आठ गडी बाद होताच पाकिस्तानची शरणागती, भारताचा सर्वात मोठा विजय, १५ वर्ष जुना विक्रम मोडला
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये भारताने पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला आहे. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (१० सप्टेंबर) हा सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे केवळ २४ षटकांचाच खेळ होऊ शकला. श्रीलंकेतील सध्याचं वातावरण पाहता आयोजकांनी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. त्यानुसार आज हा सामना २४ षटकांपासून पुढे खेळवण्यात आला. रविवारी खेळ थांबला तेव्हा भारताने २४.१ षटकात २ बाद १४७ धावा जमवल्या होत्या. इथून पुढे खेळताना भारतीय संघाने आज निर्धारित ५० षटकात ३५६ धावांचा डोंगर उभा केला.
भारताच्या ३५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला ३२ षटकांत आठ गड्यांच्या बदल्यात केवळ १२८ धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. त्यामुळे ८ गडी बाद होताच पाकिस्तानचा डाव संपला. अशा प्रकारे भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल २२८ धावांनी बलाढ्य विजय मिळवला.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. कुलदीप यादवने पाच बळी घेत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला. कुलदीपने ८ षटकात ५ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. पाकिस्तानचे दोन फलंदाज दुखापतीमुळे मैदानात उतरलेच नाहीत.
तत्पूर्वी भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. रविवारी कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. दोघांनी १२१ धावांची सलामी दिली. रोहित ५६ आणि गिल ५८ धावा करून ८ चेंडूंच्या फरकाने बाद झाले. त्यावेळी भारतीय संघ अडचणीत आला आहे असं वाटतं होतं. परंतु, विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनी भारताचा डाव सावरला.
विराट आणि राहुल या दोघांनी वैयक्तिक शतकं झळकावत तब्बल २३३ धावांची नाबाद भागिदारी केली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३५० धावांचा टप्पा पार केला. लोकेश राहुलने १०६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १११ धावा फटकावल्या. तर विराट कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२२ धावा फटकावल्या.
सीबीएसई दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरुपात बदल, आता विद्यार्थ्यांचे आकलन ठरणार महत्वाचे
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यात संकल्पना-सक्षमतेवर आधारित प्रश्न, बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपत्रिकांचे प्रारुप जाहीर करण्यात आले आहे.
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने आता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती सीबीएसईने दिली. आगामी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकतेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. आता प्रश्नपत्रिकेत अधिक विश्लेषणात्मक, संकल्पनात्मक स्पष्टता विशद करणारे, तसेच विद्यार्थ्यांचे आकलन तपासणाऱ्या बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील. त्यात ५० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित म्हणजे विश्लेषणात्मक प्रकारचे असतील. तर ४५ टक्के बहुपर्यायी प्रश्न एक दोन गुणांसाठीचे असतील. बदललेल्या स्वरुपाची विद्यार्थी, शिक्षक, पालकांना माहिती होण्यासाठी विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे प्रारुप https://cbseacademic.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रश्नपत्रिकांच्या बदललेल्या स्वरुपाविषयी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, की पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे पाठांतर किंवा स्मरणशक्ती महत्त्वाची होती. मात्र नव्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे आकलन किंवा विद्यार्थ्यांना संकल्पना कळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक समजून घेऊन अभ्यास करावा लागेल.
वन शहीद दिन आणि जोधपूर किल्ल्याचा काय संबंध माहितीये? ११ सप्टेंबर १७३० ला जे घडले ते इतिहासात…
देशात दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन पाळला जातो. भारतातील वन्यजीव, जंगले आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी प्राण गमावलेल्या कामगारांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी देशभरातील वनक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाला महत्त्व दिले जाते.
११ सप्टेंबर १७३० साली भारतात ‘खेजर्ली हत्याकांड’ ही एक ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी जोधपूर किल्ला बांधताना चुनखडी आणि लाकडाची गरज होती, म्हणून दिवाण गिरधरदास भंडारी यांनी त्यांच्या सैनिकांना जंगलातून लाकूड आणण्याचा आदेश दिला. सैनिक झाडे तोडण्यासाठी पुढे सरसावले, पण अमृता देवी बिश्नोई नावाच्या महिलेच्या नेतृत्वाखाली काही गावकरी त्यांच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहिले. खेजरीची झाडे आपल्यासाठी पवित्र आहेत आणि ती तोडू देणार नाहीत असे अमृताने सांगितले. यानंतर सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी गावातील लोकांना ठार केले. यात अमृताच्या मुलासह ३५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.
जेव्हा राजाला ही घटना कळली तेव्हा त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना परत बोलावले आणि त्यांच्यासह विष्णोई समाजाच्या लोकांची माफी मागितली. यानंतर राजा महाराजा अभय सिंह यांनी बिश्नोई समाजाच्या गावांच्या आसपासच्या भागात झाडे तोडली जाणार नाहीत आणि प्राण्यांची हत्या केली जाणार नाही, अशी घोषणा केली.
शिक्षक भरतीबाबत उदासीन प्रतिसाद, कारण काय?
बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया एक सप्टेंबरपासून सुरू झाली असून, गत दहा दिवसांत केवळ एक लाख पात्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार पात्र असल्याची माहिती आहे.
१५ सप्टेंबरपर्यंतच नोंदणी मुदत आहे. राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केल्या जाणार आहे. मात्र प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. अद्याप दीड लाखावर उमेदवार नोंदणी बाहेर आहेत. पण त्यापैकी ५० ते ६० हजारच नोंदणी करू शकतात. कारण अनेकांना खूप कमी गुण आहेत. ते इकडे फिरकणार नाहीत.
पात्रता परीक्षेत जवळपास नऊ हजारांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. ही पदे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय तर खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अश्या दोन्ही प्रकारे भरल्या जाणार आहेत. आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत.
कोण होईल सर्वात आळशी नागरिक? गेल्या २० दिवसांपासून लोळत पडले आहेत स्पर्धक, ‘या’ देशात सुरू आहे विचित्र स्पर्धा
जगात आळशी लोकांची काही कमरतरता नाही. आळशी लोकांना कसलेही काम करायचे नसते, कसलीच मेहनत करायाला त्यांना आवडतं नाही. पण जर तुम्हीही असेच असाल तर तुम्ही कितीही आळशी असाल तरी त्याने काही फरक पडत नाही. कारण या जगात तुमच्यापेक्षा आळशी लोक आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका देशात एक विचित्र स्पर्धा सुरू आहे. सर्वात आळशी नागरिक ही पदवी मिळवण्यासाठी काही स्पर्धक स्पर्धेत उतरले आहेत आणि गेल्या २० दिवसांपासून लोळत पडले आहेत.
सर्वात आळशी व्यक्तीला मिळणार एवढे बक्षीस
उत्तर मॉन्टेनेग्रोमधील ब्रेज्ना या गावात ही विचित्र वार्षिक स्पर्धा आयोजित केली जाते. ‘आळशी नागरिक’ ही प्रतिष्ठित पदवी मिळविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. विशेष म्हणजे येथे लोक १०७० डॉलरच्या(१,००० युरो, ८८,७९५.१४ रुपये) भव्य बक्षीसासाठी स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि सलग २० दिवस चटईवर पडून आहेत आणि दिवस मोजत आहेत. गेल्या वर्षीचा ११७ तासांचा विक्रम मोडल्यानंतरही या लोकांनी पुढे जाण्याचा निर्धार Iघेतला आहे.
असे आहेत स्पर्धेचे नियम
२३ वर्षीय स्पर्धक फिलिप क्नेझेविकयांनी रॉयटर्सला सांगितले की, तो विजयी होईल असा त्याला विश्वास आहे. येथे आळशी क्रमांक १ ला बक्षीस दिले जाईल. तो म्हणाला, “आमच्याकडे जे काही आवश्यक आहे ते येथे उपलब्ध आहे, येथील लोकांचा सहवास विलक्षण आहे, वेळ पटकन जातो.” नुसते उठणे, बसणे, उभे राहणे हे नियमांचे उल्लंघन आहे, पण त्यांना दर आठ तासांनी १० मिनिटांचा बाथरूम ब्रेक मिळतो.
खाणे, पिणे, वाचणे सर्वकाही लोळत करतात स्पर्धक
स्पर्धकांना खाण्याची, पिण्याची, वाचण्याची आणि मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरण्याची देखील परवानगी आहे – परंतु हे सर्व त्यांनी लोळतच केले पाहिजे. ‘आळशी नागरिक’ स्पर्धेच्या १२व्या आवृत्तीत स्पर्धक सहभाग होत आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी होते स्पर्धा
स्पर्धेचे आयोजक आणि मालक राडोन्जा ब्लागोजेविक यांनी सांगितले की, ”मॉन्टेनेग्रिन्स (नागरिक) आळशी आहेत या गैरसमजाची खिल्ली उडवण्यासाठी ही स्पर्धा १२ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. स्पर्धेची सुरुवात २१ लोकांपासून सुरू झाली होती पण आता ७ लोक बाकी आहेत आणि ब्लागोजेविक म्हणाले की, ”उर्वरित सात लोक ४६३ तासांपासून लोळत पडून आहेत.
२०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शुल्क परत मिळणार; जाणून घ्या तपशील…
जिल्हा परिषद भरती २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना पुणे जिल्हा परिषदेकडून शुल्क परत करण्यात येणार आहे. त्यासाठीची माहिती उमेदवारांनी भरण्यासाठी जिल्हा परिषदेने संकेतस्थळ खुले केले आहे.
जिल्हा परिषद भरती २०१९ रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परताव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य शासनाकडून जिल्हा परिषदांना शुल्काची रक्कम देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेकडून उमेदवारांच्या शुल्क परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा शुल्क परताव्यासाठीची आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रक्रिया करून उमेदवारांना परीक्षा शुल्क परतावा केला जाजाणार आहे. परीक्षा शुल्क परताव्यासंदर्भात उमेदवारांसोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कोलंबो येथील भारत-पाक सामन्यातील पावसाने करून दिली २००२ ची आठवण, जाणून घ्या काय झाले होते?
कोलंबोमध्ये पावसामुळे आशिया कप २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. रविवारी १० सप्टेंबर २०२३ रोजी हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता जिथे सामना थांबला होता तिथून पुढे सोमवारी सुरू होईल. राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. कोलंबोतील पावसाने २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून दिली आहे, जेव्हा राखीव दिवस असूनही सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि भारत आणि श्रीलंकेला ट्रॉफी शेअर करावी लागली. सौरव गांगुली आणि रसेल अरनॉल्ड यांच्यातील लढतीसाठीही हा सामना लक्षात राहतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर, भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने आले. अंतिम सामना रोमांचक होईल, असे मानले जात होते, मात्र पावसाने कोलंबोमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात व्यत्यय आणला. फायनलमध्ये ११०.४ षटके असतानाही भारत आणि श्रीलंकेला जेतेपदावर समाधान मानावे लागले.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सर्वोत्तम कामगिरी -
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मायदेशात असो वा परदेशात चांगली कामगिरी करत होती. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर संघाचे मनोबल उंचावले होते. लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात संघाने ३२५ धावांचे लक्ष्य गाठून नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली. यानंतर हेडिंग्ले येथील कसोटीत कठीण परिस्थितीत इंग्लंडचा डावाने पराभव केला.
दोन्ही संघ होते मजबूत -
टीम इंडिया २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. ही स्पर्धा तिसऱ्यांदा खेळवली जात आहे. आधी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती. श्रीलंकेचा संघही खूप मजबूत होता. कर्णधार सनथ जयसूर्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्यांच्याकडे मारवान अटापट्टू, अरविंद डी सिल्वा, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारासारखे उत्कृष्ट फलंदाज होते. घरच्या खेळपट्ट्यांचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे श्रीलंकेच्या गोलंदाजांना माहीत होते.
भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! आज ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण :
भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत आणखी युद्धनौका दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे प्रकल्प १७ ए मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’चे आज जलावतरण करण्यात येणार
तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण - तारगिरी प्रकल्पाची सुरुवात १० स्प्टेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाईन ब्युरोने केले आहे. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे नुकतेच लॉंचिंग केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.
‘तारागिरी’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये - एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.
के. चंद्रशेखर राव राष्ट्रीय पक्ष स्थापन करणार, लवकरच होणार अधिकृत घोषणा :
तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव लवकरच राष्ट्रीय पक्षाची स्थापना करणार आहेत. पक्षाचे धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली आहे. राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या प्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. “विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याबाबत एकमत झाले आहे”, असे निवेदन राव यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
के. चंद्रशेखर राव यांनी सातत्याने भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही महिन्यात विरोधकांमध्ये ऐक्य साधण्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात उतरेल, असे काही दिवसांपूर्वी राव यांनी जाहीर केले होते.
पाकिस्तानला F-16 विमानांसाठी अमेरिकेकडून ४५० अब्ज डॉलर्स, भारताने नोंदवला तीव्र निषेध :
अमेरिकेने पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी तब्बल ४५० अब्ज डॉलर्सचे पॅकेज मंजुर केले आहे. या पॅकेजबाबत भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांच्याकडे भारताने या निर्णयाची वस्तुस्थिती आणि वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
जो बायडन सरकारने पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. गेल्या चार वर्षात अमेरिकेने सुरक्षा क्षेत्रासाठी पाकिस्तानला केलेली ही सर्वात मोठी मदत आहे. २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी देण्यात येत असलेली २ अब्ज डॉलर्सची मदत रद्द केली होती. पाकिस्तानला अफगाणिस्तानातील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांवर अंकुश ठेवण्यात आलेल्या अपयशानंतर ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला होता.
दरम्यान, सागरी सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी भारताने ७ सप्टेंबरला अमेरिकेसोबत द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत डोनाल्ड लूदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर काही दिवसातच अमेरिकेने पाकिस्तानसाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. “दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान महत्त्वाचा देश आहे. F-16 कार्यक्रम हा अमेरिका आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. याबाबत दिर्घकालीन धोरणानुसार अमेरिकेने पाकिस्तानसाठी हे पॅकेज जाहीर केले” अशी माहिती अमेरिकेच्या प्रवक्त्याने दिली आहे. F-16 लढाई विमानांच्या पॅकेजमध्ये कोणतेही शस्त्र किंवा युद्ध सामुग्री समाविष्ट नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आले आहे.
सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किबिथू छावणीला जनरल रावत यांचे नाव :
येथील लोहित खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किबिथू लष्करी छावणीला शनिवारी देशाचे पहिले सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे नाव देण्यात आले. या गावाजवळून जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर ही छावणी आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृ्त्यू झाला होता. रावत हे प्रारंभी १९९९-२००० दरम्यान कर्नल असताना त्यांनी किबिथू येथे तैनात असलेल्या त्यांच्या गोरखा रायफल्सच्या बटालियन ५-११ चे नेतृत्व केले होते. या संवेदनशील क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या छावणीतले सैनिक लक्ष ठेवून असतात. भारतीय लष्कराच्या याच छावणीच्या अगदी विरुद्ध बाजूला चिनी सैन्याची रिमा चौकी आहे.
लोहित खोऱ्यातील पर्वतराजीत किबिथू ही भारताची पूर्वेकडील अखेरची छावणी आहे. याच ठिकाणी मेयोर आणि जर्किन आदिवासींची छोटीशी वस्तीही आहे. मेशाई हे रस्त्याचे शेवटचे टोक १९९७ पर्यंत या भागाला जोडले गेले नव्हते. त्यामुळे तेथे हवाई मार्गानेच दळणवळण होत होते. लोहित नदीच्या पूर्व किनाऱ्यावर जाण्यासाठी केवळ एका दोरखंडाच्या पादचारी पुलाचा पर्याय होता. ही लष्करी छावणी आणि वालांग ते किबिथू हा २२ किलोमीटर लांबीचा रस्ता यांना आता जनरल रावत यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरण समारंभाला अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडिअर (निवृत्त) बी. डी. मिश्रा, मुख्यमंत्री प्रेमा खंडू, लष्कराचे पूर्व कमांडचे प्रमुख ले. जनरल राणा प्रताप कलिता आणि जनरल रावत यांच्या कन्या तारिनी या उपस्थित होत्या.
किबिथूबाबत.. किबिथूवर सर्वप्रथम २-आसाम रायफल्सने डिसेंबर १९५० मध्ये एक प्लॅटून फौजफाटय़ासह ताबा मिळविला होता. त्यानंतर १९५९ मध्ये तेथे आणखी एक प्लॅटून तैनात करण्यात आली. १९६२ च्या चिनी आक्रमणादरम्यान चीनला पहिला प्रतिकार किबिथू येथेच झाला. हे युद्ध संपल्यानंतर १९६४ मध्ये आसाम रायफल्सने या भागाचा पुन्हा ताबा मिळविला. १९८५ मध्ये तेथे ६-राजपूतकडे किबिथूची सूत्रे आली. जनरल रावत यांनी त्यांच्या कारकीर्दीत या छावणीत सुधारणा करून तेथे स्थानिकांशी नागरी-लष्करी संबंध प्रस्थापित केले आणि सीमा अधिकारी बैठकांची यंत्रणा सुस्थापित केली.
श्रीलंकेचा पाकिस्तानवर २३ धावांनी दणदणीत विजय :
यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लाढत रंगणार आहे. आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून सायंकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल.
सुपर-४ फेरीतील अंतिम सामन्यात याच दोन संघांमध्ये सामना रंगला होता. यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शतक झळकावून कोहलीने सही केली अन् बॅटची किंमत थेट लाखोंमध्ये गेली; पाकिस्तानी फॅन म्हणतो “१ कोटी रुपये…” :
यूएईमधील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने निराशा केली असली तरी याच स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसला. त्याने या स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केली. विशेष म्हणजे याच स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तानविरोधात खेळताना त्याने साधारण तीन वर्षांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले. कोहलीच्या या खेळीची चांगलीच चर्चा झाली. याच सामन्यादरम्यान विराटने एका पाकिस्तानी फॅनला बॅटवर दिलेली सहीचीही चांगलीच चर्चा होत आहे. या बॅटची किंमत आता लाखो रुपये झाली आहे.
आशिया चषक स्पर्धेत ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली चांगलाच तळपला. त्याने या सामन्यात ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा केल्या. पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानावर टिकून होता. विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे ७१ वे शतक होते.
तबब्ल तीन वर्षांनी विराटने शतकी खेळी केली. त्यानंतर त्याने पाकिस्तानी फॅनला बॅटवर एक दिली. या पाकिस्तानी नागरिकाचे नाव सलाऊद्दीन असे आहे. विराटच्या सहीमुळे या बॅटला आता लाखो रुपयांची किंमत आली आहे. सलाऊद्दीद यांना एका माणसाने ही बॅट साधारण १ लाख रुपयांना मागितली होती. मात्र सलाऊद्दीनने बॅट विकण्यास नकार दिला.
विशेष म्हणजे या बॅटच्या बदल्यात कोणी मला १ कोटी रुपये दिले तरीही मी ही बॅट विकणार नाही, असे सलाऊद्दीन यांनी सांगितले आहे. सलाऊद्दी यांच्याकडे साधारण १५० बॅट्सचा संग्रह आहे आहेत. या सर्वच बॅट्स विशेष आहेत. त्याच्याकडे शाहीद आफ्रिदी, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इम्रान खान असा दिग्गज क्रिकेटपटूंनी सही केलेल्या बॅट आहेत. त्यामुळे त्याने विराटची सही केलेली बॅट विकण्यास नकार दिला आहे.