चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ मार्च २०२१

Date : 11 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बदललेल्या चिनीनीतीनंतर नवीन व्यूहविचार - नौदलप्रमुख :
  • भारतीय नौदल चीनवर लक्ष ठेवून आहे. चीन इतरांप्रमाणे विचार करत नाही, त्यांची रणनीती वेगळी आहे. ते ध्यानात ठेवून आता भारतीय नौदलातर्फे नवीन व्यूहविचार आकारास येत असल्याचे प्रतिपादन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी बुधवारी केले.

  • प्रोजेक्ट ७५ अंतर्गत कलवरी वर्गातील तिसरी स्टेल्थ स्कॉर्पिन पाणबुडी ‘आयएनएस करंज’ समारंभपूर्वक नौदलात दाखल झाली. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नौदलप्रमुख बोलत होर्ते. हिंदी महासागरातीलच नव्हे तर देशाच्या तिन्ही बाजूंना असलेल्या सागरी सीमा अभेद्या राहण्याची खातरजमा करण्यासाठी अलीकडे देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर व बेटसदृश्य असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या सागरीसीमांवरही एकाच वेळेस ‘सी व्हिजिल’ युद्धाभ्यास पार पडला.

  • त्यामध्ये लक्षात आलेल्या काही बाबींनंतर सागरीसुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, असे सांगून अ‍ॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले की, ‘आयएनएस करंज’ ही आत्मनिर्भर भारत योजनेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.

  • कारण यापूर्वी कलवरी वर्गातील दोन्ही स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मिती- तपासणी आणि त्यावरील नौदलाच्या ताफ्याचे प्रशिक्षण यात फ्रेंच सहभाग होता. मात्र ‘आयएनएस करंज’ ही पूर्णपणे भारतीय नजरेखाली तयार झालेली पहिलीच पाणबुडी आहे. येणाºया काळात पाणबुडीचा ऊर्जास्रोत असलेल्या प्रोपल्शन यंत्रणेमध्येही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

बहुत बढिया! म्हणत मोदींनी केले लोककलाकारांचे कौतुक; लाखो लोकांनी केले लाईक :
  • देशात प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही आणि सोशल मीडियाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या मान्यता न मिळालेल्या कलागुणांकडे आता लोकांचे लक्ष वेधले जात आहे. नुकतेच असे काही लोककलाकारांच्या जोडीसोबत घडले. त्यांनी आपल्या गाण्याने केवळ सर्वांनाच मंत्रमुग्ध केले तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकही मिळवले.

  • ब्रिजेश चौधरी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन पुरुष रस्त्यावर भक्तिगीत गाताना दिसत आहेत. त्यातील एक राजस्थानी तंतुवाद्य रावणहठ वाजवताना दिसत आहे, तर दुसरा त्याच्या साथीने डफ वाजवित आहे.

  • या विडीयो क्लिप शेअर करणार्‍या ट्विटर युजरने लिहिले आहे की, ही भावना ऐका आणि अनुभवा. या अस्सल प्रतिभेसमोर सर्व सेलिब्रिटी ‘अपयशी’ असल्याचा दावा करत सर्वांना “स्थानिक प्रतिभेचे समर्थन व प्रोत्साहन” देण्याचे आवाहन केले आहे.

  • लोकगीताचा हा भावपूर्ण विडियो भरपूर व्हायरल झाला. याकडे पंतप्रधान मोदींचेही लक्ष गेले. महा शिवरात्रीच्या अगोदर पंतप्रधानांनी गाण्याचे क्लिप रीट्वीट करुन भगवान शिवची स्तुती केली आणि “बहुत बढिया (खुपच छान)” असे म्हणत या कुशल जोडीचे कौतुक देखील केले: त्याचे ट्विट आणल्यानंतर या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेकांनी या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला पंतप्रधान दाखवणार झेंडा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महात्मा गांधींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला झेंडा दाखवणार आहेत. अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून यात्रेला सुरूवात होणार आहे.  या यात्रेत सहभागी होणारे प्रतिनिधी दांडी यात्रेच्या ३८६ किलोमीटरच्या मूळ मार्गावरुन यात्रा करणार आहेत. हा मार्ग साबरमती आश्रम ते दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडीपर्यंत आहे.

  • राज्यशासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना, गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा अमृत महोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याच्या विचार विनिमयाबद्दल ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

  • सायकल आणि बाईक रॅली, विविध स्पर्धा, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘आत्मानिर्भर भारत’ या विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यामागचे उद्दीष्ट म्हणजे मुले, तरुण आणि नागरिकांचा यात जास्तीत जास्त सहभाग होणे आणि महात्मा गांधींचा संदेश पोहोचविणे हा आहे.

  • १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती गांधी आश्रमातून ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला झेंडा दाखवणार आहेत. यात ८१ पादचारी साबरमती आश्रमापासून ३८६ कि.मी. अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी जातील.

गूगल डूडलने केला ‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा सन्मान :
  • गूगल डूडलने बुधवारी प्रख्यात भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडुपी रामचंद्र राव यांचा ८९ वा वाढदिवस साजरा केला, ज्यांना लोक “भारताचे सॅटेलाईट मॅन” म्हणून ओळखतात.

  • डूडलमध्ये उजव्या हातात उपग्रह घेतलेले प्रोफेसर राव यांचे रेखाटन आहे आणि त्यांच्यामागे अंतराळ आणि पृथ्वीचे चित्र आहे. “आपली ताऱ्यांच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजुनसुध्दा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे,” असं गुगलने त्यांच्या वर्णनात लिहिलं आहे.

  • भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष असलेले राव यांनी १९७५ साली “आर्यभट्ट” या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते.

  • “१० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील एका दुर्गम गावात प्रा. राव यांचा जन्म झाला. त्यांनी वैश्विक किरणशास्त्रज्ञ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर प्रो. राव अमेरिकेत गेले, जिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आणि नासाच्या पायोनियर आणि एक्सप्लोरर स्पेस प्रोब या प्रकल्पांवर देखील काम केले, ” असे गुगल डूडलच्या संकेतस्थळावरील वर्णनात लिहिले आहे.

  • १९६६ मध्ये भारतात परत आल्यावर प्रा. राव यांनी भौतिक विज्ञान संशोधन प्रयोगशाळेत, एक व्यापक उच्च उर्जा खगोलशास्त्र कार्यक्रम सुरू केला. १९८४ ते १९९४ पर्यंत प्रो. राव यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

पाकिस्तानला देणार ४.५ कोटी Made In India व्हॅक्सिन :
  • भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • GAVI अंतर्गत लसींच्या पुरवठ्यासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. यामुळे जगातील अर्ध्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण केलं जातं. करोना संकटाच्या काळातही पाकिस्तानला ही मदत केली जात होती. सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानला करोना लस पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

  • ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत ४.५ कोटी लसीचे डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारे लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली.

  • “GAVI करारांतर्गत भारतात निर्मिती करण्यात आलेली लस पाकिस्तानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विकसनशील आणि गरीब देशांना लस पुरवणं हा या कराराचा मुख्य हेतू आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली! उमेदवारांची प्रतिक्षा संपेना :
  • गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

  • एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १४ मार्च रोजी एमपीएससीची मार्च २०२० मध्ये होणारी पूर्वपरीक्षा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती.

  • उमेदवारांना प्रवेशपत्र देखील देण्यात आले होते. आता परीक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता उमेदवारांकडून याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

११ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.