चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ फेब्रुवारी २०२१

Date : 12 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मेड इन इंडिया’ Koo मध्ये चिनी गुंतवणूक, कंपनीच्या ‘सीईओं’ची कबुली; म्हणाले :
  • शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद समोर आल्यापासून ‘मेड इन इंडिया’ Koo अ‍ॅप झपाट्याने लोकप्रिय होत आहे. ट्विटरला स्वदेशी पर्याय म्हणून Koo अ‍ॅपची चर्चा असून सरकारमधील काही मंत्रीही Koo अ‍ॅप वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत. मात्र, या ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅपमध्ये चिनी गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे.

  • कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) अप्रम्या राधाकृष्णा यांनी CNBC-TV18 ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Koo अ‍ॅपमध्ये चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक असल्याचं सांगितलं. “शुनवेई कॅपिटल या चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक अ‍ॅपमध्ये आहे, पण त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे ते लवकरच यातून बाहेर पडतील”, असंही राधाकृष्णा यांनी स्पष्ट केलं.

  • “शुनवेई कॅपिटलने सुरूवातीला आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता आम्ही ‘कू’ कडे लक्ष केंद्रीत केलं आहे, त्यामुळे शेनवाई लवकरच बाहेर पडेल”, असं राधाकृष्णा म्हणाले. शुनवेई कॅपिटलशिवाय ‘कू’मध्ये 3one4 कॅपिटल (माजी इन्फोसिस बोर्ड मेंबर मोहनदास पै यांची कंपनी), कलारी कॅपिटल आणि ब्लम व्हेंचर्स यांची गुंतवणूक आहे.

करोना लसीकरण संपताच CAA लागू होणार; अमित शाह यांची घोषणा :
  • करोना लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये बोलत असताना अमित शाह यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत आता त्यांची वेळ संपली असल्याचं म्हटलं.

  • “दीदींची वेळ संपली आहे. बंगाल निवडणूक संपेपर्यंत ममतादीदी ‘जय श्री राम’ म्हणतील हे माझं आश्वासन आहे. भाजपाच्या नेतृत्वात पुढील सरकार स्थापन होईल. मी शंतनू ठाकूर यांना आश्वासन दिलं आहे की, मी येथे येऊन सीएएसंबंधी सर्व शंका दूर करणार आहे,” असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं.

  • अमित शाह यांनी यावेळी आयुषमान योजना लागू केली जाणार असल्याचं आश्वासन देत शेतकऱ्यांना वार्षिक थकबाकी व्यतिरिक्त सहा हजारांची मदत केली जाईल असं सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर केंद्र सरकार ‘शरणार्थी कल्याण योजना’ राबवणार आहे असंही ते म्हणाले.

  • “२०१८ मध्ये आम्ही सर्वांसाठी सीएए असं आश्वासन दिलं होतं. २०१९ मध्ये आम्हाला त्यांनी समर्थन दिलं आणि २०२० मध्ये सीएए आलं. ममता बॅनर्जी यांनी आपण सीएएला परवानगी देणार नाही असं म्हटलं होतं. आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. करोना लसीकरण आणि महामारी संपताच आम्ही सीएए लागू करणार,” असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.

गलवानच्या संघर्षात चीनला मोठा फटका, रशियन वृत्तसंस्थेचा मोठा दावा :
  • भारत आणि चीनमधील सैन्य माघारीच्या प्रक्रियेची बातमी देताना रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने एक मोठा दावा केला आहे. जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे ४५ सैनिक ठार झाले, तर भारताचे २० जवान शहीद झाले असे तासने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन दोघांनी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु केली आहे.

  • काल चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम सैन्य माघारी सुरु झाल्याचे जाहीर केले होते. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या संबंधी माहिती दिली. गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले किती सैनिक ठार झाले, ते चीनने अद्यापही जाहीर केलेले नाही.

  • अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यानेही काही माध्यमांनी गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. गलवानमधील या घटनेच्या सात ते आठ महिन्यानंतर आता दोन्ही देश तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत.

लोकसत्ता डॉट कॉम ठरली मराठीमधील नंबर वन न्यूज वेबसाईट :
  • इंडियन एक्स्प्रेस समूहातील लोकसत्ता डिजिटलनं मराठी वृत्त माध्यमांमध्ये वादातीतरीत्या अग्रस्थान प्राप्त केलं आहे. डिसेंबरमध्ये लोकसत्ता वेबसाईटला १.३४ कोटी वाचकांनी भेट दिली.

  • ताज्या ‘कॉमस्कोअर एमएमएक्स’ अहवालानुसार, लोकसत्ता डॉट कॉमनं डिसेंबर २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२ टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहाचा आघाडीचा मराठी न्यूज ब्रँड असलेल्या लोकसत्ता डॉट कॉमनं पाच प्रादेशिक वेबसाईट्सना वाचकसंख्या वाढीमध्ये मागे टाकलं आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यूज १८ लोकमत ( उणे ८ टक्के), ईसकाळ डॉट कॉम (उणे ९ टक्के), लोकमत डॉट कॉम (उणे १५ टक्के) व महाराष्ट्र टाइम्स (उणे ६० टक्के) या वेबसाईट्सचा समावेश आहे.

  • इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडिया सर्विसेसचे (IE Online Media Services) सीईओ संजय सिंधवानी यांनी लोकसत्ता डॉट कॉमने मिळवलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. लोकसत्ता डॉट कॉम आघाडीवर राहण्यामध्ये नवीन वाचकसंख्येत झालेली ऑरगॅनिक वाढ, जुन्या वाचकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद हे महत्त्वाचे घटक असल्याचं सिंधवानी म्हणाले आहेत.

  • “स्पर्धकांच्या तुलनेत आम्हाला मिळालेली आघाडी, आमच्या कंटेंटवर वाचकांचा विश्वास असल्याचं द्योतक आहे. लोकसत्ताच्या वेबसाइटवर जगभरातल्या मराठी वाचकांना उपयुक्त व अचूक कंटेट योग्य वेळी देणाऱ्या संपादकीय विभागाचं मी अभिनंदन करतो. वाचकांना सर्वसमावेशक कंटेंट मिळावा व त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा आनंददायी अनुभव यावा यासाठी संपादकीय विभागाबरोबर आमची संपूर्ण टीम सतत कार्यशील राहील,” असा विश्वास सिंधवानी यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर :

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.

  • यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.

  • सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.

  • करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.

  • महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.

  • फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.

  • आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

१२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.