चालू घडामोडी आणि दिनविशेष - 14 जुलै 2023

Date : 14 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

‘चंद्रयान-३’चे आज उड्डाण; उलटगणती सुरू, दु. २.३५ वाजता प्रक्षेपण
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली. आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
  • २०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न ‘इस्रो’ने केला होता. या लँडरसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा ‘रोव्हर’ही धाडण्यात आला होता. मात्र लँडर चांद्रपृष्ठावर कोसळल्यामुळे ही मोहीम अंशत: यशस्वी ठरली. आता चंद्रयान-३ मोहिमेत या त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे.
  • ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. वैज्ञानिकांमध्ये ‘फॅट बॉय’ म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम-३ (पूर्वीचे जीएसएलव्ही-एमकेएल-२) हे प्रक्षेपणयान अतिशय जड वस्तूमान अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम आहे. आतापर्यंत प्रचंड यशस्वी ठरलेल्या या प्रक्षेपणयानाची ‘चंद्रयान-३’ ही चौथी मोहीम आहे.

मोहिमेचे तीन मुख्य टप्पे

  • ’यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे
  • ’चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)
  • ’‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर
२० वर्षांतील चांद्रमोहिमेचे यश
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) ‘चंद्रयान-३’ चंद्रावर झेपावण्यासाठी सज्ज झाले असून आज, शुक्रवारी दुपारी या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. २००३ मध्ये चांद्रयानाची घोषणा झाल्यानंतर गेल्या २० वर्षांत देशाची चांद्रमोहीम विकसित होत गेली. देशाच्या चांद्रमोहिमेचा आढावा..

चंद्रयान-१

  • * भारत सरकारने २००३ मध्ये चंद्रयान ही संकल्पना तयार केली. त्यानंतर १५ ऑगस्ट २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी औपचारिकपणे देशाच्या चांद्रमोहिमेची घोषणा केली.
  • * २२ ऑक्टोबर २००८ रोजी ‘इस्रो’ने पीएसएलव्ही-सी ११ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-१’चे यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही-सी ११ ही पीएसएलव्हीच्या मानक कॉन्फिगरेशनची अद्ययावत आवृत्ती होती. लिफ्ट-ऑफच्या वेळी ३२० टन वजनाच्या वाहनाने उच्च पेलोड क्षमता प्राप्त करण्यासाठी मोठय़ा स्ट्रॅप-ऑन मोटरचा वापर केला. तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे पीएसएलव्ही-सी ११ तयार करण्यात आले होते.
  • * पहिल्या चंद्रयानात भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरिया येथे तयार केलेली ११ वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यात आली. तमिळनाडूतील प्रख्यात शास्त्रज्ञ मायिलसामी अन्नदुराई यांनी ‘चंद्रयान-१’चे मोहिमेचे नेतृत्व केले.
  • * चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर चंद्राभोवती फिरत होते.
  • * मोहिमेने सर्व इच्छित उद्दिष्टे साध्य केली असताना प्रक्षेपणानंतर काही महिन्यांनी मे २००९ मध्ये अवकाशयानाची कक्षा २०० किलोमीटपर्यंत वाढविण्यात आली. 
  • * चंद्रयान-१ने चंद्राभोवती ३,४०० पेक्षा जास्त प्रदक्षिणा केल्या. २९ ऑगस्ट २००९ रोजी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या अंतराळ यानाचा संपर्क तुटल्याचे घोषित केल्यामुळे या मोहिमेचा शेवट झाला.
आयसीसीचा ऐतिहासिक निर्णय! टूर्नामेंटमध्ये पुरुष आणि महिला संघांना मिळणार समान बक्षीस रक्कम
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्या अंतर्गत आता आयसीसी स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ जिंकल्यानंतर समान बक्षीस रक्कम दिली जाईल. आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये पुरुष संघाला महिला संघापेक्षा जास्त बक्षीस रक्कम दिली जात होती, पण आता तसे होणार नाही.
  • क्रिकेटमधील पुरुष आणि महिला संघातील असमानता संपवण्यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे, जे एक कौतुकास्पद आहे. आयसीसीच्या या मोठ्या पावलाचा क्रिकेटला अधिक फायदा होणार आहे, तर खेळाडूंचा उत्साहही वाढणार आहे.
  • आयसीसीने बदलला स्लो ओव्हररेटचा नियम –
  • आयसीसीने आता स्लो ओव्हररेटच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता हा नियम सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात लागू केला जाईल. त्यामुळे आता जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत कमी षटके टाकली, तर त्यानंतर टाकलेल्या सर्व षटकांना मॅच फीच्या पाच टक्के दंड आणि कमाल दंड ५० टक्के इतका मर्यादित असेल.
  • आयसीसीच्या या घोषणेनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विटमध्ये लिहले की, “लैंगिक समानता आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आता आयसीसी स्पर्धेसाठी पुरूष आणि महिलांच्या सर्व संघांना समान बक्षीस रक्कम दिली जाईल. आपण सगळे मिळून पुढे जाऊया.”
राफेल खरेदी प्रस्तावाला मंजुरी; पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर
  • भारताने फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच बनावटीच्या तीन स्कॉर्पियन पाणबुडय़ा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण खरेदी समितीने (डीएसी) या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. यामध्ये संबंधित पूरक उपकरणे, शस्त्रे, सुटे भाग, कर्मचारी प्रशिक्षण इत्याही बाबींचाही समावेश असेल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आगमन झाले. मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दरम्यान शुक्रवारी चर्चा झाल्यानंतर या खरेदी प्रस्तावाची घोषणा अपेक्षित आहे. यामध्ये चार विमाने ही प्रशिक्षक विमाने असतील अशी माहिती संरक्षण खात्यातील सूत्रांकडून मिळाली. करारावर सही केल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत विमानांच्या वितरणाला सुरुवात होईल. तसेच तपशीलवार किमतीच्या वाटाघाटी अजून सुरू आहेत, त्यामुळे अंतिम करार होण्यासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहितीही देण्यात आली.
  • फ्रान्स दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दरम्यान विविध विषयांवर व्यापक चर्चा होणार असून त्यानंतर ते फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन सोहळय़ामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या सोहळय़ामध्ये भारताचे २६९ सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे.
  • भारतीय समुदायाशी संवाद  ‘पॅरिसमध्ये पोहोचलो. या भेटीमध्ये भारत-फ्रान्स सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहे. माझ्या विविध कार्यक्रमांमध्ये संध्याकाळी भारतीय समुदायाशी संवाद साधण्याचाही समावेश आहे’, असे ट्वीट मोदी यांनी पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर केले. पॅरिसमधील हॉटेलवर आल्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वागताला जमलेल्या भारतीय समुदायातील सदस्य आणि मुलांशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटल्यानंतर तिथे जमलेल्या भारतीयांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.
चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी इस्रोकडून खास व्यवस्था; ‘या’ ठिकाणी करावी लागेल नोंदणी
  • भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • चांद्रयान-३ च्या लँडरने २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित आहे. ६१५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान -३ या मोहिमेचे उद्दिष्ट हे रोव्हरला चंद्राच्या कक्षेमध्ये पोचवणे व चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे हे आहे.
  • अवकाशात गेल्यावर Chandrayaan-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-3 हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर लँडरमधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे.

Chandrayaan-3 Launch: कुठे आणि कसे पाहता येणार ऑनलाईन ?

  • राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना चांद्रयान-३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. नागरिकांना हे थेट प्रक्षेपण https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION या लिंकवर नोंदणी करून SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून पाहता येणार आहे. ISRO ने ट्विट करत नागरिकांना हे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - शाहू-मेहुलीला सुवर्ण; पलक-शिवाला कांस्यपदक :
  • मेहुली घोष आणि शाहू माने यांनी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात बुधवारी भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले, तर १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटामध्ये पलक व शिवा नरवाल जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • शाहू व मेहुली जोडीने निर्णायक फेरीत हंगेरीच्या ईस्झटर मेसझारोस आणि इस्तवान पेन जोडीला १७-१३ असे चुरशीच्या लढतीत नमवले. या गटात इस्राइलने तिसरे आणि चेक प्रजासत्ताकने चौथे स्थान मिळवले. शाहूचे भारताकडून वरिष्ठ गटासाठीचे हे पहिले सुवर्णपदक आहे, तर मेहुलीने दुसऱ्यांदा देशासाठी सुवर्णकामगिरी केली आहे. यापूर्वी तिने २०१९ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

  • एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटामधील कांस्यपदकाच्या एकतर्फी सामन्यात भारताच्या पलक आणि शिवा जोडीने कझाकस्तानच्या इरिना लोकतिओनोव्हा आणि व्हालेरिया रखिमझान जोडीला १६-० असे पराभूत करत बाजी मारली. या कामगिरीमुळे भारतीय संघाने पदकतालिकेत सर्बियानंतर दुसरे स्थान गाठले. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक मिळवले आहे.

श्रीलंकेत आणीबाणी - रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती :
  • श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालल्याचं दिसू लागलं आहे. एकीकडे आर्थिक संकटामुळे जनतेचं कंबरडं मोडलं असताना दुसरीकडे राजकीय पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून या संकटावर उपाय शोधण्यासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीयेत. त्यामुळे जनता अधिकाधिक आक्रमक होत असताना श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रानील विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

  • श्रीलंकेत अभूतपूर्व परिस्थिती - गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे एकूणच श्रीलंकेतील राजकीय व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या कुटुंबाकडे असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असतानाच श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा आणि रोजच्या आहारासाठी देखील रस्त्यावर उतरण्याची नागरिकांवर आलेली वेळ या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा रोष आणि आर्थिक आरिष्ट या पार्श्वभूमीवर चिघळलेली परिस्थिती पाहून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी मालदीवमध्ये पळ काढला आहे.

  • आता जबाबदारी विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर - राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाचे सर्व अधिकार त्यांनी बहाल केल्याची माहिती श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेयवर्धने यांनी दिली आहे. त्यामुळे आता सध्याच्या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी रानील विक्रमसिंघे यांच्यावर येऊन पडली आहे. विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा केली असून इथून पुढे सर्व अधिकार हे केंद्रीय सत्तेच्या हाती असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. देशातील अनेक संवेदनशील भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान - पहिल्या फेरीत सर्वाधिक मतं :
  • ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान पदाच्या एक पाऊल जवळ पोहोचले आहेत. सुनक यांनी पहिल्या फेरीत सर्वाधिक मतं मिळवली आहेत. यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील दोन उमेदवार बाद ठरले असून ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • कोण आहेत ऋषी सुनक - मूळचे भारतीय असलेले ऋषी सुनक हे इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक हे बोरिस जॉन्सन सरकारच्या काळात अर्थमंत्री होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुनक हे पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहेत. ४२ वर्षीय सुनक यांची फेब्रुवारी २०२० मध्ये बोरिस जॉन्सन यांनी अर्थमंत्री पदी नियुक्ती केली होती. या वर्षी जानेवारीमध्ये ब्रिटनच्या एका सट्टेबाजाने बोरिस जॉन्सन राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी ऋषी सुनक पंतप्रधान बनतील, अशी भविष्यवाणी केली होती.

  • ऋषी सुनक यांचे शिक्षण आणि कारकीर्द - भारतीय वंशाच्या ऋषी यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षणही घेतले आहे. आपल्या शैक्षणिक काळात ते हुशार विद्यार्थी होते. ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशननंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्म्समध्ये भागीदार बनले. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांना अर्थसहाय्य देते.

उद्यापासून ७५ दिवस वर्धक मात्रा मोफत; केंद्र सरकारची घोषणा :
  • सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे करोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळण्याचे संकेत आहेत. ‘‘देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असून, अमृत महोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत वर्धक मात्रा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला’’ अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोना प्रतिबंधक लशीची पहिली आणि दुसरी मात्रा केंद्र सरकारने मोफत दिली होती. खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरणाचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला होता.

  •  आत्तापर्यंत ९६ टक्के पात्र लोकांना पहिली, तर ८७ टक्के पात्र नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील ७७ कोटी लोकसंख्येपैकी १ टक्क्यांहूनही कमी नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, ६० आणि त्याहून अधिक वयोगटातील सुमारे १६ कोटी पात्र लोकसंख्येपैकी सुमारे २६ टक्के नागरिकांना तसेच, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे.

  • गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशभर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली़  दोन्ही मात्रा घेतलेल्या बहुतांश नागरिकांनी वर्धक मात्रेकडे मात्र पाठ फिरवली़  आता वर्धक मात्राही मोफत देण्यात येणार असल्याने लसीकरणाची टक्केवारी वाढेल, असे मानले जाते.

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा - भारताच्या विजयात नवनीत चमकली :
  • नवनीत कौरने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत जपानवर ३-१ असा विजय मिळवला आणि स्पर्धेची सांगता नवव्या क्रमांकानिशी केली. नवनीतने (३०व्या मिनिटाला, ४५व्या मि.) दोन मैदानी गोल केले, तर दीप ग्रेस एक्काने (३८व्या मि.) पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले. जपानकडून एकमात्र गोल यू असाइने (२०व्या मि.)केला.

  • सामन्याच्या पहिल्या सत्रापासून दोन्ही संघांमध्ये गोल करण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. भारताच्या वंदना कटारियाने जपानच्या गोलजाळय़ाच्या दिशेने चेंडू मारला, मात्र जपानच्या गोलरक्षकाने तो रोखला. दुसऱ्या सत्रातही जपानने आक्रमक खेळ केला. त्यांच्या असाइने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने जपानची ही आघाडी फार काळ टिकू दिली नाही. नवनीतने निर्णायक क्षणी गोल केल्याने मध्यांतराला सामना १-१ असा बरोबरीत आणला.

  • तिसऱ्या सत्रात भारताने जपानच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. या सत्रात संघाने दोन गोल झळाकवत ३-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर भारताच्या बचावफळीने जपानला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली आणि आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत सामना जिंकला.

१४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.