चालू घडामोडी आणि दिनविशेष - 13 डिसेंबर 2023

Date : 13 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत होणार आहे. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीबीएसईने २०२२-२३च्या निकालावेळीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना विषयनिहाय, दिनांकनिहाय वेळापत्रकाची प्रतीक्षा होती.
  • आता सीबीएसईने सविस्तर वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार सुमारे ५५ दिवस या परीक्षा चालणार आहेत. सविस्तर वेळापत्रक  https://www.cbse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान दोन विषयांमध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात आला आहे.
  • वेळापत्रक तयार करताना जेईईसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचा विचार करण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी बराच काळ आधी दिनांकनिहाय वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे, असे सीबीएसईने स्पष्ट केले.
जीवाश्म इंधनावरील कराराविना ‘सीओपी-२८’चा समारोप?
  • जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनांचा वापर घटवण्याचा मुद्दा जाहीरनाम्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यास विरोध करून या मुद्दय़ावरून नाटय़मय घुमजाव करणारे देश आणि या विषयावर सहमती होऊन संयुक्त राष्ट्रांच्या महत्त्वपूर्ण हवामान  शिखर परिषदेच्या (सीओपी २८) वेळेवर समारोपाची आशा असलेले देश यांच्यात कोंडी निर्माण झाली आहे.
  • ‘सीओपी २८’च्या अंतिम जाहीरनाम्याच्या मसुद्यातून जीवाश्म इंधनाचा (कोळसा, नैसर्गिक तेल-वायू)  वापर टप्प्या-टप्प्याने घटवण्याचा मुद्दा ऐन वेळी वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जाहीरनाम्यात जिवाश्म इंधनाचा वापर घटविण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यास सौदी अरेबिया, इराकसारख्या तेलावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या देशांनी विरोध केल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ परिषदेचे २८ वे सत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील शिखर परिषद सुमारे दोन आठवडे चालली. या काळात भाषणे, वाटाघाटी, निदर्शने झाली. ती मंगळवारी माधान्हीला संपणार होती. परंतु हवामान परिषदेतील विचारविनिमय-चर्चा जवळजवळ नेहमीच लांबते. यंदा सोमवारी या परिषदेच्या जाहीरनाम्याच्या मसुद्यात कोळसा, तेल आणि वायूच्या वापर वेगाने घटवण्यासाठी कटिबद्धतेचा आग्रह धरणारे देश संतप्त झाले. कारण हा मुद्दा वगळण्यात आला.
  • त्याऐवजी, मसुद्यात देशांनी जीवाश्म इंधनाचा वापर आणि उत्पादन न्याय्य, सुव्यवस्थित पद्धतीने घटवण्याचे आवाहन केले. ‘सीओपी-२८’चे महासंचालक माजिद अल-सुवैदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की सोमवारी रात्री मांडलेल्या मसुद्यावर देशांनी विचारविनिमय करून आपली मते द्यावीत. या जाहीरनाम्यात मतभेदाचे कोणते मुद्दे (रेड लाईन्स) आहेत, हे त्यांनी मांडावेत, यासाठी हा मसुदा ठेवण्यात आला होता. हा मसुदा या विषयावरील विचारमंथनाचा प्रारंभ बिंदू होता. हा मसुदा मांडताना, त्यावर सदस्य देशांचे टोकाचे मतभेद आहेत, हे आम्हाला माहीत होते. परंतु, हे मतभेदाचे मुद्दे नेमके कोणते, हे आम्हाला ठाऊक नव्हते. आता काल रात्रभर या मुद्दयांवर आम्ही साकल्याने विचारविनिमय केला आहे. सदस्य देशांचे यावरील अभिप्राय घेतले. त्यामुळे आता सुधारित नवा मसुदा तयार करण्याची वेळ आली आहे.
जो बायडेन प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी भारतात येणार नाहीत, क्वाड बैठकही पुढे ढकलली
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना २६ जानेवारी रोजी भारतात साजरा केला जाणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. परतुं, बायडेन या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी बातमी समोर आली आहे. भारत पुढच्या वर्षी क्वाड देशांच्या शिखर परिषदेचंही आयोजन करणार आहे. ही बैठक जानेवारी महिन्यात होणार होती जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. क्वाड बैठक प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच आयोजित केली जाणार होती. त्यामुळे जो बायडेन हे प्रजासत्ताक दिन आणि क्वाड बैठक अशा दोन गोष्टींसाठी सलग काही दिवस भारतात येणं अपेक्षित होतं. परंतु, आता अशी माहिती मिळाली आहे की, बायडेन प्रजासत्ताक दिन सोहळ्याला येऊ शकणार नाहीत. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, क्वाड देशांची बैठकदेखील पुढच्या वर्षीच्या अखेरीस आयोजित केली जाऊ शकते.
  • पुढच्या वर्षी भारतात होणारी क्वाड देशांची बैठक वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. भारत सरकार आता सुधारित तारखांवर काम करत आहे. क्वाड देशांच्या प्रतिनिधींशी बोलून याबाबतचं वेळापत्रक ठरवलं जाईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी मे महिन्यात जपानच्या हिरोशिमा येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी यांनी घोषणा केली होती की, क्वाड देशांच्या पुढच्या बैठकीचं आयोजन भारतात केलं जाईल. भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान हे क्वाडचे सदस्य देश आहेत. ‘क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ (क्वाड) ही अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमधील धोरणात्मक युती आहे. या युतीची स्थापना २००७ साली झाली होती. आशिया-पॅसिफिक प्रदेशात म्हणजेच हिंद महासागर आणि प्रशांत महासागरादरम्यान येणाऱ्या सागरी क्षेत्रावरील चीनच्या वाढत्या प्रभावाला लगाम घालणं हे क्वाडच्या निर्मितीचं मुख्य अघोषित उद्दिष्ट आहे.
  • यंदा (२०२३) प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. भारत दरवर्षी प्रजासत्ताक सोहळ्यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या नेत्यांना आमंत्रित करतो. २०२१ आणि २०२२ मध्ये करोनाच्या प्रादूर्भावामुळे भारताने या कार्यक्रमासाठी कोणालाही बोलावलं नव्हतं. तर पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी भारताने बायडेन यांना आमंत्रण पाठवलं होतं.
दगडफेक करणारी मुलगी ते फूटबॉलपटू, नरेंद्र मोदींनी सांगितलं काश्मिरी तरुणीचं परिवर्तन
  • केंद्र सरकारने २०१९ साली जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य असल्याचं सांगत कलम ३७० रद्द ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. भाजपा सरकारच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ठरली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी कलम ३७० रद्द केल्याने गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये काय सकारात्मक चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे. तसंच, एका तरुण खेळाडूचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखात अफशा आशिक हिचा उल्लेख केला आहे. ती कधीकाळी श्रीनगरमधील दगडफेकीत सहभागी होती. परंतु, कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिला तिच्यातील फुटबॉलचं कौशल्य दिसलं. तिला त्यानुसार प्रशिक्षण मिळालं आणि आज ती देशातील नामवंत फुटबॉलपटू आहे. याबाबत मोदी लिहितात, “क्रिडा क्षेत्रातील तरुणांची क्षमता लक्षात घेऊन आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध उपक्रम राबवले. विविध खेळांच्या माध्यमातून तेथील तरुणांच्या आकांक्षा आणि भविष्यात झालेले बदल आम्ही पाहिले आहेत. या दरम्यान विविध खेळांच्या जागांचं आधुनिकीकरण करण्यात आलं. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. स्थानिक पातळीवर फुटबॉल क्लबची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या सर्वांचा परिणाम चांगला होती”, असंही मोदी म्हणाले.
  • “मला प्रतिभाशाली फुटबॉल खेळाडू अफशा आशिक हिचं नाव आठवतंय. डिसेंबर २०१४ मध्ये ती दगडफेक करणाऱ्या समुहात होती. परंतु, योग्य प्रोत्साहन मिळाल्याने तिने फुटबॉल खेळासाठी प्रयत्न केले. तिला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. या खेळात तिने उत्कृष्ट कामगिरी केली. फिट इंडिया डायलॉग्स या कार्यक्रमात तिच्याबरोबर माझी भेट झाली होती. या भेटीत मी तिला म्हटलं होतं की, बेंड इट लाईक बेकहमच्या पुढे जाण्याची वेळ आली आहे. कारण आता लोक Ace it like Afshan (अफशाप्रमाणे निपुण व्हा)म्हणत आहेत. मला आनंद आहे की, आता तरुणांनी किकबॉक्सिंग, कराटे आणि इतर अनेक खेळात आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली आहे.
अंडर-१९ पुरुष विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
  • पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा १९ जानेवारीपासून सुरू होणार असून ११ फेब्रुवारीला विजेतेपदाचा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत त्रिकोणीय शृंखला खेळणार आहे. जे खेळाडू विश्वचषकात खेळतील तेच खेळाडू त्या मालिकेतही सहभागी होतील. पंजाबच्या उदय सहारनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेतही तो संघाचे नेतृत्व करत आहे.
  • बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिका आणि आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषक २०२४ साठी भारताच्या अंडर-१९ पुरुष संघाची घोषणा केली आहे. भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील त्रिकोणीय मालिकेला २९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० जानेवारीला, दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडशी आणि तिसरा सामना २८ जानेवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जातील.
  • आयसीसीने सोमवारी संध्याकाळी अंडर-१९ विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी विश्वचषकात चार गट करण्यात आले आहेत. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल ३ संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण १२ संघ असतील. येथे प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर सर्वोतम-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

 

स्मृती मंधानाने रचला इतिहास; कॅप्टन कौरनंतर ‘ही’ कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय खेळाडू :
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्ला सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये भारताने ४ धावांनी विजय नोंदवला. या विजयात स्मृती मंधानाने महत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर तिने एका विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.

  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाच्या २५०० धावा पूर्ण - भारतीय महिला संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी हे विशेष पराक्रम फक्त हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवला गेला होता. कौरने देशासाठी १३९ सामने खेळताना१२५ डावांत २७.३६ च्या सरासरीने २७३६ धावा केल्या. त्याचवेळी, मंधानाने तिच्या १०४ व्या सामन्यातील १०० व्या डावात ही विशेष कामगिरी केली आहे. मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५४४ धावा केल्या आहेत.

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात स्मृती मंधानाची बॅट जोरदार तळपली. संघासाठी डावाची सुरुवात करताना तिने ४९ चेंडूत १६१.२२ च्या स्ट्राईक रेटने ७९ धावांची मौल्यवान खेळी खेळली. यादरम्यान तिच्या बॅटमधून ९ चौकार आणि ४ उत्कृष्ट गगनचुंबी षटकार निघाले.

देशात लवकरच नवी टोल सिस्टीम? कॅमेरांमुळे वाचणार प्रवासाचा वेळ; जाणून घ्या सविस्तर : 
  • केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे. सध्या फास्टटॅगवरून टोल जमा करण्याच्या सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये लवकरच बदल करण्यात येत असुन एका नवी सिस्टिम अंमलात आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडुन कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे. या कॅमेऱ्यांना ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ (ANPR) म्हणून ओळखले जाईल.

  • कॅमेऱ्यावर आधारित या टोल जमा करण्याच्या पद्धतीचे मुख्य कारण नागरिकांचा टोल प्लाझावरील वेळ वाचवणे हा आहे. सध्या भारतातील ९७ टक्के टोल प्लाझावर फास्टटॅगचा वापर केला जातो. पण तरीही नागरिकांना या टोल प्लाझावर होणाऱ्या गर्दीला सामोरे जावे लागते. टोल प्लाझावर एएनपीआर सेट केल्याने कदाचित ही गर्दी जमा होणार नाही आणि नागरिकांचा वेळ वाचेल अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.

  • एएनपीआर कसे काम करेल - देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरून टोल प्लाझा हटवण्यात येतील आणि त्याजागी एएनपीआर इन्स्टॉल केले जाईल. एएनपीआरद्वारे गाडीच्या नंबर प्लेटवरील नंबरची नोंद करण्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून पैसे भरले जातील.

  • एएनपीआर सिस्टिममध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात - एएनपीआर सिस्टिममध्ये अनेक संभाव्य अडचणी येऊ शकतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे या कॅमेऱ्यांमध्ये केवळ २०१९ नंतर बनवण्यात आलेल्या गाड्यांचेच नंबर कॅप्चर केले जातील. याचे कारण म्हणजे,२०१९ मध्ये सरकारने ओइएम असणारे नंबर प्लेट्स असावे अशी कल्पना मांडली आणि त्यानुसार नंबर प्लेट्स बनवण्यात आल्या. त्यामुळे त्या आधीच्या गाड्यांच्या नंबर प्लेट्सची नोंद होणार नाही.

  • ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’मधील आणखी एक समस्या म्हणजे या कॅमेऱ्याद्वारे ९ अंकांपेक्षा अधिक अंक किंवा अक्षर असणाऱ्या गाडयांवरील नंबर कॅप्चर करता येणार नाही. बऱ्याच जणांनी एखादे नाव किंवा एखादे लकी अक्षर नंबर प्लेटमध्ये जोडलेले असते. त्यामुळे अशा नंबर प्लेटवरील नंबर एएनपीआर सिस्टिमला कॅप्चर करता येणार नाहीत.

भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय, आता महिलाही होणार ‘मरिन कमांडो’ : 
  • भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता महिलांनाही नौदलाच्या मरिन कमांडोजच्या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होता येणार आहे. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

  • या वृत्तानुसार, महिलांनी ठरलेले निकष पूर्ण केले तर त्यांनाही नौदलात मरिन कमांडो म्हणून भरती होता येणार आहे. असं असलं तरी कोणालाही थेट मरिन कमांडो म्हणून भरती होता येत नाही. नौदलात भरती झाल्यानंतर मरिन कमांडो होण्यासाठीचे निकष पूर्ण करून मगच ‘स्पेशल फोर्स’मध्ये भरती होता येते.

  • पुढील वर्षीपासून अग्निवीर म्हणून नौदलात दाखल होणाऱ्या महिला अधिकारी किंवा सेलर यांना मरिन कमांडोच्या पात्रतांच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करून या पदावर काम करता येईल.

स्पेशल फोर्सेस काय आहे?

  • भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिन्ही दलात स्पेशल फोर्सेस आहेत. या स्पेशल फोर्सेसमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही तग राहू शकतील असे मानसिक आणि शारीरिक पातळीवरील सदृढ सैनिकांची भरती केली जाते. यासाठी त्यांना खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं आणि विशेष काठिण्य पातळी पार करावी लागते. त्या निकषांवर संबंधितांनी स्वतःला सिद्ध केल्यानंतरच त्यांना या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल केले जाते.

मरिन कमांडो कोण असतात?

  • भारतीय नौदलात १९८७ मध्ये मरिन कमांडोंच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला या पथकाचं नाव ‘इंडियन मरिन स्पेशल फोर्सेस’ असं होतं. १९९१ नौदलाने हे नाव बदललं आणि ‘सबोटेड फोर्सेस ऑफ मरिन’ (मरिन कमांडो फोर्स) असं ठेवलं. त्याचाच शॉर्ट फॉर्म मार्कोज असा आहे.

‘कोची बिएनाले’वर ‘लांबणी’ची नामुष्की; दृश्यकलेचे महाप्रदर्शन १२ ऐवजी २३ डिसेंबरपासून नागरिकांसाठी खुले :
  • भारतीय कलाजगतातील पहिलेच आणि जगाचे लक्ष वेधून घेणारे ‘कोची बिएनाले’ हे दृश्यकलेचे दर दोन वर्षांनी भरणारे महाप्रदर्शन यंदा कोणतेही कारण न देता लांबणीवर टाकले गेल्याचा धक्का अनेक चित्रकार व कलारसिकांना सोमवारी बसला.

  • या महाप्रदर्शनाचे उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी संध्याकाळी केले खरे; पण २३ डिसेंबपर्यंत मुख्य दालने उघडणार नाहीत, हे सकाळीच जाहीर करण्यात आले. ‘‘ हे काय चालले आहे?’’, ‘‘ असे होऊच कसे शकते?’’ या प्रश्नांचा भडिमार आयोजकांनी दिवसभर पूर्णपणे टाळला! ‘ कोची बिएनाले’ चे एक संस्थापक आणि विख्यात चित्रकार बोस कृष्णम्माचारी यांनी सायंकाळच्या उद्घाटन सोहळय़ात करोनाकाळातील अडचणींचा पाढा वाचला; त्यामुळेच २०२० चे हे प्रदर्शन दोन वर्षे लांबणीवर पडून २०२२ मध्ये होत असल्याचाही उल्लेख केला आणि ‘‘गेल्या काही दिवसांत प्रचंड पाऊस पडल्यामुळे आम्ही प्रदर्शनाची मांडणीच करू शकलो नाही’’ असे कारण दिले.

  • केरळसाठी हे महाप्रदर्शन पर्यटनदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे आहे. राज्य सरकार यासाठी विविध स्वरूपात एकंदर सात कोटी रुपयांचा खर्चभार उचलणार आहे, असे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी जाहीर केले.

  • ३५ टक्केच काम पूर्ण - युरोप – ऑस्ट्रेलिया, कॅनडा , इंग्लंड, जर्मनी , सिंगापूर , अमेरिका आदी देशांतून तसेच देशभरच्या अनेक शहरांतून ‘‘१२ डिसेंबर’’ ही या प्रदर्शनाची नेहमी ठरलेली तारीख गाठण्यासाठी प्रवास करून आलेल्या कलाप्रेमींची चीडयुक्त- हताश कुजबूज दिवसभर,सुरू होती. आम्ही जी काही अर्धीमुर्धी ‘‘बिएनाले’’ मांडून तयार आहे तीही पाहू, असा हट्टच सकाळपासून तासभर ताटकळलेल्या सुमारे दीड डझन परदेशी कलाप्रेमींनी धरला. अखेर मुख्य दालने असलेल्या ‘‘अ‍ॅस्पिनवॉल हाउस’’ च्या आतील काही दालनांमध्ये प्रवेशही मिळाला. परंतु त्यांच्यासह आत शिरलेल्या ‘‘लोकसत्ता’’ प्रतिनिधीने पाहिले की, फार तर ३५ टक्के कलाकृतीच मांडून झाल्या होत्या.

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय! ; हिमाचल प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही : 
  • सिमला येथे झालेल्या सोहळय़ात हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांचा रविवारी शपथविधी उत्साहात झाला. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

  • शपथविधीनंतर सुखू यांनी सांगितले, की आम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार देऊ. राज्यातील जनतेला निवडणूक प्रचारात दहा आश्वासने दिली आहेत. त्यांची आम्ही निश्चित पूर्तता करू. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करू.

  • सिमला येथे रविवारी झालेल्या एका समारंभात मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तथापि इतर कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. राज्यात १२ सदस्यीय मंत्रिमंडळ बनवता येते.

  • सुखू यांनी स्वच्छ व प्रामाणिक सरकारचे आश्वासन देताना सांगितले, की काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ते म्हणाले, की आम्हाला केवळ सत्तेसाठी सत्ता नको होती. आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. मला थोडा वेळ द्या. कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. नवीन व्यवस्था आणि नवीन विचार आणण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ डिसेंबर २०२१

 

मानवाधिकार जाहीरनाम्यावर ‘व्हॅटिकन’ने स्वाक्षरी करावी ; कॅथलिक महिला संघटनांची मागणी :
  • रोमन कॅथलिक चर्चचे सार्वभौम राज्य मानल्या जाणाऱ्या ‘होली सी’ने युरोप परिषदेचे सदस्य व्हावे, तसेच युरोपच्या मानवाधिकार जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करावी, अशी मागणी कॅथलिक महिलांच्या गटांचा समावेश असलेल्या संघटनेने केली आहे.

  • संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार दिनानिमित्त या संघटनेने ही मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘होली सी’ हा सार्वभौम देश समजला जातो आणि आपण मानवाधिकार आणि व्यक्तिगत प्रतिष्ठेचा पुरस्कार करतो, असे ‘होली सी’चे म्हणणे आहे, असे या महिला संघटनांनी निदर्शनास आणून दिले आहे.

  • असे असतानाही व्हॅटिकनने युरोपच्या मानवाधिकार जाहीरनाम्याशी सुसंगत धोरण ठेवलेले नाही. युरोपचे हे मानवाधिकार धोरण जगभरात मानवी हक्कांबाबत प्रमाण मानले जाते, असे कॅथलिक महिला संघटनांचे म्हणणे आहे.

  • कॅथलिक महिला परिषद (कॅथलिक वुमन्स काऊन्सिल) ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेच्या युरोपमधील सदस्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, वर्षानुवर्षे ‘होली सी’ने आपल्या अधिकारांत एखाद्या देशासारखा कारभार चालविला आहे. त्यातून त्यांचे काही हक्क निर्माण झाले असले तरी, त्याचवेळी त्यांची काही कर्तव्येही बनली आहेत.

‘धर्माधारित फाळणी ही ऐतिहासिक चूक :
  • भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद्धही भारत जिंकेल. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होताना भारताचे धर्माच्या नावावर झालेले विभाजन ही ‘ऐतिहासिक चूक’ होती हे १९७१च्या युद्धाने दाखवून दिले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.

  • दहशतवादाला प्रोत्साहन देऊन आणि इतर भारतविरोधी कारवाया करून पाकिस्तान भारताचे तुकडे करू इच्छितो, असे भारताने १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय पर्वाच्या’ (सुवर्णमहोत्सवी समारंभ) उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

  • भारताच्या सशस्त्र दलांनी १९७१च्या युद्धात पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीला मिळवले आणि सध्या ते दहशतवादाचा धोका मुळापासून नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकलो आणि आम्ही अप्रत्यक्ष युद्धही जिंकू अशी मी हमी देऊ शकतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

  •  संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत व इतर ११ जवानांच्या अकाली मृत्यूमुळे हा कार्यक्रम साधेपणाने झाला.

युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाची आर्थिक नाकेबंदी; बायडेन यांच्यापाठोपाठ जी-७ देशांचा इशारा :
  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आर्थिक आघाडीवर अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

  • अमेरिकेतील काही राज्यांना शनिवारी वादळाचा मोठा फटका बसला. त्यासंबंधी माहिती दिल्यानंतर बायडेन यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, ‘‘मी पुतिन यांना निक्षून सांगितले आहे की, रशियाने जर युक्रेनवर हल्ला केला तर, त्याचे रशियाचे अर्थव्यवस्थेवर विध्वंसकारी परिणाम होतील.

  • ’’ रशियाने युक्रेनवरील आक्रमणाबाबत कोणतीही माहिती उघड केली नसली तरी, युक्रेनमध्ये अमेरिकेचे भूसैनिक पाठविले जाण्याची शक्यता बायडेन यांनी वर्तविली. पूर्वेतर नाटो देशांची सुरक्षा वाढविण्यासाठी तेथे आणखी सैन्य पाठविण्याचा निर्णय अमेरिका आणि नाटोला घ्यावा लागणार आहे.

  • बायडेन यांनी गेल्या आठवड्यात पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून दोन तास चर्चा केली होती. युक्रेनवर चाल केल्यास रशियाचे जागतिक क्रमवारीतील स्थान धोक्यात येईल, याची आपण पुतिन यांना जाणीव करून दिली, असे बायडेन म्हणाले.

नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्त्यात वाढ; २०,००० रुपयांपर्यंत वाढणार पगार :
  • सातव्या वेतन आयोगांतर्गत मोदी सरकार नवीन वर्ष २०२२ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट देऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ करू शकते. यावेळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ मिळणार आहे. त्यामुळे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाई भत्त्यात (डीए) वाढ झाल्यास सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

  • माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २०,००० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सामान्यतः, सरकार केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा वाढ करते, म्हणजे जानेवारी ते जुलै दरम्यान. यापूर्वी जुलैमध्ये, सरकारने दीर्घकालीन स्थगितीनंतर महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) पुनर्संचयित केले होते आणि भत्त्यांचा दर १७ टक्क्यांवरून २८ टक्के केला होता.

  • केंद्र सरकारने संभाव्य वाढीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही आणि या बातम्या केवळ काही अहवालांवर आधारित आहेत. या डीए वाढीबाबत केंद्राकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, की त्याची अंमलबजावणी कधी होणार याचीही घोषणा करण्यात आलेली नाही.

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा - सिंधूपुढे जगज्जेतेपद टिकवण्याचे आव्हान :
  • दोन ऑलिम्पिपक पदकविजेती पी. व्ही. सिंधूपुढे रविवारपासून सुरू होणाऱ्या ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आपले जगज्जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

  • दोन वर्षांपूर्वी बॅसेल (स्वित्झर्लंड) येथे सिंधूने प्रथमच जागतिक अजिंक्यपदावर नाव कोरले होते. गेल्या काही महिन्यांत फ्रेंच खुल्या, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुल्या या स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडू न शकलेल्या सिंधूने हंगामाची अखेर करणाऱ्या जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यात रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. कामगिरीतील हेच सातत्य ती कायम राखण्याचा प्रयत्न करील.

  • जागतिक स्पर्धेतून इंडोनेशियाच्या संपूर्ण चमू आणि जपानचा दोन वेळा विश्वविजेत्या केंटो मोमोटासह अनेक नामांकित खेळाडूंनी माघार घेतली आहे. महिला एकेरीत तीन वेळा विश्वविजेती कॅरोलिना मरिन आणि नोझोमी ओकुहारासुद्धा यंदा सहभागी झालेले नाहीत. दुखापतींमुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि २०१५मधील जागतिक उपविजेती सायना नेहवालसुद्धा कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत खेळणार नाही.

  • सिंधूला जेतेपद टिकवण्यासाठी नववी मानांकित थायलंडची पोर्नपावी चोचूवाँग, तैपेईची अग्रमानांकित ताय  यिंग आणि कोरियाची युवा अ‍ॅन से-यंग या महत्त्वाच्या खेळाडूंचे अडथळे ओलांडावे लागतील. इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अ‍ॅन से-यंगला जेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जाते.

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा - बावणेच्या शतकामुळे महाराष्ट्र विजयी :
  • अनुभवी फलंदाज अंकित बावणेने साकारलेल्या झुंजार शतकामुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी उत्तराखंडचा चार गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला.

  • प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तराखंडने ५० षटकांत ६ बाद २५१ अशी धावसंख्या उभारली. मग चौथ्या क्रमांकावरील बावणेने १३२ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारानिशी नाबाद ११३ धावांची खेळी करत एलिट ड-गटात महाराष्ट्राला चार सामन्यांत तिसरा विजय मिळवून दिला. उत्तराखंडने दिलेले २५२ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने ४९.५ षटकांत गाठले. कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ २१ धावा करून बाद झाला. महाराष्ट्राची ४ बाद ७५ अशी अवस्था असताना बावणेने नौशाद शेखच्या (४७) साथीने शतकी भागीदारी रचली. मग त्याने जगदीश झोपेसोबत (२२) सहाव्या गड्यासाठी ६२ धावांची भर घातली.

  • उत्तराखंड : ५० षटकांत ६ बाद २५१ (स्वप्निल सिंह ६६, तनुष गुसेन ५५; जगदीश झोपे २/४५) पराभूत वि. महाराष्ट्र : ४९.५ षटकांत ६ बाद २५२ (अंकित बावणे नाबाद ११३, नौशाद शेख ४७; स्वप्निल सिंह २/२०).

13 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.