चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ एप्रिल २०२२

Date : 13 April, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद व्हिक्टोरियाला :
  • ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याला २०२६ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. मात्र, ही स्पर्धा पारंपरिक पद्धतीने केवळ एका ठिकाणी नाही, तर व्हिक्टोरिया राज्यातील विविध शहरांमध्ये होणार आहे.

  • २०२६ची राष्ट्रकुल स्पर्धा मेलबर्न, जिलॉन्ग, बेिडगो, बेलार्ट आणि जिप्सलँड आदी शहरांमध्ये खेळवण्यात येणार असून सर्व शहरांमध्ये खेळाडूंसाठी क्रीडा ग्राम असेल. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा एक लाख आसनसंख्या असलेल्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) पार पडेल, अशी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) मंगळवारी घोषणा केली.

  • ‘सीजीएफ’, ऑस्ट्रेलियन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समिती आणि व्हिक्टोरिया राज्यामध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी १६ क्रीडा प्रकारांची प्रारंभिक यादी पुढे करण्यात आली असून यात ट्वेन्टी-२० क्रिकेटचाही समावेश आहे. वर्षअखेपर्यंत या यादीत अन्य काही खेळांचा समावेशही करण्यात येईल.

भारताच्या महिन्याच्या आयातीएवढे तेल युरोप रशियाकडून अर्ध्या दिवसात घेतो :
  • ‘रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून शस्त्रपुरवठय़ाचे नवे मोठे करार करू नयेत, असे आवाहन आम्ही सर्व देशांना करत आहोत,’ असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत केले. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशिया-युक्रेन युद्धप्रश्नी भारताच्या भूमिकेबाबत बोलताना स्पष्ट केले, की भारत रशियाकडून महिनाभरात जेवढे खनिज तेल आयात करतो, तेवढे खनिज तेल युरोपीय देश रशियाकडून रोज दुपापर्यंत म्हणजे अर्ध्या दिवसात आयात करतात.

  • वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विमंत्रिस्तरीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही परराष्ट्रमंत्री बोलत होते. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, की तुमचा रोख भारत रशियाकडून करत असलेल्या खनिज तेल आयातीला अनुषंगून आहे. परंतु, तुम्ही या संदर्भात युरोपकडे लक्ष द्यायला हवे. भारत त्याच्या उर्जेच्या गरजेनुसार व गरजेपुरतेच खनिज तेल रशियाकडून आयात करतो. परंतु उपलब्ध आकडेवारी पाहता भारताची रशियाकडून महिनाभरात होणारी तेल आयात युरोपीय देशांना अवघ्या अर्ध्या दिवसात केलेल्या आयातीपेक्षाही कमी आहे. त्यामुळे आपण त्या वास्तवाचाही विचार अवश्य करावा.

  • भारताने युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचा निषेध का केला नाही, असे विचारले असता जयशंकर यांनी सांगितले, की भारताने संयुक्त राष्ट्र संघटना, संसद आणि इतर व्यासपीठांवर युक्रेनप्रश्नी कोणती भूमिका घेतली, हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी आता निदर्शनास आणले. कुठल्याही संघर्षांला भारताचा विरोधच आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे प्रश्न सोडवावेत, अशीच आमची भूमिका आहे. हा संघर्ष व हिंसाचार तातडीने बंद व्हावा, अशीच भारताची भूमिका आहे. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याची भारताची तयारी आहे.

भारतीय वायू दलाच्या Chinook हेलिकॉप्टरने उड्डाणाचा केला विक्रम, एका दमात पार केले तब्बल एक हजार ९१० किलोमीटरचे अंतर:
  • भारतीय वायू दलात ताफ्यात विविध प्रकराची हेलिकॉप्टर आहेत. टेहेळणीसाठी, हल्ला करण्यासाठी, लष्करी जवान-साहित्य-शस्त्रास्त्रे यांची ने-आण करण्यासाठी, वेळप्रसंगी नागरी मदत कार्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.

  • यापैकी चिनूक – Chinook CH-47 हे एक वैशिष्टयपुर्ण लष्करी साहित्याची ने-आण करणारे हेलिकॉप्टर वायू दलाच्या सेवेत आहेत. सोमवारी देशामध्ये हेलिकॉप्टरच्या इतिहासात या चिनूकने एक वेगळ्या विक्रमाची नोंद केली.

  • सोमवारी चिनूकने चंदीगढ ते देशाच्या पूर्व टोकवर असलेल्या आसामधील जोरहाट शहरापर्यंतचा प्रवास एका दमात केला. तब्बल साडे सात चाललेल्या या उड्डाणात चिनूकने तब्बल एक हजार ९१० किलोमीटर अंतर पार करत देशातील हेलिकॉप्टरच्या इतिहासात एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली.

  • देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवास करत एवढे अंतर पार करण्याची ही एक आगळीवेगळी घटना आहे. यानिमित्ताने संरक्षण दलाने हेलिकॉप्टरच्या ऑपरेशनमधील एक क्षमता जगाला दाखवून दिली आहे. इतकं दीर्घ काळ उड्डाणाचा अनुभव, यानिमित्ताने मनुष्य बळाच्या क्षमतेचा केलेला वापर, हेलिकॉप्टरची आजमावलेली क्षमता असे विविध अनुभव यानिमित्ताने संरक्षण दलाला घेता आले आहेत. अशा दीर्घकाळ केलेल्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा अनुभव – उपयोग हा प्रत्यक्ष युद्धकाळात होणार आहे.

ओमायक्रॉनचे दोन नवीन ‘सब-व्हेरिएंट’ जागतिक आरोग्य संघटनेच्या रडारवर :
  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, ते ओमायक्रॉनच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारातील दोन नवीन उपप्रकारांचे परीक्षण करत आहे. हे उपप्रकार BA.4 आणि BA.5 म्हणून ओळखले जातात. BA.1.1 आणि BA.3 ची नावे देखील त्याच्या उपप्रकारांच्या यादीत जोडली गेली आहेत. जागतिक स्तरावर, आजकाल BA.1 आणि BA.2 ची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

  • WHO सध्या BA.4 आणि BA.5 या नवीन स्ट्रेनचे निरीक्षण करत आहे. त्याला हे उपप्रकार अधिक सांसर्गिक आणि धोकादायक आहेत का? ते पहायचे आहे.

  • WHO च्या मते, जागतिक GISAID डेटाबेसमधून BA.4 आणि BA.5 ची फक्त काही डझन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डब्ल्यूएचओने सांगितले की “अतिरिक्त म्युटिशयन्सचा रोगप्रतिकारक क्षमतेवर होणार प्रभाव समजून घेण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक आहे”.

  • ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीने (UKHSA) गेल्या आठवड्यात सांगितले की 10 जानेवारी ते 30 मार्च दरम्यान, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, बोत्सवाना, स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये BA.4 ची प्रकरणे नोंदवली गेली.

जिलिंगो पीटीई कंपनीच्या सीईओ अंकिती बोस निलंबित :
  • सिंगापूरमधील गेल्या काही वर्षांपासून नावाजलेल्या ‘झिलिंगो पीटीई’ या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून भारतीय वंशाच्या अंकिती बोस यांना हटवले आहे. नवीन निधी मिळवण्याच्या प्रयत्नात गैरव्यवहार झाला असून त्यामुळे कंपनीच्या एकूण टाळेबंदाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

  • ‘जिलिंगो पीटीई’ ही नवउद्योग कंपनी असून मोठे व्यापारी आणि कारखान्यांना तंत्रज्ञान पुरवण्याचे काम या कंपनीकडून केले जाते. या कंपनीने गोल्डमन सॅच ग्रुप इंक.च्या सहाय्याने १५ ते २० कोटी डॉलर गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुंतवणूकदारांनी या निधीबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र ही माहिती गोपनीय असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे झिलिंगो कंपनीचे मूल्यांकन १०० कोटी डॉलर झाले.

  • या कंपनीच्या अन्य गुंतवणूकदारांनी यास आक्षेप घेतला आणि कंपनीच्या लेखापरीक्षकांनी कंपनीच्या टाळेबंदावर प्रश्न उपस्थित केले. या कंपनीने वार्षिक आर्थिक विवरणपत्रही सादर केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंकिती बोस यांच्या एकूण व्यवहारावर प्रश्न निर्माण झाल्याने बोस यांना निलंबित करण्यात आले.

  • वयाच्या २३ व्या वर्षी कंपनीची स्थापना - अंकिती बोस ई-कॉमर्स क्षेत्रातील बहु-राष्ट्रीय स्टार्ट-अप झिलिंगोच्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. मुंबईतील कांदिवली येथील केंब्रिज स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले, तर सेंट झेवियर्स महाविद्यालयात गणित व अर्थशास्त्रात पदवी. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कंपनीने मोठे यश मिळवले आहे.

१३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.