चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० सप्टेंबर २०२२

Date : 10 September, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केदारनाथ धामने भाविकांच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले; १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन :
  • जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडीत काढत, नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे.

  • २०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • १६ आणि १७ जून २०१३ रोजी केदारनाथ धाममध्ये घडलेली विनाशकारी आपत्ती क्वचितच विसरता येणार आहे. या भयंकर आपत्तीत केदारनाथमध्ये मोठा विध्वंस झाला होता. ज्यात हजारो लोक मारले गेले. ती भीषण परिस्थिती पाहून यात्रा पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागतील असे वाटत होते, मात्र पुनर्बांधणीच्या कामामुळे आपत्तीनंतर पुढच्याच वर्षी यात्रा सुरू झाली. तर, आपत्तीनंतर २०१९ मध्ये विक्रमी १० लाख भाविक केदारनाथला पोहोचले होते.

  • त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये करोना महामारीमुळे यात्रा प्रभावित झाली होती. आता केदारनाथ धाम यात्रा २०२२ मध्ये रीतसर सुरू झाली आणि यात्रेने सर्व विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ११ लाख भाविक अवघ्या १२६ दिवसांत केदारनाथला पोहोचले आहेत. अजून दीड महिन्याची यात्रा बाकी आहे. दररोज सात ते आठ हजार भाविक केदारनाथला पोहोचत आहेत. अशा स्थितीत केदारनाथ धामला येणाऱ्या भाविकांची संख्या १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • केदारनाथ धामची यात्रा ६ मे रोजी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुधारली. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि प्रवासी येत राहिले. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

विश्लेषण: राणीनंतरचा ब्रिटन..राष्ट्रगीतापासून राष्ट्रध्वजापर्यंत बरंच काही बदलणार, नेमके काय असतील हे बदल :
  • युनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय जीवनामध्ये राजेशाही हा एक अविभाज्य घटक आहे. राजघराण्याशी संबंधित प्रतिमा, प्रतीके आणि रॉयल सायफर म्हणजे राणी वा राजाच्या आद्याक्षरांच्या चिन्हाचा वापर जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये गुंफलेला आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या ७० वर्षे चालत आल्या होत्या, बदल होणार आहेत.

ध्वज आणि संकेत

  • इंग्लंडमधल्या सगळ्या पोलिस स्थानकांमध्ये, नौदलाच्या जहाजांवर, शासकीय कार्यालयांवर जो ध्वज फडकावला जातो त्यावर ‘EIIR’ हे रॉयल सायफर किंवा राणीची आद्याक्षरं लिहिलेली असतात. ब्रिटिश सैन्यही ही आद्याक्षरं सोनेरी अक्षरात लिहिलेले ध्वज दिमाखात फडकावतं. राष्ट्रकुलातले ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश राणीच्या भेटीदरम्यान ‘E Flag’ फडकावत असत.

  • गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या ध्वजामध्ये अर्धा हिस्सा इंग्लंडचं तर उर्वरीत प्रत्येकी पाव हिस्सा स्कॉटलंड व आयर्लंडचं प्रतिनिधित्व करतो, यातही आता बदल होणं शक्य आहे. नवीन राजा कदाचित ध्वजामध्ये वेल्सचाही समावेश करू शकतो असं गार्डियननं म्हटलं आहे.

तब्बल ३ वर्षांनी झळकावलं शतक, पण विराटला मात्र नवल नाही; म्हणतो “माझं पुढचं टार्गेट : 
  • यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताने सुपर- ४ फेरीतील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावळे; ज्यामुळे भारत औपचारिकरित्या या स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र या स्पर्धेत भारताने संघ म्हणून चांगली कामगिरी केली नसली तरी, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र चांगला खेळ केला. त्याने या स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील ७१ वे षटक झळकावले. तब्बल तीन वर्षांनी केलेल्या या कामगिरीचे मात्र विराट कोहलीला फारसे नवल वाटलेले नाही. आशिया चषक स्पर्धेत मला माझ्या खेळात सुधारणा करायची होती. माझे मुख्य लक्ष्य हे आगामी टी-२० विश्वचषक आहे, असे विराट कोहली म्हणाला.

  • विराटने शतक झळकावल्यानंतर भारतभरातील चाहते चांगलेच खूश झाले आहेत. ठिकठिकाणी त्याच्या नावाने आतषबाजी करण्यात आली. तर काही ठिकाणी केक कापण्यात आले. मात्र विराट कोहलीला त्याच्या या कामगिरीचे फारसे नवल वाटलेले नाही. त्याने “संघ म्हणून आमच्यासाठी हा क्षण खूपच विशेष असा होता. श्रीलंकेविरोधात पराभव झाल्यानंतर सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून मैदानात उतरण्याचे आम्ही ठरवले होते. ही स्पर्धा आमच्यासाठी खूपच महत्त्वाची होती. बाद फेरीमध्ये आमच्यावरील दबाव वाढला होता. या दबावाचा आम्ही सामना केला. मात्र सर्वांनाच माहिती आहे की ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा आमचे लक्ष्य आहे. आम्ही आमच्या खेळात सुधारणा करत आहोत. जे सामने आमच्यासाठी चांगले राहिले नाही, त्या सामन्यांचा आम्ही अभ्यास करू,” असे विराट कोहली म्हणाला आहे.

  • पुढे बोलताना कोहलीने आपल्या शतकी खेळीवरही भाष्य केले. “संघ तसेच व्यवस्थापनासोबत माझा सवांद चांगला आहे. हा संवाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझ्या कठीण काळात हा संवाद आणि संघाने दिलेल्या अवकाशामुळे मला सुरक्षित वाायचे. जेव्हा मी परतलो तेव्हा संघासाठी काहीतरी करण्यास उत्सुक होतो,” असे म्हणत कोहलीने भारतीय संघाचे तसेच व्यवस्थापनाचे आभार मानले.

पुढच्या वर्षी लवकर या! २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन :
  • करोनाच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

गणेशभक्त भावूक

  • समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला. १० दिवसांसाठी घरातील वातावरण प्रफुल्लित करणारा, घराघरात आनंद आणणारा गणपती बाप्पा आपल्या गावी निघाला. पण यावेळी गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

चौपाटीवर अलोट गर्दी

  • पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेत आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात निरोप दिला गेला.

लिलिबेट आणि मारगॉट…ब्रिटनच्या मुकुटाचं ओझं वागवणारं नातं :
  • ही गोष्टं आहे राजघराण्यातल्या, दोन गोड बहिणींची. मोठी लिलिबेट (एलिझाबेथ दुसऱ्या) आणि लहान मारगॉट (मार्गारेट). दोघींमध्ये चार वर्षांचं अंतर. जगातली सगळी सुखं पायाशी असलेल्या राजप्रासादात राहायचं, तिथल्या हिरवळीवर मनसोक्त खेळायचं, लाडक्या घोड्यांवर बसून घोडेस्वारीचे धडे गिरवायचे, पाळीव श्वानांना गोंजारायचं, आई-बाबांबरोबर सहलींना जायचं, अगदी स्वप्नवत भासावं असं हे आयुष्य… पण लिलिबेट १० वर्षांची असताना, तिच्या काकांना राजेपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि या चौकोनी कुटुंबाचं भविष्य पूर्णपणे बदलून गेलं.

  • घराबाहेर दंगा करणाऱ्या या मुलींना नॅनी घरात घेऊन आली. घरात गंभीर वातावरण होतं. त्यांचे बाबा आता राजे (किंग जॉर्ज सहावे) झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. लिलिबेटला आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव तत्क्षणी झाली असावी. बाबा राजे म्हणजे त्यांच्यामागे राजघराण्याचा मुकुट तिलाच वागवावा लागणार होता. छोटी मारगॉट मात्र आपल्या भविष्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.

  • बहिणी… मग त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असोत, वा राजप्रासादात वाढलेल्या, त्यांच्या नात्यात काही समान पैलू असतातच. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं हे नातं. यात एकमेकींविषयी प्रेम तर असतंच, पण त्याच वेळी असूयाही असतेच. लिलिबेट आणि मारगॉटचं नातंही काही वेगळं नव्हतं. त्यांच्या तत्कालीन गव्हर्नेस मेरियन क्रॉफर्ड यांनी ‘द लिट्ल प्रिन्सेसेस’ या पुस्तकात म्हटलं आहे की, या बहिणी अनेकदा एकमेकींशी खेळण्यांवरून आणि कपड्यांवरून भांडत, काहीवेळा मारामारीही करत. कोणीही माघार घ्यायला तयार नसे. मार्गारेट जास्त आक्रमक होती.

  • काहीवेळा एलिझाबेथ माझ्याकडे येऊन हातावर चावा घेतल्याचे व्रण दाखवत तक्रार करत असे. दोघींनाही रात्री त्यांच्या बाबांकडून एक-एक चमचा बार्ली शुगर दिली जात असे. मार्गारेट सगळी शुगर एकदम तोंडात कोंबत असे. लिलिबेट मात्र आरामात चवीचवीने खात असे.

१० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.