चालू घडामोडी आणि दिनविशेष - 14 फेब्रुवारी 2024

Date : 14 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
माजी भारतीय क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • भारतातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे मंगळवारी गुजरातमधील वडोदरा येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गायकवाड यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अंशुमन गायकवाड आहे. अंशुमन गायकवाडही भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
  • दत्ताजीराव गायकवाड हे १९५७-५८ मध्ये रणजी करंडक स्पर्धेत बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार होते. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने वडोदरा येथील मोतीबाग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सर्व्हिसेस संघाचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला होता.
  • गायकवाड हे भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सी. एस नायडू यांचे विद्यार्थी होते. १९८४ मध्ये बडोद्याच्या महाराजांनी युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सी.एस. नायडू यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी, गायकवाड १२ वर्षांचे होते आणि बडोद्यात भारताचे माजी कर्णधार सीके नायडू यांनी सुरू केलेल्या पहिल्या अंडर-१४ आणि १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.
  • सीएस नायडू यांच्याकडून लेग-स्पिन आणि गुगली गोलंदाजीचे डावपेच आत्मसात करणाऱ्या गायकवाड यांनी १९५२ ते १९६१ दरम्यान ११ कसोटी सामने खेळले आणि १९४८ मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीकडून (एकत्रित प्रांताचा भाग म्हणून) रणजी पदार्पण केले. पॉली उमरीगर आणि जी रामचंद हे त्यांचे सहखेळाडू होते.
  • विजय हजारेंसारख्या दिग्गजांशी भागीदारी करणारे गायकवाड हे एमएस युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघाची स्थापना झाल्यावर पहिले कर्णधार बनले होते. नंतर २००० पर्यंत बडोदा रणजी संघाचे प्रशिक्षकही राहिले. १९६० च्या उत्तरार्धात बडोदा क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट प्रशासक जयवंत लेले यांच्यासह गायकवाड यांनी सहसचिव म्हणूनही काम केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी बडोदा राज्याचे नियंत्रक म्हणूनही काम केले होते.
सहकारी श्रमपरिहारात दंग, हा मूनलायटिंगमध्ये सक्रिय
  • कोरोना काळात वर्क फ्रॉम होम लोकप्रिय झालं. घरुन काम करणं अनेकांना सोयीचं वाटू लागलं. कंपन्यांना मात्र कर्मचारी भौतिकदृष्ट्या समोर नसल्याने अडचण वाटू लागली. अनेक कर्मचाऱ्यांनी दृष्टीआड सृष्टीचा फायदा उठवत मूनलायटिंग सुरू केलं. एखाद्या कंपनीत अधिकृत कर्मचारी म्हणून काम करत असतानाच फावल्या वेळात अन्य कंपनीसाठी किंवा वैयक्तिक पातळीवर वेगळं काम सुरू करणं. असं काम ज्यातून अर्थार्जन होईल. तांत्रिकदृष्ट्या आर्थिक कमाईचा स्रोत विशिष्ट कंपनी असली तरी प्रत्यक्षात अनेक माणसं मूनलायटिंग करुन वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावू लागली. असं काम करुन पैसे कमावणं नैतिकतेत बसत नाही अशी ओरड झाली. त्याला मूनलायटिंग हे नाव मिळालं. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडच्या संघातील एका क्रिकेटपटूने चक्क मूनलायटिंग केलं आहे. विशेष म्हणजे या मूनलायटिंगला इंग्लंड क्रिकेट बोर्डाची परवानगी आहे. काहीही? असं तुम्हाला वाटेल ना. काहीसं तसंच आहे. समजून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण.
  • इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात आहे. हैदराबाद आणि विशाखापट्टणम इथे पहिली आणि दुसरी कसोटी झाली. त्यानंतर तब्बल १० दिवसांची विश्रांती आहे. भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरी परतले तर इंग्लंडचा संघ श्रमपरिहारासाठी अबूधाबीला रवाना झाला. दौरा सुरू होण्याआधी इंग्लंडचा संघ युएईतच होता. आशियाई उपखंडातील खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी सराव व्हावा म्हणून त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. आता ते ताण हलका करण्यासाठी तिथे गेले आहेत.
  • इंग्लंडच्या संघात डॅन लॉरेन्स नावाचा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीबरोबरीने लॉरेन्स फिरकी गोलंदाजी टाकतो. उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. भारत दौऱ्यासाठी डिसेंबर महिन्यात इंग्लंडने संघाची घोषणा केली. त्यामध्ये लॉरेन्सचं नाव नव्हतं. इंग्लंडने लॉरेन्सऐवजी हॅरी ब्रूकला पसंती दिली. तडाखेबंद फलंदाजीसाठी ब्रूक प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात झालेल्या मालिकेत ब्रूकने धावांची टांकसाळच उघडली होती. तो अनुभव लक्षात घेऊन निवडसमितीने ब्रूकला ताफ्यात समाविष्ट केलं. पण दौरा सुरू होण्यापूर्वीच इंग्लंडला धक्का बसला कारण वैयक्तिक कारणांसाठी ब्रूकने संपूर्ण दौऱ्यातून माघार घेतली. ब्रूकसारखा फलंदाज गमावणं हे निश्चितच मोठं नुकसान होतं. ब्रूकऐवजी इंग्लंडच्या निवडसमितीने डॅन लॉरेन्सची निवड केली.
  • भारतीय संघासाठी निवड न झाल्याने दुबईत सुरू असलेल्या IL20 स्पर्धेतील डेझर्ट व्हायपर्स संघाने लॉरेन्सला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आयत्या वेळी समाविष्ट केलं. कागदपत्रांची पूर्तता करुन लॉरेन्स इंग्लंडहून दुबईत दाखल झाला. व्हायपर संघासाठी एक सामना खेळला. तितक्यातच ब्रूकची बातमी त्याला कळली. निवडसमितीने त्याची निवड केल्याने त्याला भारतात जाणं भाग होतं. राष्ट्रीय संघासाठी खेळण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने लॉरेन्स भारतात दाखल झाला. मूळ योजनेचा हिस्सा नसल्याने इंग्लंड संघव्यस्थापनाने लॉरेन्सची अंतिम अकरात निवड केली नाही. लॉरेन्सने या काळात राखीव खेळाडूचं काम केलं. एनर्जी ड्रिंक, पाणी, किट, साहित्य-उपकरणं यांचा पुरवठा करण्याचं काम इमानेइतबारे केलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार
  • मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरु केलं आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे अशी माहिती समोर आली आहे. कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. सगेसोयऱ्यांसाठीच्या कायद्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस

  • सगे-सोयरे यांच्याविषयीचा जो अध्यादेश राज्य सरकारने आणला आहे त्याचं रुपांतर कायद्यात करा अशी प्रमुख मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास सातत्याने नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा आरोग्यपथक आंतरवली सराटीमध्ये दाखल झालं. मात्र रक्तदाब तपासण्यासही मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. आमच्याकडून दर तासाला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांनी किमान पाणी घेतलं पाहिजे मात्र त्यासाठीही त्यांनी नकार दिला आहे असं वरिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी सांगितलं.
  • मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी रात्री जालना –जळगाव मार्गावर टायर जाळण्यात आले. तर हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. टीव्ही ९ मराठीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
म्हसवे गावची गुलाबकथा! गुलाबाचे उत्पादन, विक्रीपासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत भरारी
  • गुलाबाचे फूल आणि प्रेमाचे नाते हे जगभर सर्वश्रुत आहे. पण याच गुलाबावर प्रेम करत साताऱ्यातील म्हसवे गावाने आपल्या शेतीचा हा मुख्य विषय बनवला आहे. एका शेतकऱ्याने फुलवलेली ही गुलाबशेतीची चळवळ आता परिसरातील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी अंगीकारली असून, गुलाब फुलांच्या विक्रीसोबतच त्यापासून गुलकंद, गुलाब अत्तर, सिरप बनवण्याच्या प्रक्रिया उद्योगातही गावातील शेतकऱ्यांनी भरारी घेतली आहे.
  • म्हसवे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. साधारण १० वर्षांपूर्वी या गावातही पारंपरिक पिकांची शेती केली जात होती. परंतु २०१२ मध्ये गावातील एक उच्चशिक्षित शेतकरी सचिन शेलार यांनी नोकरीला फाटा देत प्रयोगशील शेतीचे स्वप्न पाहिले आणि गावात प्रथमच त्यांनी त्यांच्या तीन एकर क्षेत्रावर देशी-परदेशी गुलाबाची शेती फुलवली. परदेशी गुलाब प्रेमाचे प्रतीक बनून शहरात विक्रीसाठी जाऊ लागला, तर देशी गुलाबाचे महत्त्व लक्षात घेत गुलकंद, गुलाब अत्तर, गुलाब सिरपउत्पादक गावात येऊ लागले. फुलेविक्री आणि त्या जोडीनेच प्रक्रिया उद्योगासाठीही फुलांची विक्री सुरू झाल्याने त्यांची ही गुलाबशेती वर्षभरासाठी गुलाबी बनली. आवश्यक ती काळजी घेत त्यांनी उत्पादनात वाढ तर केलीच, सोबतच बाजारपेठेचा अंदाज घेत उत्पन्नही वाढवले.
  • शेलार यांचे गुलाब शेतीतील हे यश पाहून परिसरातील अन्य शेतकरीही मग या गुलाबाच्या प्रेमात पडू लागले. सुरुवातीला पाच-दहा शेतकऱ्यांपर्यंत असलेली ही संख्या हळूहळू वाढत जाऊन तब्बल दीडशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांतच ही एक चळवळ बनली. पुढे या चळवळीनेच ठरवले, की फुलांची केवळ विक्री करण्यापेक्षा त्या जोडीने प्रक्रिया उद्योगातही उतरायचे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन गावातच यंत्रणा उभी केली. आणि कालपर्यंत केवळ गुलाबाची फुले विकणारे हे गाव आता गुलाब फुलांच्या प्रक्रिया उद्योगातही स्वयंपूर्ण झाले आहे. म्हसवे गावातच आता गुलाब शेतीसोबत गुलकंद, गुलाब अत्तर, गुलाब सिरप ही उत्पादनेही घेतली जातात. गेल्या केवळ एक वर्षात गावाने २५ टन गुलकंद आणि तेवढ्याच गुलाब सिरपची विक्री केली आहे. या उत्पादनांची आता निर्यातही होऊ लागली आहे. गुलाब अत्तर बनवण्यातही आता गावाने उडी घेतली आहे. गुलाबासोबतच निशिगंध, जर्बेरा, चमेली, ऑर्किड आदी अन्य शोभेच्या फुलांच्या उत्पादनातही गावाने पाय रोवले आहेत. ही सगळी आकडेवारी आणि तपशील ऐकले, तरी म्हसवे गावच्या गुलाबकथेतील सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही.
निवडणुकीसाठी मतपेरणीचा ‘मार्ग’ ; रस्ते विकासासाठी सात हजार कोटी रुपये; ग्रामविकास विभागाची योजना
  • आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी मतपेरणी करताना राज्यात सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. त्यानुसार सुमारे सात हजार कोटी रुपये खर्चून महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीला लागून असलेल्या रस्त्यांची सुधारणा करण्याची योजना ग्रामविकास विभागाने आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या आमदारांना खूश करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  • केंद्राच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रत्यांची संख्या वाढवितांनाच सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सुमारे २६ हजार ३८१ कोटी रुपये खर्चून राज्यातील ४० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारणा आणि नव्या रस्त्यांची बांधणी करण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार आतापर्यंत २८ हजार ३३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून त्यावर १५ हजार ४९० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करतानाच मतदारांना खूष करण्यासाठी या योजनेचा दुसरा टप्पा हाती घेण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार योजनेच्या दुसऱ्या टप्यात ७६०० कोटी रुपये खर्चून सुमारे सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्यात प्रामुख्याने महापालिका, नगरपालिका यांच्या हद्दीपासून १० किमी तर नगरपालिकांच्या हद्दीपासून ५ किमी अंतरापासूनच्या रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच नदीपात्राला समांतर, खदाणी किंवा वाळू काढण्याच्या ठिकाणांकडे जाणारे रस्ते, डोंगरीभागातील रस्ते, औद्याोेगिक क्षेत्र किंवा साखर कारखान्यांच्या क्षेत्राबाहेरील रस्त्यांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.
सोनिया गांधी आज राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार
  • काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व विद्यमान खासदार सोनिया गांधी आज राजस्थानमधील जयपूर येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी उपस्थित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी सोनिया गांधी राज्यसभेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करतील, ही राजस्थानसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी या सध्या रायबरेलीच्या खासदार आहेत. पाच वेळा त्या लोकसभेच्या सदस्या राहिल्या. आता राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी आज सोनिया गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे राजस्थानमधूनच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात कोणत्या काँग्रेस नेत्याला उमेदवारी मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. सर्वच पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
२०२३ मध्ये ५९ हजारांहून अधिक भारतीयांनी घेतलं अमेरिकेचं नागरिकत्व
  • परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०२३ सालात अमेरिकेत तब्बल ५९ हजार भारतीय नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालं आहे. त्यामुळे अमेरिकेत मेक्सिकोतील नागरिकांनंतर भारतीयांचा क्रमांक लागतो. यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस)च्या २०२३ चा वार्षिक प्रगती अहवालातून ही बाब समोर आली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.
  • अधिकृत अहवालानुसार, २०२३ (३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेले वर्ष) या आर्थिक वर्षात सुमारे ८.७ लाख परदेशी नागरिक अमेरिकेचे नागरिक बनले. त्यापैकी १.१ लाखांहून अधिक मेक्सिकन (एकूण नवीन नागरिकांच्या संख्येपैकी १२.७ टक्के) आणि ५९ हजार १०० (६.७ टक्के) भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. यूएस नागरिकत्त्वासाठी (नैसर्गिकीकरण) पात्र होण्यासाठी, अर्जदाराने इमिग्रेशन आणि नॅशनॅलिटी ऍक्ट (INA) मध्ये नमूद केलेल्या काही पात्रता आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक असतं.
  • आवश्यकतांमध्ये साधारणपणे किमान पाच वर्षांसाठी कायदेशीर स्थायी निवासी (LPR) असणे गरजेचे आहे. यूएससीआयएसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इतर विशेष नैसर्गिकीकरणाच्या तरतुदी काही विशिष्ट अर्जदारांना, ज्यामध्ये यूएस नागरिकांच्या काही जोडीदारांचा आणि लष्करी सेवेतील अर्जदारांचा समावेश आहे, नैसर्गिकीकरणासाठी एक किंवा अधिक सामान्य आवश्यकतांमधून सूट दिली जाते.
  • बहुतेक लोक ज्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये यूएस नागरिकत्व प्राप्त केले ते किमान ५ वर्षे LPR असण्याच्या आधारावर नैसर्गिकरणासाठी पात्र होते (INA कलम 316(a), त्यानंतर जोडीदारासाठी हे निकष ३ वर्षे आहे.
  • अहवालात असे म्हटले आहे की सर्वसाधारणपणे, अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी संबंधित अर्जदाराला अमेरिकेत किमान पाच वर्षे राहणे गरजेचे आहे. तर त्याच्या जोडीदाराला किमान ३ वर्षे अमेरिकेत राहणे गरजेचे असते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये नैसर्गिकीकरण केलेल्या सर्व नागरिकांसाठी LPR म्हणून खर्च केलेल्या वर्षांची सरासरी संख्या ७ वर्षे होती.
  • पुढे, यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) अंतर्गत, २०२२ आणि २०२३ या आर्थिक वर्षांमध्ये नैसर्गिकीकरण गेल्या दशकातील सर्व नैसर्गिकीकरणांपैकी जवळजवळ एक चतुर्थांश होते.

 

भारत लवकरच संरक्षण क्षेत्रात अग्रगण्य उत्पादक - पंतप्रधान मोदी

  • गेल्या आठ-नऊ वर्षांत भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात कायाकल्प घडवला आहे. त्यासाठी अवलंबलेल्या अनुकूल आर्थिक धोरणांमुळे जगातील अग्रगण्य संरक्षण उत्पादक राष्ट्रांच्या पंक्तीत सामील होण्यासाठी आपण वेगाने वाटचाल करत आहोत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.
  • बंगळुरू लगत येलाहंका हवाई दल तळावर हवाई क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक व प्रदर्शन ‘एअरो इंडिया २०२३’ चे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. संरक्षण क्षेत्रातील अनेक अग्रगण्य भारतीय व परदेशी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले की, अशा उपक्रमांकडे पूर्वी भारताला फक्त संरक्षण उत्पादने विकण्यासाठीची संधी म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता या क्षेत्रात भारताने आपली क्षमता एवढी वाढवली आहे, की जागतिक स्तरावरून ‘संभाव्य संरक्षण भागीदार’ म्हणून  आपल्याकडे पाहिले जात आहे. भारत आता ७५ देशांना आपली संरक्षण उत्पादने निर्यात करत आहे.
  • या क्षेत्रातील विविध सुधारणा आणि यशाचा तपशील देताना मोदींनी भारत हा लष्करी उपकरण निर्मितीसाठी गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण असल्याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, की २०२४-२५ पर्यंत भारताची संरक्षण उत्पादनांची निर्यात दीड अब्ज डॉलरवरून पाच अब्ज डॉलपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हलक्या वजनाचे तेजस हे लढाऊ विमान आणि आयएनएस विक्रांत हे ही क्षेत्रातील भारताच्या क्षमतेची झळाळती उदाहरणे आहेत. बंगळुरूचे आकाशात आज नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष मिळत आहे. गाठलेली ही नवी उंची हीच नव्या भारताचे वास्तव असून, देश ही नवी उंचीही आता पार करत आहे.
  •  मोदी म्हणाले, की  अनेक दशकांपासून भारत हा संरक्षण उत्पादने आयात करणारा सर्वात मोठा देश होता. आता आपण जगातील ७५ देशांना संरक्षण उत्पादने निर्यात करत आहोत. देशाच्या संरक्षण निर्यातीत गेल्या पाच वर्षांत सहा पटीने वाढ झाली आहे. भारताने २०२१-२२ मध्ये दीड अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उत्पादने निर्यात केली आहेत. संरक्षण हे असे क्षेत्र आहे, जिथे तंत्रज्ञान, बाजार आणि व्यवसाय खूप क्लिष्ट मानले जातात. असे असूनही गेल्या आठ-नऊ वर्षांत भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात कायापालट घडवून आणला आहे. ही फक्त सुरुवात आहे.

कोलकाता पुस्तक मेळय़ाचा विक्रम; २६ लाख लोकांची भेट, २५.५० कोटींची विक्री

  • ४६व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळय़ात २५.५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाल्याचे आयोजकांनी सांगितले. ३१ जानेवारीला सुरू होऊन १२ फेब्रुवारीला संपलेल्या या वर्षीच्या पुस्तक मेळय़ाला सुमारे २६ लाख लोकांनी भेट दिली, अशी माहिती प्रकाशक व पुस्तक विक्रेते संघटनेचे सरचिटणीस त्रिदीब चौधरी यांनी दिली. १९७६ साली सुरू झालेल्या या पुस्तक मेळय़ाच्या इतिहासात भेट दिलेल्या लोकांचा आणि विक्रीचा हा विक्रम होता असेही ते म्हणाले.
  •  ‘करोना महासाथीनंतर, गेल्या वर्षी  २४ लाख नागरिकांनी मेळय़ास हजेरी लावली होती.  ही संख्या उत्साहवर्धक होती. मात्र या वर्षी त्याहून अधिक लोक आले असून त्यांची संख्या २६ लाखांपलीकडे गेली. लोकांच्या या प्रतिसादामुळे आम्ही अतिशय आनंदी आहोत. पुस्तक मेळय़ाच्या इतिहासातील हा विक्रम आहे’, असे चौधरी यांनी सांगितले. मेळय़ातील सर्व स्टॉल्सवरील विक्रीत ६ ते १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधांशु शेखर डे यांनी दिली.
  • ९५० स्टॉल, स्पेन ‘थीम कंट्री’ -  बांगलादेश पॅव्हिलिनमधील ७० स्टॉल्सव्यतिरिक्त मेळय़ात ९५० स्टॉल्स होते. स्पेन हा ‘थीम कंट्री’ होता. पुढील वर्षीच्या पुस्त मेळय़ातही एक युरोपीय देश ‘थीम कंट्री’ राहणार असून, हा मेळाही सॉल्ट लेक सेंट्रल पार्कमध्ये होईल, असे चॅटर्जी म्हणाले.

विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम! सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

  • इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडने २०१९ साली विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत मॉर्गनने इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते.
  • इंग्लंडा क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपण निवृत्त झाल्याचे जाहीर करताना त्याने खेळापासून दूर होण्याची हीच खरी वेळ आहे, असे सांगितले आहे. इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करिअर एकूण १६ वर्षे राहिले. मॉर्गनने एकदिवसीय क्रिकेटसाठी इंग्लंडच्या टीमचे यशस्वी नेतृत्व केले. मॉर्गनच्या नेतृत्वातच इंग्लंडलने २०१९ साली पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. मॉर्गनने १२६ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या टीमचे नेतृत्व केले. यापैकी ७६ सामन्यांत इंग्लंडचा विजय झाला होता.
  • इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करिअर - मॉर्गनने आपल्या करिअरमध्ये एकू २५८ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले. त्याच्या नावावर १४ शतकं आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ७७०१ धावा केल्या. तर त्याने एकूण १६ कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतक असून त्याने एकूण ७०० धावा केल्या.

किरकोळ महागाई दर पुन्हा ६.५ टक्क्यांवर, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग

  • किरकोळ महागाई दराने रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग करत, सरलेल्या जानेवारीमध्ये ६.५२ टक्क्यांवर, तीन महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.
  • ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आधीच्या डिसेंबर महिन्यात ५.७२ टक्के पातळीवर होता. ती या दराची २०२२ सालातील नीचांकी पातळी होती. त्या आधी नोव्हेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.८८ टक्के नोंदविण्यात आला होता. तर वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये तो ६.०१ टक्के नोंदला गेला होता, असे सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. अन्नधान्य घटकांसाठी महागाईचा दर जानेवारीमध्ये ५.९४ टक्के होता, जो डिसेंबरमधील ४.१९ टक्के पातळीवरून लक्षणीय उसळलेला दिसून आला. यापूर्वी अन्नधान्य महागाईने ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के असा उच्चांक नोंदवला होता.

काय महागले?

  • सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डाळी, दूध आणि अंडय़ांच्या दरांमधील वाढ कायम आहे. गतवर्षी जानेवारीच्या तुलनेत डाळींचे दर तब्बल १६ टक्क्यांनी वाढले आहेत, तर दूध व अंडी प्रत्येकी ८.८ टक्के महागली आहेत. भाज्यांचे दर मात्र गतवर्षीच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी खाली आले आहेत.

व्याजदर आणखी वाढणार?

  • उत्पादनातील वाढत्या खर्चाचा परिणाम झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये महागाई दर चढाच राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधान पातळीपेक्षा जास्त असल्यामुळे आगामी काळात व्याजदरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 14 फेब्रुवारी 2022

 

युवा विश्वविजेते ओस्तवाल, तांबे महाराष्ट्राच्या रणजी संघात :
  • डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल आणि अष्टपैलू कौशल तांबे या भारताच्या युवा विश्वचषक विजेत्या संघातील दोन खेळाडूंना महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान देण्यात आले आहे.

  • ग-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राची १७ फेब्रुवारीपासून हरयाणाशी पहिली लढत सुरू होणार आहे. अंकित बावणेच्या नेतृत्वाखालील या संघात आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीकडे उपकर्णधार सोपवण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाडची वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड झाल्याने तो रणजीच्या साखळी टप्प्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने म्हटले आहे.

  • महाराष्ट्राचा संघ - अंकित बावणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), यश नहार, पवन शहा, नौशाद शेख, अझीम काझी, विशांत मोरे (यष्टीरक्षक), सत्यजीत बच्छाव, अवधूत दांडेकर (यष्टीरक्षक), तरनजितसिंह ढिल्लाँ, मुकेश चौधरी, आशय पालकर, प्रदीप दधे, दिव्यांग हिंगणेकर, यश क्षीरसागर, विशाल गिते, निकित धुमाळ, सिद्धेश वीर, मनोज इंगळे, विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे.

‘हिप्पोक्रॅटिक’ऐवजी डॉक्टरांना ‘चरक शपथ’!; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची सूचना :
  • डॉक्टरांनी पदवीदान समारंभात ग्रीक हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी चरक संहितेतील शपथ घ्यावी, अशी सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेदरम्यान ही सूचना करण्यात आली होती.

  • तथापि, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ‘एनएमसी’च्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा व्ही. वाणीकर यांनी सांगितले की, डॉक्टरांनी घ्यावयाच्या शपथेत बदल करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.  

  • ‘‘हिप्पोक्रॅटिक शपथ घेतली जाणार नाही, तर डॉक्टरांच्या पदवीदान समारंभात महर्षि चरक शपथ घेतली जाईल, असे ‘एनएमसी’च्या संकेतस्थळावरील वैद्यकीय महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेच्या इतिवृत्तात म्हटले आहे.

  • चरक संहिता हा आयुर्वेदावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. महर्षि चरक शपथेचा उल्लेख चरक संहितेत आहे. ‘एम्स’ या देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेतील पदवीधर गेल्या काही काळापासून वार्षिक दीक्षांत समारंभात ‘चरक शपथ’ घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. ‘‘स्वत:साठी नाही; कोणत्याही ऐहिक, भौतिक इच्छा किंवा लाभाच्या पूर्ततेसाठी नाही, तर केवळ दु:खी मानवतेच्या कल्याणासाठी, मी माझ्या रुग्णावर उपचार करीन आणि उत्तम वर्तन करेन,’’ ही चरक शपथ ‘एम्स’मध्ये घेण्यात येते.

१५-१८ वर्षे वयोगटातील ७० टक्के मुलांना पहिली मात्रा; ४० दिवसांनंतर करोनाबाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी :
  • देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७० टक्क्यांहून अधिक मुलांना आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी सांगितले. या वयोगटातील पात्र असलेल्या सर्वानी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  •  ‘तरुण भारत जगातील सर्वात मोठय़ा लसीकरणाला आणखी बळकटी देत आहे. १५-१८ वर्षे वयोगटातील आमच्या ७० टक्क्यांहून अधिक युवकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतली आहे’, असे मंडाविया म्हणाले.

  •  १५ ते १८ वर्षे वयोगटातील १.४७ कोटींहून अधिक लाभार्थीचे संपूर्ण लसीकरण झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. भारताच्या महानिबंधकांच्या सांगण्यानुसार, २०२१-२२ या वर्षांसाठी वरील वयोगटातील लाभार्थीची अंदाजे लोकसंख्या ७.४ कोटी इतकी आहे.

  •  २४ तासांच्या कालावधीत ४९.१६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्यामुळे, देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या १७२.८१ कोटींहून अधिक झाली आहे.

‘एलआयसी’चे विक्रमी पाऊल!; पाच टक्के हिस्साविक्रीचा सरकारचा प्रस्ताव :
  • देशाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा प्रारंभिक समभाग विक्रीचा (आयपीओ) मार्ग प्रशस्त करण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने आपले दरवाजे खुले ठेवले. त्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आजवरच्या सर्व विक्रमांना मोडीत काढणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्ताव रविवारी ‘सेबी’कडे दाखल केला.

  • सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठय़ा विमा कंपनीतील ५ टक्के हिस्सा सरकारकडून विकला जाणार असल्याचे ‘सेबी’कडे दाखल मसुदा प्रस्तावातून स्पष्ट झाले. सरकारकडून विकले जाणारे १० रुपये दर्शनी मूल्याचे ३१ कोटी ६० लाख समभाग अधिमूल्यासह विक्रीला खुले होतील. त्यामुळे या विक्रीतून उभा राहणारा संपूर्ण निधी सरकारी तिजोरीत जमा होईल. सध्या एलआयसीवर सरकारची १०० टक्के मालकी आहे.

  • मसुदा प्रस्तावानुसार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५० टक्के समभागांचे आरक्षण असेल. ‘आयपीओ’चा १५ टक्क्यांचा हिस्सा हा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असेल. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सार्वजनिक भागविक्रीचा ३५ टक्के हिस्सा राखीव राहील.

  • चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकाराला निर्गुतवणुकीच्या माध्यमातून ७८ हजार कोटी रुपयांच्या महसूल उभारणीचे सुधारित अर्थसंकल्पीय लक्ष्य गाठावयाचे झाल्यास, एलआयसीची भागविक्री ही चालू आर्थिक वर्षांत, म्हणजे मार्च अखेरपूर्वीच होणे आवश्यक आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही एलआयसीची भागविक्री चालू वर्षांतच अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते. तथापि, एलआयसीमधील सरकारच्या मालकीचा पाच टक्के हिस्सा म्हणजे ३१ कोटी ६० लाख समभागांच्या विक्रीतून सरकारला निर्धारीत लक्ष्य गाठून आणखी पुढे मजल मारता येऊ शकेल.

प्रो लीग हॉकी (पुरुष) - फ्रान्सकडून भारताला पराभवाचा धक्का :
  • टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाला प्रो लीग हॉकीमध्ये पराभव पत्करावा लागला. शनिवारी रात्री झालेल्या लढतीत फ्रान्सने भारताला ५-२ अशी धूळ चारून त्यांचे विजयी हॅट्ट्रिक लगावण्याचे मनसुबे उधळून लावले.

  • जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानी आहे. त्याशिवाय गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यात मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फ्रान्सला नमवले होते. त्यामुळे भारताचे पारडे दुसऱ्या लढतीसाठीही जड मानले जात होते.

  • फ्रान्ससाठी व्हिक्टर चार्लेटने (१६ आणि ५९वे मिनिट) दोन गोल केले. स्टॅनली लॉकवूड (३५ मि.), चार्ल्स मॅसोन (४८ मि.) आणि टिम क्लायमेंट (६० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. भारताकडून जर्मनप्रीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी अनुक्रमे २२ आणि ५७व्या मिनिटाला गोल केले. परंतु उर्वरित तीन गोल नोंदवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. या पराभवानंतरही भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम असून त्यांच्या खात्यात तीन सामन्यांतील दोन विजयांचे सहा गुण जमा आहेत.

१४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.