चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ मे २०२१

Date : 12 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधानांचा जी-७ दौरा रद्द :
  • देशात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी जाणार नसल्याचे मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

  • ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ ते १३ जून या कालावधीत जी-७ देशांची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदी यांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रण दिले होते. मात्र करोना स्थितीमुळे मोदी जी-७ परिषदेसाठी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.

लशीची दुसरी मात्रा असलेल्यांना प्राधान्य :
  • ज्या नागरिकांना कोविड-१९ लशीची दुसरी मात्रा देय आहे, त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या लशीच्या साठ्यातील ७० टक्के साठा राखीव ठेवावा, असे आवाहन मंगळवारी केंद्र सरकारने राज्यांना केले. राज्यांनीही लसीच्या मात्रांचा किमान अपव्यय होईल या बाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

  • ज्यांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना तातडीने दुसरी मात्रा देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश शूषण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना दुसरी मात्रा प्राधान्याने द्यावी, असे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे.

  • दुसरी मात्रा प्राधान्याने देण्यासाठी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या लशीच्या मात्रांपैकी ७० टक्के मात्रा राखून ठेवाव्या आणि उर्वरित ३० टक्के मात्रा लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांसाठी ठेवाव्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इव्हरमेक्टिन औषधाबाबत आरोग्य संघटनेचा इशारा :
  • करोना संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट  वापरण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी धोक्याचा इशारा दिला आहे. इव्हरमेक्टिन हे तोंडावाटे देण्याचे औषध असून परोपजीवी जंतूंना अटकाव करणारे ते करोनावर वापरण्यात येत आहे.

  • त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, करोनावर उपचार करताना सुरक्षितता व परिणामकारकता महत्त्वाची आहे. कोविड १९ विषाणू संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट वापरणे योग्य नाही. या औषधाची निर्मिती करणाऱ्या एमएसडी व मर्क या कंपन्यांनाही याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

  • इव्हरमेक्टिनचा करोना १९ विषाणू संसर्गावर वापर करताना त्याबाबत झालेले अभ्यास विचारात घेणे आवश्यक आहे. आतापर्यंतच्या विश्लेषणानुसार या औषधाचा करोनावर उपयोग होत असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. शिवाय सुरक्षिततेबाबतच्या माहितीचाही अभाव आहे. इव्हरमेक्टिन या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा देण्याची दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.

  • मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले होते की, या औषधाने रुग्णास  रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत. गोवा सरकारने करोनावर इव्हरमेक्टीन औषधाच्या वापरास प्रतिबंधात्मक औषध म्हणून मंजुरी दिली असून प्रौढांमध्ये हे औषध वापरण्यास सांगितले आहे.

लघुग्रहाचे अवशेष घेऊन  वृत्तसंस्था, केप कॅनव्हरॉल :
  • नासाने पाठवलेल्या एका अवकाशयानात लघुग्रहाचे अवशेष  अडकले असून हे यान आता सोमवारी पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला निघाले आहेत. अवकाशातील प्राचीन खडकांचा या अवशेषात समावेश आहे असे मागच्या आरशातून दिसत आहे.  

  • रोबोट स्वरूपाचे हे यान ओसीरिस रेक्स नावाचे असून त्याला पृथ्वीकडे परतण्यास दोन वर्षे लागणार आहेत. अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे लॉरेटा यांनी सांगितले की, अवकाशयानात अर्धा पौंड व  १ पौंड म्हणजे २०० ते ४०० ग्रॅम अवशेष असून ते खडकांचे छोटे तुकडे आहेत. एकूण २ औंस  म्हणजे साठ ग्रॅम अवशेष आणण्याचे उद्दिष्ट होते ते पूर्ण करण्यात आले आहे. यापूर्वी अपोलो यानाने चंद्रावरून खडक आणले होते. त्यानंतर प्रथमच सर्वात मोठ्या प्रमाणात अवकाशातील अवशेष हे पृथ्वीवर आणण्यात येत आहेत.

  • धुमेकतूतील धूळ व सौर वाऱ्यांचे काही नमुने नासाने यापूर्वी आणले होते. जपानने अशी उद्दिष्टे दोनदा पार केली आहेत. सोमवारी जे यान निघाले आहे ते बेन्नू या लघुग्रहाजवळून निघाले आहे. नासाचे प्रकल्प वैज्ञानिक जॅसन डोर्किन यांनी सांगितले की, लघुग्रहावरील अवशेष परत येत आहेत. त्यासाठी बराच कालावधी लागला असून हा प्रवास खूप मोठा आहे. हे यान काही वर्षांपूर्वी पाठवण्यात आले आहे, त्यावेळी माझी मुलगी लहान होती. आता ती  पदवी घेण्याच्या तयारीत आहे.

  • बेन्नू लघुग्रहावरील नमुने व काही छायाचित्रे परत आणली जात असून ओसिरीस रेक्स हे यान बेन्नूपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. बेन्नू हा लघुग्रह सूर्याभोवती फिरत आहे. सोमवारी दुपारी त्याचे मुख्य इंजिन प्रज्वलित करण्यात आले होते. लॉकहीड मार्टिन कंपनीने हे यान तयार केले होते. त्यांनी अवकाशयान परत येत असल्याचे स्वागत केले आहे.

विश्वचषकाच्या संघसंख्येत वाढ :
  • करोना साथीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्याबरोबरच बिगरनामांकित संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १० ऐवजी १४ संघांचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) प्रयत्नशील आहे.

  • गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे ‘आयसीसी’लासुद्धा आर्थिक हानीला सामोरे जावे लागले. त्याशिवाय ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतही अद्याप साशंकता कायम आहे. २०१९मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात फक्त १० संघांचाच समावेश करण्यात आला. त्यामुळे झिम्बाब्वे, आयर्लंड, नेदरलँड्स या संघांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे या देशांतील क्रिकेटला पुन्हा उभारी देण्यासाठी ‘आयसीसी’ पाऊल उचलणार आहे.

  • सध्याची स्थिती पाहता २०२३मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकातच ‘आयसीसी’ला अधिक संघ खेळवता आले असते. परंतु इतक्या कमी कालावधीत संपूर्ण स्पधेची रूपरेखा नव्याने आखणे कठीण असल्यामुळे त्यानंतरच्या म्हणजेच २०२७च्या विश्वचषकात १० ऐवजी १४ संघ खेळवण्याचा विचार ‘आयसीसी’ करत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ‘आयसीसी’च्या बैठकीदरम्यान याविषयी अंतिम निर्णय घेतला जाण्याचे अपेक्षित आहे. २००७, २०११, २०१५च्या विश्वचषकात १४ संघांचा समावेश करून त्यांना दोन गटांत विभागण्यात आले होते.

१२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.