चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ सप्टेंबर २०२०

Date : 11 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अशुद्ध पाणीपुरवठा योजना :
  • वाडा : वाडा तालुक्यात विविध गावांमध्ये शंभरहून अधिक नळपाणी पुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत. यातील केवळ मौजे गांध्रे येथील एकमेव नळपाणी पुरवठा योजनेत जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे.

  • अर्थात ही यंत्रणा सरकारच्या वतीने नव्हे तर एका आंतरराष्ट्रीय शीतपेय निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पैशातून उभारण्यात आली आहे. उर्वरित सर्व नळपाणी योजनांमध्ये जलशुद्धीकरणाबाबत बोंब आहे. त्यामुळे पावसाळ्यात गढूळ पाणी घशाखाली ढकलावे लागत आहे.

  • गढूळ पाण्याने जलजन्य आजारांनी बहुतांश गावांमधील नागरिक बेजार झाले आहेत. यावर कुडूस कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी अनिरुद्ध पाटील यांनी पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला ग्रामस्थांना दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी शुद्ध करून पिण्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत-जपान दरम्यान संरक्षणविषयक सहकार्य करार :
  • अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांना व्यूहात्मक रचनेसाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करता येणार आहे. चीनच्या लष्कराचे प्रादेशिक प्राबल्य वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला आहे.

  • भारत आणि जपान यांच्या सशस्त्र दलांमध्ये एकमेकांना मदत आणि सेवा देण्याची तरतूद असलेला करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आहे. संरक्षण सचिव अजयकु मार आणि जपानचे राजदूत सुझुकी सातोशी यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

  • दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांनी एकमेकांच्या सुविधांचा वापर करणे, एकमेकांना सहकार्य करणे आदी मुद्दय़ांचा करारामध्ये समावेश आहे.

संसदेच्या अधिवेशनाचे डिजिटल कामकाज :
  • करोनाच्या साथरोगामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज नेहमीप्रमाणे घेणे अशक्य असल्याने ते अधिकाधिक डिजिटल केले जाईल. त्यादृष्टीनेही हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.

  • संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांना सर्व लेखी प्रश्न ऑनलाइन पाठवावे लागतील. अधिवेशनाचे ६२ टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल. नजिकच्या भविष्यात ते पूर्णत: डिजिटल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती बिर्ला यांनी दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून करोनाच्या काळात कामकाज चालवणे आव्हानात्मक आहे.

  • मात्र संसद लोकांना अधिकाधिक जबाबदार आणि उत्तरदायी असली पाहिजे, असे बिर्ला म्हणाले. मात्र लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे प्रश्न विचारण्याची संधी यावेळी अधिवेशनात दिली जाणार नाही. या संदर्भात बिर्ला म्हणाले की, प्रश्नोत्तराचा तास रद्द केला गेला असला तरी लेखी प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्याला उत्तरेही दिली जातील. शून्यप्रहर ६० मिनिटांऐवजी अर्ध्या तासाचा असेल.

  • १७ वी लोकसभा स्थापन होऊन वर्षभराचा काळ लोटला असला तरी उपाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. विरोधी पक्षांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी केली असली तरी, सभागृह आणि सरकार यांनी एकत्रित निर्णय घ्यावा असे सांगत या मुद्दय़ावर अधिक बोलण्यास बिर्ला यांनी नकार दिला. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने जनता दल (सं)चे खासदार हरिवंश यांनी उमेवदवारी अर्ज भरला असून विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

करोनाबाधितांची संख्या ४५ लाखांहून अधिक; एका दिवसात ९६,५५१ नवे रुग्ण :
  • जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारीचा देशातील विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे.

  • महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वात आधिक आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या सहा राज्यात आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत एक हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • गेल्या २४ तासांत देशात ९६ हजार ५५१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३५ लाख ४२ हजार ६६४ जणांनी करोनावर मात केली आहे. भारतातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण इतर देशांपेक्षा चांगलं आहे. देशात सध्या ९ लाख ४३ हजार ४८० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • देशात करोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख ५४३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पाच ११ लाख ६३ हजार ५४२ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

११ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.