चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 फेब्रुवारी 2024

Date : 12 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार
 • राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली.
 • महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेममध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य बैठकीस उपस्थित होते.
 • बैठकीदरम्यान अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रात गेल्या वर्षभरात यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती चांगल्या प्रकारने नांदत असून, ती आणखी कशी सशक्त होईल यासाठी राज्य शासन, क्रीडा आयुक्तालय आणि क्रीडा संघटना यांच्यात समन्वय राहून काम करण्याची सूचनाही पवार यांनी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनाचा उपयोग कसा केला जावा, तेथे काय असावे याबाबतही पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याच वेळी लक्ष्यवेध ही योजना योग्य पद्धतीने राबवली जाईल आणि यातून संघटना दूर राहणार नाहीत याची काळजी घेण्याचेही पवार यांनी सूचित केले.

 • बैठकीनंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना, राज्य संघटना, सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष व महिला), क्रीडा मार्गदर्शक (पुरुष व महिला) असे पुरस्कार दिले जातील. यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडून प्रायोजक शोधला जाईल किंवा कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी यासाठी कसा वर्ग करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
 • त्याच बरोबर राज्यातील क्रीडा गुणवत्तेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी राज्यातील क्रीडा प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट कोचिंग’ या संस्थेशी करार करण्यात आला असून, यामार्फत विविध खेळांतील ६० प्रशिक्षकांना मोफत मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचेही शिरगावकर यांनी सांगितले.
राज्यातील रखडलेल्या सात हजार गृहप्रकल्पांपैकी तीन हजार प्रकल्प पूर्ण! रेरा उपसमितीला अहवाल सादर
 • राज्यातील रखडलेल्या वा बंद पडलेल्या सात हजार गृहप्रकल्पांपैकी तीन हजार गृहप्रकल्प गेल्या वर्षभरात पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) केंद्रीय रेरा उपसमितीला सादर केली आहे. अशा प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया महारेराने सुरू करताच रखडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. महारेराकडे काम पूर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्रही सादर केले आहे.
 • महारेराने गेल्या वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पांविरोधात कारवाई सुरु केली होती. यापैकी ७० टक्के काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांकडे प्रामुख्याने लक्ष वळविले होते. यासाठी माजी अतिरिक्त पालिका आयुक्त संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विभागही नेमण्यात आला. या विभागाने रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. हे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू केले. स्वयंनियमन करणाऱ्या विकासकांच्या संघटनेची स्थापना करून त्यांच्यामार्फत हे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात आली. याचा परिणाम दिसून आला असून आता त्यापैकी तीन हजार गृहप्रकल्प पूर्ण झाले आहेत, असा दावा महारेरातील सूत्रांनी केला. हे सर्व प्रकल्प २०१७ पूर्वीचे असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
 • आतापर्यंत ४४ हजार ५१२ गृहप्रकल्पांची महारेराने नोंदणी केली असून त्यापैकी आतापर्यंत फक्त १४ हजार ५१ गृहप्रकल्प पूर्ण होऊ शकले आहेत. हे प्रमाण पाहता फक्त ३५ टक्के गृहप्रकल्प पूर्ण होऊ शकले आहेत. यामध्येही प्रकल्प पूर्ण होण्याची संख्या गेल्या वर्षांत वाढल्याचेही या सूत्रांनी सांगितले. महारेराने आता विकासकांविरुद्ध कारवाई सुरु केल्यामुळे अनेक विकासक प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या प्रकल्पांमध्ये काहीही काम सुरू झालेले नाही, अशा प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया महारेराने सुरु केली आहे. ज्या विकासकांना प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छा आहे, त्यांना प्रकल्प मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधितांनी प्रकल्पाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकल्पांविरुद्धही महारेराकडून कारवाई केली जाणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
 • दरम्यान, गृहप्रकल्प व्यपगत होण्याच्या संख्येत सध्या घट आली आहे. २०२२ मध्ये व्यपगत गृहप्रकल्पांची संख्या तीन हजारहून अधिक होती. यंदा ती संख्या १७०० इतकी आहे. महारेराच्या सततच्या कार्यवाहीमुळे आता विकासक प्रकल्पाच्या मुदतवाढीकडे लक्ष पुरवत असून त्यांनी प्रकल्प पूर्ण करावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून बेरोजगारांची थट्टा, घेतला ‘हा’ निर्णय
 • राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुण्यातील मुख्यालयात करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहजिल्हा निबंधक वर्ग एक, सहजिल्हा निबंधक वर्ग दोन, लेखाधिकारी अशी पदे करार पद्धतीने भरली जाणार आहेत. नोंदणी विभागात एकीकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने भरती करण्याची मागणी होत असतानाच नव्याने भरती करण्याऐवजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच पायघड्या घालण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 • राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात आता महसूल विभागातून निवृत्त झालेल्या ६५ वर्षांखालील अधिकाऱ्यांची विविध कामांसाठी करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. विभागाच्या संकेतस्थळावर याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सहजिल्हा निबंधक वर्ग एक आणि दोन या पदांसाठी प्रत्येकी दोन, तर लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी यांची १२ या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी राज्य शासकीय सेवेतून सहजिल्हा निबंधक वर्ग एक किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले, तर सहजिल्हा निबंधक वर्ग दोनसाठी सह दुय्यम निबंधक वर्ग दोन किंवा मुद्रांक उपअधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. या दोन्ही पदांवर घेण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व नोंदणी अधिनियमातील तरतुदी, अपील प्रकरणे आणि पुनरावृत्ती प्रकरणे हाताळणे, रिट याचिकेतील परिच्छेदानुसार उत्तर तयार करणे आदी कामे करावी लागणार आहेत.
 • या पदांसाठी १२ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्यांना बुधवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे, असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
भारतीय मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज; स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंती कार्यक्रमात मोदींचे प्रतिपादन
 • ‘‘भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणव्यवस्था ही काळाची गरज आहे,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळयास दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदींनी संबोधित केले.
 • मोदींनी यावेळी समाजसुधारक दयानंद सरस्वती यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, की भारतीय जनता जेव्हा गुलामीच्या बेडयांत अडकली होती. देशात मोठया प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेली असताना दयानंद यांनी भारतीय समाजाला वेदांकडे परतण्याचे आवाहन केले होते. आपल्या रूढीवादी परंपरा आणि अंधश्रद्धांसारख्या सामाजिक दुराचारामुळे विज्ञाननिष्ठ विचारसरणी मागे पडल्याने आपले कसे नुकसान झाले, आपल्या एकतेला धोका निर्माण झाल्याचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यावेळी आपल्याला दाखवून दिले.
 • भारतीय संस्कृती आणि अध्यात्मापासून दुरावणाऱ्या समाजघटकांना वेदांकडे परण्याचे आवाहन दयानंदांनी केले. ते केवळ एक वैदिक ऋषी नव्हते तर राष्ट्रचेतनेचे ऋषी होते. तत्कालीन इंग्रज सरकार आपल्या सामाजिक कुप्रथा अधोरेखित करून भारतीयांची अवहेलना करत असे आणि ब्रिटिश सरकार कसे योग्य आहे, असे ठसवत असे. मात्र ब्रिटिशांच्या या कारस्थानाला दयानंद सरस्वतींच्या आगमनाने मोठा शह बसला असे मोदी म्हणाले.
 • आर्य समाजाच्या संस्थापक असलेल्या स्वामी दयानंद यांनी वेदांचे तार्किक अर्थ लावले. बुरसटलेल्या रुढीवादी लोकांवर खुलेआम हल्ला केला आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे स्वरूप प्रकट केले अशी प्रशंसा पंतप्रधानांनी केली. परिणामी समाजात आत्मविश्वास परत येऊ लागला. वैदिक धर्म जाणून घेऊन जनतेची त्याच्यासी नाळ जुळू लागली. लाला लजपत राय, राम प्रसाद बिस्मिल आणि स्वामी श्रद्धानंद यांसारखे अनेक क्रांतिकारकांवर आर्य समाजाचा प्रभाव होता, असे सांगून मोदी म्हणाले की, त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले होते. या ‘अमृतकाळात’ आपण आधुनिक भारताची जडणघडण केली पाहिजे. 
केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय क्रिएटर पुरस्काराची घोषणा; २० इन्फ्लुएन्सर्सचा होणार सन्मान, कशी आहे प्रक्रिया?

अरे कसले व्हिडीओ बनवत असतोस, याने काय मिळणार आहे? एकेकाळी अशा प्रश्नांनी वेढलेला ऑनलाईन क्रिएटर्सचा समुदाय आता सेलिब्रिटीज म्हणून नावारूपाला आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची समाजात बदल घडवून आणण्याची शक्ती अफाट आहे. या शक्तीचा सदुपयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता माय जीओव्ही इंडियाने (MyGov India) भारताच्या डिजिटल क्रिएटर्ससाठी विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. खाली तपशीलवार दिलेल्या २० श्रेणींमधील इन्फ्लुएन्सर्सना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सूचनेत म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच डिजिटल क्रिएटर्सच्या शक्तीला मान्य करून त्यांना नवनवीन विषयांवर भाष्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, या पुरस्कारांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा यांना जगासमोर आणणाऱ्या चेहऱ्यांना गौरवले जाईल तसेच यातून अन्य कलाकारांना सुद्धा समाजात परिवर्तनाचे काम करण्याची प्रेरणा मिळेल अशा हेतूने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे. आपणही या सोहळ्यातील पुरस्काराच्या २० श्रेणी कोणत्या याविषयी जाणून घेऊया..

 1. सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार: असा क्रिएटर ज्याने भारतीय संस्कृतीविषयी कथेच्या माध्यमातून कल्पक रित्या माहिती दिली आहे
 2. द डिसप्टर ऑफ द इयर: असा क्रिएटर ज्याने आपल्या कॉन्टेन्टमधून त्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत
 3. सेलिब्रेटी क्रिएटर ऑफ द इयर: असा क्रिएटर ज्याने आपल्या मोठ्या संख्येतील फॉलोअर्सना मार्गदर्शन करून आपल्या कॉन्टेन्टमधून समाजात सकारात्मकता पसरवण्यास मदत केली आहे
 4. ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड: पर्यावरणासाठी काम करणाऱ्या क्रिएटरला हा पुरस्कार देण्यात येईल
 5. सामाजिक बदल घडवणारा सर्वोत्कृष्ट क्रिएटर: समाजकार्यात अग्रेसर क्रिएटरला या पुरस्काराने गौरवण्यात येईल
 6. कृषी क्षेत्रातील प्रभावशाली क्रिएटर: कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त नवनवीन माहिती देणाऱ्या क्रिएटरचा सन्मान होईल
 7. कल्चरल अम्बॅसेडर ऑफ द इयर: भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंना उजेडात आणून संस्कृतीचा प्रचार करण्यास मदत करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल
 8. आंतरराष्ट्रीय निर्माता पुरस्कार: भारताची संस्कृती जगभरात पोहोचवण्यासाठी परदेशात राहून काम करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल
 9. पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट क्रिएटर पुरस्कार: भारतातील पर्यटनाला चालना देणारा कॉन्टेन्ट तयार करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
 10. स्वच्छता दूत पुरस्कार: स्वच्छतेवर आधारित कॉन्टेन्टचा सन्मान केला जाईल.
 11. द न्यू इंडिया चॅम्पियन पुरस्कार: भारताची प्रगती, विकास तसेच सरकारी धोरणांबद्दल जागरूकता पसरवणारे आणि राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रिएटरचा सन्मान होईल.
 12. टेक क्रिएटर पुरस्कार: नवीन उपकरणे, तंत्रज्ञान याविषयी माहिती देणाऱ्या, प्रश्न सोडवणाऱ्या क्रिएटरचा सन्मान होईल
 13. हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार: स्थानिक कपड्यांच्या ब्रँडचा तसेच कलेचा प्रचार करणाऱ्या क्रिएटरला सन्मानित केले जाईल.
 14. मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (पुरुष आणि महिला): मनोरंजन व सामाजिक जाणीव या दोन्ही पैलूंनी समृद्ध कॉन्टेन्ट बनवणाऱ्या पुरुष व स्त्री क्रिएटरचा या पुरस्काराने सन्मान केला जाईल
 15. खाद्य श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर: भारतीय पाककलेची माहिती देणाऱ्या क्रिएटरला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
 16. शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर: शिक्षणाची ऑनलाईन सामग्री उपलब्ध करून देणाऱ्या क्रिएटरला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
 17. गेमिंग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर: गेमप्ले, रिव्ह्यू किंवा समालोचनाद्वारे, खेळांविषयी माहिती देणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
 18. सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर: ठराविक प्रेक्षक असूनही, एखाद्या महत्त्वाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या क्रिएटरला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
 19. सर्वोत्कृष्ट नॅनो क्रिएटर: प्रेक्षकांशी परस्परसंवाद आणि वैयक्तिक नाती जोडून मार्गदर्शन करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
 20. सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस क्रिएटर: आरोग्य, निरोगीपणा आणि फिटनेसचा प्रचार करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.

 

इस्रोच्या ‘एसएसएलव्ही डी२’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण

 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी एसएसएलव्ही (लघु उपग्रह प्रक्षेपण यान) डी२ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यासह ईओएस-०७ या पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्यासह एकूण तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
 • अंतरिसकडून न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचा जानुस-१ हा उपग्रह आणि स्पेस किड्स इंडियाच्या आझादीसॅट हे दोन उपग्रहदेखील त्यांच्या प्रस्तावित कक्षेत यशस्वीरीत्या सोडण्यात आले. यापैकी आझादीसॅट हा विशेष महत्त्वाचा उपग्रह आहे. त्याची निर्मिती देशभरातील विद्यार्थिनींनी केली आहे. हे तिन्ही उपग्रह वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतील. यामुळे इस्रोने आता लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
 • एसएसएलव्हीची क्षमता - लघु उपग्रह प्रक्षेपण यान अग्निबाण १० ते ५०० किलो वजनाचे लहान, सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म उपग्रह ५०० किमी कक्षेमध्ये सोडू शकतो. पृथ्वीपासून जवळच्या कक्षांमध्ये मागणीप्रमाणे प्रक्षेपण करण्याची त्याची क्षमता आहे. हे अग्निबाण एकाच वेळी एकापेक्षा जास्त उपग्रहांचे प्रक्षेपण करू शकतात त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत अवकाशाचा अभ्यास शक्य होतो. तसेच त्याच्या प्रक्षेपणासाठी तुलनेने कमी पायाभूत सुविधा आवश्यक असतात.

  तीन लघु उपग्रहांची वैशिष्टय़े

 • आझादीसॅट-२ – वजन – ८.२ किलो. चेन्नईमधील स्पेस किड्स इंडियाद्वारे देशभरातील ७५० विद्यार्थिनींच्या एकत्रित प्रयत्नातून निर्मिती.
 • ईओएस-०७ – वजन – १५६.३ किलो. इस्रोद्वारे रचना, विकास आणि अंमलबजावणी.
 • जानुस-१ – वजन – १०.२ किलो. अमेरिकेतील अंतरिसद्वारे बांधणी.
 • इस्रोसाठी अभिमानाचा क्षण!

  गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी आलेल्या अपयशातून इस्रोने अल्प काळात पुनरागमन केले आहे. ही आमच्यासाठी विस्मरणीय घडामोड आहे आणि इस्रोसाठी अभिमानाचा क्षण आहे. एस विनोद, एसएसएलव्ही डी२ प्रक्षेपण मोहीम संचालक.

जम्मू-काश्मीरमध्ये ५.९ दशलक्ष लिथियम साठय़ांचा शोध, विद्युत वाहनांच्या बॅटरीसाठी उपयुक्त

 • विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या ‘बॅटरी’तील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लिथियम’ साठय़ाचा शोध जम्मू-काश्मीरमध्ये लागला आहे. ५.९ दशलक्ष टन लिथियम साठा सापडल्याचे सरकारने जाहीर केले आहे, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले. लिथियमसाठी भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनावर अवलंबून आहे.
 • भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले. कर्नाटकात २०२१ मध्ये या खनिजाचे अनेक छोटे साठे आढळले होते. नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ धातूंच्या पुरेशा पुरवठय़ासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशांतर्गत आणि परदेशातील स्रोतांचा शोध सुरू आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. खणीकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज म्हणाले की कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आधीच्या उपायांना नवी दिशा दिली जात आहे.
 • हवामानबदलावरील उपाय म्हणून हरित उर्जेसाठी जगभरात लिथियमसारख्या दुर्मिळ धातूंची मागणी वाढली आहे. २०२३ मध्ये, चीनने बोलिव्हियाच्या विशाल लिथियम साठय़ासंदर्भात एक अब्ज डॉलर करारावर स्वाक्षरी केली. तेथे जगातील सर्वात मोठा सुमारे २१ मिलियन टन लिथियम साठा असल्याचा अंदाज आहे.
 • लिथियम उत्खनाने पर्यावरणाचा ऱ्हास - जागतिक बँकेच्या मतानुसार २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खननात ५०० टक्के वाढ करणे आवश्यक आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मतानुसार लिथियमची खाणप्रक्रिया पर्यावरणास अनुकूल नाही. लिथियम हे कठीण खडक आणि भूगर्भातील जलाशयातून काढले जाते. ऑस्ट्रेलिया, चिली आणि अर्जेटिनात हे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात. खनिज उत्खननानंतर, ते जीवाश्म इंधन वापरून भाजले जाते. तसेच हे खडक काढल्यावर तेथील भूभागाला मोठमोठी भगदाडे पडतात. शिवाय, प्रक्रिया करताना मोठय़ा प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते. 

सूर्याला पडली भेग, एक मोठा भाग निखळल्याने जगभरातले संशोधक चिंतेत

 • सूर्य हा आपल्याला प्रकाश देणारा तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. या सूर्याबाबतच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्याला प्रकाश देणाऱ्या या सूर्याला एक भेग पडली आहे. तसंच सूर्यापासून सूर्याचा एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. सूर्यापासून वेगळा झालेला हा तुकडा आता सूर्याभोवतीच फिरतो आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून ही घटना पाहण्यात आली आहे. या घटनेमुळे वैज्ञानिक चकीत आणि चिंतित झाले आहेत.
 • जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काय नोंदवलं निरीक्षण - नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हे निरीक्षण नोंदवलं आहे की सूर्यापासून त्याच एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. आता हा भाग सूर्याभोवती फिरतो आहे. हा भाग वेगळा झाल्याने सूर्याला एक मोठी भेग पडली आहे असं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या अवलोकनाबाबत वैज्ञानिक जगतात काहीसं कुतूहल निर्माण झालं आहे. तमिथा स्कोव नावाच्या हवामान विषयक संशोधकांनी ही बाब सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी नासाचा व्हिडिओही ट्विट केला आहे.
 • नेमकं काय झालं आहे याबाबत जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. अशात असंही म्हटलं जातं आह की याचा संबंध सूर्याच्या मॅग्नेटिक फिल्डसंदर्भातलाही असू शकतो. तसंच याचा संबंध ११ वर्षे चालणाऱ्या सौर चक्राशीही असू शकतो. काही अभ्यासकाचं असंही यावर म्हणणं आहे की ही घटना अनपेक्षित नाही. सौर चक्राच्या ११ वर्षांच्या कालावधीत अशी घटना घडू शकते. तसंच अशा प्रकारची घटना सौर चक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते असंही काही अभ्यासकांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
 • नेमकं काय पाहायला मिळालं आहे - सूर्यापासून एक भाग वेगळा झालेला पाहण्यास मिळतो आहे. लालबुंद सूर्य आणि त्यातून बाहेर पडणारा तो भाग हे या व्हिडिओत पाहण्यास मिळतं आहे. सूर्याने आत्तापर्यंत गेल्या काही वर्षात अनेकदा वैज्ञानिकांना चकित केलं आहे. मात्र यावेळी ही नवी घटना टेलिस्कोपमध्ये पाहिली गेली आहे. सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळचा एक मोठा भाग निखळला आहे. तसंच हा तुकडा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो आहे.

“वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातली दोन आर्थिक केंद्रं…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्त्वाचं वक्तव्य

 • वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातली मुंबई आणि पुणे ही दोन आर्थिक केंद्रं ही आपल्या धार्मिक केंद्रांशी जोडण्याचं महत्त्वाचं काम पूर्ण झालं आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी झालेल्या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई ते सोलापूर अशी होती तर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई ते शिर्डी अशी होती. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
 • काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी - महाराष्ट्रात आलेल्या या दोन वंदे भारत एक्स्प्रेस पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना चालना देणाऱ्या ठरणार आहेत. शिर्डीत जाऊन साईबाबाचं दर्शन घेता येईल तसंच नाशिकमध्ये जाऊन रामकुंड, प्रभू रामचंद्रांचं मंदिर आणि त्याजवळ असलेलं त्र्यंबकेश्वरही तुम्ही पाहू शकता. तसंच सोलापूरला जाणाऱ्या ट्रेनने तुम्ही अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर आणि पंढरपूरचं मंदिर पाहू शकता. सह्याद्रीच्या घाटातून जेव्हा ही एक्स्प्रेस जाईल तेव्हा तुम्ही इथलं विलोभनीय सौंदर्यही पाहू शकता असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
 • आणखी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी - मला आठवतं आहे की काळ असा होता की खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालायात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की अमुक अमुक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटं, पाच मिनिटं थांबेल का पाहा. आज वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही? कधी येणार? यावर ते चर्चा करताना दिसतात पूर्वीच्या काळातला आणि आत्ताचा हा महत्त्वाचा फरक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारताचं प्रतीक आहे. भारताची प्रगती आणि वेग या दोन्हीचं ही खूण आहे. ज्या वेगाने वंदे भारत ट्रेन लाँच करतो आहे ते तुम्ही पाहाता आहातच. आज घडीला देशातल्या १७ राज्यांमधले १०८ जोडले गेले आहेत.

चालत्या मोटारसायकलवर दहा सूर्यनमस्कार; बारामतीच्या रोहित शिंदे याची इंडिया, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

चालत्या मोटारसायकलवर चार मिनीट आणि वीस सेकंदांमध्ये दहा सूर्यनमस्कार बारामतीच्या रोहित शिंदे या युवकाने घातले आहेत. त्याच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक रेकाॅर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.  मोटारसायकलवर दहा वेळा सूर्यनमस्कार घालणारा तो जगातील पहिला मोटारसायकलस्वार ठरला आहे.

 

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ फेब्रुवारी २०२२

 

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा - लुकाकूच्या गोलमुळे चेल्सी अंतिम फेरीत :
 • आघाडीपटू रोमेलू लुकाकूने केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने अल हिलाल संघावर १-० अशी मात करत क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

 • युरोपीय संघांनी या आंतरखंडीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून मागील १४ पैकी १३ अंतिम सामन्यांत बाजी मारली आहे. अंतिम फेरीत पराभूत होणारा चेल्सी हा एकमेव संघ आहे. २०१२ मध्ये त्यांच्यावर ब्राझीलमधील संघ कोरिन्थिन्सने मात केली होती. यंदा मात्र चेल्सीला ही स्पर्धा जिंकण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. शनिवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे ब्राझीलमधील संघ पाल्मेरेसचे आव्हान असेल.

 • तत्पूर्वी, बुधवारी रात्री उशिराने झालेल्या लढतीत अल हिलालने चेल्सीला चांगली झुंज दिली. अल हिलालने भक्कम बचाव करतानाच आक्रमणात गोलच्या काही संधी निर्माण केल्या. मात्र, चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाने अप्रतिम खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसरीकडे ३२व्या मिनिटाला काय हावेत्झच्या पासवर लुकाकूने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अखेर हाच गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरला.

मराठी भाषेसंदर्भात सुप्रिया सुळेंची लोकसभेत मोदी सरकारकडे मोठी मागणी; म्हणाल्या, “येत्या २७ फेब्रुवारीला :
 • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

 • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. साहित्य अकादमीकडेही याबाबत सात वर्षांपूर्वीच शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले. काही वर्षांपुर्वी तत्कालिन केंद्रीय मंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते.

 • गेल्या आठवड्याच विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीही राज्यसभेत तेच उत्तर दिले. जगभरातील लाखो लोक मराठी भाषेवर प्रेम करतात. अनेक साहित्यिक या भाषेत होऊन गेले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत कितीतरी संतांची ही भाषा आहे, असं सुप्रिया सुळे या मागणीचा पाठपुरावा करताना म्हणाल्या.

पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान; उत्तर प्रदेश : अनेक केंद्रांवर मतदान यंत्रांत बिघाड; गोंधळाचे वातावरण :
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी ६० टक्के मतदान झाल़े. काही केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल़े  मात्र, किरकोळ अपवादवगळता मतदान शांततेत पार पडल़े

 • उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी गुरुवारी मतदान झाल़े  सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७़ ७९ टक्के मतदानाची नोंद झाली़.  ६ वाजेपर्यंत ६०़ ५१ टक्के मतदान नोंदवण्यात आल़े.  मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली़.  मात्र, त्याआधीच रांगेत असलेल्यांना वाढीव वेळ देऊन मतदानाची परवानगी देण्यात आली, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी़ डी़ राम तिवारी यांनी सांगितल़े.  त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आह़े.

 •  काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये  बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़. त्यानुसार संबंधित मतदान यंत्रे बदलण्यात आली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे तिवारी  यांनी स्पष्ट केल़े  कैराना मतदारसंघांमधील दुंदूखेडा येथे काही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला़. याबाबत तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे तिवारी यांनी सांगितल़े

 • पहिल्या टप्प्यातील ५८ जागांसाठी ६२३ उमेदवार रिंगणात आहेत़. त्यात ७३ महिलांचा समावेश आह़े.  या टप्प्यात श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नरेन या मंत्र्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाल़े.

हिजाब संदर्भात पाकचे भारतीय राजदूताला पाचारण :
 • पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली.

 • भारतात मुस्लिमांविरुद्धची कथित धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक साचेबंद चित्रण आणि भेदभाव याबाबत पाकिस्तानला वाटणारी अतीव चिंता भारतीय राजदूतांना कळवण्यात आली, असे परराष्ट्र कार्यालयाने बुधवारी उशिरा रात्री एका निवेदनात सांगितले.

 • कर्नाटकमध्ये महिलांचा छळ करणाऱ्या सूत्रधारांना भारतीय सरकारने वठणीवर आणावे आणि मुस्लीम महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे उपाय योजावेत, यावर भर देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुस्लीम मुलींना शिक्षणापासून वंचित करणे हे मूलभूत मानवी अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कर्नाटकातील हिजाब वादावर भाष्य केल्यानंतर परराष्ट्र कार्यालयाने हे निवेदन जारी केले.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गृह अलगीकरणातून मुक्तता; १४ फेब्रुवारीपासून नवी नियमावली :
 • जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांना आता करोना चाचणी करणे अनिवार्य नाही. प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी ७२ तास आधी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आता आवश्यक नाही. प्रवासी केवळ लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवू शकतात.

 • आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवस गृहअलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. १४ दिवस त्यांच्या आरोग्याची देखरेख ते स्वत:च करतील.

 • प्रवास केल्यानंतर आठ दिवसांनी करोना चाचणी करणे अनिवार्य नाही आणि चाचणीचा अहवाल सरकारी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक नाही. त्याऐवजी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करू शकता.

 • विमानातील दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर पडण्यास परवानगी देण्यात येणार असून त्यांना चाचणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. ८२ देशांतील संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना ‘अलगीकरण मुक्त’ प्रवेश देण्यासाठी हे नियम लागू आहेत.

११ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.