चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ नोव्हेंबर २०२०

Date : 11 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बिहारमध्ये पुन्हा नितीशराज! NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता :
  • बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.

  • दुसरीकडे महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

  • बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं. मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली.

  • रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे.

एकमेकांच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मतेचा मान राखा :
  • सर्व सदस्य देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्व तसेत प्रादेशिक एकात्मतेचा मान राखावा, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी बैठकीत चीन व पाकिस्तान यांना टोला लगावला आहे.

  • पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना झालेल्या आठ सदस्यांच्या शांघाय सहकार्य संघटना बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. दुसरीकडे पाकिस्तानही सीमावर्ती भागातून भारतात दहशतवाद पसरवित आहे त्यामुळे पंतप्रधानांचे हे विधान पाकिस्तानलाही लागू पडणारे आहे.

  • पंतप्रधान मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत हे सूचक वक्तव्य केल्याने त्याला विशेष अर्थ आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन होते.  भारताच्या इतर देशांशी संबंधाबाबत त्यांनी सांगितले की, भारताला विविध देशांशी संबंध वाढवताना त्यांच्याशी विविध मार्गानी जोडणी महत्त्वाची वाटते.

  • पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी सांगितले की, काही देश द्विपक्षीय प्रश्न या मंचावर उपस्थित करतात ते शांघाय सहकार्य संघटना ज्या तत्त्वांवर स्थापना झाली त्याच्या विरोधात आहे.  भारताने या संघटनेच्या तत्त्वांचे नेहमीच पालन केले आहे पण काही देश दुर्दैवाने त्यात द्विपक्षीय प्रश्न आणतात.

देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ शब्दांत केलं ‘मुंबई इंडियन्स’चं अभिनंदन :
  • IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

  • मुंबईला मिळालेल्या विजेतेपदानंतर त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत मुंबईच्या संघाचं कौतुक केलं. “…आणि पुन्हा एकदा आमची मुंबई इंडियन्स विजयी झाली. पाचव्यांदा IPLचा चषक उंचावल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनापासून अभिनंदन! रोहित… तू खरंच एक उत्तम कर्णधार आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो”, असं ट्विट फडणवीस यांनी केलं.

  • प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार :
  • राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठीकीमध्ये घेण्यात आला आहे. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.

  • हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्याची राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता, यंदा ते नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशन घेता येईल का? किती दिवस घ्यायचे? याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

  • बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.

  • या बैठकीस विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर; दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन :
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. तसंच शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • “एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • “टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे,” असंही परब यांनी नमूद केलं.

११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.