चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ फेब्रुवारी २०२२

Date : 12 February, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मनिकाला न्याय; टेबल टेनिस महासंघावर प्रशासकाची नियुक्ती :
  • आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बात्राच्या लढय़ाला अखेर न्याय मिळाला आहे. विश्वासार्हता गमावल्याचा ठपका ठेवत भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या कार्यकारिणीला निलंबित करीत प्रशासक नेमण्याचे निर्देश शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

  • राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती आणि खेलरत्न पुरस्कारप्राप्त बात्राने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी हा निर्णय दिला आहे. मनिकाने दाखल केलेल्या सामनानिश्चितीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. सामनानिश्चिती करण्याची सूचना देणाऱ्या प्रशिक्षकाला संघटना पाठीशी घालत असल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

  • ‘‘क्रीडापटू देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संघटनेचे आहे. ज्या व्यक्तींना खेळाडूंना कशी वागणूक द्यावी हे कळत नाही, त्यांनी बाहेर जाणेच योग्य ठरेल,’’ असे न्यायमूर्ती पल्ली यांनी निकालात म्हटले आहे. या निकालपत्रात न्यायामूर्तीनी प्रशासकाचे नावही नमूद केले आहे.

  • गतवर्षी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न देण्यात आलेल्या मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रौय यांच्यावर आरोप करीत न्यायालयात धाव घेतली होती. रॉय यांनी त्यांच्याकडे खासगी प्रशिक्षण घेणाऱ्या एका खेळाडूसाठी मनिकाला ऑलिम्पिक पात्रता लढत गमावण्याची सूचना केली होती.

  • भारतीय टेबल टेनिस संघटनेने दिलेल्या वागणुकीमुळे मला न्यायालयाचा मार्ग निवडणे भाग पडले. देशातील न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशाचे नाव उंचावण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले आहे. मी केंद्र सरकार आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या देशवासीयांची आभारी आहे. 

युक्रेन सोडा, अमेरिकेचा नागरिकांना सल्ला; रशिया आक्रमणाच्या तयारीत :
  • रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती जगभरामध्ये आहे. युद्ध थांबवण्यासाठी चार देशांदरम्यान सुरू असलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रशिया बीजिंग ऑलिम्पिक संपण्याची वाट बघणार नाही. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याचा मोठा जमाव वाढत आहे आणि युद्ध टाळण्याच्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.

  • जो बायडेन यांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, “अमेरिकेच्या नागरिकांनी तेथून ताबडतोब बाहेर पडावे. आम्ही जगातील सर्वात मोठ्या सैन्यासोबत गुंतत आहोत. ही पूर्णपणे वेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे जी लवकरच नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.”

  • दुसरीकडे, मेलबर्नमध्ये, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आशिया पॅसिफिकच्या मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींना भेटत आहेत. संपूर्ण घडामोडीवरून असे दिसून येत आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष युरोपमध्ये युद्ध करण्यापासून काही दिवसांऐवजी काही तास दूर आहेत. “आम्ही अशा टप्प्यात आहोत जिथे हल्ला कधीही सुरू होऊ शकतो आणि बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान देखील हे होऊ शकते,” असे अँटनी ब्लिंकन म्हणाले. रशिया बीजिंग आम्ही ऑलिम्पिक संपण्याची वाट पाहत आहे या गोष्टीला ब्लिंकन यांनी स्पष्ट नकार दिला.

महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा :
  • काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात अधिक यश आले आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेत केला.

  • जागतिक आर्थिक संकटाच्या काळात म्हणजे २००८-०९ मध्ये महागाई अर्थात चलनवाढीचा दर ९.१ टक्के होता आणि आर्थिक घट २.२१ लाख कोटी झाली होती. २०२०-२१ मध्ये करोनाच्या अभूतपूर्व संकटात चलनवाढीचा दर ६.२ टक्के राहिला आणि आर्थिक घट ९.१७ लाख कोटी झाली, असे सीतारामन म्हणाल्या.

  • लोकांच्या हातात थेट पैसे का दिले नाही, असा आक्षेप घेतला गेला. पण, अन्य विकसित देशांनी घेतलेला हाच निर्णय त्यांना महागात पडला असून त्यांना मोठय़ा चलनवाढीच्या समस्येशी झगडावे लागत आहे. अमेरिकेत १९९२ पासून महागाई झाली नव्हती, युरोझोनमधील देशांनी गेल्या २५ वर्षांमध्ये, ब्रिटनने ३० वर्षांत चलनवाढ पाहिली नव्हती. या सर्व देशांना महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. ‘यूपीए’च्या काळात २२ महिने ९ टक्क्यांपेक्षा जास्त चलनवाढ होत राहिली.

  • यूपीए सरकारला महागाईची समस्या हाताळता आली नाही, अशी टीका सीतारामन यांनी केली. करोनाकाळात महसुली खर्चात वाढ केली नाही, कारण त्यातून फारसा वाढीव लाभ (मल्टिप्लायर इफेक्ट) मिळाला नसता, त्या तुलनेत भांडवली खर्चातून एका रुपयामागे वाढीव लाभ २.४५ रुपये आणि नंतर ३.१४ रुपये मिळणार होता. त्यामुळे यंदाही भांडवली खर्चासाठी तरतूद ५.५४ लाख कोटींवरून ७.५ लाख कोटींपर्यंत वाढण्यात आली आहे. त्यातून पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवले जातील आणि रोजगारनिर्मितीही होईल, असे सीतारामन म्हणाल्या.

अफगाणिस्तानच्या निधीतून ‘९/११’ पीडितांना भरपाई; बायडेन प्रशासनाकडून लवकरच निर्णय :
  • अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने तालिबानची राजवट पुन्हा प्रस्थापित होण्याच्या आधी न्यू यॉर्कमध्ये मोठय़ा प्रमाणावर निधी जमा जमा केला आहे. त्या निधीतील ३५० कोटी डॉलर हे अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळावेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कायदेशीर तरतूद करणार आहेत, असे वृत्त दी न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे.

  • या घडामोडीशी संबंधित असलेल्या एका जाणकार अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याचवेळी बायडेन हे आपले खास अधिकार वापरून अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची न्यू यॉर्कमधील सर्व ७०० कोटी डॉलरची मालमत्ता गोठविण्याची करण्याची कारवाई करतील. त्याशिवाय अन्य ३५० कोटी डॉलर विश्वस्त निधीत जमा करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात येईल.

  • अफगाणिस्तानात मानवी दृष्टिकोनातून तातडीने मदतकार्य करण्यासाठी हा निधी वापरण्याची योजना आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ९-११ चा हल्ला आणि अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या युद्धाचा अंत, यातून निर्माण झालेल्या कायदेशीर, राजकीय, परराष्ट्र धोरणविषयक तसेच मानवतेसंबंधित प्रश्नांचा गुंता सोडविण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

  • दरम्यान, अफगाणिस्तानातील अर्थव्यवस्था कोसळली असून तेथील हजारो लोक उपासमारीच्या संकटात आहेत.

लष्करी प्रशिक्षणादरम्यान जखमांमुळे २११ जण सेवामुक्त :
  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भारतीय लष्कर अकादमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी या सैनिक घडवणाऱ्या तीनही प्रशिक्षण संस्थांमध्ये गेल्या १० वर्षांत २११ प्रशिक्षणार्थीना सेवामुक्त करण्यात आले.

  • गंभीर जखमी झाल्याने लष्करात सेवा देण्यास ते अपात्र ठरले असल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. या प्रशिक्षणार्थीना केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्य करण्यात आल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला भट यांनी उत्तर दिले. अपंगत्व आलेल्या या प्रशिक्षणार्थीना प्रत्येक महिन्याला ९००० रुपये आर्थिक साहाय्य आणि महागाई भत्ता देण्यात येतो. २० टक्के अपंगत्व असलेल्यांना अपंगत्व निधी म्हणून दरमहा १६,२०० रुपये देण्यात येतात, असे भट यांनी सांगितले. प्रशिक्षण घेताना मृत्यू आलेल्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी १२.५ लाख, तसेच अन्य साहाय्यही करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

१२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.