चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ नोव्हेंबर २०२१

Date : 11 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
न्यूझीलंडकडून परतफेड - इंग्लंडला नमवून अंतिम फेरीत :
  • दोन वर्षांपूर्वी लॉडर्सवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सरशी साधत इंग्लंडने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यात अखेर न्यूझीलंडला यश आले. डॅरेल मिचेल (४७ चेंडूंत नाबाद ७२) आणि जिमी नीशाम (११ चेंडूंत २७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने बुधवारी इंग्लंडचा पाच गडी व एक षटक राखून पराभव करत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

  • अबू धाबी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठले. ख्रिस वोक्सने सलामीवीर मार्टिन गप्टिल (४) आणि कर्णधार केन विल्यम्सन (५) यांना माघारी पाठवले. पण मिचेलला डेवॉन कॉन्वेची (४६) उत्तम साथ लाभली.

  • लियम लिव्हिंगस्टोनने कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स (२) यांना बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकले. मात्र, अखेरच्या चार षटकांत ५७ धावांची गरज असताना नीशामने ख्रिस जॉर्डनच्या एकाच षटकात २३ धावा (२ वाइड आणि २ लेग बाय) फटकावल्या. तसेच न्यूझीलंडने पुढील दोन षटकांत ३४ धावा करत हा सामना जिंकला. मिचेलच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

  • तत्पूर्वी, इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १४६ अशी धावसंख्या उभारली होती. जोस बटलर (२४ चेंडूंत २९) आणि जॉनी बेअरस्टो (१७ चेंडूंत १३) चांगल्या सुरुवातीनंतर माघारी परतले. मात्र, मोईन आणि डेविड मलान (३० चेंडूत ४१) यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी रचल्यावर मलानला टीम साऊदीने बाद केले. मोईनने नाबाद अर्धशतकासह इंग्लंडला १६५ धावांचा टप्पा पार करून दिला.

MPSC Exams : राज्य सरकारचा मोठा निर्णय, परीक्षार्थींना एका वर्षाची मुदतवाढ :
  • करोना काळामध्ये इतर मुद्द्यांप्रमाणेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षा, त्यांचे निकाल, त्यांचं झालेलं नुकसान हा मुद्दा चर्चेचा ठरला होता. पुण्यामध्ये ऐन करोनाच्या संकटामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. करोना काळात परीक्षा स्थगित केल्यामुळे या परीक्षा घेण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.

  • मात्र, त्यानंतर करोनाचं संकट वाढल्यामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीच्या परीक्षार्थींना आता परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कालच मिळाला पद्मश्रीचा सन्मान आणि आज केला ‘असा’ प्रकार; ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग बसले फुटपाथवर :
  • ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग यांना काल पद्मश्री पुरस्कार मिळाला पण आज ते हरियाणा भवनासमोर पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि पदक घेऊन फुटपाथवर बसले आहेत. हरियाणा सरकार आपल्याशी भेदभाव करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी पद्मश्री पुरस्काराची जोरदार चर्चा आहे. काल दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते मूकबधिर ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

  • वीरेंद्र यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही, पण त्यांच्या हातातील पदके आणि समोर द्रोण पुरस्कार हे त्यांच्या कुस्तीतील योगदानामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची साक्ष आहे. त्यांची केंद्र सरकारशी कोणतीही तक्रार नाही पण हरियाणा सरकारबाबत त्यांच्याकडे तक्रारींची मोठी यादी आहे.

  • वीरेंद्रचा भाऊ रामवीरने सांगितले की, हरियाणा सरकारने फक्त एक कोटी आणि सी ग्रेड नोकरी दिली आहे, तर पॅरा ऑलिंपियन आणि ऑलिम्पियन्सना अधिक सुविधा दिल्या जात आहेत. आम्ही काल पंतप्रधानांनाही हे सांगितले आहे. ते म्हणाले आम्हा यावर चर्चा करु. 

“एसटीच्या प्रत्येक प्रवाश्यांवर आकारला जाणारा एक रुपया याप्रमाणे महिन्याचे २१ कोटी ‘मातोश्री’वर जातात” :
  • राज्यामध्ये सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशांकडून महिन्याला २१ कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा ‘मातोश्री’त जातो, असं पडळकर एसटी कर्मचाऱ्यांसमोर बोलताना म्हणाले आहेत.

  • एसटी कर्मचाऱ्यांचा संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर देखील संप सुरूच असल्यामुळे अखेर एसटी महामंडळाने न्यायालयात संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आणि कर्मचारी संघटनांविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

  • असं असतानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच पडळकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्याने भर पडणार आहे.

  • गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शेकडो आंदोलक जमले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. यावेळी पडळकर यांनी एसटीतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी नको :
  • अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जागतिक दहशतवादासाठी होता कामा नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्या देशात सर्वसमावेशक  सरकार स्थापन होणे गरजेचे आहे, असे भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक संवादाअंती प्रसारित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. भारत, रशिया, इराण व इतर पाच मध्य आशियायी देशांनी या उद्दिष्टांवर सामुदायिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

  • भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तान सुरक्षा संवाद परिषदेत त्या देशातील सुरक्षा परिस्थितीवर सर्वांगीण चर्चा करण्यात आली. अफगाणिस्तानच्या प्रदेशात दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण व अर्थपुरवठा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. त्याला संबंधित देशांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

  • अफगाणिस्तानातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती ढासळत आहे व तेथील लोकांना तातडीने मानवतावादी पातळीवर मदत करण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले. अफगाणिस्तानला थेट मदत देण्याची गरज असून त्यात भेदभाव असता कामा नये असेही स्पष्ट करण्यात आले.

  • अफगाणिस्तानातील परिस्थितीचे केवळ त्या देशातच नव्हे तर इतर शेजारी देशातही परिणाम होऊ शकतात, असे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, जाहीरनाम्यात पुढे म्हटले आहे की, अफगाणिस्तानात शांतता व स्थिरता नांदावी यासाठी तसेच त्या देशाचे सार्वभौमत्व व एकता अखंडित राहावी यासाठी सर्व देशांचा र्पांठबा आहे. त्या देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करू नये यावरही मतैक्य झाले आहे.

एलॉन मस्क यांनी दोन दिवसांत गमावली तब्बल ५० अब्ज डॉलर्सची संपत्ती; जाणून घ्या कारण :
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत ५० अब्ज डॉलरची घट झाली आहे. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेली घसरण हे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे.

  • ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या इतिहासात अवघ्या दोन दिवसांत अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात सर्वाधिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीतही मस्क दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

  • एका दिवसात सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा विक्रम अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये मॅकेन्झी स्कॉटसोबत घटस्फोट घेतल्यानंतर बेझोसची संपत्ती एका दिवसात ३६ अब्ज डॉलरने कमी झाली होती. तर, मंगळवारी मस्कच्या संपत्तीत तब्बल ३५ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.