बी.ए., बी.कॉम. करायचे आहे, मग मोजावे लागणार ‘इतके’ रुपये; विद्यापीठाचे नवे दरपत्रक जाहीर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय घेतला असून अखेर दरपत्रक जाहीर केले आहे. यामुळे बी.ए., बी.कॉम. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुल्कापोटी सात हजारांवर शुल्क भरावे लागणार आहे. विद्यापीठाने दरवर्षी ७ टक्के शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षीपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीवरील स्थगिती उठवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. आता विद्यापीठाने शुल्कवाढीचे दरपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे.
विद्यापीठाने २०१६ पासून प्रवेश आणि परीक्षा शुल्कात कुठलीही शुल्कवाढ केली नाही. संस्थाचालकांकडून सातत्याने शुल्कवाढीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीवरील स्थगिती उठवण्याचा प्रस्ताव सादर करीत, ती स्थगिती उठवण्यात आली. त्यानुसार शुल्क निर्धारण समितीद्वारे २० टक्के शुल्कवाढ व पुढे दरवर्षी ७ टक्केप्रमाणे शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. पुढील वर्षापासून दरवर्षी ७ टक्के शुल्कवाढीला मंजुरी दिली आहे.
असे आहे नवीन शुल्क
कला आणि सामाजिक शास्त्र (पदवी) - ७,०५७
जनसंवाद पदव्युत्तर - २०,६०८
वाणिज्य (पदवी) - ७,०५७
बी.बी.ए., बी.कॉम. - ९,५१२
बी.कॉम. (सीए) - ९,५१२
वाणिज्य(पदव्युत्तर) - ८,८२०
एमसीएम - ११,८८६
खादी प्रोडक्शन - २२,०५१
एमएस्सी होमसायन्स - १७,८३३
जिल्हा परिषद परीक्षेच्या भाग दोनच्या तारखा जाहीर, पदानुसार जिल्हा परिषद परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक तपासा
जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन मधिल १३७ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ पदांसाठी चार दिवस परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वेळापत्रक भाग-२, ७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आहे. या जिल्हा परिषद परीक्षेची तारीख २०२३ भाग २ मध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता(विद्युत), वायरमेन, फिटर आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद भरती २०२३ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ७ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.
जाहीर वेळापत्रकानुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाची परीक्षा १५ ऑक्टोबर २०३ रोजी होणार आहे. तर वायरमेन, फिटर आणि पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा १५ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. या लेखात पदानुसार परीक्षेची तारीख, शिफ्ट्स, परीक्षेची वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण १९ हजार ४६० पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती २०२३ जाहीर केली होती.
जिल्हा परिषद भरती परीक्षा भाग-१- ०७, ०८, १० आणि ११ ऑक्टोबर.
जिल्हा परिषद भरती परीक्षा भाग-२- १५ आणि १७ ऑक्टोबर.
आरोग्य यंत्रणेचा कायापालट! सर्व जिल्ह्यांत अद्ययावत रुग्णालये, मुख्यमंत्र्यांची घोषणा
ठाणे, नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णांचे मृत्यू झाल्याने शासनावर टीका होऊ लागताच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३४ जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पावले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत शिंदे यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही आरोग्यावरील गुंतवणूक, पदभरती याबाबत सूचना केल्या. बैठकीला आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. नवीन सुविधायुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबतचा आराखडा पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने तयार करावा आणि २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी आरोग्याचे एक सर्वंकष ‘ धोरण (व्हिजन) ’ तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
औषधांचा तुटवडा नको !
जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी वेळ न गमावता आपापल्या ठिकाणी रुग्णालयांत लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे दरपत्रकानुसार तत्काळ खरेदी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सूचना काय?
’२५ जिल्ह्यांमध्ये नवी अद्ययावत जिल्हा रुग्णालये उभारणार
’वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन
’१४ जिल्ह्यातील महिलांच्या रुग्णालयांचे बळकटीकरण
’मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत सुविधा
’प्राथमिक उपकेंद्रे, उप जिल्हा रुग्णालये सक्षम करणे
’आरोग्य खर्चामध्ये भरीव वाढ – सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीला वेग
’वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवी परिमंडळे निर्माण करण्याचे निर्देश आरोग्यावरील खर्च वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आली पाहिजे. वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च झाला पाहिजे. –एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
३२ तास प्रवास आणि विश्वचषक पाहण्याची स्वप्नपूर्ती!
अशोक चक्रवर्ती आणि मनोज जैस्वाल. एक सचिन तेंडुलकरचा चाहता, तर दुसरा राहुल द्रविडचा. द्रविड आणि सचिन यांनी क्रिकेटला अलविदा करून बराच काळ झाला. मात्र, या चाहत्यांचे क्रिकेटप्रेम किंचितही कमी झालेले नाही.
कोलकाताचे रहिवासी असलेले हे दोघे तब्बल ३२ तास प्रवास करून भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पोहोचले होते. कडक ऊन असूनही डोक्यावर मुकुट, त्यावर क्रिकेटपटूंचे छायाचित्र, चेहऱ्यावर व कपडय़ांवर तिरंगा, तर हातात कृत्रिम विश्वचषक.. अशी त्यांची वेशभूषा होती. त्यांनी शंखनाद करत वेगळे वातावरण निर्माण केले.
‘‘मी भारतीय संघ आणि कोलकाता नाइट रायडर्सचा चाहता आहे. विश्वचषक बघणे हे माझे स्वप्न होते, ते साकार झाले. इतका लांब प्रवास करणे सार्थकी लागले. पुढील सामन्यांतही आम्ही असाच पाठिंबा देत राहू,’’ असे अशोक चक्रवर्ती म्हणाला.
महिला श्रमशक्ती, उत्पन्नातील फरक स्पष्ट करणाऱ्या क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार
जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. आज आर्थिक विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला असून अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २०२३ मध्ये नोबेल पुरस्कार पटकावणारी क्लॉडिया गोल्डिन या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. महिलांच्या श्रम बाजारातील परिणामांबाबत समज वृद्धिंगत केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
“श्रम बाजारात महिलांची भूमिका समजून घेणे समाजासाठी महत्त्वाचे आहे. क्लॉडिया गोल्डिनच्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल धन्यवाद, आम्हाला आता भविष्यात कोणते अडथळे दूर करावे लागतील याबद्दल बरेच काही समजले आहे”, असे अर्थशास्त्रातील पुरस्कारासाठी समितीचे अध्यक्ष जेकोब स्वेन्सन म्हणाले.
स्त्री पुरुष यांच्यातील कमाईतील तफावत
नोकरीच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्या कमाईत बरीच तफावत असते. शिक्षण आणि व्यवसायावरून कमाईतील हा फरक पूर्वी दाखवून दिला जायचा. परंतु यंदा आर्थिक विज्ञान पुरस्कार विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनीच दाखवून दिलंय की, आता एकाच व्यवसायात असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या कमाईतही तफावत आढळते. महिलेला पहिलं मूल झाल्यानंतर ही तफावत प्रकर्षाने जाणवते.
कोण आहे क्लॉडिया गोल्डिन
क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या १९८९ ते २०१७ पर्यंत NBER (National Bureau of Economic Research) च्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्था विकास कार्यक्रमाच्या संचालकपदीही होत्या. तसंच, NBER च्या जेंडर इन द इकोनॉमी समूहाच्या त्या उपसंचालिकाही होत्या. क्लॉडिया गोल्डिन यांनी अर्थशास्त्रात अनेक संशोधन केलं आहे. महिला श्रम शक्ती, स्त्री-पुरुषांतील कमाईतील तफावत, नोकरीच्या ठिकाणी मिळणारे असमान उत्पन्न, शिक्षणसारख्या अनेक विषयांत त्यांनी अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे.
नोबेल पुरस्काराविषयी
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा केली जाते. त्यानंतर १० डिसेंबर रोजी (आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी) नॉर्वेमधील ओस्लो, आणि स्वीडनच्या स्टॉकहोम या शहरांमध्ये बक्षीस वितरण सोहळे आयोजित केले जातात. औषध, भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांना पारितोषिकं वितरीत केली जातात. किंग कार्ल, राणी सिल्विया यांच्यासह जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पारितोषिकं वितरित केले जातात. तर ओस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं जातं.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - मल्लखांबात महाराष्ट्राला सुवर्ण :
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्राच्या मुलींनी मल्लखांब स्पर्धा प्रकारात पुरलेल्या आणि दोरीवरच्या मल्लखांब अशा दोन्ही प्रकारांत सुवर्णयश मिळविले. तसेच योगासन प्रकारात महाराष्ट्राने दोन दिवसांत पाच पदकांची कमाई करून आपले वर्चस्व राखले. वैभव श्रीरामेने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची, तर छकुली सेलोकरने रौप्यपदकाची कमाई केली. या दोघांनी शुक्रवारीही सुवर्ण व रौप्य यश मिळविले होते. पूर्वाने कांस्यपदक जिंकले.
मल्लखांब प्रकारात पुरलेल्या आणि दोरीवरच्या मल्लखांब प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात रूपाली गंगावणे, जान्हवी जाधव, श्रृती उत्तेकर, नेहा क्षीरसागर, आकांक्षा बर्गे व पलक चुरी यांचा समावेश होता.
योगासन स्पर्धा प्रकारात वैभव श्रीरामे (१३६.५२ गुण) आणि छकुली सेलोकर (१२७.६८ गुण) यांनी सर्वोत्तम कामगिरी करताना महाराष्ट्राच्या पदकसंख्येत वाढ केली. वैभवने योगासनाच्या आर्टिस्टिक वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. नागपूरचीच छकुली महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरली. या प्रकारात रत्नागिरीच्या पूर्वाने (१२६.६८) कांस्यपदक मिळवले.
वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने कांस्यपदक पटकावले. ज्युडोमध्ये ५२ किलोखालील गटात स्नेहल खावरेने कांस्यपदक पटकावले. पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यावर स्नेहलला रेपिचेजमधून पदकाची संधी निर्माण झाली. या लढतीत तिने मध्ये प्रदेशाच्या निधी यादवला पराभूत केले. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत राजस्थानच्या टीना शर्माला हरवले. मल्लखांब प्रकारात पुरुष विभागात महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महात्मा गांधींना आजपर्यंत नोबेल पुरस्काराने सन्मानित का करण्यात आलं नाही? काय सांगतो इतिहास :
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश दिला. ब्रिटिश राजवटीच्या आक्रमक आणि क्रूर वृत्तीसमोर अहिंसात्मक आणि शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह करून आपलं म्हणणं ठामपणे अधोरेखित करण्याचा मार्ग महात्मा गांधींनी तमाम भारतीयांना दाखवला.
नंतर अवघ्या जगानं तो ऐकला, पाहिला आणि अनुभवला! आजपर्यंत अवघ्या जगानं गांधीजींच्या कार्याचा गौरव केला.
पण जगात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने आजपर्यंत महात्मा गांधींना सन्मानित करण्यात आलेलं नाही. वेळोवेळी यावर जागतिक पटलावरही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, अजूनपर्यंत गांधीजींना हा पुरस्कार का जाहीर करण्यात आला नाही? नेमकं यामागचं कारण काय?
पंकज अडवाणीने बिलियर्ड्समध्ये रचला इतिहास, भारताच्याच सौरवचा पराभव करून पटकावला २५वा किताब :
भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने शनिवारी मलेशिया येथे पार पडलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये बिलियर्ड्सच्या अंतिम फेरीत देशबांधव सौरव कोठारीचा ४-० असा पराभव करून कारकिर्दीतील २५वा जागतिक करंडक जिंकला. अडवाणीने चमकदार खेळ केला आणि कोठारीला संधी देणार नसल्याचे पहिल्याच फ्रेमपासून आपले इरादे स्पष्ट केले. या १५० पेक्षा जास्त प्रकारामध्ये अडवाणीने १४९ च्या ब्रेकसह पहिली फ्रेम घेतली. तोपर्यंत कोठारी यांनी खातेही उघडले नव्हते.
सौरवला त्याच्या पहिल्या आयबीएसएफ (आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ) जागतिक किताबाची प्रतीक्षा आहे. या बेस्ट ऑफ सेव्हन अंतिम सामन्यामध्ये, अडवाणीने सुरुवातीपासूनच आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा बिलियर्ड्स राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. कोठारीला दुसऱ्या फ्रेममध्ये काही संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा त्याला उठवता आला नाही. दुसरीकडे अडवाणीने ७७ च्या ब्रेकच्या मदतीने २-० अशी आघाडी घेतली. यानंतर अडवाणींचा खेळ आणखी उत्तम होत गेला आणि त्याने आपल्या कौशल्याने मलेशियाच्या प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले.
अडवाणीने तिसऱ्या फ्रेममध्ये १५३ धावांचा स्पर्धेतील सर्वोच्च ब्रेक केला, ज्यामुळे तो किताबापासून केवळ एक फ्रेम दूर होता. चौथ्या फ्रेममध्ये ८० आणि ६० असे दोन ब्रेक घेत अडवाणीने ट्रॉफी जिंकली. कोठारीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि त्याने केवळ ७२ गुण मिळवले. दुसरीकडे, अडवाणीने ६६० हून अधिक गुण मिळवत किताब जिंकला.
महेंद्रसिंह धोनीने लॉन्च केला ‘ड्रोनी’ कॅमेरा, स्वदेशी बनावटीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ड्रोनची निर्मिती :
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वदेशी ‘ड्रोनी’ या ड्रोन कॅमेराला लॉन्च केले आहे. अत्याधुनिक सुविधा असलेले हे ड्रोन ‘गरुडा एयरोस्पेस’ या कंपनीने निर्मित केले आहे. धोनी या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कंपनीने बनवलेला ‘ड्रोनी’ हा कॅमेरा २०२२ च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल, अशी माहिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश यांनी दिली आहे.
“ड्रोनी ड्रोन हा पूर्णत: स्वदेशी बनावटीचा आहे. याचा उपयोग विविध उद्दिष्टांसाठी पाळत ठेवण्यासाठी होऊ शकतो. ड्रोन अत्यंत कार्यक्षम, अखंड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आला आहे. स्वदेशी ड्रोनच्या निर्मितीतून भारताला केवळ आत्मनिर्भरच नाही तर जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून देणे आमचे लक्ष्य आहे”, असे ‘गरुडा एयरोस्पेस’ चे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश यांनी म्हटले आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये पार पडलेल्या ‘ग्लोबल ड्रोन एक्स्पो’मध्ये जगातील १४ आंतरराष्ट्रीय ड्रोन कंपन्यांच्या १५०० हून जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात गुंतवणूकदार, भागीदारांसह तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
‘गरुडा एयरोस्पेस’ कंपनीकडून शेती, सौर ऊर्जा, औद्योगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांसाठी ड्रोन कॅमेरे पुरवण्यात येतात. चेन्नईमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यात ‘किसान ड्रोन’चेही लॉन्च करण्यात आले. बॅटरीने चालणाऱ्या या ड्रोनमुळे दर दिवशी ३० हेक्टर क्षेत्रामध्ये खतांची फवारणी करणं शक्य होणार आहे. करोना काळामध्ये शेतीमध्ये मन रमवल्याचे या कार्यक्रमात महेंद्रसिंह धोनीने सांगितले. शेती क्षेत्रासाठी ड्रोनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे धोनीने म्हटले आहे.
व्हेस्र्टापेनचे सलग दुसरे विश्वविजेतेपद :
रेड बुलच्या मॅक्स व्हेस्र्टापेनने सलग दुसऱ्यांदा फॉम्र्युला-१ स्पर्धेचे विश्वविजेतेपद मिळविले आहे. जपानमध्ये सुझुका येथे रविवारी झालेली जपान ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकून व्हेस्र्टापेनने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुसळधार पावसाने शर्यतीत कमालीचा अडथळा आणला. अनेक गाडय़ा घसरल्यामुळे दोन फेऱ्यांनंतर शर्यत थांबविण्यात आली. दोन तासांनी शर्यतीस पुन्हा सुरुवात झाल्यावर एकूण ५३ ऐवजी २८ फेऱ्या (लॅप) पूर्ण करण्यात आल्या. अग्रस्थानावरून शर्यतीची सुरुवात करणाऱ्या व्हेस्र्टापेनने सुरुवातीपासून अखेपर्यंत आघाडी टिकवून ठेवली होती. रेड बुलच्याच सर्गिओ पेरेझने दुसरा, तर फेरारीच्या चार्ल्स लेक्लेर तिसरा क्रमांक पटकावला.
जागतिक मालिकेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत पेरेझ व लेक्लेर हे व्हेस्र्टापेनचे खरे स्पर्धक होते. मात्र, व्हेस्र्टापेनने जपान ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकताना त्यांच्यावर मोठी आघाडी घेत हंगामातील चार शर्यती शिल्लक असतानाच आपले विश्वविजेतेपद निश्चित केले. व्हेस्र्टापेनचे ३६६ गुण असून, पेरेझचे २५३ आणि लेक्लेरचे २५२ गुण आहेत. अठरा शर्यतींच्या जागतिक मालिकेतील १२ शर्यती व्हेस्र्टापेनने जिंकल्या.