चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जून २०२०

Date : 11 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय पुढील महिन्यात :
  • ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय बुधवारीदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) राखून ठेवला आहे. पुढील महिन्यापर्यंत करोनाची स्थिती पाहून विश्वचषकाच्या आयोजनाबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे ‘आयसीसी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • ट्वेन्टी-२० विश्वचषकासह पुढील वर्षी महिलांचा एकदिवसीय विश्वचषक आहे. या दोन्हींबाबतचा निर्णय ‘आयसीसी’कडून पुढील महिन्यानंतर राखून ठेवण्यात आला आहे. ‘‘विश्वचषकाबाबत योग्य निर्णय घेता यावा म्हणून आम्ही पुन्हा थोडे थांबण्याचे ठरवले आहे. सदस्य देश, प्रायोजक, प्रसारणकर्ते, खेळाडू आणि सरकार यांच्याशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेणार आहोत. आम्ही घाईत निर्णय न घेणे महत्त्वाचे आहे,’’ असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी स्पष्ट केले.

  • करोनामुळे यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार की नाही यावरून सतत चर्चा सुरू आहे. हा विश्वचषक २०२१ फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात यावा असेही मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच प्रेक्षकांशिवाय विश्वचषक खेळवायचा का याबाबतही ‘आयसीसी’ संभ्रमात आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाऐवजी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • “आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल.

  • लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. करोना व्हायरसच्या संकटादरम्या त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बंगाली भाषेतून केली. “गेले ९५ वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

  • “स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीनं ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्यानं पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असं म्हटलं जात,” असंही त्यांनी नमूद केलं.

करोना व्हायरस - Johnson & Johnson ने दिली ‘गुड न्यूज’, जुलैमध्ये येणार औषध :
  • करोना व्हायरसवर औषध शोधण्याचे जगभरातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध कंपनी Johnson & Johnson ने करोना व्हायरसवर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला असून या व्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच, या व्हॅक्सिनची आता मानवावर चाचणी घेण्यास सुरूवात करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

  • कंपनी जुलै महिन्यामध्ये माणसावर या व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरूवात करणार आहे. हे व्हॅक्सिन करोनावर 100 टक्के उपायकारक ठरेल असा अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. पण, त्याआधीच अमेरिकेने Johnson & Johnson सोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे.

  • Johnson & Johnson कंपनी जुलै महिन्यामध्ये या व्हॅक्सिनच्या माणसावरील चाचणीला सुरूवात करेल. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.

“या बाबतीत भारत आमच्याहून सरस आणि जगात अव्वल”; चीनकडून भारतीय सैन्याचे कौतुक :
  • “भारताकडे जगातील सर्वात मोठे आणि उंचावरील युद्धांसाठी प्रशिक्षण देण्यात आलेलं अनुभवी सैन्य आहे. अशा उंच ठिकाणी लढाई लढताना आवश्यक असणारे गिर्यारोहणाचे कौशल्य प्रत्येक भारतीय सैनिकाकडे आहे,” असं मत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी (पीएलए) उपकरणे तयार करणार्‍या कंपनीच्या अधिकाऱ्याने आणि चीनशी संबंधित लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

  • ‘मॉडर्न वेपनरी’ मासिकाचे ज्येष्ठ संपादक हुआंग गुओझी यांनी लिहिलेल्या लेखामध्ये भारतीय सैन्य हे उंचावरील लढायांसाठी चीनी सैन्यापेक्षा सरस असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

  • “पठार आणि पर्वतरांगा असा दोन्ही ठिकाणी लढाई करु शकणारा सध्या जगातील सर्वात मोठा आणि अनुभवी सैन्य हे अमेरिका, रशिया किंवा कोणत्याही युरोपियन देशांकडून नसून ते भारताकडे आहे,” असं गुओझी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. हा लेख ‘द पेपर डॉट सीएन’ या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे.

लॉकडाउनमुळे भारताच्या महत्वकांक्षी ‘मिशन गगनयान’चं उड्डाण रखडणार :
  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा भारताच्या पहिल्या मानवरहित मिशन गगनयान मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  • चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाउन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

  • “करोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसं सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण या मोहिमेवर काम करणाऱ्या पथकानं अद्याप विलंब होण्याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत,” असं इस्रोच्या अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

११ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.