चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जुलै २०२१

Updated On : Jul 12, 2021 | Category : Current Affairs


भारतीय वंशाची तिसरी महिला आज अवकाशात :
 • व्हर्जिन गॅलेक्टिकच्या मदतीने भारतीय वंशाच्या सिरीषा बांदला ( वय ३४) या रविवारी अवकाशात झेपावणार आहेत. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या तिसऱ्या महिला  ठरणार आहेत.

 • बांदला यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला असून त्या टेक्सासमधील ह्यूस्टन येथे  लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्या आता सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासमवेत अवकाशात जाणार असून यात इतर पाच जणांचा समावेश आहे. टू युनिटी या अवकाशयानाच्या मदतीने त्या अवकाशात जाणार असून न्यू मेक्सिको येथून हे उड्डाण होणार  आहे.  बांदला यांचा या मोहिमेतील अवकाश यात्री म्हणून असलेला क्रमांक ००४ असून संशोधक म्हणून त्या या मोहिमेत सहभागी होत आहेत.

 • बांदला यांचे शिक्षण परडय़ू विद्यापीठात झाले असून त्यांचा संशोधनातील अनुभव मोठा आहे. बांदला या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या सरकारी कामकाज व संशोधन मोहिमा विभागाच्या उपाध्यक्षा आहेत. टू युनिटी यानाचे हे २२ वे उड्डाण असून ११ जुलैला ते अवकाशात झेपावणार आहे. या अवकाशयानात कंपनीचे संस्थापक सर ब्रॅन्सन, चार मोहीम तज्ज्ञ, दोन वैमानिक यांचा समावेश झाला आहे.

 • मी नेहमी स्वप्ने पाहिली. माझ्या आईने मला नेहमीच असे सांगितले की, काम हाती घेतले आहे ते कधी सोडू नकोस. तिचे स्वप्न खरे करण्याची हीच वेळ आहे असे सिरीषाने म्हटले आहे.

अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन अंतराळात :
 • अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन हे स्वत:च्या अंतराळयानात (विंग्ड रॉकेट शिप) अंतराळात पोहचले आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या या सर्वात धाडसी मोहिमेत भारतीय वंशाची सिरिषा बांदला ही त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक आहे.

 • आजपासून ९ दिवसांनी अशाचप्रकारे स्वत:च्या यानातून अंतराळात जाण्याच्या तयारीत असलेले अब्जाधीश आणि प्रतिस्पर्धी जेफ बेझोस यांच्यावर ७१ वर्षांच्या ब्रॅन्सन यांनी आघाडी घेतली आहे.

 • ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीच्या व्हीएसस युनिटी नावाच्या अंतराळयानाने न्यू मेक्सिको येथून दीड तासांच्या मोहिमेवर उड्डाण केले. जमिनीपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर त्यांचे यान मुख्य विमानापासून वेगळे झाले आणि त्याचे इंजिन प्रज्ज्वलित होऊन ते सुमारे ८८ किलोमीटर उंचीवर पोहचले. अंतराळवीरांच्या काही मिनिटांच्या वजनरहित अवस्थेनंतर हे यान रनवेवर उतरणार होते.

 • मूळ भारतीय वंशाची अमेरिकी नागरिक व एअरोनॉटिकल अभियंता सिरिषा बांदला ही या मोहिमेचा भाग असून, अंतराळात जाणारी ती भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे.

हरलीनच्या अफलातून झेलचे पंतप्रधानांकडून कौतुक :
 • भारतीय महिला संघातील अष्टपैलू हरलीन देओलने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध हवेत सूर लगावून टिपलेल्या अफलातून झेलची चित्रफीत गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे चर्चेत आहे. रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर हरलीनच्या झेलचे कौतुक केले.

 • भारत-इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतील शुक्रवारी झालेल्या पहिल्या लढतीत हरलीनने झेल टिपला.

 • इंग्लंडच्या डावातील १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अ‍ॅमी जोन्सने टोलवलेला चेंडू हरलीनने सीमारेषेजवळ झेलला. यासंबंधी ‘अभूतपूर्व, शाब्बास, हरलीन देओल’ असा मजकूर जोडून मोदी यांनी तिच्या झेलची चित्रफीत पोस्ट केली. हा सामना भारताला पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार गमवावा लागला.

भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावलं जेतेपद :
 • भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीनं ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने व्हिक्टर लिलोव्हला पराभूत करत ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. समीरने व्हिक्टरचा ७-५, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामना १ तास २२ मिनिटं चालला. हा किताब जिंकत समीर रॉजर फेडरर, स्टीफन एडबर्ग, माँफिल्स या सारख्या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. फेडरर, एडबर्ग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विम्बलडन ज्युनिअरचा किताब जिंकून केली होती.

 • यापूर्वी फ्रेंच ओपन स्पर्धेत समीर बॅनर्जी पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. मात्र विम्बलडन स्पर्धेत त्याने जोरदार कमबॅक केलं. पहिला सेट जिंकण्यासाठी त्याला चांगलाच घाम गाळावा लागला. मात्र दुसरा सेट त्याने सहज जिंकला. समीर ६ वर्षांचा असल्यापासून टेनिस खेळत आहे. समीरचे आई-वडील १९८०च्या दशकात अमेरिकेत वास्तव्यास गेले होते.

 • “हा एक अद्भुत अनुभव होता. इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर मी खेळलो. मला प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. हे क्षण कायम माझ्या स्मरणात राहतील.” असं समीर बॅनर्जीनं सांगितले.

केरळमध्ये करोनापाठोपाठ ‘झिका’बाबतही सतर्कता :
 • केरळ  हे कोविड रुग्णांच्या संख्येतही वरच्या क्रमांकाच्या राज्यांमध्ये असताना आता तेथे झिका विषाणूने डोके वर काढले आहे. तेथे झिकाची लागण १४ जणांना झाली असून डेंग्यूच्या एडिस इजिप्तीसारख्या डासामुळे हा रोग होतो.

 • केरळ राज्यात दोन दिवसांत या रोगाचे रुग्ण सापडले आहेत. तिरुअनंतपुरम येथे एका २४ वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. शनिवारपर्यंत या रोगाच्या रुग्णांची संख्या १४ झाली आहे. आणखी १३ नमुने सकारात्मक आल्याने ही संख्या १४ झाली आहे.

 • आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आमचा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोविडमध्ये आमची रुग्णसंख्या कमी आहे. केरळात प्राणवायूअभावी कुणी मरण पावलेले नाही. झिका विषाणूविरोधात केरळने कृती योजना तयार केली आहे. त्यामुळे झिकाचा प्रसार होणार नाही. शुक्रवारी केंद्राने तज्ज्ञांचे पथक तेथे पाठवले होते. राज्य सरकारच्या मदतीसाठी काही सामुग्रीही पाठवली होती.

योगी आदित्यनाथांनी जाहीर केलं लोकसंख्या धोरण ; असा आहे अ‍ॅक्शन प्लान :
 • जागतिक लोकसंख्या दिवसाचं औचित्य साधत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात लोकसंख्या धोरण जाहीर केलं आहे.

 • राज्याच्या लोकसंख्या धोरण २०२१-३१ चं जाहीर करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, लोकसंख्या धोरण जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. वाढती लोकसंख्या ही विकासाच्या मार्गात अडथळा बनू शकते. या लोकसंख्या धोरणामध्ये प्रत्येक समाजाचा विचार केला गेला आहे.

 • तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट देखील केलं असून, ”वाढती लोकसंख्या समाजात पसरलेल्या असमानतेसह प्रमुख समस्यांचं मूळ आहे. प्रगत समाज निर्मितीसाठी लोकसंख्या नियंत्रण ही प्राथमिक अट आहे.

 • आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत असलेल्या समस्यांबाबत स्वतः व समाजाला जागरूक करण्याची शपथ घेऊयात.” असं ट्विटद्वारे त्यांनी आवाहन केलं आहे.

१२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)