चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ ऑक्टोबर २०२१

Date : 13 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पहिल्यांदाच सूर्यमालेबाहेरील ग्रहावरुन मिळाले रेडिओ सिग्नल, सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा मिळाला एक नवा मार्ग :
  • क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड इथली ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर ,आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह (exoplanets) शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

  • विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल. आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ताऱ्यांची निर्मिती होते असते अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात. त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्त्रोत म्हणजे गुरु आणि शनी सारखे जे मोठे ग्रह. अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश (Aurorae) तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होते.

  • तेव्हा ग्रहांपासून मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होती. असं असतांना काही लाल बटु तारे (ताऱ्यांचा एक प्रकार, आपल्या सुर्यापेक्षा लहान आकाराचे तारे) यांच्याकडून रेडिओ सिग्नल मिळत असल्याचं संशोकांच्या लक्षात आलं.

  • Low Frequency Array ( LOFAR ) या रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी संशोधन आणि निरिक्षणे केल्यावर संशोधकांच्या लक्षात आलं की हे रेडिओ सिग्नल संबंधित तारे उत्सर्जित करत नसून या ताऱ्या भोवती फिरणारे ग्रह फेकत आहेत.

सोमवारपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने ; केंद्राची परवानगी :
  • देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हवाई वाहतूक कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे. करोना निर्बंधांमध्ये शिथिलतेनंतर अर्थव्यवस्था खुली होत असल्याने प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी पाहता हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विमान कंपन्यांवरील करोना सावट दूर होणार आहे.

  • करोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेत मंत्रालयाने टप्प्याटप्प्याने विमान वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. डिसेंबर २०२० पर्यंत ८० टक्के प्रवासी क्षमतेसह सुरू असलेल्या उड्डाणांवर पुढे दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर मार्चपासून पुन्हा निर्बंध आले. त्यानंतर हे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले.

  • देशांतर्गत हवाई वाहतुकीतील कंपन्यांना चालू वर्षांत १ जून ते ५ जुलैदरम्यान ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान ती ६५ टक्के करण्यात आली, तर १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान ती ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ८५ टक्के प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणे करण्यास विमान कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती.

मुलांचे लसीकरण लवकरच ; २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसवापराची तज्ज्ञ समितीची शिफारस :
  • देशातील २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या वयोगटासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे.

  • भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या देशभरात घेण्यात आल्या होत्या. भारत बायोटेकने दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा तपशील केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेकडे सादर केला होता.

  • यासंदर्भातील तज्ज्ञ समितीने सोमवारी चाचण्यांच्या निष्कर्षांची पडताळणी केली. त्यानंतर काही अटींच्या अधीन राहून २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याचा निर्णय समितीने घेतला. आता त्यास अंतिम मंजुरी देण्याची शिफारस औषध महानियंत्रकांना करण्यात आली आहे.

वन्यजीवांच्या सुरक्षितता-संवर्धन कृती आराखडय़ास मान्यता :
  • वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या ‘राज्य वन्यजीव कृती आराखडय़ा’स मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • सन २०२१ ते २०३० या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या आराखडय़ाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाकरे यांनी या वेळी दिले.

  • बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आमदार धीरज देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धा : मालदीवविरुद्ध भारताला विजय अनिवार्य :
  • आतापर्यंत अपराजित आणि कामगिरी उंचावू न शकणाऱ्या भारताला ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लीगमधील अखेरच्या सामन्यात बुधवारी मालदीवविरुद्ध विजय अनिवार्य आहे. मालदीवविरुद्ध बरोबरी किंवा पराभव पत्करल्यास भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकेल.

  • भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण भारताने ‘सॅफ’ स्पर्धेचे सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. २००३मध्ये भारताने तिसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर ११ स्पर्धामध्ये भारताला विजेतेपद किंवा उपविजेतेपद मिळाले आहे. पाच संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील चारही संघ अद्याप १६ ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत.

  • तीन सामन्यांपैकी दोन बरोबरीत आणि एक विजय मिळवणारा भारतीय संघ ५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मालदीव आणि नेपाळ या संघांनी प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर वर्चस्व राखले आहे. बुधवारी नेपाळचा बांगलादेशशी सामना होणार आहे.

१३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.