चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जुलै २०२०

Date : 14 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“गुगल भारतात करणार ७५ हजार कोटीची गुंतवणूक”; सुंदर पिचई यांनी केली घोषणा :
  • गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे. पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • “आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.

  • गुगलकडून करण्यात येणारी गुंतवणूक ऑपरेशन्स व डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित असणार आहे असंही पिचई यांनी म्हटलं आहे.

पोरीनं नाव काढलं! CBSE बारावीच्या परीक्षेत मिळवले पैकीच्या पैकी गुण :
  • CBSE Results 2020 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकता. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही. यंदा ८८.७८ टक्के सीबीएसई विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईनं यंदा चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील ९४.३९ टक्के विद्यार्थाी पास झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदापण मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात ९२.१५ टक्के मुली पास झाल्या आहेत.

  • लखनऊच्या दिव्यांशी जैन या विद्यार्थीनीनं सीबीएसई बारावीत ६०० पैकी ६०० गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पैकीच्या पैकी गुण घेऊन दिव्यांशीनं ऐतिहासीक कामगिरी केली आहे. लखनऊमधील नवयुग रेडियंस स्कूलमध्ये दिव्यांशीनं शिक्षण घेतलं असून शाळेत आणि आजूबाजूच्या लोकांसाह नातेवाईकांनी दिव्यांशीला शुभेच्छा देत कौतुक केलं आहे.

  • मला पैकीच्या पैकी गुण मिळतील असा स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी प्रतिक्रिया दिव्यांशीने निकालानंतर दिली आहे. दहावीमध्ये दिव्यांशाला ९७.६ टक्के गुण मिळाले होते. दिव्यांशाचे वडिल प्रकाश जैन व्यावसायीक असून आई सीमा जैन गृहिणी आहे.

मे महिन्यातील CA च्या परीक्षा रद्द, ICAI ची सर्वोच्च न्यायालयात माहिती :
  • देशातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, भारतीय सनदी लेखाकार संस्था अर्थात ICAI ने आपली पहिल्या टप्प्यातली परीक्षा रद्द केली आहे. २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान CA च्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसोबत घेतली जाईल अशी माहिती ICAI च्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर दिली.

  • देशातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता ICAI ने परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना Opt-out चा पर्याय दिला होता. मात्र पहिल्या टप्प्यात परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय अन्यायकारक असल्याचा आरोप करत काही उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

  • याचिकाकर्त्याच्या वकिलांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी देशभरात परीक्षाकेंद्र वाढवून देण्यासोबत आणि काही मुद्द्यांवर आपला आक्षेप नोंदवला. ज्याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील अलोक श्रीवास्तव यांना आपली बाजू ICAI कडे थेट मांडण्याची मूभा असल्याचं सांगितलं.

“भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी” :
  • “भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली  यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसंच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत असंही ओली यांनी म्हटलं आहे.

  • नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटं आहे.

  • कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

भारत-चीन लष्करांदरम्यान आज उच्चस्तरीय चर्चेची चौथी फेरी :
  • ‘कालबद्ध पद्धतीने’ पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याच्या आणि फौजा माघारी घेण्याच्या पुढील टप्प्यासाठीच्या कार्यपद्धतीला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यान उच्चस्तरीय चर्चेची चौथी फेरी मंगळवारी होणार असल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी सोमवारी दिली.

  • वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची ही बैठक पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारतीय हद्दीत चुशुल येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू होईल, असे या सूत्रांनी सांगितले.

  • पँगाँग त्सो आणि डेप्सांग यांच्यासह इतर भागांतून फौजा माघारी घेण्याचा दुसरा टप्पा सुरू करणे, तसेच मागच्या बाजूच्या तळांवरून फौजा आणि शस्त्रास्त्रे कालबद्ध रीतीने मागे घेणे यावर चर्चेचा मुख्य भर राहणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

  • पँगाँग त्सो येथे भारत व चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी झालेल्या संघर्षांनंतर तणाव उद्भवण्यापूर्वी पूर्व लडाखमधील सर्व भागांमध्ये जी परिस्थिती होती, ती ‘पूर्णपणे जैसे थे’ केली जावी, यावर भारत भर देईल असेही सूत्रांनी सांगितले.

Coronavirus: शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा :
  • करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली असून शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे. रॉयटर्नसे यासंबंधी वृत्त दिलं आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच शाळांना राजकारणात आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकदा करोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलं आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.

  • करोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल अशी भीती टेड्रोस यांनी व्यक्त केली असून इशाराही दिला आहे.

१४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.