चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जुलै २०२१

Updated On : Jul 13, 2021 | Category : Current Affairs


‘नीट’ची परीक्षा १२ सप्टेंबरला; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा :
 • राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) १२ सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात घेतली जाणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे.

 • गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांबाबत विद्यार्थी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत विचारत होते. अखेर त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी अर्ज उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून ntaneet.nic.in वर उपलब्ध असणार आहे.

 • यापूर्वी ही परीक्षा १ ऑगस्ट रोजी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षाही करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणसाठी ही परीक्षा पास होणं महत्त्वाचं आहे.

 • नीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक विभागात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढेल. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न निवड करता येतील. माहिती पत्रक आल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या परीक्षेला किमान १४ लाख विद्यार्थी बसतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत होते.

रोमन जिंकले :
 • निराशा, विश्वास आणि पुनरागमन या त्रिसूत्रीच्या बळावर इटलीने जगाला पुन्हा एकदा त्यांचे सामर्थ्य दाखवून दिले. जवळपास वर्षभरापूर्वी करोनाच्या कहरात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या इटलीने रविवारी इतिहास घडवला. क्षणाक्षणाला हिंदोळे घेणाऱ्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत झुंजार इटलीने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे आतापर्यंत यशस्वीपणे पेलणाऱ्या इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये नामोहरम केले.

 • रॉबटरे मान्चिनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इटलीने हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडवर १-१ (३-२) असा विजय मिळवून दुसऱ्यांदा युरो चषक उंचावला. तर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या इंग्लंडला मात्र ५५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही जेतेपदाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे एकीकडे अश्रूंचा बांध फुटलेले इंग्लंडचे खेळाडू आणि चाहते, तर दुसरीकडे जेतेपदाच्या जल्लोषात न्हाऊन गेलेले इटालियन्स, असे चित्र युरोप खंडात रविवारी पाहायला मिळाले.

 • ऐतिहासिक वेम्बले स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रथमच युरो चषकाच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या इंग्लंडने त्याच थाटात सुरुवात करताना अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळवली. किरॅन ट्रिपियरने उजव्या दिशेने दिलेल्या पासला ल्यूक शॉ याने अप्रतिमरीत्या गोलजाळ्याची दिशा दाखवली तेव्हा स्टेडियममधील इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शॉ याचा हा कारकीर्दीतील पहिलाच गोल ठरला.

संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून :
 • संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९ सत्रांचे हे अधिवेशन पूर्णवेळ चालणे अपेक्षित असून, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे एकाच वेळी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील.

 • करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी, करोनासंदर्भातील नियमांचे पालन करूनच संसदेचे कामकाज होईल, असे बिर्ला यांनी सांगितले. लशीची किमान एक मात्रा घेतलेल्या खासदारांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणीची सक्ती केली जाणार नाही. मात्र, लसीकरण न झालेल्यांनी नमुना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन बिर्ला यांनी केले.

 • गेल्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशात संसदेच्या आवारात प्रवेश करण्यासाठी सर्वाना चाचणी सक्तीची होती. संसदेच्या आवारात नमुना चाचणीची सुविधा २४ तास उपलब्ध असून, सदस्यांच्या साहाय्यकांच्या लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बिर्ला यांनी दिली.

भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail :
 • भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं.

 • ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनची चाचणी घेतली जात होती. यामध्ये ४५० किमी दूरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला जो अपयशी ठरला.

 • “क्षेपणास्त्र डागल्यानंतर अवघ्या काही काळामध्येच ते पडलं. सोमवारी सकाळी ही चाचणी करण्यात आली. हे असं का घडलं या मागील कारणांचा तपास डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) वैज्ञानिक आणि ब्रम्होस अरोस्पेस कॉर्परेशनच्या टीम्सकडून केला जाणार आहे,” अशी माहिती सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

नेपाळच्या पंतप्रधानपदी  देऊबा यांच्या नेमणुकीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश :
 • नेपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून पाच महिन्यांपूर्वी दोन वेळा संसद बरखास्त करण्यात आली होती.

 • पाच सदस्यांच्या घटनात्मक पीठाचे प्रमुख न्या. चोलेंद्र शमशेर राणा यांनी असा निकाल दिला की, अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचा संसदेचे प्रतिनिधिगृह बरखास्त करण्याचा निर्णय हा पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या शिफारशीनुसार असला तरी तो घटनाबाह्य़ आहे. मध्यावधी निवडणुका घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने असा आदेश दिला की, देऊबा यांना पंतप्रधानपदी नेमण्यात यावे. या आदेशाची कारवाई मंगळवारीच करण्यात यावी.

 • देऊबा हे ७४ वर्षे वयाचे आहेत. त्यांनी चार वेळा पंतप्रधानपद सांभाळले आहे. न्यायालयाने नवीन संसदेचे अधिवेशन १८ जुलैला सायंकाळी पाच वाजता घेण्याचा आदेशही जारी केला आहे. सरन्यायाधीश राणा यांनी सांगितले की, मतदानात सहभाग घेण्याचा पक्षादेश नवीन पंतप्रधानांची निवड करताना राज्य घटनेच्या कलम ७६(५) अन्वये लागू होत नाही. न्यायापीठात दीपक कुमार कार्की, मिरा खाडका, ईश्वर प्रसाद खाटीवाडा, डॉ. आनंदा मोहन  भट्टराय यांचा समावेश होता.

१३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)