चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ एप्रिल २०२१

Date : 12 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“एकदा म्हणता ‘उत्सव’, नंतर म्हणता ‘दुसरं युद्ध’…नेमकं काय आहे?” : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ११ ते १४ एप्रिलदरम्यान करोना लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. देशात एकीकडे अनेक राज्य लसींचा साठा कमी असल्याची तक्रार करत असताना नरेंद्र मोदींनी उत्सव साजरा करण्याचं आवाहन केल्याने टीका होत आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी रविवारी जनतेशी संवाद साधताना उत्सव ही दुसरी लढाई असल्याचा उल्लेख केला. दरम्यान काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी यावरुन टोला लगावला आहे.

  • पी चिदंबरम यांनी ट्विट करत लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्द अशी विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी मोदींनी लॉकडाउन जाहीर करताना २१ दिवसांत युद्ध जिंकू अशी घोषणा केली होती, त्याचीही आठवण करुन दिली.

  • पी चिंदबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं…दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?”. पुढे ते म्हणाले आहेत, “पंतप्रधानांनी पहिला लॉकडाउन जाहीर केला तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे १८ दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?”.

  • “पोकळ अभिमान, वकृत्व आणि अतिशयोक्ती आपल्याला करोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

देशात आणखी पाच लशी परवान्याच्या प्रतीक्षेत :
  • देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती बिकट होत असून येत्या ऑक्टोबरपर्यंत किमान आणखी पाच लशींना केंद्र सरकार मान्यता देण्याची शक्यता आहे. दरम्यान रशियाच्या स्पुटनिक ५ या लशीस येत्या दहा दिवसांत मान्यता मिळणार आहे.   सध्या उपलब्ध असलेल्या लशींचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्नही सरकार करणार आहे.

  • भारतात सध्या कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोनच लशी उपलब्ध असून २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत आणखी पाच लशी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यात स्पुटनिक ५ ही लस रेड्डीज लॅबोरेटरीजच्या मदतीने उत्पादित केली जाणार असून जॉन्सन अँड जॉन्सनची लस बायॉलॉजिकल इ ही कंपनी तयार करणार आहे. सीरम इंडिया ही कंपनी नोव्हाव्हॅक्स ही लस उत्पादित करणार आहे. झायडस कॅडिला कंपना ‘झायकोव्ह- डी ’ लस तयार करीत आहे. भारत बायोटेक नाकावाटे देण्याची लस विकसित करीत आहे.   या लशींना परवानगी देताना परिणामकारकता व सुरक्षितता या दोन घटकांवर सरकार लक्ष केंद्रित करीत आहे.

  • रेड्डी लॅबोरेटरीज व्यतिरिक्त हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा, विक्रो बायोटेक या  कंपन्या स्पुटनिक ५ लशीचे उत्पादन करणार असून ८५० दशलक्ष मात्रांची निर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. स्पुटनिक लस प्रत्यक्ष जूनमध्ये, जॉन्सन अँड जॉन्सन व झायडस कॅडिला यांच्या लशी ऑगस्टमध्ये, नोव्हाव्हॅक्स सप्टेंबरमध्ये, नाकात टाकण्याची लस ऑक्टोबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला -केंद्रीय आरोग्यमंत्री :
  • करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला. केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्यातून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. लस वाटपावरून पेटलेल्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भूमिका मांडली आहे.

  • केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आजतक सीधी बात या कार्यक्रमात बोलताना लस तुटवडा आणि पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. लस तुटवड्यावर बोलताना हर्ष वर्धन म्हणाले,”अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचं सांगितलं जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणं राज्य सरकारची जबाबदारी आहे.

  • निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं हे राज्य सरकारचं काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेलं नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे. लस वितरणात कोणतंही राजकारण केलं जात नाहीये,” असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

  • राज्यांना दिल्या जाणाऱ्या लसींच्या वितरणावर बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले,”कोव्हॅक्सिनवरून महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये राजकारण केलं जात आहे. छत्तीसगढमध्ये आम्ही जानेवारीमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे डोस पाठवले होते. दोन महिन्यांपर्यंत त्यांनी लसीकरणच सुरू केलं नाही. मी आरोग्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र पाठवलं. मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं. कोव्हॅक्सिन लस लोकांना देणार नाही म्हणत तीन महिन्यांपर्यंत फक्त राजकारण करत राहिले. आता मार्च अखेरीपासून लसीकरण सुरू केलं आहे,” असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससमवेत झाली महत्वपूर्ण बैठक; सर्वसमावेशक ‘एसओपी’ तयार केली जाणार :
  • राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसीवरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली.

  • बैठकीत मुख्यंत्र्यांनी प्रशासनाला काही विशेष निर्देश देखील दिले. तर, नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

  • तसेच, कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसीवर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी, असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

१२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.