चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ ऑक्टोबर २०२०

Date : 13 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोठा दिलासा! करोना रुग्णसंख्येत २४ तासांत प्रचंड घट, मृतांची संख्या झाली कमी :
  • गेल्या काही महिन्यांपासून लाखांची दिवसागणिक लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांतील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली असून, तब्बल एक ते दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची इतकी नीच्चांकी नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच गेल्या २४ तासांत मृतांची संख्याही घटली आहे.

  • देशात करोना विषाणूनं जनजीवन वेठीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं केंद्र सरकारकडून लॉकडाउनची कडक अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच्या काळात रुग्णसंख्येनं मोठी उसळी घेतली होती. मात्र, आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

  • गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

शाळा बंद असल्याने भारताला ४०० अब्ज डॉलर्सचा फटका :
  • करोना साथीमुळे शाळा अनेक दिवस बंद राहिल्याने भारताला ४०० अब्ज डॉलर्सचा शैक्षणिक फटका बसण्याची शक्यता जागतिक बँकेच्या एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. दक्षिण आशिया भागात शाळा बंदमुळे ६२२ अब्ज डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता आहे. यापेक्षा वाईट परिस्थितीचा विचार करता ८८० अब्ज डॉलर्सचा फटका बसू शकतो.सर्वाधिक फटका भारताला बसणार असून बहुतांश देशांना सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा बराच वाटा यात गमवावा लागणार आहे.

  • ‘बिटन ऑर ब्रोकन- इनफॉर्मलिटी अँड कोविड १९ इन साउथ एशिया’ या अहवालात म्हटले आहे,की दक्षिण आशिया २०२० मध्ये मोठय़ा मंदीच्या खाईत सापडणार आहे. याचे कारण करोनाने अर्थव्यवस्थेला मोठा फटका दिला आहे. शाळा बराच काळ बंद असल्याने ३.९१ कोटी मुले प्राथमिक व माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहिली. त्यामुळे शैक्षणिक पेच वाढतच गेला. अनेक देशांनी शाळा बंद असल्याचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला पण तरी दूरशिक्षणाच्या माध्यमातून फार मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांना सहभागी करणे जड गेले आहे.

  • करोना साथीमुळे ५५ लाख विद्यार्थी शिक्षणातून गळाले असून त्याचा फटका बसणार आहे. अनेक शाळा मार्चपासून बंद आहेत. काही देशात शाळा सुरू करण्यात आल्या तरी पाच महिने विद्यार्थी शाळेबाहेर होते. त्यामुळे ०.५ विनियोजित वर्ष इतके शैक्षणिक नुकसान झाले आहे.

  • शालेय विनियोजित शैक्षणिक वर्ष अशी नवी संकल्पना जागतिक बँकेने तयार केली असून त्यात विद्यार्थ्यांची शाळेची पूर्ण वर्षे व त्यांचे दर्जात्मक ज्ञान यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यात मानवी भांडवलाचे मापन करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियातील मुले जेव्हा कामगार बाजारपेठेते प्रवेश करतील तेव्हा त्यांचे आजीवन नुकसान हे ४४०० डॉलर्सचे असणार आहे. ते एकूण उत्पन्नाच्या ५ टक्के राहील.

भारत-चीन यांच्यात सातव्या फेरीची चर्चा :
  • सीमेवर तणावाचे वातावरण  निवळण्यासाठी भारत व चीन यांच्यात लष्करी पातळीवरील सातव्या फेरीची चर्चा आज झाली. त्यात पूर्व लडाखमधून दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्याबाबतचा विषय प्रमुख होता.

  • गेले सहा महिने दोन्ही देशात सीमेवर संघर्ष सुरू असून त्यावर लवकर तोडगा निघणे कठीण आहे. दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूला असलेल्या चुशूल येथे पूर्व लडाख भागात ही चर्चा झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह येथील चौदाव्या कोअरचे हरिंदर सिंग यांनी केले. त्यात पूर्व आशियाचे परराष्ट्र सह सचिव नवीन श्रीवास्तव हे सहभागी होते.

  • पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांचे सुमारे एक लाख सैनिक तैनात असून पूर्व लडाखमध्ये दोन्ही देश शक्तिप्रदर्शन करीत आहेत. संघर्ष निवळण्यासाठी राजनैतिक व लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. भारताने या चर्चेत सर्व संघर्ष ठिकाणांहून चीनला सैन्य माघारीसाठी भाग पाडण्याची भूमिका घेण्याचे ठरवले. जैसे थे परिस्थिती लवकर निर्माण करून ती एप्रिलपूर्वी होती तशी करावी अशी भारताची मागणी आहे.

अर्थशास्त्राच्या नोबेलमुळे गुरू-शिष्य जोडीचा सन्मान :
  • ‘‘आज सकाळी एका व्यक्तीने दारावर टकटक केली. दार उघडले तर समोर बॉब विल्सन उभे होते. त्यांनी नोबेलची पुरस्काराची बातमी आपल्याला दिली. हा सगळा विचित्र योगायोग होता. आम्ही दोघेही नोबेलचे मानकरी ठरलो व विल्सन यांनी आपल्याला ही माहिती दिली’’, असे स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक पॉल. आर. मिलग्रोम यांनी सांगितले. एक प्रकारे गुरू-शिष्य परंपरेचा हा सन्मान झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • मिलग्रोम यांनी म्हटले आहे की, विल्सन हे माझे पीएच डीचे सल्लागार आहेत. ते समोरच्या रस्त्यावर राहतात. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे येऊन दोघांनाही नोबेल मिळाल्याची ही बातमी दिली. अगदी गोड अशीच ही बातमी होती. विद्यार्थी, मित्र व सहकारी यांची आम्हाला नोबेल मिळावे ही इच्छा होती ती आज पूर्ण झाली. चाहत्यांचे प्रेम व आदरही आम्हाला मिळाला.

  • विल्सन यांनी सांगितले की, मिलग्रोम हा माझा माजी विद्यार्थी. लिलावाबाबतच्या संशोधनात तो अगोदरपासून चमक दाखवत होता. आम्ही १९७० मध्ये पहिल्यांदा लिलावाबाबतचे संशोधन केले. अनेक आर्थिक प्रक्रियात सुधारणा करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा आमचा हेतू आहे.

१३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.