आता ‘नॉकआऊट’ सामना; वानखेडेवर काय आहे भारताचा जय-पराजयाचा इतिहास?
- गेल्या दीड महिन्यापासून टीम इंडिया सातत्याने जिंकत आली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लीग फेरीत एकही सामना न गमावलेल्या भारतानं सलग ९ सामने जिंकत नवा विक्रम केला आहे. रविवारी नेदरलँड्सला १६० धावांनी नमवत टीम इंडियानं तब्बल १८ गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता बुधवारी, अर्थात १५ नोव्हेंबर रोजी टीम इंडियाची गाठ पुन्हा एकदा न्यूझीलंडशी पडणार आहे. लीग फेरीत भारतानं न्यूझीलंडला पराभूत केल्यामुळे भारतीय संघच या सामन्यात फेव्हरेट मानला जात आहे. पण मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आकड्यांचं गणित भारताच्या बाजूने आहे की नाही? हेही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे!
- लीग फेरीत २२ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. न्यूझीलंडच्या २७३ धावांचा पाठलाग करताना भारतानं ६ गड्यांच्या मोबदल्यात ४८व्या षटकातच विजय मिळवला होता. या सामन्यात डॅरिल मिचेलच्या तडाखेबाज १३० धावा आणि रचिन रविंद्रच्या ७५ धावा वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना छाप पाडता आली नव्हती. तर दुसरीकडे मोहम्मद शमीनं याच सामन्यात पाच विकेट्स घेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. मात्र, हा सामना झालेल्या धरमशालापेक्षा मुंबईच्या वानखेडेची परिस्थिती व आकडेवारीही वेगळी आहे.
- मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यामुळे वानखेडे स्टेडियमवर चेंडू स्विंग होतो. शिवाय, इथे फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. चेंडू उसळीही घेतो. त्यामुळे दोन्ही बाजूच्या फलंदाजांसाठी वानखेडेचा पेपर कठीण ठरू शकतो. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजीचा यंदाच्या विश्वचषकातला फॉर्म पाहाता त्यांच्यावर भारताची मोठी भिस्त असेल. भारतानं जिंकलेल्या २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना याच वानखेडे स्टेडियमवर झाला होता.
२०० गुणांच्या परीक्षेत २०० पेक्षा अधिक गुण! सुधारित निकाल लावण्याची ‘महाज्योती’वर नामुष्की
- महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या (एमपीएससी) प्रशिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. ही परिक्षा २०० गुणांची असताना अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून लवकरच सुधारित निकाल जाहीर केला जाईल, असे ‘महाज्योती’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
- २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी एमपीएससी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ सत्रांमध्ये चाळणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शनिवारी ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले होते. मात्र निकालात गोंधळ झाल्यानंतर हा निकाल संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध केला जाईल. त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असा खुलासा ‘महाज्योती’मार्फत काढलेल्या पत्रकात केला आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा करून घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत प्राप्त झालेले गुण आणि गुणांचे नॉर्मलायक्षेशन केल्यानंतर येणारे प्राप्त गुण याची माहिती निकालद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल लावण्यात येईल, असे स्षष्टीकरण ‘महाज्योती’कडून देण्यात आले आहे.
नेमका दोष कुणाचा?
- निकाल हटविल्यानंतर ‘महाज्योति’ने पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार संबंधित संस्थेने गुणांची मोजणी करताना (नॉर्मलायझेशन) रेल्वे भरती बोर्डाद्वारे वापरण्यात येणाऱ्या सूत्राचा वापर केला आहे. मात्र नॉर्मलायझेशन योग्य रीतीने केल्याचे या संस्थेने कळविले आहे. आता ‘महाज्योती’मधील तज्ज्ञांकरवी सूत्र बरोबर आहे का याची खात्री केली जात आहे. याबाबत अधिक भाष्य करण्यास महाज्योतीच्या अधिकाऱ्ऱ्यांनी नकार दिला.
भारतातील शहरांची धुळधाण! जगातील सर्वांत प्रदूषित शहरांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर, मुंबई कितव्या स्थानी?
देशभर दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांकडूनही दिवाळी साजरी केली जातेय. एकीकडे देशात वायू प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्याला परवानगी दिली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारत देशभर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यामुळे देशातील तीन शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून गणली गेली आहेत. यामध्ये पहिल्या नंबरवर देशाची राजाधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. स्वीस ग्रुप IQAir ने हा अहवाल दिला आहे.
सकाळी ११.५२ पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत ४१२ हवा गुणवत्ता निर्देशांक होता. तर त्यापाठोपाठ लाहोर (पाकिस्तान), बघदाद (इराक), कराची (पाकिस्तान), कुवैत शहर (कुवैत), कोलकत्ता (भारत), ढाका (बांगलादेश), मुंबई (भारत), सराजेवो (बोसनिया), दोहा (कतार) आदी दहा शहरांचा क्रमांक लागतो.
कुठे किती AIQ?
- दिल्ली – ४१२
- लाहोर- २६२
- बघदाद – २०६
- कराची – १९७
- कुवैत – १६८
- कोलकत्ता – १६७
- ढाका – १५५
- मुंबई – १५४
- सरजेवो – १५३
- दोहा- १४९
- जकार्ता – १२६
- काठमांडू – ११५
- शेन्यांग (चीन)- ११३
- रियाध (सौदी अरेबिया) – १०७
- कम्फांळा (युगांडा) – ९९
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा बिघडत आहे. त्यापाठोपाठ मुंबईतही वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचीही योजना आखली होती. दिवाळीपूर्वी प्रदूषणात घट नोंदवली होती. परंतु, शनिवार, रविवारी झालेल्या आतिषबाजीमुळे वायू प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीसह मुंबईतही हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढला.
आडवाणींच्या रथयात्रेनंतर ३३ वर्षांनी सोमनाथमधून सुरु झाली ‘ही’ खास मोहीम, राम मंदिर उद्घाटनात महत्वाचं योगदान
- ३० ऑक्टोबरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमधून ‘राम नाम मंत्र लेखन यज्ञ’ याची सुरुवात केली. या मोहिमेच्या अंतर्गत गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरातील राम मंदिरातल्या पोथ्यांमध्ये प्रभू रामाचं नाव लिहिलं जातं आहे. या पोथ्या २०२४ मध्ये २२ जानेवारीच्या दिवशी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. राम मंदिरासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेनंतर ३३ वर्षांनी अशा प्रकारची मोहीम राबवली जाते आहे. २३ ऑक्टोबर १९९० या दिवशी लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने लालकृष्ण आडवाणींना अटक केली होती. ज्यानंतर राम मंदिराची रथयात्रा अचानक थांबली होती. त्यानंतर राम मंदिरासाठी ही विशेष मोहीम राबवली जाते आहे.
सोमनाथच्या राम मंदिरात भक्तांसाठी ठेवण्यात आल्या १० पोथ्या
- सोमनाथ मंदिर ट्रस्टने १० पोथ्यांची व्यवस्था केली आहे. या पोथ्यांमध्ये भक्तांनी राम नाम लिहायचं आहे. राम मंदिर आणि बाबरी मशिद यांच्यातला वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा वाद सुरु होता तेव्हा सोमनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने सोमनाथ मंदिराच्या समोर असलेल्या त्रिवेणी संगमावर राम मंदिर बांधलं होतं. २०१७ मध्ये या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बसची योजना
- सोमनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष बसची योजनाही आखली आहे. सोमनाथ मंदिर ते राम मंदिर अशी बस सेवा सुरु केली जाणार आहे. ठराविक वेळाने या बस सोडल्या जाणार आहेत. या विश्वस्त मंडळाने असंही सांगितलं आहे की जे भक्त पोथ्यांमध्ये राम नाम लिहितील त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
- गुजरातमध्ये भाजपाने या मोहिमेच्या अंतर्गत २४ जानेवारीला प्रत्येक गावात उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. वेरावलचे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी आणि राज्य भाजपा सचिव झवेरीभाई ठकरार यांनी सांगितलं की राम हे तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयतात आहेत. राम मंदिराचं उद्घाटन होणं ही ५७६ वर्षांच्या लढाईच्या विजयाचं प्रतीक आहे. हिंदुत्व काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे यासाठी राम रथ यात्रा काढण्यात आली होती. आता राम मंदिराचं उद्घाटन होताना प्रत्येक गावात उत्सव साजरा झाला पाहिजे. आम्ही त्यासाठी सर्वतोपरी तयारी करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना विराट कोहलीच्या सहीची बॅट गिफ्ट; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सपत्निक भेटीला!
- यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयी अश्वमेघ ९व्या सामन्यातही अपराजित आहे. त्यामुळे या निर्भेळ यशासह टीम इंडिया बुधवारी न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये सामना करणार आहे. या विजयांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा माजी कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत असताना आता आणखी एका कारणामुळे विराट कोहलीची चर्चा होऊ लागली आहे. कारण ब्रिटनचे पंतप्रधान व भारताचे जावई अर्थात ऋषी सुनक यांना चक्क विराट कोहलीची सही असणारी बॅट गिफ्ट देण्यात आली आहे!
- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या द्विपक्षीय चर्चेसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या आमंत्रणावर त्यांनी दिवाळीच्या दिवशी सपत्नीक ऋषी सुनक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवांत चर्चा झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द एस. जयशंकर यांनी हे फोटो शेअर करताना एक पोस्ट एक्सवर (ट्विटर) लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे.
- यावेळी एस. जयशंकर यांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीनं सही केलेली बॅट भेट म्हणून दिली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशाची एक मूर्तीही त्यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा आपण ऋषी सुनक यांना दिल्याचं जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
काय लिहिलंय पोस्टमध्ये?
- “पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या आमंत्रणामुळे मी भारावून गेलो आहे. यावेळी मी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा ऋषी सुनक यांच्यापर्यंत पोहोचवल्या. सध्याच्या काळानुरूप द्विपक्षीय संबंधांची नव्याने बांधणी करण्यासाठी भारत व ब्रिटन पुढाकार घेत आहेत. दिवाळीनिमित्त केलेल्या पाहुणचारासाठी श्रीमान व श्रीमती सुनक यांचे आभार”, असं या पोस्टमध्ये एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.
भारताचे इस्रायलच्या विरोधात मतदान; संयुक्त राष्ट्र महासभेत ठराव मंजूर
- संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये इस्रायलव्याप्त पॅलेस्टाईनमधील कारवायांचा निषेध करणाऱ्या ठरावाच्या बाजुने भारताने मतदान केले. महासभेमध्ये रविवारी मांडण्यात आलेल्या एकूण सहा ठरावांपैकी पाच ठरावांच्या बाजुने भारताने मतदान केले, तर एका ठरावावर भारत तटस्थ राहिला.संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये ‘स्पेशल पॉलिटिकल अँड डी-कॉलनायेशन कमिटी’ने ९ नोव्हेंबरला सदस्य देशांची मते नोंदवून पॅलेस्टाईन प्रश्नासह पश्चिम आशियातील परिस्थितीशी संबंधित सहा ठरावांचा आराखडा मंजूर केला होता.
- इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी भूप्रदेशात इस्रायलच्या वसाहतींच्या कारवायांचा निषेध करणाऱ्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले. ‘पूर्व जेरुसलेमसह व्याप्त पॅलेस्टिनी भूप्रदेशात आणि सीरियातील इस्रायलव्याप्त गोलन भागात इस्रायली वसाहत’ शीर्षकाच्या या ठरावाच्या बाजूने १४५, विरोधात सात आणि १८ तटस्थ अशा मतांनी समितीने हा ठराव मंजूर केला. कॅनडा, हंगेरी, इस्रायल, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया संघराज्य, नाऊरू आणि अमेरिका यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
- ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या १४५ देशांमध्ये भारतासह बांगलादेश, भूतान, चीन, फ्रान्स, जपान, मलेशिया, मालदीव, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व ब्रिटन यांचा समावेश होता. या ठरावातील मसुद्यानुसार, पूर्व जेरुसलेमसह ऑक्युपाईड पॅलेस्टिनी भूप्रदेशात व ताब्यातील सीरियन गोलन भागात इस्रायली वसाहतवादी कारवाया, तसेच जमीन बळकावणे, संरक्षित लोकांच्या उपजीविकेत अडथळा आणणे, नागरिकांचे बळजबरीने हस्तांतर आणि प्रत्यक्षात किंवा कायदा करून जमिनीचे संलग्नीकरण यांच्या निषेधातील हे ठराव आहेत.
सीमेवर बहाद्दर सैनिक असेपर्यंत भारत सुरक्षित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
- जागतिक सद्य:स्थितीत भारताकडून अपेक्षा वाढत असताना, शांतता राखण्यात आणि भारताच्या सीमा सुरक्षित राखण्यात सुरक्षा दलांची मोठी भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे केले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची दरवर्षीची परंपरा पंतप्रधानांनी याही वर्षी कायम राखली. भारत संरक्षण क्षेत्रात ‘मोठा जागतिक खेळाडू’ म्हणून उदयाला येत असून, त्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता सतत वाढत आहेत. जगातील सद्य:स्थिती अशी आहे, की भारताकडून असलेल्या अपेक्षा सतत वाढत आहेत, असे सैनिकांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितले.
- ‘अशा महत्त्वाच्या वेळी भारताच्या सीमा संरक्षित असणे व देशात शांततेचे वातावरण असणे आवश्यक आहे आणि तुमची त्यात मोठी भूमिका आहे’, असे भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) गणवेषात असेलेले मोदी म्हणाले. ‘माझे बहाद्दर सैनिक सीमेवर हिमालयासारखे निर्भयपणे उभे असेपर्यंत भारत संरक्षित आहे. स्वातंत्र्यानंतर आमच्या बहाद्दर जवानांनी अनेक युद्धे लढली आणि देशाचे हृदय जिंकले. आमच्या जवानांनी आव्हानांचा सामना करत विजय खेचून आणला आहे’, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
- ‘जेथे परिवार आहे तेथे पर्व आहे असे म्हटले जाते. सणांच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहाणे आणि सीमेवर तैनात असणे कर्तव्याबाबतच्या बांधिलकीचे उदाहरण घालून देते. हा देश तुमचा ऋणी आहे’, असेही पंतप्रधान अभिमानाने म्हणाले. ‘यामुळे, दिवाळीत एक दिवा तुमच्या सुरक्षिततेसाठी असून, प्रत्येक प्रार्थनेत लोक तुमच्या सुरक्षिततेची कामना करतात’, असेही त्यांनी सांगितले.‘गेल्या ३०-३५ वर्षांपासून, एकही दिवाळी मी तुमच्याशिवाय साजरी केलेली नाही. मी पंतप्रधान नव्हतो, किंवा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मी तुमच्यासोबत सीमेवर दिवाळी साजरी केली’, असे मोदी म्हणाले.
- भारताच्या सैनिकांनी जीव धोक्यात घालून नेहमी पुढेच वाटचाल केली आहे आणि सीमेवरील ‘सर्वात मजबूत भिंत’ असल्याचे सिद्ध केले आहे.