चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जून २०२२

Date : 11 June, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा: संजीवनी जाधवला सुवर्ण; १०,००० मीटर शर्यतीत प्राजक्ता गोडबोलेला रौप्यपदक :
  • महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक कमावले, तर प्राजक्ता गोडबोलेने रौप्यपदक पटकावले.२५ वर्षीय संजीवनीने ३३:१६.४३ सेकंद, तर प्राजक्ताने ३३:५९.३४ सेकंद अशी वेळ नोंदवली.

  • एप्रिल महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवताना यापेक्षा तीन सेकंदांनी उत्तम अशी ३३:१३.०७ सेकंद अशी वेळ गाठली होती. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची ३१ मिनिटांची वेळ नोंदवण्यात ती अपयशी ठरली आहे. या प्रकारात उत्तर प्रदेशच्या कविता यादवने (३५:००.३३ से.) कांस्यपदक पटकावले.लांब उडीपटू एम. श्रीशंकरने पात्रता फेरीतील अखेरच्या प्रयत्नात ८.०१ मीटरसह राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या प्रकारात प्रेम कुमारने २०१३मध्ये ८ मीटर अंतर गाठले होते.

  • बंदीने आयुष्याचा धडा दिला -संजीवनी - उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे २०१८मध्ये घातलेली दोन वर्षांची बंदी आणि करोनामुळे वडिलांचे झालेले निधन या दोन धक्क्यांनी धावपटू संजीवनी जाधवला आयुष्याचा धडा दिला. हे दु:ख मागे टाकून तिने ॲथलेटिक्समधील कारकीर्दीकडे पुन्हा गांभीर्याने पाहायचे ठरवले. उत्तेजक चाचणीत प्रोबेनेसिड या बंदी असलेल्या पदार्थाचे अंश आढळल्यामुळे जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून संजीवनीवर दोन वर्षे बंदीची कारवाई करण्यात आली. २९ जून २०१८नंतरचे तिचे सर्व निकाल रद्दबातल ठरवण्यात आले.

  • परिणामी दोहा येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १०,००० हजार मीटर शर्यतीत तिने मिळवलेले कांस्यपदक गमवावे लागले. याआधी २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने ५००० मीटरमध्ये कांस्यपदक मिळवले होते. ‘‘बंदीच्या दोन वर्षांत मी बरेच काही शिकले. बंदी असलेले पदार्थ मी जाणीवपूर्वक सेवन केले नव्हते. त्यामुळे माझी चूक नव्हती. या कारवाईमुळे आयुष्य साधेसरळ जगता येत नसते. त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. अन्न किंवा औषध अशा कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना सावध राहायला हवे. आजारपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेत नाही,’’ असे संजीवनीने सांगितले.

पंतप्रधानांचा देहू दौरा; मोदी बनणार वारकरी, माथी सजणार तुकारामांची पगडी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आले आहे. त्याच दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले आहे. ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ तारखेच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यात येणार आहे. या पगडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

  • या पगडीबाबत गिरीश मुरुडकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आजवर आमच्यामार्फत अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीकरीता पगडी, फेटे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही मागील तीन चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत.

  • पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.

  • दोन वर्षानंतर सोहळ्याचे आयोजन - येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

जाहिरातींबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे :
  • मुलांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुलांचे आरोग्य आणि पोषण यासंबंधी लाभांचे खोटे दावे करण्याच्या प्रकाराला आळा घालणे आणि त्यांना भेटवस्तूचे प्रलोभन दाखवून वस्तू आणि सेवा घेण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करण्याची यामध्ये तरतूद आहे.

  • ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंध आणि जाहिरातींसंबंधी आवश्यक सतर्कतेसाठी यंदा मार्गदर्शक तत्त्वे  जारी केली आहेत. मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींसंबंधी  १९ तरतूदी आहेत. त्या तातडीने लागू करण्यात आल्या आहेत.

  • ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या शिफारशीनंतर मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी  तरतूदी  आहेत, असे सिंह यांनी सांगितले.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा: मामेदेरोव्हकडून पराभवामुळे आनंदची तिसऱ्या स्थानी घसरण :
  • भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला नॉर्वे स्पर्धेच्या पारंपरिक (क्लासिकल) विभागातील आठव्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अझरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हने आनंदला पराभूत केले. त्यामुळे त्याची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.आनंदने या स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. पाचव्या फेरीअंती तो गुणतालिकेत नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसनसह संयुक्तरीत्या अग्रस्थानावर होता. मात्र त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही.

  • गुरुवारी मध्यरात्री झालेल्या आठव्या फेरीच्या लढतीत मामेदेरोव्हने आनंदवर २२ चालींमध्येच सरशी साधली. या पराभवामुळे आनंद १३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या स्पर्धेची एक फेरी शिल्लक असताना कार्लसन १५ गुणांसह अग्रस्थानी कायम असून आनंदवर मात करणारा मामेदेरोव्ह १४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

  • कार्लसनने आठव्या फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाशिये-लॅग्रेव्हला नमवले. या दोघांमधील नियमित लढत ७९ चालींअंती बरोबरीत सुटली. त्यानंतर बरोबरीची ही कोंडी फोडण्यासाठी झालेल्या अर्मागेडन डावात कार्लसनने ५४ चालींमध्ये विजयाची नोंद केली. अन्य लढतींमध्ये, बल्गेरियाच्या व्हेसेलिन टोपोलोव्हने अमेरिकेच्या वेस्ली सो याचा, तर अझरबैजानच्या तैमूर राजाबोव्हने चीनच्या हाओ वांगचा पराभव केला. नेदरलँड्सच्या अनिश गिरीने नॉर्वेच्या आर्यन तारीला ६१ चालींमध्ये पराभूत करत तीन गुणांची कमाई केली.

महाराष्ट्रासह आणखी तीन राज्यात सुरू आहे राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम :
  • राज्यसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. हे मतदान चार राज्यांमधील १६ रिक्त जागांसाठी होत आहे. या राज्यांमध्ये राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. १५ राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांपैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारांची संख्या जागांपेक्षा जास्त असल्याने उर्वरित १६ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली असून संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल, काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत हे या निवडणुकीसाठी उमेदवार असून, या सर्व नेत्यांकडून विजयाची अपेक्षा आहे.

  • भाजपने चार राज्यांत अतिरिक्त आणि अपक्ष उमेदवार उभे केल्याने ही लढत रंजक बनली आहे. क्रॉस व्होटिंग आणि आमदारांचा घोडेबाजारड टाळण्यासाठी काँग्रेसने खास राजस्थान आणि हरियाणाच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. त्याचवेळी अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांच्या माध्यमातून राजस्थानमध्ये संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपानेही आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी जोरदार तयारी केली होती.

११ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.