चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 एप्रिल 2023

Date : 11 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रणजी करंडक स्पर्धा ५ जानेवारीपासून; देशांतर्गत क्रिकेट हंगामाला यंदा जूनमध्ये प्रारंभ
  • देशांतर्गत क्रिकेटच्या २०२३-२४च्या हंगामाला जूनमध्ये दुलीप करंडक स्पर्धेसह प्रारंभ होणार असून, प्रतिष्ठेची रणजी करंडक स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीपासून खेळवली जाईल.

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रविवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. दुलीप करंडक स्पर्धा २८ जूनपासून सुरू होईल, तर रणजी करंडकाला पुढील वर्षी ५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.

  • पुरुषांच्या वरिष्ठ गटातील हंगामाची सांगता रणजी स्पर्धेने होईल. स्पर्धेतील एलिट विभागातील लढती ५ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होतील. बाद फेरीच्या लढती २३ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान खेळवण्यात येतील. रणजी स्पर्धेचा एकूण कालावधी ७० दिवसांचा असेल. प्लेट विभागातील सामने ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२४, तर बाद फेरीचे सामने ९ ते २२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहेत.

मराठी भाषा विद्यापीठासाठी १५ दिवसांत समिती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश
  • ज्या ठिकाणी मराठीतील आद्यग्रंथ लिहिला गेला त्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यात येणार असून विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी एक समिती १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल. समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश असेल. दोन महिन्यांत सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
  •  सध्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत,  रिद्धपूर येथे थीम पार्कमध्ये सभागृह, कक्ष उपलब्ध आहेत. तिथे तत्काळ विद्यापीठाचे आवश्यक ते काम सुरू करता येऊ शकेल. हे विद्यापीठ संलग्नित असावे की इतर भाषा विद्यापीठाप्रमाणे एकल असावे, याविषयीही समितीला सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. अनेक अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होईल, असे  फडणवीस यांनी स्पष्ट केले.
  • नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीनजीक पीएम मित्रा योजनेअंतर्गत १ हजार एकर जागेवर मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २२० एकर क्षेत्राचे भूसंपादन केले असून उर्वरित भूसंपादन पुढील पंधरा दिवसांत केले जाणार आहे. भूसंपादनासाठी चांगले दर देण्यात आले आहेत. केंद्र सरकारसोबत सहमती करार केल्यानंतर पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
  • रेमंड हा उद्योगसमूह देशातील सर्वात मोठी गुंतवणूक या ठिकाणी करण्यास तयार आहे. कापूस – कापड ते फॅशन ही संकल्पना प्रत्यक्ष आकाराला येणार असून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहेच, शिवाय येथील बेरोजगार तरुणांच्या हातालाही काम मिळणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
भारतात करोना संसर्ग का वाढतोय? इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितली तीन कारणं
  • मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतात करोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संस्था सतर्क झाल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच करोना नियमांचं काटेकोर पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं जात आहे. सोमवारी भारतातील नवीन करोना रुग्णांमध्ये जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • भारतातील करोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने तीन प्रमुख कारणं सांगितली आहेत. “कोविड-१९ नियमांमध्ये शिथिलता, करोना चाचण्यांमध्ये झालेली घट आणि कोविड-१९ चे नवीन व्हेरिएंट” या तीन कारणांमुळे भारतात करोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवलं आहे.
  • सोमवारी भारतात नवीन करोना रुग्णांच्या संख्येत जवळपास १० टक्के वाढ नोंदली आहे. करोनाचा वाढता आलेख पाहता देशात पुन्हा एकदा करोना निर्बंध लादण्याची भीती लोकांना सतावत आहे.
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : दुसऱ्या डावात नेपोम्नियाशीचा लिरेनवर विजय
  • रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीने सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या दुसऱ्या डावात काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळताना चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनवर २९ चालींमध्येच विजय मिळवला. यासह नेपोम्नियाशीने जागतिक अजिंक्यपद लढतीत आघाडी घेतली आहे.
  • नेपोम्नियाशी आणि लिरेन यांच्यातील रविवारी झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या डावात मात्र नेपोम्नियाशीने अप्रतिम खेळ केला. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या लिरेनला वेळेचे योग्य नियोजन करता आले नाही. त्याने आपल्या चाली खेळण्यासाठी बराच वेळ घेतला. त्यामुळे त्याच्यावर दडपण आले आणि त्याने चूक केली. पुढे सी१चा धोका लक्षात घेऊन २९व्या चालीअंती लिरेनने पराभव स्वीकारला. त्यावेळी त्याच्याकडे पुढील चाली रचण्यासाठी एका मिनिटाहूनही कमी वेळ शिल्लक होता.
  • जागतिक अजिंक्यपद लढतीत २०१४ नंतर प्रथमच एखाद्या खेळाडूला दुसऱ्या डावात विजय मिळवण्यात यश आले. २०१४मध्ये मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत केले होते. तसेच काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूने २००६ नंतर प्रथमच दुसऱ्या डावात विजयाची नोंद केली.
  • नेपोम्नियाशीने आव्हानवीरांच्या (कॅन्डिडेट्स) स्पर्धेतही काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना लिरेनवर सरशी साधली होती. मात्र, त्यानंतर लिरेनने दमदार पुनरागमन करताना स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. त्यामुळे नेपोम्नियाशीला पुढील फेऱ्यांमध्येही सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
  • कोणत्याही जागतिक अजिंक्यपद लढतीतील हा सर्वात निराशाजनक डाव होता. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या डिंग लिरेनच्या चाली फारच अनपेक्षित होत्या. पहिल्या डावापासून तो दडपणाखाली दिसतो आहे. त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आहे. दुसऱ्या डावातील त्याची चौथी चाल एच३ होती. या चालीमुळे तो अडचणीत सापडला. मग नेपोम्नियाशीने ११व्या चालीत वर्चस्व मिळवले. लिरेनला आपण अडचणीत सापडल्याचे लक्षात आले नाही आणि त्याच्या पुढील चालीही फारशा प्रभावी ठरल्या नाहीत.
एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…
  • गुगल पे वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या स्वरुपात जवळपास ८०,००० रुपये पाठवले. अशाप्रकारे पैसे आलेले पाहून अनेकांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार कमी काळ टिकला. गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

  • गुगल पेच्या तांत्रिक चुकीमुळे अचानक तब्बल ८० हजार रुपये विविध लोकांच्या बँक खात्यावर जमा झाले. यानंतर ज्यांच्या खात्यावर अचानकपणे हे पैसे जमा झाले त्यांना सुखद धक्का बसला. त्यांना कॅशबॅक स्वरुपात रिवार्डमध्ये हे पैसे आलेले दिसले. अनेकांना तर हे पैसे आपल्याला का मिळाले हेही कळाले नाही.
  • पत्रकार मिशाल रहमान यांनी याबाबत ट्वीट केलं. ते म्हणाले, “सध्या गुगल पे वापरकर्त्यांना मोफत पैसे देत आहे असं वाटतं. मी गुगल पे उघडलं आणि रिवार्ड्समध्ये मला ३ हजार ७७१ रुपये आल्याचं दिसलं.”
  • असं असलं तरी अचानक कारण नसताना मिळालेल्या या पैशांचा आनंद काही काळासाठीचाच ठरला. गुगल पेच्या तांत्रिक विभागाला ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी जमा केलेले पैसे पुन्हा परत घेतले.

गुगलकडून आलेले पैसे खर्च केले त्यांचं काय?

  • गुगलने आपल्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर काही वापरकर्त्यांनी लगोलग हे पैसे वापरले. त्यामुळे गुगलच्या तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा पैसे घेताना काही जणांच्या खात्यावर पैसेच नव्हते. अशा युजर्सला गुगल पेने एक ईमेल पाठवला. यात त्यांनी तुम्हाला खात्यावर आलेले पैसे परत करणं शक्य नसेल, तर ते पैसे तुमचे आहेत, असं म्हटलं. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.

 

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, नाटककार राजीव नाईक यांना २०१८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान :
  • अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी, २०१८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज(९ एप्रिल) सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला गेला.

  • संगीत, नाट्य, नृत्य, लोककला या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, पं. सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह ४४ कलावंतांना वर्ष २०१८ चे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले होते. तर अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येते.

  • संगीत नाटक अकादमीची जनरल कौन्सिल आणि राष्ट्रीय संगीत, नृत्य व नाटक अकादमी यांची गुवाहाटी येथे २६ जून २०१९ रोजी झालेल्या बैठकीत या ४४ कलावंतांना हा सन्मान देण्याचे ठरवले गेल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तेव्हा सांगितले होते.

करोनावरील वर्धक मात्रा स्वस्त; लसउत्पादक सीरम आणि भारत बायोटेकचा निर्णय :
  • करोना लशीच्या वर्धक मात्रेचे शुल्क कमी करण्याची घोषणा सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक या लसउत्पादक कंपन्यांनी शनिवारी केली.  केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर वर्धक मात्रेचे शुल्क २२५ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीरम आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले. सीरमच्या कोव्हिशिल्ड वर्धक मात्रेचे शुल्क ६००, तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन मात्रेचे शुल्क १२०० रुपये होते. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची किंमत सुमारे ८१ टक्क्यांनी कमी केली, तर सीरमने कोव्हिशिल्डच्या शुल्कात सुमारे ६२ टक्के घटवले.

  • ‘‘केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, सीरमने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हिशिल्डचे शुल्क प्रति मात्रा ६०० रुपयांवरून २२५ रुपये करण्याचा निर्णय घेतला’’, असे ट्वीट सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी शनिवारी केले. भारत बायोटेकेच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एल्ला यांनी, सर्वाना वर्धक मात्रा देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आणि सरकारशी विचारविनिमय केल्यानंतर कोव्हॅक्सिन लशीच्या वर्धक मात्रेचे शुल्क १२०० वरून २२५ रुपये करण्यात येत असल्याचे जाहीर केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी १८ वर्षांवरील सर्वासाठी वर्धक मात्रा देण्याची घोषणा केली होती. करोनावरील लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या १८ वर्षांवरील सर्वाना वर्धक मात्रा देण्याची मोहीम आज, रविवारपासून सुरू करण्यात येत असून सर्व खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा देण्यात येणार आहे.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांपैकी सुमारे ९६ टक्के लोकांनी लशीची एक मात्रा घेतली आहे, तर सुमारे ८३ टक्के लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, आघाडीवरील कामगार-कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन कोटी ४० लाख लोकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे. याशिवाय, १२ ते १४ वयोगटातील ४५ टक्के लाभार्थीना पहिली मात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

“करोना संपलेला नाही तर…”; पंतप्रधान मोदींचा इशारा :
  • देशात अलिकडेच करोनाची तिसरी लाट संपली. देशातील करोना रुग्णांची संख्या सध्या एक हजारांच्या आसपास आढळत असून सर्वच राज्यांमधील करोना निर्बंध हटवले गेले आहेत. करोना नावाची महामारी संपलीये, अशी आशा वाटत असताना करोना हा संपलेला नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. करोना व्हायरस संपलेला नाही आणि तो पुन्हा कधीही वाढू शकतो, त्यामुळे करोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, दुर्लक्ष करू  नका, असं ते म्हणाले.

  • “बहुरूपिया करोना कधी कोणत्या रुपात परत येईल हे कोणालाच माहीत नाही. देशातील लोकांच्या पाठिंब्यामुळे या करोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे जवळपास १८५ कोटी डोस देणे शक्य झाले आहे”, असं मोदी म्हणाले. ते पाटीदार समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या माँ उमियाच्या मंदिराच्या १४ व्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथे माँ उमिया धामच्या महोत्सव कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.

  • “करोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असं आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला तरी तो पुन्हा कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. हा एक ‘बहुरूपिया’ आजार आहे. तो कधीही येऊ शकतो. लोकांचं या आजारापासून रक्षण करण्यासाठी जवळपास लसींचे १८५ कोटी डोस दिले गेले. आपण एवढा मोठा टप्पा गाठला याबद्दल जग आश्चर्य व्यक्त करतंय. परंतु तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे,” असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

दहावीपर्यंत ‘हिंदी’ अनिवार्य करण्यास ईशान्येचा विरोध ; निर्णय मागे घेण्याची केंद्राकडे मागणी :
  • ईशान्येकडील राज्यांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत हिंदी हा विषय अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आसाम साहित्य सभेसह ईशान्येच्या अनेक संस्था-संघटनांनी विरोध केला असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

  • सरकारने स्थानिक भाषांचे संवर्धन आणि प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आसाम साहित्य सभेने केले आहे. साहित्य सभेने त्याबाबतचे एक निवेदन शनिवारी प्रसिद्ध केले.

  • त्यात ‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामी आणि इतर स्थानिक भाषांच्या विकासासाठी पावले उचलायला हवी होती; परंतु हिंदी अनिवार्य करण्याचे पाऊल आसामी आणि ईशान्येकडील सर्व स्थानिक भाषांचे भवितव्य अंधकारमय करणारे आहे,’’ अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. दहावीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

  • ईशान्येच्या सर्व राज्यांनी हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयास सहमती दिल्याच्या केंद्राच्या घोषणेवर आसाममधील विरोधी पक्षांनी ‘सांस्कृतिक साम्राज्यवादाकडे टाकलेले हे पाऊल आहे’ अशी टिप्पणी केली आहे. काँग्रेस आणि आसाम जातीय परिषदेसह अन्य विरोधी पक्षांनी हा निर्णय लोकांच्या हिताच्या विरोधात असल्याने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

लीग-१ फुटबॉल - एम्बापे, नेयमारमुळे सेंट-जर्मेन विजयी :
  • किलियन एम्बापे आणि नेयमार या तारांकित आघाडीपटूंच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेन संघाने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात क्लेर्मोन्टचा ६-१ असा धुव्वा उडवला. या सामन्यात लिओनेल मेसीच्या पासवर नेयमारने सहाव्या, तर एम्बापेने १९व्या मिनिटाला  गोल करत सेंट-जर्मेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

  • मात्र, क्लेर्मोन्टच्या जोडेल दोसूने ४२व्या मिनिटाला गोल केल्याने मध्यंतराला सेंट-जर्मेनकडे २-१ अशी केवळ एका गोलची आघाडी होती. उत्तरार्धात सेंट-जर्मेनने अधिक आक्रमक खेळ केला.

  • नेयमारने ७१व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने गोल झळकावताना सेंट-जर्मेनला पुन्हा दोन गोलची आघाडी मिळवून दिली. मग एम्बापेने ७४ आणि ८०व्या, तर नेयमारने ८३व्या गोलची नोंद करताना वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केल्या.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा - उपांत्य फेरीत भारताचा पराभव :
  • भारतीय महिला हॉकी संघाला ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात रविवारी तीन वेळच्या विजेत्या नेदरलँड्सकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचे पहिल्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. 

  • भारतीय महिला संघाने २०१३च्या पर्वात कांस्यपदक जिंकले होते. ही भारताची कनिष्ठ विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी होती. यंदा एक पाऊल पुढे जाऊन अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा मानस होता. मात्र, त्यांना यात यश मिळाले नाही. आता मंगळवारी भारतीय संघ कांस्यपदकाच्या लढतीत खेळेल.

  • तत्पूर्वी, रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. नेदरलँड्सने मात्र आक्रमण आणि बचाव या दोन्हींत अप्रतिम खेळ करताना सलग चौथ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांच्याकडून या सामन्यात तेसा बीट्समा (१२ वे मिनिट), लुना फोक्के (५३ वे मि.) आणि जीप डिके (५४ वे मि.) यांनी गोल झळकावले.  

  • भारताने या सामन्याला चांगली सुरुवात केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या मुमताज खानने संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णधार समिमा टेटेच्या पासवर तिने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. पहिल्या सत्रात भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर नेदरलँड्सने दमदार पुनरागमन केले. बीट्समाने १२व्या मिनिटाला गोल करत नेदरलँड्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

  • भारताकडून दुसऱ्या सत्रातही गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना नेदरलँड्सचा भक्कम बचाव भेदता आला नाही. उत्तरार्धात नेदरलँड्सने आक्रमणाची गती वाढवली. त्याचा फायदा संघाला चौथ्या सत्रात मिळाला. लुना फोक्के आणि जीप डिके यांनी दोन मिनिटांत दोन गोल झळकावताना नेदरलँड्सची आघाडी ३-० अशी भक्कम केली. यानंतर भारतीय संघाला पुनरागमन करणे वेळेअभावी शक्य झाले नाही.

११ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.