चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ ऑक्टोबर २०२०

Date : 12 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील ८ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’; पंतप्रधान मोदीनींही केलं कौतुक :
  • देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित समजला जाणारा ब्लू फ्लॅग पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी देशातील नागरिकांचं कौतुकही केलं आहे.

  • जगातल्या ५० देशांमधील समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्येच आता भारताचादेखील समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासोबतच देशातील समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषण नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय बेस्ट प्रॅक्टीस पुरस्कारसाठीदेखील निवड करण्यात आली आहे.

  • आशिया खंडातील ब्लू फ्लॅगचा पुरस्कार मिळविणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी जपान, द. कोरिया आणि युएई यांना ब्लू फ्लॅगचा पुरस्कार मिळाला होता. मात्र, हा पुरस्कार मिळण्यासाठी या देशांना जवळपास ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागला होता. सध्याच्या घडीला ब्लू फ्लॅग पुरस्कारांच्या यादीमध्ये देशातील सर्वात जास्त मोठा समुद्र किनारा लाभलेला स्पेन आहे. त्यांना ५६६ मोठा किनारा लाभला आहे. तर फ्रान्सकडे ३९५ इतका आहे.

भारत-चीन सीमा संघर्ष: आज लष्कराची बैठक, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही होणार सहभागी :
  • गलवान खोऱ्यातील रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत-चीन यांच्यातील सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. जूनपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावपूर्ण स्थिती असून, त्यावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी लष्कराच्या बैठक सुरू आहेत. या बैठकीची सातवी फेरी आज होत असून, या बैठकीला दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार असून, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी पहिल्यांदाच हजर राहणार आहेत.

  • गलवाननंतर पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, दक्ष भारतीय लष्करामुळे चीनचा डाव उधळून लावण्यात आला. मात्र, त्यानंतरही दोन्ही बाजूंकडील सैन्य सामने असून, सध्या तणावपूर्ण स्थिती आहे.

  • सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरीय बैठक सुरू आहे. आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चर्चेची सातवी फेरी आज (१२ ऑक्टोबर) होत असून, ही बैठक भारतीय हद्दीत होणार आहे. चुशूल-मोल्डो बॉर्डर पॉईंटवर ही बैठक होणार आहेत. या बैठकीत पहिल्यांदाच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे उच्च पदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत.

‘स्वामित्व’ योजनेंतर्गत मालमत्तापत्रिका :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्डाचे वितरण करण्याच्या योजनेचे दूरचित्रसंवादाद्वारे उद्घाटन केले आणि या ऐतिहासिक पावलामुळे ग्रामीण भारताचे रूप बदलेल असे स्पष्ट केले.

  • या योजनेमुळे ग्रामस्थांना कर्ज अथवा अन्य वित्तीय लाभ घेण्यासाठी मालमत्तेचा आर्थिक संपत्ती म्हणून वापर करता येईल आणि जमिनीच्या मालकीवरून गावकऱ्यांमधील वाद संपुष्टात येईल, असेही मोदी म्हणाले.

  • या वेळी मोदी यांनी ‘सव्‍‌र्हे ऑफ व्हिलेजीस अ‍ॅण्ड मॅपिंग विथ इम्प्रूव्हाइज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज’ (स्वामित्व) योजनेतील काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. देश आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले हे मोठे पाऊल आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

फेलुदा चाचण्यांना काही आठवडय़ांत आरंभ :
  • नवी दिल्ली : करोनावरील लशीला आपत्कालीन मान्यता देण्याबाबत सरकारने अद्याप विचार केलेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी येथे सांगितले. करोनाचे निदान करण्यासाठी देशात विकसित करण्यात आलेल्या फेलुदा पेपर चाचणीला पुढील काही आठवडय़ांत सुरुवात होणार असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

  • सध्या करोनावरील लस चाचणीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे, त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरील ‘रविवार संवाद’ या कार्यक्रमात स्पष्ट केले. आपत्कालीन स्थितीत लशीचा वापर करण्यास मान्यता देण्यासाठी लशीची परिणामकारकता, लस कितपत सुरक्षित आहे त्याची माहिती आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

  • वेगवेगळ्या प्रकारच्या लशी कशा उपलब्ध होतील ते आम्ही पाहत आहोत, एखाद्या वयोगटाला एखादी लस लागू पडेल तर दुसऱ्यांना ती कदाचित लागू पडणार नाही. लस वितरण करण्यासाठी शीतगृह सर्वात महत्त्वाचा घटक आहे, लस पोहोचविताना कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

विजया राजे शिंदे यांना मोदी सरकारचं अनोखं अभिवादन; आणणार १०० रुपयाचं नाणं :

 

  • राजमाता विजयाराजे शिंदे (Rajmata Vijaya Raje Scindia) यांना केंद्र सरकार अनोख्या पद्धतीनं अभिवादन करणार आहे. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नाण्याचं अनावरण करणार आहेत.

  • प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) या नाण्याचं अनावरण करणार आहेत. शिंदे राजघराण्यातील सदस्याच्या सन्मानार्थ नाण्याचं अनावरण होणार असल्याच्या घोषणेनंतर राजमाताच्या मुलीनं ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

  • १०० रुपयांचं हे नाणं चार धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्याच वजन ३५ ग्रॅम आहे. या नाण्यामध्ये चांदीचा वापर ५० टक्के करण्यात आला आहे. तर इतर धातूचं प्रमाण ५० टक्के आहे.

१२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.