चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ सप्टेंबर २०२०

Date : 12 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्राच्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी राज्यांना बंधनकारक :
  • करोना संशयित अथवा लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासह ‘कोविड-१९’साठी केंद्र सरकारने विविध कार्यप्रणाली निश्चित केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करणे राज्यांवर बंधनकारक असल्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

  • करोना संशयित अथवा  लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका अवाजवी दर आकारत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका ‘अर्थ’ या संघटनेने केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, रुग्णवाहिकांचे दर राज्यांनी निश्चित करावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर स्पष्ट केले की, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने याबाबत प्रमाणित कार्यप्रणाली जाहीर केली असून राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.

पूर्व लडाखमधील तणाव - पाच कलमी योजनेवर भारत-चीन मतैक्य :
  • भारत-चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष दोन्ही देशांच्या हिताचा नाही,  हे उभय  देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मॉस्कोतील चर्चेत मान्य केले आहे. या भागातील सैन्य वेगाने माघारी घेण्यासाठी पाच कलमी योजना स्वीकारण्यासही त्यांनी मान्यता दिली आहे.

  • चार महिने सुरू असलेल्या या संघर्षांमुळे निर्माण झालेला तणाव अधिक वाढू न देण्याचा निर्धारही दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व चीनचे समपदस्थ वँग यी यांच्यात गुरुवारी सायंकाळी ही चर्चा झाली.

  • सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ केलेली सैन्याची जमवाजमव आणि जमा केलेली लष्करी सामुग्री या गोष्टींना भारताने आक्षेप  घेतला आहे.

  • जयशंकर आणि वँग यांची मॉस्कोत शांघाय सहकार्य संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने चर्चा झाली.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे समपदस्थ जनरल वेई फेंग यांच्याशी मॉस्कोत शुक्रवारी चर्चा केली होती.

‘विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील गुणांचे ओझे दूर’ :
  • नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गुणपत्रिकेचे ओझे काढून टाकण्यात आले असून नवीन अभ्यासक्रम पद्धती देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत असताना, २०२२ पासून लागू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी नवीन भविष्याकडे  वाटचाल करतील,   असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • नवीन धोरणातील अभ्यासक्रम व तरतुदी  भविष्यवेधी, वैज्ञानिक पद्धतीच्या आहेत असेही ते म्हणाले.

  • ‘एकविसाव्या शतकातील शालेय शिक्षण’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन दशकांत जग बदलले आहे, पण आपले शैक्षणिक धोरण बदलले नव्हते. सध्याच्या शैक्षणिक धोरणात गुणांना महत्त्व होते. त्यामुळे गुणपत्रक हे विद्यार्थ्यांसाठी ताणपत्रक तर कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठापत्रक होते. आता हा ताण आम्ही दूर केला आहे.

  • शैक्षणिक  धोरण जाहीर केले म्हणजे काम संपले असे नाही. त्याची प्रभावी अंमलबजावणी सर्वाच्या सहकार्याने झाली पाहिजे.  लोकांचे याबाबत अनेक प्रश्न आहेत व  ते रास्तही आहेत. या धोरणावर  १५ लाख सूचना एका आठवडय़ात शिक्षकांकडून आल्या आहेत, अशी  माहिती त्यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन :
  • सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र लीव्हर सोरायसीस या आजाराने त्यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती. १९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता.

  • १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान २०११ मध्ये त्यांनी लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते. स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही वेळापूर्वीच त्यांचं निधन झालं.

  • स्वामी अग्निवेश यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. सामाजिक मुद्द्यांवर ते कायम भाष्य करत असत. आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांना नवी दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना लीव्हर सोरायसीस हा आजार जडला होता. १९८१ मध्ये त्यांनी बंधुता मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेची स्थापनाही केली होती.

‘बीसीसीआय’ची वार्षिक बैठक पुन्हा लांबणीवर :
  • करोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण बैठक अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइनदेखील या बैठकीचे आयोजन करणे शक्य नसल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी सांगितले.

  • १९७५च्या तमिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत दरवर्षी ३० सप्टेंबरपूर्वी ‘बीसीसीआय’ने वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करणे अनिवार्य आहे. परंतु यंदा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते शक्य नाही. ‘‘देशातील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे यंदा ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण बैठक तूर्तास महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे.

  • नोंदणी कायद्यानुसार डिसेंबर २०२०पर्यंत आम्हाला बैठकीचे आयोजन करण्याची मुदत वाढवून मिळाली असल्याने त्या तारखांविषयी आम्ही लवकरच आपल्याला कल्पना देऊ,’’ असे शाह म्हणाले. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक बैठकीत सौरव गांगुलीची ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

१२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.