चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ मार्च २०२१

Date : 13 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘क्वाड’ ही जागतिक कल्याणाची शक्ती - मोदी :
  • भारतासह अमेरिका, ऑस्टे्रलिया आणि जपान या चार देशांच्या क्वाड परिषदेच्या विषयपत्रिकेमध्ये करोनावरील लस, हवामान बदल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आल्याने क्वाडला जगाचे भले करण्याची शक्ती बनविले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाडच्या पहिल्या शिखर परिषदेत व्यक्त केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थैर्य याबाबतही मोदी यांनी भाष्य केले.

  • लोकशाही मूल्यांनी आम्ही एकत्रित आहोत आणि मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आम्ही बांधील आहोत, असेही मोदी म्हणाले. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्टे्रलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हेही सहभागी झाले होते.

  • वसुधैव कुटुंबकम हे भारताचे प्राचीन तत्त्वज्ञान असून त्याचाच विस्तार आपण अनुभवत आहोत, आपण पूर्वीपेक्षाही अधिक एकत्रितपणे काम करू, क्वाड हा आता प्रादेशिक स्थैर्याचा स्तंभ बनला असल्याचे शिखर परिषदेने दाखवून दिले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

मोठी बातमी! MPSC परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर :
  • राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

  • २७ मार्च आणि ११ एप्रिलची परीक्षा वेळेतच होणार - तसंच याशिवाय इतर परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘एच १बी’ व्हिसाधारकांची वेतनकपात लांबणीवर :
  • भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक कंपन्या वापरत असलेल्या एच १बी व्हिसाधारक व्यक्तींचे वेतन कमी करण्याच्या ट्रम्प सरकारच्या अधिसूचनेची अंमलबजावणी साठ दिवस लांबणीवर टाकण्याचे बायडेन प्रशासनाने ठरवले आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकी लोकांना जास्त वेतन मिळावे यासाठी हा निर्णय़ घेतला होता.

  • परदेशी असलेल्या एच १बी व्हिसाधारक व्यक्तींना कमी वेतन देण्याची अधिसूचना ट्रम्प प्रशासनाने काढली होती. एच १ बी व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे भारतीय, चिनी व इतर देशातील माहिती तंत्रज्ञान व इतर कर्मचाऱ्यांना अमेरिकेत जाऊन काम करता येते.

  • तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी याच प्रकारचा व्हिसा घेऊन त्यांना अमेरिकेत पाठवत असतात. कामगार मंत्रालयाने संघराज्य  अधिसूचनेत शुक्रवारी म्हटले आहे, की वेतन कपातीचा निर्णय़ आता १४ मे २०२१ चे १ जुलै २०२१ या काळात लागू होता, पण तो आणखी  लांबणीवर टाकण्यात आला आहे. अंमलबजावणी लांबणीवर टाकताना लोकांना या निर्णयावर प्रतिक्रिया विचारली होती. १ फेब्रुवारी रोजी कामगार मंत्रालयाने एच१ बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा निर्णय़ लांबणीवर टाकण्याची अधिसूचना काढली होती.

  • १४ जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेत परदेशी लोकांना कमी वेतन देण्याची अधिसूचना आधीच्या ट्रम्प सरकारने जारी केली होती.वेतन कपात साठ दिवस लांबणीवर टाकण्याच्या निर्णय़ामुळे मधल्या काळात या निर्णयावर कायदेशीर मते, तथ्ये व धोरण यांच्या मदतीने निर्णय घेतला जाणार आहे. वेतन कपात लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर १५ दिवसांत सूचना मागवण्यात आल्या होत्या. १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण ५७ सूचना मिळाल्या होत्या. त्यात वेतनकपातीचा निर्णय लांबणीवर टाकण्याच्या बाजूने संबंधित लोकांनी कल दर्शवला होता.

‘अमेरिका ४ जुलैपर्यंत करोनामुक्तीच्या समीप’  :
  • येत्या १ मेपर्यंत पात्र व्यक्तींचे करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करून अमेरिकेला ४ जुलै या स्वातंत्र्य दिनी करोनामुक्तीच्या समीप आणण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला आहे.

  • २० जानेवारीला अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी प्रथमच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले , की करोना साथीतून देशाला बाहेर काढण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येईल. १ मे पर्यंत सर्व प्रौढांना लस घेण्याची परवानगी देऊन त्यांचे लसीकरण करण्यात येईल. ४ जुलैपर्यंत देशाला करोनामुक्तीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करून स्वातंत्र्य दिन करोनाच्या छायेत नव्हे, तर मुक्त वातावरणात साजरा करता येईल अशी परिस्थिती निर्माण करू. संपूर्ण वर्षभर कठीण गेले आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष असणार आहे. त्यात आपण करोनापासूनही स्वातंत्र्य मिळवणार आहोत.

  • बायडेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सच्या करोना मदत योजनेवर नुकतीच स्वाक्षरी केली आहे.  त्यांनी सांगितले, की चाचण्या व जनुकीय क्रमनिर्धारण केले जाईल. चाचण्या व जिनोमच्या माध्यमातून हे शक्य आहे. कोविड प्रतिबंधासाठी आम्ही योजना आखली आहे.

  • कोविड १९ मुळे अमेरिकेत गुरुवारी मृतांची संख्या ५,२७,००० झाली असून ही संख्या पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध व व्हिएतनाम युद्ध तसेच ९/११ हल्ला या सर्वांमधील एकूण प्राणहानीपेक्षा मोठी आहे,असे त्यांनी सांगितले.

मोदींच्या उपस्थितीत दांडी यात्रेला आरंभ :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पंचाहत्तरीनिमित्त उद्घाटन केले असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.  मोदी यांनी गुजरातमध्ये साबरमती आश्रमापासून यात्रेस हिरवा झेंडा दाखवला. ही यात्रा  दांडी येथे जाणार आहे.

  • महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढून मूठभर मीठ उचलून ब्रिटिशांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. या पदयात्रेत ८१ जण सामील असून अहमदाबादमधील साबरमती आश्रमापासून नवसारीतील दांडी येथे ही यात्रा पायी जाणार आहे.  ३८६ कि.मीचे हे अंतर २५ दिवसांत कापले जाईल. ५ एप्रिलला  सांगता होईल.

  • महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेला १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमापासून सुरुवात झाली होती. त्या वेळी त्याला ‘मिठाचा सत्याग्रह’ असेही म्हटले गेले. शुक्रवारी अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर मोदी थेट साबरमती आश्रमाकडे गेले. तेथे त्यांनी महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. नंतर हृदयकुंज या ठिकाणी भेट दिली. तिथे महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा १९१८ ते १९३० या काळात राहत असत. मोदी यांनी अभ्यागत पुस्तिकेत असे म्हटले आहे,की हा महोत्सव म्हणजे स्वातंत्र्य सैनिक व  स्वातंत्र्यलढ्याला आदरांजली आहे. साबरमती आश्रमात आल्यानंतर बापूंमुळे देश घडवण्याचा माझा निर्धार अधिक पक्का होत जातो. महात्मा गांधी यांनी आत्मनिर्भरतेची शिकवण दिली होती. आत्मविश्वासाला महत्त्व दिले.

  • आझादी का अमृतमहोत्सव ही स्वातंत्र्यसैनिकांना व त्यांच्या लढ्याला आदरांजली आहे. या लढ्यातील महत्त्वाच्या घटना देशाच्या सदैव स्मरणात राहतील. त्यातून आपल्याला  विकासासाठी प्रेरणा मिळत राहील. बापूंच्या आशीर्वादाने आपण भारतीय लोक आपली कर्तव्ये पार पाडू, अमृत महोत्सवातील उद्दिष्टे साध्य करू, असे मोदी यांनी सांगितले.

१ ली ते ११ वी सगळेच पास; विद्यार्थ्यांना सुखद धक्का :
  • करोना काळात देशभरात अनेक भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन घेण्यात आली. काही भागात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन झाल्या. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पुद्दुचेरीमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसत आहे.

  • इयत्ता १ली ते इयत्ता ११वी अशा सर्वच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.

मोठी बातमी! इंजिनिअर होण्यासाठी आता १२वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही; AICTE चा निर्णय :
  • इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(AICTE) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत आता बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे.

  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयांचा अभ्यास कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • AICTE संस्थेने आता १४ विषयांची यादी जाहीर केली असून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

  • यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा  समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE  ने एक हँडबुक जारी केलं असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर :
  • साहित्य अकादमी पुरस्कार – २०२० आज (शुक्रवार) जाहीर झाले असून नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • तसेच, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ.निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

  • साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.

१३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.