चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 नोव्हेंबर 2023

Date : 11 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
श्रीलंकेला मोठा धक्का! आयसीसीने तात्काळ प्रभावाने क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व केले निलंबित
  • एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आयसीसी सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली आणि निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे गंभीर उल्लंघन करत आहे. तथापि, निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल. याबाबत आयसीसीने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणण्यानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेप खूप होता आणि त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेचा संघ शेवटचा साखळी खेळला गेल्याच्या एका दिवसानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे निलंबन झाले. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती आणि या संघाने ९ पैकी केवळ २ सामने जिंकले होते. त्याचबरोबर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
  • आयसीसीने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “आयसीसी बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे गंभीर उल्लंघन करत आहे. विशेषत: त्यांचे व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनात कोणताही सरकारी हस्तक्षेप नाही, याची याची खात्री करणे आवश्यक आहे. निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी निश्चित करतील.”
  • दर तीन महिन्यांनी होणारी आयसीसीची बैठक १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अहमदाबाद येथे होणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकन ​​क्रिकेटच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयसीसीने शुक्रवारी ऑनलाइन बैठक घेतली. असे कळते की आयसीसी बोर्डाला एसएलसीमधील प्रशासनापासून ते वित्त आणि अगदी राष्ट्रीय संघाशी संबंधित बाबींमध्ये श्रीलंका सरकारच्या हस्तक्षेपाची चिंता होती. आयसीसीने एसएलसीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांना सांगितले आहे की २१ नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.
सिकंदर शेखने २२ सेकंदात कसं मारलं मैदान? कुठल्या डावाने शिवराज राक्षेला दिला धोबीपछाड?
  • ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि चांदीच्या गदेचा मानकरी ठरलेला मल्ल म्हणजे सिकंदर शेख. गतविजेत्या शिवराज राक्षेवर त्याने अवघ्या २२ सेकंदांत विजय मिळवला. सिकंदरचं पारडं सुरुवातीपासूनच जड होतं. मात्र शिवराज राक्षे त्याला आव्हान उभं करेल असं वाटलं होतं. तसं मात्र घडलं नाही.
  • काय घडलं २२ सेकंदात?
  • अंतिम फेरीची लढत सुरु झाली. शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांनी एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात केली. सुरुवात झाल्यापासूनच सिकंदर आक्रमक वेगाने खेळत होता. सिकंदरच्या वेगापुढे शिवराजचा निभाव लागला नाही. कारण २२ व्या सेकंदाला सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला धोबीपछाड केलं. चितपट करुन विजय मिळवला. कुस्तीचे हे २२ सेकंद उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले.

सिकंदरने झोळी डाव खेळला आणि..

  • कुस्तीची पंढरी मानली जाणाऱ्या कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या २२ सेकंदात ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला.अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदर शेखने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला २२ व्या सेकंदाला झोळी डावावर चितपट केले. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिकंदर शेखने अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला पराभवाची धूळ चारत शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडकला होता. या दोघांमधली लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव करत सिकंदर शेखने मैदान मारलं आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
  • प्रदीप कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे,योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, मानाची गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व्यवस्थापन, एनआरआय कोट्याचे कमाल शुल्क जाहीर
  • वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना व्यवस्थापन किंवा संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नियमित शिक्षण शुल्काच्या कमाल तीन पट, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चार पट शुल्क द्यावे लागेल. तर अनिवासी भारतीय (एनआरआय) कोट्यातून प्रवेशासाठी नियमित शुल्काच्या कमाल पाच पट शुल्क द्यावे लागणार आहे.
  • शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्यातील महाविद्यालयांकडून एमबीबीएस, दंतवैद्यक, वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (एमडी), होमिओपॅथी पदवी अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी वैद्यकीय महाविद्यालयांकडून अवाजवी पद्धतीने शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी एफआरएला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) एफआरएला कमाल शुल्काबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची विनंती केली. त्यानंतर एफआरएने व्यवस्थापन कोटा आणि अनिवासी भारतीय कोट्याच्या कमाल शुल्काची माहिती जाहीर केली.
  • एफआरएच्या परिपत्रकानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, ऑक्युपेशनल थेरपी अशा पदवी अभ्यासक्रमांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतांना विद्यार्थ्याला नियमित शुल्काच्या कमाल तीन पट शुल्क भरावे लागणार आहे. एमडी, एमएस, एमडीएस यांच्यासह इतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी नियमित शुल्काच्या कमाल चार पट शुल्क भरावे लागणार आहे. तर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना एनआरआय कोट्यातून प्रवेशासाठी नियमित शुल्काच्या कमाल पाच पट शुल्क भरावे लागणार आहे. या शुल्कापेक्षा अधिक शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार नाही. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून जास्तीचे शुल्क किंवा अतिरिक्त शुल्काची मागणी करीत असल्यास संबंधित महाविद्यालयाविरोधात http://www.mahafra.org या संकेतस्थळाद्वारे किंवा [email protected] या ई-मेलद्वारे तक्रार दाखल करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून १८१ आजार वगळणार, हे आहे कारण..
  • राज्यात २०१२-१३ मध्ये सुरू झालेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती प्रत्येक वर्षी वाढत असून त्याचा हजारो रुग्णांना लाभही मिळत आहे. मात्र, या योजनेतून मागणी नसलेले १८१ आजार वगळण्यात येणार असून शासनाने त्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
  • या योजनेत आधी ९९६ व्याधींवरील उपचारांचा समावेश होता. कालांतराने त्यात २१३ नव्या व्याधींवरील उपचारांची भर टाकली गेली. परंतु, एकूण १ हजार २०९ व्याधींपैकी १८१ व्याधींवरील उपचाराला रुग्णांकडून राज्यात मागणी नव्हती. त्यामुळे शासनाकडून या १८१ व्याधींवरील उपचार वगळण्याचा प्रस्ताव संबंधितांना दिला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
  • या योजनेतून २०१६-१७ मध्ये ४.३२ लाख रुग्णांवर, २०२०-२१ मध्ये ६.७१ लाख रुग्णांवर, २०२१-२२ मध्ये ८.४९ लाख रुग्णांवर तर २०२२-२३ मध्ये ७.९७ लाख रुग्णांवर उपचार झाले. प्रत्येक वर्षी या योजनेतून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. परंतु, पोर्टाकॅव्हल ऍनास्टोमोसिस, एक्सिजन आर्थ्रोप्लास्टी, सॅक्रल रिॲक्शन, फेकल फिस्टुला क्लोझर आणि इतर असे एकूण १८१ पद्धतीच्या आजार व व्याधींवरील उपचाराला रुग्णांकडून मागणी नव्हती. त्यामुळे हे आजार योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. या विषयावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे सहाय्यक संचालक रवी शेट्ये यांना विचारणा केली असता त्यांनी हे आजार वगळले जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
रिक्त पदांमुळे रेल्वे प्रवाशांना फटका? सुरक्षा विभागातील १९ हजार पदे रिक्त
  • रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांची जबाबदारी सुरक्षा विभागाच्या खांद्यावर असते. मात्र मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागात १९ हजार ४०० पदे रिक्त आहेत. रनिंग स्टाफ, गँगमन, पॉईंटमन, गेटमन आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे काही वेळा कर्मचाऱ्यांकडून नकळत चूका होतात. परिणामी, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भिती रेल्वे कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
  • मध्य रेल्वेवर एक दिवसआड लहान-मोठे तांत्रिक बिघाड, होणारे अपघात यामुळे प्रवाशांना वेठीस धरले जाते. तसेच दुरुस्तीच्या कामांचा वेग मंदावत असल्याने त्याचाही फटका प्रवाशांना बसतो. मध्य रेल्वेकडून ब्लाॅक घेऊन देखभाल-दुरूस्तीची कामे केली जातात, मात्र ही कामे करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांऐवजी राज्यातील ठिकठिकाणांहून किंवा परराज्यातून कर्मचारी आणले जातात. रेल्वेचे स्लीपर बदलण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जाते. हे कर्मचारी कितपत कुशलतेने काम करतात हा मोठा प्रश्न आहे. तरीही ट्रॅकमन, की-मन, पॉईंटमन ही पदे भरण्यासाठी दिरंगाई करण्यात येत आहे.
  • रेल्वेच्या सुरक्षा पदावर पूर्ण वेळ कार्यरत कर्मचारी असणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेमध्ये सुरक्षा विभागात एकूण २७ हजार पदे मंजूर असून त्यापैकी १९ हजार ४०० पदे रिक्त असल्याची माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी दिली. तसेच रेल्वेचे खासगीकरण करून रेल्वे विभागातील अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे, प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो, असे नायर यांनी सांगितले.
पाकिस्तानातून परदेशी जाणाऱ्यांना मनस्ताप, ‘या’ कारणामुळे नागरिकांना पासपोर्ट मिळेना
  • पाकिस्तानी नागरिकांना पासपोर्ट काढणं कठीण झालं आहे. कारण परदेशी जाण्यासाठी लागणारं पासपोर्टच नागरिकांना मिळणं मुश्किल झालंय. यामुळे परदेशात विविध कारणांसाठी जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, दि एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
  • पासपोर्टसाठी लॅमिनेशन पेपर महत्त्वाचं साहित्य आहे. हा कागद फ्रान्समधून मागवला जातो. परंतु, देशभर लॅमिनेशन पेपरचा तुटवडा निर्माण झालाय, अशी माहिती पाकिस्तानचे इमिग्रेशन आणि पासपोर्टचे विभागाचे महासंचालकांनी दिली.
  • परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी युके, इटलीमधील विविध विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश अर्ज केले आहे. परंतु, वेळेत पासपोर्ट मिळत नसल्याने ते तिथे जाऊ शकत नाहीयत. सरकारच्या या अनास्थेमुळे त्यांना किंमत मोजावी लागत असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली.
  • याप्रकरणी पाकिस्तान सरकारकडून प्रयत्न केले जात असून ही परिस्थिती लवकरच अटोक्यात आणली जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी कादिर यार तिवाना यांनी दिली.
  • अमिर नावाच्या एका व्यक्तीचा पासपोर्ट तयार असल्याचा मेसेज त्याला ऑक्टोबरमध्ये प्राप्त झाला होता. पासपोर्ट घेण्याकरता तो कार्यालयात गेला असता त्याला कळलं की त्याचा पासपोर्ट अद्यापही आलेला नाही. मोहम्मद इम्रान यांनाही सप्टेंबरमध्ये पुढच्या आठवड्यात पासपोर्ट येईल, असं आश्वासित करण्यात आलं होतं. परंतु, त्यानंतर अनेक आठवडे गेले तरीही पासपोर्ट मिळालेला नाही. दररोज ३ ते ४ हजार पासपोर्टची प्रक्रिया केली जायची, परंतु आता ही संख्या आता अवघ्या १२ ते १३ वर पोहोचली आहे.
मानवजातीला हाय अलर्ट! गेले १२ महिने ठरला पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात उष्ण नोंद झालेला काळ
  • गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमानवाढीवर निरनिराळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांपासून अनेक आंतरराष्ट्रीय संघटना, देशोदेशीच्या पर्यावरणप्रेम संघटना व पर्यावरणतज्ज्ञ यावर सातत्याने भूमिका मांडत आहेत. मात्र, तरीही जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार अत्यंत कमी लोकसंख्येकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचे चटके वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात बसू लागले आहेत. आता यासंदर्भात अवघ्या मानवजातीला धोक्याची घंटा ठरणारा एक अहवाल समोर आला असून त्यानुसार गेले १२ महिने हे पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेले सर्वात उष्ण १२ महिने होते!
  • ‘क्लायमेट रीसर्च’ या समाजसेवी विज्ञान संशोधन संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. यानुसार, नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ हा कालखंड पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेल्या तापमानातील सर्वात उष्ण तापमानाचा काळ होता. कोळसा, नैसर्गिक वायू, इतर इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचं तापमान वाढवणारे कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढू लागलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय सांगते आकडेवारी?

  • या वर्षभरात पृथ्वीवरील जवळपास ७.३ बिलियन अर्थात ९० टक्के लोकसंख्येला किमान १० दिवस अतीउष्ण दिवसांचा अनुभव आला. हे प्रमाण सामान्य तापमानापेक्षा तप्पल तीन पट अधिक असल्याचीही नोंद झाली. या काळात सरासरी जागतिक तापमान १.३ अंश सेल्सिअस नोंद झालं. पॅरिस करारानुसार जागतिक स्तरावर सगळ्यांनीच मान्य केलेल्या १.५ अंश सेल्सिअस मर्यादेच्या हे अगदी जवळ पोहोचल्याचं दिसत आहे.
  • “लोकांना हे माहिती आहे की गोष्टी फार विचित्र झाल्या आहेत. पण त्या का विचित्र झाल्यात, हे मात्र लोकांना समजत नाहीये. कारण ते वास्तवाकडे बघत नाहीयेत. आपण अजूनही कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू जाळत आहोत”, अशी प्रतिक्रिया क्लायमेट सेंट्रलचे वैज्ञानिक अँड्र्यू पर्शिंग यांनी दिली आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानच्या समुद्रात नव्या बेटाची निर्मिती
  • एक -एक इंच जमिनीसाठी अनेक देशांमध्ये युद्ध होत असताना तीन आठवडय़ांपूर्वी जपानच्या समुद्रात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर एका छोटय़ा नव्या बेटाची निर्मिती झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बेट फार काळ टिकणार नाही. दक्षिणेकडील इवो जिमाच्या किनारपट्टीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या मालिकेला २१ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्यानंतर १० दिवसांत ज्वालामुखीची राख आणि खडक येथील उथळ समुद्रतळावर गोळा झाले. त्याचे टोक समुद्राच्या पृष्ठभागावर आहे.
  • जपानच्या हवामानशास्त्र संस्थेच्या ज्वालामुखी विभागातील विश्लेषक युजी उसुई यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुमारे १०० मीटर व्यासाचे आणि समुद्रापासून २० मीटर उंचीचे नवीन बेट तयार झाले आहे.
  • इवो जिमाजवळ ज्वालामुखीची सक्रियता वाढली आहे. अलीकडच्या काही वर्षांत समुद्राखाली अनेक उद्रेक झाले आहेत. परंतु नवीन बेटाची निर्मिती ही एक महत्त्वाची घटना आहे, असे उसुई यांनी सांगितले. लाटांच्या माऱ्यामुळे नवीन बेट आता काहीसे आकुंचन पावत आहे. तज्ज्ञ येथील परिस्थितीचे विश्लेषण करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

 

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : शिवा थापा अंतिम फेरीत; भारताच्या चार बॉक्सिंगपटूंची कांस्यपदकाची कमाई :
  • सहा आशियाई पदक विजेता बॉक्सिंगपटू शिवा थापाने जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई वरिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत गुरूवारी अंतिम फेरीत धडक मारली. तर अन्य चार बॉक्सिंगपटूंना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. थापाने (६३.५ किलो वजनी गट) उपांत्य सामन्यात ताजिकिस्तानच्या बाखोदुर उस्मोनोवला ४-१ अशा फरकाने पराभूत करत आगेकूच केली.

  • अंतिम फेरीत त्याचा सामना उज्बेकिस्तानच्या अब्दुलाएव रूसलानशी होईल. थायलंड स्पर्धेत जेतेपद मिळवणारे सुमित आणि गोविंद कुमार यांना आपापल्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदक मिळाले. त्यांच्याशिवाय नरेंदरला (९२ किलोहून अधिक) उपांत्य सामन्याच्या पूढे आगेकूच करता आला नाही.

  • गोविंदने (४८ किलो) कझाकस्तानच्या सानझार ताशकेनबेकडून ०-४ अशी हार पत्करली. सुमितला (७५ किलो) उज्बेकिस्तानच्या आशियाई विजेत्या जाफारोव साईदजामशिदकडून ०-५ असे पराभूत व्हावे लागले. दोन राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हुसामुद्दीनला (५७ किलो) उपांत्यपूर्व सामन्यात डोळय़ाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उपांत्य सामन्यात उतरला नाही. अखेर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नरेंदरला उज्बेकिस्तानच्या मुलोजोनोव लाजिजबेकने ०-५ असे नमवले.

  • शुक्रवारी पाच महिला बॉक्सिंगपटू सुवर्णपदकाच्या लढतीत सहभाग नोंदवतील. ज्यामध्ये टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोरगोहेन (७५ किलो) आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती परवीनचा (६३ किलो) समावेश आहे. स्वीटीनेही (८१ किलो) अंतिम फेरीत स्थान मिळवले असून तिचा सामना कझाकस्तानच्या गुलसाया येरझानशी होईल.

ज्ञानवापी मशीदप्रकरणी आज खंडपीठाची स्थापना :
  • ज्ञानवापी काशी विश्वनाथप्रकरणी सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी खंडपीठाची स्थापना करणार आहे. हिंदूवादी संघटनेच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी गुरुवारी याप्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. यानंतर मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करण्याचे स्पष्ट केले.

  • मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील  पीठाने गुरुवारी काही हिंदू भाविकांच्या वतीने विष्णू शंकर जैन यांनी मांडलेली बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सुरक्षा देण्याचा आदेश १२ नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे.

  • मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, उद्या दुपारी ३ वाजता एका पीठाची स्थापना करणार आहोत. हिंदू पक्षाने ज्ञानवापी परिसरातील तळघराचे कुलूप उघडून पाहणी करण्याची मागणी केली होती.  दाव्यानुसार त्या ठिकाणी ‘शिविलग’ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी एक  आदेश देत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराच्या अंतर्गत सुरक्षेचे निर्देश दिले होते. 

११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर मार्क झकरबर्गने मागितली माफी, म्हणाला “दुर्दैवाने माझ्या…” :
  • फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी (एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के) कमी करण्याची घोषणा बुधवारी केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. झकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले असून, घटलेला महसूल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या हे यामागील कारण असल्याचं सांगितलं आहे. झकरबर्ग यांनी या निर्णयाची जबाबदारी घेतली आहे.

  • “आम्ही सध्या जिथपर्यंत पोहोचलो आहोत त्याची आणि या निर्णयाची जबाबदारी मी घेत आहे,” असं झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर मेटा कर्मचाऱ्यांसाठी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. “हे सर्वांसाठी फारच कठीण असल्याची मला जाणीव आहे. ज्यांना याचा फटका बसला आहे त्यांची मी माफी मागतो,” असं झकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

  • ‘‘करोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरून आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत,’’ असे झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

  • ‘मेटा’ने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने ‘मेटाव्हर्स’ या नव्या संकल्पनेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अ‍ॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये ‘टिकटॉक’ अधिक लोकप्रिय होत असून त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.

मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे ऋषी सुनक दबावाखाली :
  • ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा दिल्याने  राजकीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांच्या  निकटवर्तीय मंत्र्यांनी त्यांच्यावरील दमदाटीच्या आरोपांची चौकशी प्रलंबित असताना आपल्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला. विरोधी मजूर पक्षाने या प्रकरणी सुनक यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

  • सर गेव्हिन विल्यम्सन हे सुनक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. अद्याप त्यांना खाते मिळावयाचे होते. त्यांच्यावर हुजूर पक्षाचे त्यांचेच सहकारी आणि सनदी सेवकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप होता. त्यांनी ‘ट्विटर’वर आपला राजीनामा प्रसृत केला. विरोधी मजूर पक्षाने सुनक यांच्याकडे सक्षम सहकारी निवडण्याची क्षमता नसून, त्यांचे नेतृत्व सक्षम नसल्याचे हे निदर्शक असल्याची टीका केली आहे. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये पंतप्रधानांना विचारावयाच्या साप्ताहिक प्रश्नाच्या अधिकारात हा मुद्दा उपस्थित करून सुनक यांच्यावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील.

  • मजूर पक्षाच्या उपनेत्या अँजेला रेनर म्हणाल्या, की विल्यमसन यांच्यावरील गंभीर आरोपांची कल्पना असतानाही सुनक यांनी त्यांना मंत्रिपदी नियुक्त केले, विश्वास व्यक्त केला. हे ऋषी सुनक यांच्या खराब निर्णयांचे व कमकुवत नेतृत्वाचे आणखी एक उदाहरण आहे. या पदावर निवडून येण्यासाठी केलेल्या ‘तडजोडीं’मुळे सुनक हतबल आहेत. पक्षासाठी त्यांनी देश वेठीस धरला आहे.

मेरीलँड लेफ्टनंट गव्हर्नरपदी अरुणा मिलर :
  • अरुणा मिलर यांनी मेरीलँड राज्यातील ‘लेफ्टनंट गव्हर्नर’पदासाठीची निवडणूक जिंकली. ही निवडणूक जिंकणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन नेत्या ठरल्या आहेत. मेरीलँडच्या गव्हर्नरपदी डेमोक्रॅटिक पक्षाचेच वेस मूर निर्वाचित झाले आहेत. अमेरिकेच्या राजधानीलगतचे हे राज्य आहे.

  • मंगळवारी संध्याकाळी मतदानानंतर लगेचच झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. त्यानुसार मूर आणि मिलर हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिस्पर्ध्याना पराभूत करून निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. अमेरिकेचा अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस या दोघांनीही मूर आणि मिलर यांचा प्रचार केला होता. ५८ वर्षीय मिलर मेरीलँड लोकप्रतिनिधी गृहाच्या माजी सदस्य आहेत. गव्हर्नरपदाच्या खालोखाल ‘लेफ्टनंट गव्हर्नर’कडे राज्याच्या प्रमुखपदाचे अधिकार असतात.

  • आई-वडिलांसह अमेरिकेत स्थलांतरित होण्यापूर्वी मिलर यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. मिलर म्हणाल्या, की आम्ही १९७२ मध्ये अमेरिकेत आलो. तेव्हापासून मला अमेरिकेतील सुसंधी हमीबद्दल विश्वास होता. ही संधीची हमी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. प्रत्येकास प्रगतीची समान संधी यापुढेही कायम मिळत राहावी, यासाठी मी संघर्षरत राहीन. माझ्या कर्तृत्वातून मी वचनपूर्ती करेन, मेरीलँड कर्तृत्व असलेल्या कुणालाही वंचित ठेवत नाही. जेव्हा ‘गव्हर्नर’ राज्याबाहेर असतात किंवा कुठल्याही कारणाने सक्षम नसतात, तेव्हा ते ‘लेफ्टनंट गव्हर्नर’ त्यांची धुरा सांभाळतात. तसेच ‘गव्हर्नर’ मृत्युमुखी पडल्यास अथवा पदच्युत केल्यास ‘गव्हर्नर’पदाची सूत्रे ‘लेफ्टनंट गव्हर्नर’कडे येतात.

  • या निवडणुकीत मिलर यांच्यावर त्या हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हा आरोप फेटाळत व आक्रमक प्रचाराला समर्थपणे तोंड देत मिलर यांनी अखेर मात केली. खरं तर, मेरीलँडमधील भारतीय-अमेरिकनांमध्ये तिची लोकप्रियता ‘डेमोक्रॅटिक’सह ‘रिपब्लिकन’ पक्षातही आहे. ट्रम्प आणि रिपब्लिकन समर्थकांपैकी काहींनी मिलर यांना पाठिंबा दिला होता. त्यात जसदीप सिंग जस्सी यांचा समावेश आहे.

आयुष्यात कधीही चुकवलं नाही मतदान; श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार :
  • स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं शनिवारी (०५ नोव्हेंबर) हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात निधन झालं. १०५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेगी यांचं आपल्या राहत्या घरात वृद्धापकाळाने निधन झालं. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी २ नोव्हेंबर रोजीच टपालद्वारे मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदान करण्याची त्यांची ही ३४ वी वेळ होती.

  • श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार - १०५ वर्षीय श्याम सरन नेगी यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा मतदान केलं होतं. १९५१-५२ सालच्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, भौगोलिक कारणांमुळे किन्नौर येथे काही महिने आधीच मतदान घेण्यात आलं. कारण हा जिल्हा समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर आहे. त्यामुळे हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते, अशा स्थितीत या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवणं कठीण झालं असते, त्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत हिमाचल प्रदेशातील किन्नोर याठिकाणी काही महिने आधीच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

  • या निवडणुकीत श्याम सरन नेगी यांनी सर्वात आधी मतदान केलं. त्यामुळे ते स्वतंत्र भारतातील पहिले मतदार बनले. त्यावेळी त्यांचं वय ३४ वर्षे होतं. त्यांनी किन्नोर जिल्ह्यातील कल्पा येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. १ जुलै १९१७ रोजी नेगी यांचा जन्म झाला असून त्यांनी प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुकीत मतदान केलं आहे, असा दावा त्यांनी स्वत: केला आहे.

११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.