चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ एप्रिल २०२१

Date : 13 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद; ८७९ मृत्यू :
  • भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

  • देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.

  • देशात आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त :
  • देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या(१३ एप्रिल) ते पदभार स्वीकरणार आहेत. सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरपासूनच निश्चित मानले जात होते.

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

  • या अगोदर सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. आता सुशील चंद्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  सुशील चंद्र यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमधील निवडणूका पार पाडणार आहे.

१०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या! शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा :
  • गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या शालांत परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठी चर्चा पाहायला मिळत होती.

  • राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याबाबत मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • मे-जूनमध्ये होणार परीक्षा - दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील”, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

दोन तासांहून कमी प्रवासासाठी विमानात जेवण पुरवण्यास मनाई :
  • देशभरात करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर, दोन तासांहून कमी कालावधीच्या प्रवासासाठी विमानात जेवण देण्यास विमान कंपन्यांना मनाई करण्यात आलेली असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी सांगितले. ही बंदी गुरुवारपासून अमलात येणार असल्याचे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.

  • गेल्यावर्षी करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीनंतर देशांतर्गत हवाई वाहतूक २५ मे ला पुन्हा सुरू झाली, तेव्हा काही अटींच्या आधीन राहून विमानात जेवण पुरवण्यास मंत्रालयाने विमान कंपन्यांना परवानगी दिली होती.

  • ‘देशांतर्गत मार्गांवरील उड्डाणाचा कालावधी दोन तास किंवा त्याहून अधिक असेल, तर संबंधित विमान कंपन्या विमानातील प्रवाशांना जेवण पुरवू शकतील’, असे मंत्रालयाने नव्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

  • ‘कोविड-१९’ आणि त्याचे प्रकार यांची वाढती भीती लक्षात घेऊन विमानात पुरवल्या जाणाऱ्या भोजन सेवेचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. दोन तासांहून अधिक कालावधीच्या प्रवासात विमान कंपन्यांना केवळ आधीच पॅक केलेले जेवण, नाश्ता आणि पेये पुरवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ऑलिम्पिक विजेत्यांवर भारताचे वर्चस्व :
  • भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनावर दुसऱ्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत ३-० असा विजय संपादन केला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

  • हरमनप्रीत सिंग (११व्या मिनिटाला), ललित उपाध्याय (२५व्या मिनिटाला) आणि मनदीप सिंग (५८व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताने आणखी तीन गुणांची कमाई केली. शनिवारी मध्यरात्री भारतीय संघाने निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर अर्जेंटिनावर पेनल्टी-शूटआऊटमध्ये ३-२ अशी सरशी साधली होती. भारताचे पुढील सामने ग्रेट ब्रिटनविरुद्ध ८ आणि ९ मे रोजी रंगणार आहेत. त्याआधी भारतीय संघ १३ आणि १४ एप्रिल रोजी अर्जेंटिनाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे.

  • भारताने आठ सामन्यांत १५ गुणांची कमाई केली असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचले आहेत. यजमान अर्जेंटिनाला १२ सामन्यांत ११ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. भारत, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ऑलिम्पिकसाठी एकाच गटात असल्याने भारताला याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर भारताच्या अ गटात स्पेन, न्यूझीलंड आणि यजमान जपान यांचाही समावेश आहे.

भाजपचे शतक पहिल्या चार टप्प्यांतच पूर्ण, ममता त्रिफळाचीत - पंतप्रधान :
  • पश्चिम बंगालमधील जनतेने मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांत इतके चौकार आणि षटकार ठोकले आहेत की भाजपचे शतक पूर्ण झाले आहे आणि राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस हद्दपार होण्याच्या बेतात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सांगितले. वर्धमान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते.

  • ममता यांच्या अत्यंत जवळच्या एका नेत्याने अनुसूचित जातींचा भिकारी असा उल्लेख केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त करण्याची तसदीही घेतली नाही, असेही मोदी म्हणाले.

  • राज्यातील जनतेने मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांत इतके चौकार आणि षटकार ठोकले आहेत की भाजपने अगोदरच शतक पूर्ण केले आहे. जनतेने तृणमूल काँग्रेसला निम्म्यातच साफ केले आहे, जनतेने नंदीग्राममध्ये ममतांना त्रिफळाचीत केले असून त्यांच्या संपूर्ण संघाला मैदान सोडून जाण्यास सांगितले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

  • ममता बॅनर्जी यांच्या ‘माँ, माटी, मानुष’ घोषणेची मोदींनी खिल्ली उडविली. ममतांनी माँचा छळ केला, मातृभूमीची (माटी) लूट केली आणि जनतेचा (मानुष) रक्तपात केला ही वस्तुस्थिती आहे. दलितांचा अपमान करून ममतांनी मोठे पाप केले आहे, असेही मोदी म्हणाले.

१३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.