चालू घडामोडी आणि दिनविशेष - 12 जुलै 2023

Date : 12 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पार्थ साळुंखेची ऐतिहासिक कामगिरी, युवा जागतिक तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखेने ऐतिहासिक कामगिरी करताना युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जागतिक स्पर्धेतील रीकव्र्ह गटात सोनेरी यश संपादन करणारा पार्थ भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे. तसेच भारताने युवा जागतिक तिरंदाजीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ११ पदके पटकावली.
  • साताऱ्याच्या पार्थने २१ वर्षांखालील पुरुषांच्या रीकव्र्ह विभागातील अंतिम लढतीत सातव्या मानांकित कोरियाच्या सॉन्ग इन्जुनचा ७-३ असा पराभव केला. १९ वर्षीय पार्थ सुरुवातीला पिछाडीवर होता. पहिला सेट २६-२६ असा बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सॉन्गने २५-२८ अशी बाजी मारताना एकूण लढतीत आघाडी मिळवली. मात्र, पार्थने दडपणाखाली संयम बाळगताना पुढील तीन सेट अनुक्रमे २८-२६, २९-२६, २८-२६ असे जिंकत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
  • त्याचप्रमाणे २१ वर्षांखालील महिलांच्या रिकर्व्ह विभागात भारताच्या भजन कौरने कांस्यपदक मिळवले. तिने चायनीज तैपेइच्या सु हसीन-यु हिला ७-१ (२८-२५, २७-२७, २९-२५, ३०-२६) असे सहज पराभूत केले.भारताने या स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली. युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील ही भारताची सर्वाधिक पदके ठरली. मात्र, भारताला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोरियाने अग्रस्थान मिळवले.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा कटऑफ तिसऱ्या फेरीत घटणार का? तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज
  • अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज (१२ जुलै) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावी प्रवेशाठी ३२४ महाविद्यालयांत एकूण एक लाख १४ हजार ५५० जागा उपलब्ध आहेत. त्यात ९० हजार १०९ जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी, तर राखीव (कोटा) प्रवेशांसाठी २४ हजार ४११ जागांचा समावेश आहे. आत्तापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये कोटा आणि केंद्रिभूत प्रवेश मिळून ३७ हजार ८५१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर प्रवेशासाठी ७६ हजार ६९९ जागा उपलब्ध आहेत.
  • शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पात्रता गुण नव्वदीपार असल्याने तिसऱ्या फेरीत तरी पात्रता गुणांमध्ये घट होणार का, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या फेरीतील नियमित प्रवेशांबरोबरच द्विलक्ष्यी आणि कोटाअंतर्गत प्रवेश १४ जुलैपर्यंत होणार आहेत.
प्रार्थनास्थळ कायदा : केंद्राला बाजू मांडण्यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत
  • सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’ च्या काही तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राला ३१ ऑक्टोबपर्यंत वेळ दिला आहे. संबंधित कायद्यात असे नमूद केले आहे की १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात असलेल्या प्रार्थनास्थळांचे धार्मिक स्वरूप त्या दिवशी अस्तित्वात होते, तसेच कायम राहील. या धार्मिक स्थळांचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी किंवा त्याचे स्वरूप बदलण्यासाठी खटला दाखल करण्यास या कायद्यानुसार मनाई आहे.
  • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने मंगळवारी केंद्रातर्फे महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांच्या निवेदनाची दखल घेतली. मेहतांनी निवेदन केले होते, की सरकारने त्यावर विचार केला असून, ते सविस्तर उत्तर दाखल करणार आहेत. हे निवेदन विचारार्थ घेऊन खंडपीठाने याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राला ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत दिली.त्यावर आक्षेप घेत भाजप नेते व याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयास सांगितले, की केंद्र सरकार या प्रकरणी वारंवार स्थगिती घेत आहे. कृपया या प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी ही याचिका सूचिबद्ध करावी.
  • खंडपीठाने स्पष्ट केले, की भारत सरकारने स्थगितीची मागणी केली आहे. त्यांना उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल करू द्या. ते आम्हाला पहावे लागेल. खंडपीठाने हेही यावेळी स्पष्ट केले, की या कायद्याच्या अंमलबजावणी रोखण्यात आलेली नाही.न्यायालयाने वकील वृंदा ग्रोवर यांना आपल्या याचिकेची प्रत महान्याय अभिकर्त्यांच्या सहाय्यक वकिलांना सुपूर्द करण्यास सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’ मधील काही तरतुदींच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यासाठी फेब्रुवारी अखेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. वकील अश्विनी उपाध्याय आणि राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांच्या यासंदर्भातील जनहित याचिकांवर ही सुनावणी होत आहे.
चित्रपटगृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेच्या ५० व्या बैठकीत चित्रपटगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काही जीवरक्षक औषधांच्या आयातीवरील करात सूट देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
  • ‘लाइव्ह मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील कर १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रेक्षकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.
  • नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितलं की, जीएसटी परिषदेने कर्करोगावरील औषध डिनुटक्सिमॅब (Dinutuximab) आणि इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या ‘फूड फॉर स्पेशल मेडिकल पर्पज’ (FSMP) च्या आयातीवर जीएसटीमध्ये सूट देण्यास मान्यता दिली आहे. तसेच ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो (जुगाराचा प्रकार) आणि घोड्यांच्या शर्यतींवर २८ टक्के कर लावण्यासही परिषदेनं सहमती दर्शवली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यशस्वीला पदार्पणाची संधी? भारत-विंडीज पहिला कसोटी सामना आजपासून
  • भारतीय कसोटी संघात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून आज, बुधवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर यशस्वी जैस्वालला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासह भारताच्या सर्वच फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
  • भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर प्रथमच मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे, विंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पहिल्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कामगिरी उंचावून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असतील. डॉमिनिका येथील विन्डसर पार्कवर सहा वर्षांनंतर कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
  • गेल्या महिन्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. या अपयशानंतर निवड समितीने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज यशस्वीला संधी मिळू शकेल. देशांतर्गत क्रिकेट आणि ‘आयपीएल’मधील चमकदार कामगिरीच्या बळावर यशस्वीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता विंडीजविरुद्ध दोनही कसोटी सामन्यांत दर्जेदार कामगिरी करताना भारतीय संघातील स्थान भक्कम करण्याचा यशस्वीचा प्रयत्न असेल.
  • यशस्वी हा मूळ सलामीवीर असल्याने त्याला कर्णधार रोहित शर्मासह सलामीला पाठवून शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे अधिक योग्य ठरेल असाही मतप्रवाह आहे. परंतु गिलने सलामीला खेळताना गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा धोका भारतीय संघ व्यवस्थापन पत्करण्याची शक्यता कमी आहे.

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - अर्जुनला सुवर्णपदक :
  • भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुताने चँगवॉन येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जुनने टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या लुकास कोझेनिस्कीला १७-९ असा पराभवाचा धक्का दिला. अझरबैजानच्या गबाला येथे २०१६मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्जुनचे वरिष्ठ गटातील हे पहिले पदक ठरले. अंतिम फेरीमधील सात फैऱ्यांच्या पहिल्या मालिकेनंतर अर्जुन १०-४ असा आघाडीवर होता.

  • प्रत्येक मालिकेतील विजेत्याला दोन गुण मिळतात. लढत बरोबरीत राहिल्यास गुणांची विभागणी होते. सर्वप्रथम १६ गुणांचा टप्पा गाठणाऱ्या नेमबाजाला विजेता घोषित करण्यात येते. अमेरिकेच्या कोझेनिस्कीने अर्जुनला झुंज देण्याचा प्रयत्न केला; पण त्याला आठ गुणांनी पराभव पत्करावा लागला. अर्जुनने भारताला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.

  • तत्पूर्वी, अर्जुनने क्रमवारी फेरीत २६१.१ गुण मिळवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. तर कोझेनिस्कीने २६०.४ गुणांसह सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला होता. इस्राइलचा सर्गे रिचटेरला २५९.९ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पार्थ मखिजाने २५८.१ गुणांसह चौथे स्थान मिळवले.

  • भारताचे विदेशी रायफल प्रशिक्षक थॉमस फार्निक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नेमबाजांची ही पहिलीच स्पर्धा आहे. चँगवॉन विश्वचषक स्पर्धेपूर्वीच ऑस्ट्रियन थॉमस यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.

या आजीचा नादच खुळा! वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक :
  • साधारण व्यक्ती वयाच्या साठीमध्ये पोहचली की तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामे करण्यावर मर्यादा येतात. काहींना जास्त अंतराचे चालणेही नाही होत. मात्र, ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी या सर्व मर्यादा मोडून काढल्या आहेत. त्यांनी या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेमध्ये १०० मीटर स्प्रिंट(वेगात चालणे) प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वजण चकित झाले आहेत.

  • माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भगवानी देवी यांनी १०० मीटर अंतर २४.७४ सेकंदात पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळविले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे भरपूर कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे.

  • युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयाने लिहिले, “भारतातील ९४ वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.”

  • भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअ‍ॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

  • विशेष म्हणजे चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला.

श्रीलंकेत ‘एसजेबी’चा सत्तास्थापनेसाठी दावा :
  • राजकीय आणि आर्थिक संकटांनी ग्रासलेल्या श्रीलंकेत स्थैर्य आणण्यासाठी आपला पक्ष सरकारचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचा दावा श्रीलंकेतील प्रमुख विरोधी पक्ष समगी जन बालवेगयाने (एसजेबी) सोमवारी केला. संसदेत या निर्णयास कोणत्याही प्रकारे विरोध झाल्यास त्याकडे एक ‘विश्वासघातकी कृत्य’ म्हणून पाहिले जाईल, असा इशाराही या पक्षातर्फे देण्यात आला आहे.

  • हंगामी सर्वपक्षीय सरकार बनल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळ राजीनामा देईल व नव्या सरकारला सूत्रे प्रदान करेल, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आल्यानंतर एसजेबी पक्षाचे नेते सजिथ प्रेमदासा यांनी हा दावा केला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

  • विक्रमसिंघेंनी नवे सरकार बनल्यानंतर पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही नेत्यांनी पद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर रविवारी सर्वपक्षीय सरकार बनवण्याबाबत सर्व पक्षांच्या बैठकीत सहमती झाली.  ‘इकॉनॉमी नेक्स्ट’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार एसजेबी पक्षाच्या समाजमाध्यमांवरील वाहिनीवर एका चित्रफितीत या पक्षाचे नेते प्रेमदासा यानी दावा केला, की श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानपदासह सरकार बनवण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे. आम्ही या दोन्ही पदांचे नेतृत्व असलेले सरकार बनवू. याशिवाय अन्य कुठलाही पर्याय सध्या उपलब्ध नाही. याला कोणी विरोध केला किंवा संसदीय कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याकडे एक विश्वासघातकी कृत्य म्हणून पाहिले जाईल.  

  • प्रेमदासा यांनी सांगितले, की आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी व नेतृत्वासाठी व अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या विरोधाचा उल्लेख करून ते म्हणाले, की या असंतोषामुळेच गोताबया यांना पदत्याग करावा लागत आहे. मातृभूमी व जनतेचा हा विजय आहे. 

  • दरम्यान, श्रीलंकेच्या चर्चने सांगितले, की श्रीलंकेला दिवाळखोरीकडे नेण्याचे अपश्रेय राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांना स्वीकारावे लागेल.गोताबया यांच्यासह पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही चर्चतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. चर्चने निवेदनात नमूद केले, की धार्मिक नेते, नागरी संस्था-संघटनांसह सर्वसामान्य जनतेतर्फे अध्यक्ष राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी याचे निदर्शक आहे, की त्यांच्याकडे देशाचे शासन चालवण्याचा जनादेश नाही.

INS Vikrant ची शेवटची चाचणी यशस्वी, महिनाअखेरीस नौदलाकडे सूपुर्त केली जाणार, १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत दाखल होणार :
  • नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आता नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. काल म्हणजे रविवारी १० जूलैला आयएनएस विक्रांतची चौथी आणि अखेरची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भर समुद्रात विविध उपकरणांच्या चाचण्या झाल्यावर विक्रांत काल कोच्ची बंदरातल्या कोच्ची शिपयार्डच्या तळावर परतली.

  • जुलै महिन्याच्या अखेरीस विक्रांत ही नौदलाकडे सूपुर्त केली जाईल. येत्या १५ ऑगस्टला आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेते दाखल करत ‘आझादी का अमृतमहोत्सव ‘ (Azadi Ka Amrit Mahotsav) कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

  • नौदलात एखादी युद्धनौका-पाणबुडी ही सेवेतून निवृत्त झाली की तेच नाव कालांतराने त्याच प्रकारच्या श्रेणीतील युद्धनौकांना द्यायची प्रथा आहे. म्हणजेच नौदलात युद्धनौकेला दिलेले नाव हे कधीही पुसले जात नाही, नष्ट होत नाही, व्यपगत होत नाही.

  • नव्या युद्धनौकेच्या निमित्ताने विक्रांत हे नाव कायम रहाणार आहे. ब्रिटीशांनी वापरलेल्या विमानवाहू युद्धनौकेची डागडुजी करत भारतीय नौदलाने पहिली विमानवाहू युद्धनौका १९६१ च्या सुमारास सेवेत दाखल करुन घेतली. तिचे नामकरण आयएनएस विक्रांत असे करण्यात आले. ही विक्रांत १९९७ ला सेवेतून निवृत्त झाली. आता हेच नाव स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेला देण्यात आले आहे.

नवीन संसद भवनासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा; कामगारांशी संवाद :
  • नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. कांस्य धातूपासून निर्मिती केलेल्या या बोधचिन्हाचे वजन साडेनऊ हजार किलो आहे आणि त्याची उंची साडेसहा मीटर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • या अनावरणप्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की या वर्षांच्या अखेरीस नवीन संसद भवनाचे कामकाज सुरू होण्याआधी हा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीत करण्याचे नियोजन आहे.

  • नवीन संसद भवनाच्या दर्शनी भागावर हे राष्ट्रीय बोधचिन्ह उभारले जाणार आहे. त्याला आधार देण्यासाठी सुमारे सहा हजार किलो वजनाची पोलादी रचना तयार करण्यात आली आहे. नवीन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बोधचिन्ह निर्मितीची प्रक्रिया या चिन्हाचे मातीचे प्रारूप, संगणकीय रचनेपासून ते कांस्य धातूचे ओतकाम (कास्टिंग) आणि मुलाम्यापर्यंत विविध आठ टप्प्यांत झाली आहे.

  • बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या बांधकामात सहभागी कामगारांशी संवाद साधला. ते कामगारांना म्हणाले, की तुम्ही अभिमानास्पद कामगिरी करत आहात. देशासाठी अभिमानास्पद वास्तूची उभारणी तुमच्या हातांनी होत आहे. पंतप्रधानांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे, की संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या कामगारांशी माझा खूप चांगला संवाद झाला. आम्हाला त्यांच्या प्रयत्नांचा अभिमान आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.

१२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.