चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जून २०२१

Updated On : Jun 11, 2021 | Category : Current Affairs


मुलकी सेवा परीक्षांच्या मुलाखतींना २ ऑगस्टपासून सुरुवात :
 • करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या २०२० सालच्या मुलकी सेवा परीक्षांच्या मुलाखती २ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतला आहे.

 • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यांसह इतर सेवांसाठी अधिकारी निवडले जातात.

 • करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे यूपीएससीने या प्रतिष्ठित परीक्षेसाठीच्या मुलाखती या वर्षी एप्रिल महिन्यात पुढे ढकलल्या होत्या. ‘परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, नागरी सेवा परीक्षा २०२० च्या मुलाखती २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे,’ असे यूपीएससीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘कू’ या भारतीय समाजमध्यमाचा नायजेरियात वापर :
 • आफ्रिकेतील नायजेरिया या देशात पाय रोवू पाहणाऱ्या ‘कू’ या भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर नायजेरियाच्या सरकारने अधिकृत खाते उघडले असल्याचे ‘कू’ने गुरुवारी सांगितले.

 • नायजेरियन सरकार आणि कू चा प्रतिस्पर्धी असलेला ट्विटर यांच्यातील तिढ्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली आहे. अमेरिकी समाजमाध्यम असलेले ट्विटर नायजेरियात अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याची घोषणा तेथील सरकारने गेल्या आठवड्यात केली होती.

 • ‘नायजेरिया सरकारचे अधिकृत हँडल आता कू वर आहे’, असे कू चे सहसंस्थापक व सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी याच समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले. गंमत म्हणजे, त्यांनी हीच माहिती ट्विटरवरही शेअर केली.

 • नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी एका फुटीरवादी चळवळीबद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट कंपनीने काढून टाकल्यानंतर, आपण ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित करत असल्याचे नायजेरिया सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते. यानंतर आपले समाजमाध्यम नायजेरियात उपलब्ध असून, त्या देशातील नव्या वापरकत्र्यांसाठी नव्या स्थानिक भाषांचा वापर करण्यास आपण इच्छुक आहोत, असे कू ने म्हटले होते.

‘येडियुरप्पाच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कायम’ :
 • कर्नाटकमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (कर्नाटकचे प्रभारी) अरुण सिंह यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तम काम करीत आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

 • करोनाच्या काळात केवळ येडियुरप्पाच नव्हे तर राज्यातील मंत्री, पक्ष आणि प्रत्येकानेच उत्तम कामगिरी केली आहे. उच्चस्तरीय बैठकीत येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सिंह यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

 • मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांची उचलबांगडी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अफवा आहे. येडियुरप्पांना हटविण्यासाठी कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपमधील एक गट सक्रिय आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती.

कोपा अमेरिकाच्या आयोजनाचा निर्णय ब्राझिलच्या न्यायालयात
 • तीन दिवसांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करावे की नाही, हे ठरवण्यासाठी ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपत्कालीन सत्र बोलावले आहे. कोलंबिया आणि अर्जेटिना या सहआयोजकांनी कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनास नकार दिल्यामुळे ब्राझिलने यजमानपदाचा प्रस्ताव स्वीकारला. पण देशातील करोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे चाहते आणि फुटबॉलपटूंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

 • मुख्य न्यायाधीश लुइझ फक्स यांनी मंगळवारी विशेष सत्र बोलावले होते. त्या वेळी त्यांच्यासह अन्य १० न्यायाधीशांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत नोंदवले होते. न्यायाधीश कार्मेन ल्युसिया म्हणाले की, ‘‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने निर्णय घेण्यासाठी आपत्कालीन सत्र बोलवावे लागले आहे.’’

 • ब्राझिलमधील समाजवादी पक्षाने तसेच धातू कामगारांच्या व्यापारी संघाने ही स्पर्धा आयोजित न करण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली! मृतांचा आकडाही ३९३वर :
 • करोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे.

 • गुरुवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२ हजार २०७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये १० हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 • राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून ५ दिवस उलटले असून आज नव्या करोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे.

११ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)