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत इंग्रजी माध्यमातून १६ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मराठी माध्यमातून ३ लाख २४ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२२ मध्ये वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमातून २ लाख ७ हजार ५१८, तर मराठी माध्यमातून १ लाख १३ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  • कला शाखेत  इंग्रजी माध्यमातून १९ हजार १४५ आणि मराठी माध्यमातून ३ लाख ३४ हजार ८३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे वाणिज्य शाखेतील मराठी माध्यमात २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये मराठी माध्यमाचे १४ हजार विद्यार्थी कमी झाले. तर कला शाखेतील मराठी माध्यमाचे जवळपास १० हजार विद्यार्थी वाढल्याचे दिसून येते.

विश्वचषक पॅरानेमबाजी स्पर्धा - अवनीला दुसरे सुवर्ण :
  • भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. अवनीने महिलांच्या आर८ गटातील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन एसएच१ गटात सुवर्ण कामगिरी केली.

  • अवनीने ४५८.३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. तर व्हेरॉनिका व्हादोव्हिकोव्हा (४५६.६ गुण) आणि स्वीडनची अ‍ॅना नॉर्मन (४४१.९ गुण) या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या.

  • राजस्थानच्या अवनीला अंतिम फेरीच्या सुरुवातीला अपेक्षित खेळ करता आला नाही. मात्र, अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये सलग १० गुणांवर लक्ष्य साधत त्याने विजय साकारला. लेखराने यापूर्वी महिलांच्या आर२ गटातील १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

  • दुसरीकडे, भारताची युवा पॅरानेमबाज रुबीना फ्रान्सिसने  महिलांच्या पी२ गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ प्रकारात  कांस्यपदक पटकावले.

युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा - भारताला दोन रौप्यपदके :
  • आकांक्षा व्यवहारे (४० किलो) आणि विजय प्रजापती (४९ किलो) या भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई केली.

  • मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षाने एकूण १२७ किलो (५९ किलो व ६८ किलो), तर विजयने १७५ किलो (७८ किलो व ९७ किलो) वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. आकांक्षा आणि विजय हे अनुक्रमे औरंगाबाद आणि पतियाळा येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलंसमध्ये सराव करतात.

  • युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटूंनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन. राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षकांनी कमी वेळेमध्ये वेटलििफ्टगपटूंची तयारी करून घेतली. त्यामुळे त्यांनाही या दर्जेदार कामगिरीचे श्रेय जाते, असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी सांगितले.

१४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.