चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० सप्टेंबर २०२१

Date : 10 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ब्रिक्स देशांनी दहशतवादविरोधी स्वीकारली कृती योजना: पंतप्रधान मोदी :
  • ब्रिक्स विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे तो जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज म्हणून उदयास आला आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाच देशांच्या समूहाच्या आभासी शिखर परिषदेत केले. “गेल्या दीड दशकात ब्रिक्सने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. पुढील १५ वर्षांत ब्रिक्स अधिक उत्पादनक्षम कसे होईल, याबद्दल आपण काम करायला हवं,” असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी १३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे जैर बोल्सानारो यांच्या उपस्थितीत शिखर परिषदेने ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना स्वीकारली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सुरक्षा, प्रादेशिक समस्या, कोविड -१९, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा या सर्व मुद्द्यांवर ब्रिक्सची सर्वसमावेशक बैठक पार पडली.

  • पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये अफगाणिस्तानचा कोणताही संदर्भ दिला नसला तरी बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी २४ ऑगस्ट रोजी ब्रिक्स राष्ट्रांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचे सादरीकरण केले.

हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ :
  • राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वरील सट्टा- गंधव खंडावर भारतीय हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.

  • या दोन मंत्र्यांसह संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन भारतीय हवाई दलाचे हक्र्युलस सी-१३० जे विमानाने या राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. यामुळे एनएच-९२५ हा हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जाणारा पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरला आहे.

  • एनएच-९२५च्या ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ (ईएएफ) वर अनेक विमानांच्या संचलनाचे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी निरीक्षण केले. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने या ठिकाणी प्रतिरूप आपत्कालीन लँडिंग केले. हवाई दल प्रमुख आर.के. भदौरिया हेही यावेळी उपस्थित होते.

  • एएन-३१ हे लष्करी वाहतूक विमान आणि हवाई दलाचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरही ईएलएफवर उतरले.

  • बाडमेरप्रमाणेच एकूण २० आपत्कालीन लँडिंग धावपट्ट्या सध्या देशभरात विकसित करण्यात येत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या मदतीने अनेक हेलिपॅडही उभारले जात आहेत. आपल्या सुरक्षाविषयक पायाभूत सोयी बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.

MHT CET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ‘असे’ करा डाउनलोड :
  • महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाने महाराष्ट्र सामान्य प्रवेश चाचणी (MHTCET) २०२१ साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. नोंदणीकृत उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र MAH-MPED.-CET 2021, MAH-BA/B.Sc, B.Ed (चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) -CET 2021, MAH-MCA CET-2021, MAH-M.Arch-CET 2021 आणि MAH- MCA CET-2021 -M.HMCT-CET-2021 जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेण्यात येतील.

MHT CET 2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  • सर्वप्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावर, CET नावाच्या विरूद्ध “प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी ओळखपत्रे प्रविष्ट करा.
  • प्रवेशपत्र सबमिट करा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

परीक्षा १५ सप्टेंबरपासून

  • मंगळवारी महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे राज्य प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. अधिसूचनेनुसार, परीक्षा १५ सप्टेंबरपासून सुरू होतील आणि १० ऑक्टोबर २०२१ रोजी संपेल.

किती विद्यार्थी परीक्षा देणार?

  • यावर्षी MHT CET 2021 परीक्षेसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एवढेच नाही तर कोविड -१९ साथीच्या दरम्यान परीक्षा केंद्रांची संख्या १९८ वरून २२६ करण्यात आली आहे.
ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा - दुसऱ्या दिवसावरही भारताचे वर्चस्व :
  • संयुक्त गतविजेत्या भारतीय संघाने ‘फिडे’ ऑलिम्पियाड ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना तीन विजयांची नोंद केली. अव्वल विभागातील ‘ब’ गटात समावेश असलेल्या भारताने गुरुवारी अनुक्रमे शेनझेन चायना, अझरबैजान आणि बेलारूस या संघांना धूळ चारली.

  • गुरुवारी झालेल्या चौथ्या फेरीत भारताने शेनझेन चायनाचा ५-१ असा धुव्वा उडवला. पी. हरिकृष्ण, बी. अधिबान, भक्ती कुलकर्णी, निहाल सरिन, आर. वैशाली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर अशी मात केली. कोनेरू हम्पीने मात्र पराभव पत्करला.

  • पाचव्या फेरीत भारताने अझरबैजानला ४-२ असे नेस्तनाबूत केले. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला तैमूर रादजाबोव्हने असे बरोबरीत रोखले. याव्यतिरिक्त विदित गुजराथी, द्रोणावल्ली हरिका आणि वैशाली यांचेही सामने बरोबरीत सुटले. मात्र हम्पी, निहालने विजय मिळवल्यामुळे भारताने ही फेरीसुद्धा जिंकली.

  • सहाव्या फेरीत बेलारूसचे कडवे आव्हान परतवून लावताना भारताने ३.५-२.५ अशी सरशी साधली. विदित, तानिया सचदेव आणि वैशाली यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर प्रज्ञानंदला पराभव पत्करावा लागला. मात्र आनंद आणि भक्ती कुलकर्णी यांनी नोंदवलेले विजय भारतासाठी निर्णायक ठरले. सहा फेऱ्यांनंतर भारत आणि हंगेरी या संघांनी प्रत्येकी ११ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.

मैदानातील ‘दादा’गिरी लवकरच मोठ्या पडद्यावर; बायोपिकबद्दल सौरव गांगुलीने केली घोषणा :
  • क्रिकेटच्या आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लव्ह फिल्म्सने दादाच्या बायोपिकची घोषणा केली आहे. लव्ह फिल्म्स आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट करून या बायोपिकची घोषणा केली आहे. गांगुलीने लिहिलंय, “क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. क्रिकेटमुळे मला ताठ मान ठेवून पुढे चालण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता मिळाली आहे. लव फिल्म्स माझ्या आयुष्यातील प्रवासावर एक बायोपिक तयार करून ते मोठ्या पडद्यावर दाखवतील, याचा मला आनंद आहे.”

  • “लव फिल्म्स क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीच्या बायोपिकची निर्मिती करणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे आणि सर्वांनी एका चांगल्या इनिंगची वाट पहा,” असे लव्ह प्रॉडक्शन हाऊसने ट्विट करून म्हटले आहे.

  • गांगुलीनी घोषणा करून लव्ह रंजन फिल्म्सच्या बॅनरखाली बायोपिक तयार केली जाईल, याची पुष्टी केली आहे. मात्र, चित्रपटात दादाची भूमिका कोण साकारेल, हे अद्याप कळू शकलेले नाही. सौरव गांगुली आणि चित्रपट निर्मात्यांकडून स्टार कास्टची घोषणा होणे बाकी आहे.

  • दरम्यान यापुर्वी गांगुलीने न्यूज 18 बांगलाशी बोलताना बायोपिकसाठी हो म्हटल्याचं सांगितलं होतं. तसेच बायोपिक हिंदीत असेल. पण आता दिग्दर्शकाचे नाव उघड करणे शक्य नाही. सर्व काही निश्चित होण्यास आणखी काही वेळ लागेल, असं म्हटलं होतं.

१० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.