चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ नोव्हेंबर २०२१

Date : 13 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
११ महिला अधिकाऱ्यांना लष्करात कायम नियुक्ती :
  • सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांच्यावर अवमान कारवाईचा इशारा दिल्यानंतर संरक्षण दलाने शुक्रवारी ११ महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती (परमनंट कमिशन) देण्याची तयारी दर्शवली.

  • ‘‘आम्ही लष्कराला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी धरत आहोत. न्यायालय तुम्हाला सावधानतेचा इशारा देत आहे. तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. लष्कर स्वत:च्या अधिकार क्षेत्रात सर्वोच्च असू शकते, पण संविधानाने प्रस्थापित केलेले न्यायालयही आपल्या अधिकार क्षेत्रात सर्वोच्च आहे,’’ अशा शब्दांत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने लष्कराची कानउघाडणी केली. त्यानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी ११ महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली.

  • सर्वोच्च न्यायालयाने ११ महिला अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही लष्कराने कायम नियुक्ती दिलेली नाही, असे या ११ अधिकाऱ्यांनी याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

  • त्यावर जर त्या महिला अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निकालात नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता केली असेल तर तुम्ही त्यांना कायम नियुक्ती का मंजूर केली नाही, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन लष्कराची बाजू मांडताना म्हणाले की, अकरा महिलांना कायम नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांच्या संदर्भातील सर्व प्रश्न सोडवून काही प्रलंबित प्रश्नांवर न्याय्य भूमिका घेतल्याबद्दल  न्यायालयाने समाधान व्यक्त केले.

कळसुबाई बियाणे संवर्धन समितीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव :
  • कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी’ मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वात वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय ‘जीनोम सेव्हियर कम्युनिटी’ पुरस्कार या वर्षी तालुक्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीला मिळाला आहे. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.

  • नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात ११ नोव्हेंबर रोजी भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच बीज माता पद्माश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी  हा पुरस्कार व स्वीकारला.

  • स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. 

  • अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मराठी माणूस करणार नेतृत्व :
  • न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

  • कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

  • ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा २८व र्षीय भरत इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.

मनिकाला लक्ष्य करणाऱ्या टेबल टेनिस संघटनेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे :
  • भारतीय टेबल टेनिस महासंघाला न्यायालयात खेचणाऱ्या मनिका बत्राला लक्ष्य केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी प्रकट केली. क्रीडापटूंना लक्ष्य केले जाऊ नये आणि लक्ष्य केले गेले असेल, तर ती गंभीर समस्या आहे, असे ताशेरे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी ओढले आहेत.

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात अनिवार्य हजेरीच्या नियमाबाबत आव्हान देणारी याचिका मनिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती.

  • ‘‘भारतीय संघटनेप्रमाणेच आता आंतरराष्ट्रीय संघटनेकडूनही एखाद्या आरोपीप्रमाणे वागूणक दिली जात आहे, भारतीय संघटनेने त्यांना माझ्या कृतीबाबत कळवले असावे. आता मला स्पर्धेच्या सरावाकडे लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे,’’ असे मनिकाने म्हटले आहे.

१३ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.