चालू घडामोडी आणि दिनविशेष - 12 ऑक्टोबर 2023

Date : 12 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रोहित शर्मा ठरला जगातील नवा सिक्सर किंग, मोडला ख्रिस गेलचा मोठा विश्वविक्रम
  • विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार विजयानंतर, टीम इंडिया ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर त्यांच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानशी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली. त्याने या फटकेबाजीच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले. त्यातील एक विक्रम ख्रिस गेलचा मोडला आहे, तर दुसऱ्या विक्रमात त्याने डेव्हिड वार्नरची बरोबर केली आहे.

रोहित शर्माने ख्रिस गेलला टाकले मागे -

  • रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी रोहितच्या नावावर सध्या ५५१ षटकार होते, मात्र त्याने अफगाणिस्तानविरुद्ध तीन षटकार मारत ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला. रोहित आता या तीन षटकारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात मोठा षटकार किंग ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील सर्वात जास्त षटकार मारणारे फलंदाज -

  • रोहित शर्मा- ५५३
  • ख्रिस गेल- ५५२
  • शाहिद आफ्रिदी- ४७६
  • ब्रेंडन मॅक्युलम – ३९८
  • मार्टिन गप्टिल- ३८३
  • एमएस धोनी- ३५९

डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची साधली बरोबरी-

  • इतकेच नाही तर या इनिंगमध्ये भारतीय कर्णधाराने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आता एकदिवसीय विश्वचषकात आपल्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच, त्यांनी संयुक्तपणे हे सर्वात जलद केले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने १९ व्या डावात हा विक्रम केला होता. आता रोहितने एकदिवसीय विश्वचषकात १९ डावात सर्वात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या डावात त्याने शानदार आणि झंझावाती अर्धशतकही झळकावले. त्याने आपले अर्धशतक ३० चेंडूत पूर्ण केले.
तरुणांच्या विकासासाठी केंद्राची डिजिटल शाखा; ‘मेरा भारत’ संस्थेचे ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण
  • आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांप्रमाणे तरुणही निर्णायक मतदार असल्याने केंद्र सरकारने आता युवाशक्तीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तरुणांच्या विकासासाठी केंद्राची युवा डिजिटल शाखा उघडली जाणार असून तिचे ‘माय भारत’ असे नामकरण करण्यात आले आहे. या डिजिटल संस्थेच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • मेरा युवा भारत (माय भारत) ही नवी डिजिटल संस्था देशातील तरुणांच्या नेतृत्वक्षमतांचा व कौशल्यांचा विकास करण्यासाठी उभारली जात असून सरदार पटेल यांच्या जयंतीला, ३१ ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नेहरू युवा केंद्र संघटना’ नावाची संस्था आहे. त्याचा कारभार केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत चालवला जातो. आता त्याच धर्तीवर केंद्र सरकार दुसरी संस्था निर्माण करत आहे. ‘एनवायसी’सारखी संस्था अस्तित्वात असली तरी तरुणांसाठी नवी संस्था स्थापन करण्यात गैर नाही, असे ठाकूर यांनी सांगितले. ‘मेरा भारत’ ही संस्थाही केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करेल. ‘मेरा भारत’ या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट तरुणांच्या विकासासाठी अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे असून देशात १५ ते १९ या वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुणांना ‘मेरा भारत’ या संस्थेचा लाभ होईल, असा दावा ठाकूर यांनी केला.

‘मेरा भारत’चे प्रयोजन

  • तरुणांना विकासाच्या विविध संधी उपलब्ध असू शकतात पण, त्याची एकत्रित माहिती मिळण्याची सुविधा नाही, ती ‘मेरा भारत’द्वारे मिळू शकेल. शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ही संस्था माध्यम असेल. सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांची माहिती मिळू शकेल. कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागी होता येईल. ही संस्था केंद्र सरकारकडून कार्यान्वित होणार असली तरी, त्यासाठी केंद्राने अर्थसाह्य दिलेले नाही. तरुणांनी स्वयंप्रेरणेने या संस्थेच्या कारभारामध्ये सहभागी होणे व त्याचा अधिकाधिक लाभ घेणे अपेक्षित आहे.
भारतीय रेल्वे फक्त ‘या’ पाच ट्रेनमधून कमावते भरपूर पैसा; कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क!
  • भारतात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. त्यासाठी हजारो ट्रेन रोज धावतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक सुखकर आणि जलद प्रवासासाठी ट्रेन प्रवासाला पसंती देतात. भारतीय रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे की, लोकांना त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींची नीट माहिती नसते. भारतात दररोज सुमारे २२,५९३ ट्रेन धावतात. त्यापैकी १३,४५२ प्रवासी ट्रेन आहेत. त्यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्या वर्षभर धावत असल्या तरी काही गाड्या अशा आहेत की, ज्या प्रवाशांना घेऊन जात नाहीत. आज आपण भारतातील अशा पाच रेल्वे गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत; ज्या भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करून देतात.
  • बंगळूरु - राजधानी एक्स्प्रेस
  • सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेनमध्ये बंगळूरु – राजधानी एक्स्प्रेसचे नाव घेतले जाते. उत्तर रेल्वेची ही सर्वांत फायदेशीर ट्रेन आहे. या ट्रेनने २०२२- २३ मध्ये १७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
  • सियालदह राजधानी एक्सप्रेस
  • सियालदह राजधानी एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील सियालदहपर्यंत धावते. २०२२-२३ मध्ये या रेल्वेने एकूण १,२८,८१,६९,२७४ रुपये इतकी कमाई केली आहे.
  • दिब्रुगढ – राजधानी एक्स्प्रेस
  • नवी दिल्ली आणि दिब्रुगढदरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने २०२२-२३ मध्ये एकूण १,२६,२९,०९,६९७ रुपयांची कमाई केली आहे.
  • मुंबई – राजधानी एक्स्प्रेस
  • नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या या राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ या वर्षात रेल्वेला १,२२,८४,५१,५५४ रुपये कमावले.
  • दिब्रुगढ – राजधानी एक्सप्रेस
  • दिब्रुगढ – राजधानी एक्स्प्रेसने एक वर्षात रेल्वेला एकूण १, १६,८८,३९,७६९ रुपये मिळवून दिले आहेत.
  • (दिब्रुगढ – राजधानी एक्स्प्रेसमध्ये अप आणि डाऊन असा फरक आहे.)
  • भारतात रात्रंदिवस धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या आहेत आणि यातील काही गाड्या प्रचंड कमाई करून देत असल्याने रेल्वेसाठी त्या महत्त्वाच्या आहेत. प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त भारतीय रेल्वेकडे ९,१४१ मालगाड्या आहेत. रेल्वेचे हे नेटवर्क देशभरात ६७,३६८ किमीपर्यंत पसरले आहे.
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त केवळ ९९ रूपयांमध्ये पाहता येणार चित्रपट; कुठे करता येणार बुकिंग? जाणून घ्या
  • भारतात १३ ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. यावर्षी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १३ ऑक्टोबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे औचित्य साधून तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने घेतला आहे. १३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटाच्या एका तिकिटासाठी फक्त ९९रुपये आकारण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया घेतला आहे.
  • या दिवशी प्रेक्षक केवळ ९९ रुपयांमध्ये आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. प्रेक्षक चित्रपटांचे तिकीट ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बूक करू शकतात. इच्छुक प्रेक्षक बुक माय शो, पेटीएम सारखे प्लॅटफॉर्म किंवा मल्टिप्लेक्सच्या संबंधित वेबसाइटवरून देखील तिकीट बूक करू शकतात. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
  • तिकीट बूक करण्यासाठी तुम्हाला कोणते चित्रपट पाहायचा आहे ते निवडायचे आहे. तसेच तिथे शुक्रवार देखील निवडावा. काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी शुक्रवारी तिकीटांचे बुकिंग उपलब्ध नाही आहे. तथापि, जवान, मिशन रानीगंज आणि थँक यु फॉर कमिंग सारखे काही लोकप्रिय भारतीय चित्रपट आहेत जे अजूनही कमी किंमतीत उपलब्ध आहे. ही तिकिटे बूक करताना मल्टिप्लेक्सचे टॅक्स आणि चार्जेस वेगवेगळे असू शकतात.
  • राष्ट्रीय चित्रपट दिन ४ हजार पेक्षा जास्त स्क्रीन्सवर साजरा केला जाणार आहे. यामध्ये पीव्हीआर आयनॉक्स, CINEPOLIS, सिटीप्राइड, एशियन मुक्ता A2, मुव्ही टाइम WAVE, M2K, DELITE अन अन्य चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘हरवलेल्या’ आठव्या खंडाचा शोध काय सांगतो?
  • जगातील सात खंडांमध्ये आता आठव्या खंडाची भर पडली आहे. शास्त्रज्ञांनी आता ‘झीलँडिया’ या ३७५ वर्षांपूर्वी ‘लुप्त’ झालेल्या खंडाचा शोध लावला आहे. हा आता जगातील आठवा खंड मानला जातो. भूकंपशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने ‘झीलँडिया’ किंवा ‘ते रिउ-ए-माउई’चा सुधारित नकाशा तयार केला आहे. ‘टेक्टॉनिक्स जर्नल’ या विज्ञानपत्रिकेत संशोधन अहवालात त्याचा तपशीलवार नकाशा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. मात्र या खंडाचा मोठा भूभाग हा प्रशांत महासागराखाली आहे. या सुधारित नकाशाने या ज्वालामुखीय पट्ट्याच्या (मॅग्मॅटिक आर्क) अक्षाचे स्थान दर्शवले आहे. त्यामुळे झीलँडिया खंड निर्मिती झाली आहे. तसेच येथे अनेक महत्त्वपूर्ण भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये सापडली. संशोधकांना समुद्राच्या तळातून मिळालेल्या खडकांच्या नमुन्यांतून मिळालेल्या माहितीद्वारे ही वैशिष्ट्ये समजली.

‘झीलँडिया’ नेमका कसा आहे?

  • ‘झीलँडिया’ हा एक लांब, अरुंद भूभाग आहे. याचा उर्वरित बहुतांश भाग दक्षिण प्रशांत महासागरात बुडालेला आहे. सुमारे ९४ टक्के भाग पाण्याखाली गेला आहे, तर अवघा सहा टक्के भूभाग पाण्याच्या वर आहे. पाण्यावरील भूभागात ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणारा न्यूझीलंड हा देश आणि न्यू कॅलेडोनिया बेटांचा त्यात समावेश होतो. पश्चिमेला ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील केन पठारापर्यंत हा खंड पसरलेला आहे. न्यूझीलंड व्यतिरिक्त या खंडात ‘न्यू कॅलेडोनिया’सह ‘लॉर्ड हाऊ’ बेटाशी संबंधित अन्य ऑस्ट्रेलियन प्रदेशांचा समावेश आहे. त्याचे एकूण ४९ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून, आकारमानाने हा खंड पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर बेटाच्या सहापट आणि ऑस्ट्रेलियाच्या सुमारे निम्मा आहे. १६४२ मध्ये जेव्हा डच खलाशी हाबेल तस्मान दक्षिण गोलार्धात वसलेला एक विशाल खंड शोधण्याच्या मोहिमेवर गेला असताना या खंडाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम मिळाला. त्यानंतर २०१७ मध्ये भूवैज्ञानिकांच्या पथकाने त्याचा तपशीलवार शोध लावला. हा खंड सुमारे ५५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गोंडवन किंवा गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा भाग होता. त्याने सध्या जगातील सर्वात लहान आणि सर्वात तरुण खंडाचा मान मिळवला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था मंदावणार, नाणेनिधीकडून चालू वर्षासाठी अंदाज
  • वाढते व्याजदर, रशिया-युक्रेन युद्धासह, वाढत चाललेली भू-राजकीय ताणाची स्थिती यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी दिला. जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ चालू वर्षात ३ टक्के राहील, तर पुढील वर्षात ती २.९ टक्क्यांवर घसरेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे.
  • याआधी जुलैमध्ये नाणेनिधीने पुढील वर्षासाठी ३ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. करोना संकटामुळे २०२० मध्ये आलेल्या अल्पकालीन मंदीतून जग सावरलेले असताना आता त्यात पुन्हा घसरण होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा ३.५ टक्क्यांचा अंदाज वर्तविला होता, तो सुधारून घेत तिने ३ टक्क्यांपर्यंत खालावला आहे.

 

‘महाकाल लोक कॉरिडॉर’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन :
  • उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या ‘महाकाल कॉरिडॉर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. ९०० मीटर लांबीच्या या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.

  • पंतप्रधानांसमवेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी या मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित साधूंना अभिवादन केले. महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्प भगवान शिवाला समर्पित असून भारतातील १२ ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या या ज्योतिर्लिगाला भेट देणाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा प्रदान करेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ‘महाकाल लोक कॉरिडॉर’च्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भगवान महाकाल मंदिरात जाऊन पूजा केली. पंतप्रधानांनी सायंकाळी ६ वाजता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • या कॉरिडॉरसाठी दोन भव्य प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. नंदी द्वार आणि पिनाकी द्वार. ही दोनही द्वारे काही अंतरावर असून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत या दोन्ही महाद्वारांतून जाता येईल. या कॉरिडॉरमध्ये शिव पुराणमधील कथा दर्शविणारी ५० हून अधिक भित्तिचित्रे आहेत. वाळूच्या दगडांनी तयार करण्यात आलेले १०८ सुशोभित स्तंभ आहेत. कॉरिडॉरमध्ये विविध देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत, त्याशिवाय हिंदू धर्मातील विविध कथा सांगणाऱ्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत. कॉरिडॉरमधील १०८ स्तंभांवर आनंद तांडव दाखवणारे दृश्य, भगवान शिव व देवी शक्ती यांची भित्तिचित्रे आणि २०० मूर्ती आहेत.

सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी :
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो ६.८ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच जगात सध्या मंदीचे सावट असतानाही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

  • चीनपेक्षा भारताची स्थिती चांगली - चीनचा विकासदर २०२१ मध्ये ८.१ टक्के होता. तर २०२२ मध्ये तो ३.२ टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र, आयएमएफच्या ताज्या अहवालात २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठी चीनचा विकासदर ४.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताच्या विकासदरापेक्षा तो कमी आहे.

  • आयएमएफनुसार, देशातील महागाई आणि बेरोजगारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबरोबच करोनामुळे उद्भवलेली आव्हाने अद्यापतरी संपलेली नाही.

बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष?; जय शहा पुन्हा सचिवपदी; राजीव शुक्ला उपाध्यक्ष :
  • माजी अष्टपैलू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडेल.

  • गेल्या आठवडय़ाभरात ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे ३६वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांची ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी फेरनिवड होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मंडळातही गांगुलीऐवजी शहा ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

  • ‘‘जय शहा यांनी ‘आयसीसी’मध्ये ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आगामी ‘आयसीसी’ संचालक मंडळाच्या बैठकीत योग्य व्यक्तीने भारताचे प्रतिनिधित्व करणे गरजेचे आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ६७ वर्षीय बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (११ ऑक्टोबर) व बुधवारचा (१२ ऑक्टोबर) दिवस देण्यात आला आहे. बुधवारी अन्य कोणीही अर्ज न भरल्यास बिन्नी यांची ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल. १८ ऑक्टोबरला मुंबई येथे होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिन्नी अधिकृतरीत्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.

  • तसेच ‘बीसीसीआय’मधील अन्य मुख्य पदासांठी राजीव शुक्ला (उपाध्यक्ष), देवजित सैकिया (सहसचिव) आणि आशीष शेलार (कोषाध्यक्ष) हे उमेदवार आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुणसिंग धुमाळ हे सध्या ‘बीसीसीआय’मध्ये कोषाध्यक्षपद भूषवत आहेत. मात्र आता धुमाळ यांची इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष म्हणून निवड होणे अपेक्षित असून ते ब्रिजेश पटेल यांची जागा घेतील.

कलात्मक योगात महाराष्ट्राच्या संघांचे सोनेरी यश; तालबद्ध योगात छकुली-कल्याणीला सुवर्णपदक :
  • योगासनात गमावलेले सुवर्णपदक मंगळवारी महाराष्ट्राच्या छकुली सेलुकर आणि कल्याणी थिटेच्या पारडय़ात पडले. संघ व्यवस्थापनाच्या पाठपुराव्यामुळे तांत्रिक समितीला या दोघींचे सुवर्णपदक रोखण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. महाराष्ट्राने योगासन प्रकारात सहा सुवर्णपदके मिळविली. कलात्मक योगात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सोनेरी यश संपादन केले. सॉफ्टबॉल प्रकारातही महाराष्ट्राचा पुरुष संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

  • प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासन प्रकारात महाराष्ट्राची आगेकूच सुरू असतानाच सोमवारी छकुली आणि कल्याणी यांचे सुवर्णपदक रोखून धरण्यात आले होते. तालबद्ध योगा प्रकारातील दुहेरीत सरस कामगिरी करूनही छकुली-कल्याणी जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. संघ व्यवस्थापनाने या निर्णयाला आव्हान दिले. तांत्रिक समितीने पूर्ण पाहणी करून महाराष्ट्राचे आव्हान ग्राह्य धरले आणि सुवर्णपदकाचा निर्णय बदलला.

  • योगासनातच वैभव श्रीरामेने सातत्य कायम ठेवत महाराष्ट्राला कलात्मक प्रकारात सांघिक सुवर्णपदक मिळवून देताना मोलाची कामगिरी बजावली. वैभवसह हर्षल चिटे, मनन कासलीवाल, ओम वरदाई आणि नितीन पवळे यांचा या संघात समावेश होता. त्यांनी १२८ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अवघ्या एका गुणाने त्यांनी हरयाणाला मागे टाकले. योगासनातील महाराष्ट्राचे हे सहावे सुवर्णपदक ठरले.

  • महिला विभागात छकुली सेलुकर, कल्याणी थिटे, पूर्वा, प्राप्ती किनारे आणि प्रज्ञा गायकवाड यांनी १२८.८ गुणांसह सुवर्णयश मिळविले. त्यांनी गुजरातला मागे टाकले. सॉफ्टबॉल प्रकारात पुरुष संघाने दुसऱ्या पात्रता लढतीत आंध्र प्रदेशचा ८-० असा पराभव केला आणि त्यानंतर अंतिम फेरीत छत्तीसगडचे आव्हान १-० असे परतवून लावत सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत गौरव चौधरीची कामगिरी निर्णायक ठरली.

सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस :
  • भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी मंगळवारी केंद्र सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस आपले उत्तराधिकारी म्हणून केली आहे. केंद्राने ही शिफारस स्वीकारल्यास ९ नोव्हेंबर रोजी ते देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश बनतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ लाभेल. १० नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी ते निवृत्त होतील. विद्यमान सरन्यायाधीशांनी चंद्रचूड़ यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्राला पाठवून मंगळवारी आगामी सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रक्रिया सुरू केली.

  • धनंजय चंद्रचूड हे दीर्घकाळ सरन्यायाधीशपद भूषवणारे यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. यशवंत चंद्रचूड यांनी २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत हे पद भूषवले होते. ७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय विधिमंत्री किरण रिजिजू यांनी उत्तराधिकाऱ्याची शिफारस करावी, अशा आशयाचे पत्र सरन्यायाधीश लळित यांना पाठवले होते. लळित यांना ७४ दिवसांचा कालावधी मिळाला. ते सरन्यायाधीशपदावरून ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. न्याययंत्रणेतील उच्चस्तरीय न्यायमूर्ती नियुक्तीची प्रक्रिया करणाऱ्या ‘मेमोरंडम ऑफ प्रोसिजर (एमओपी)’नुसार, कायदा मंत्रालयाकडून या संदर्भात संपर्क झाल्यानंतर निवृत्त होणारे सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस देण्याची प्रक्रिया सुरू करतात.

  • अनेक घटनापीठांत न्या. चंद्रचूड यांचा सहभाग आहे. अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार आणि व्यभिचारासारख्या महत्त्वाच्या खटल्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी ३१ ऑक्टोबर २०१३ पासून १२ मे २०१६ पर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तिपद भूषवले. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. १३ मे २०१६ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यात आली. न्याय यंत्रणेचे आधुनिकीकरण, संगणकीकरणातही (डिजिटायजेशन) न्या. चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

१२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.