चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जून २०२०

Date : 10 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आयफेल टॉवर :
  • आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आहे. पॅरीसमध्ये आयफेल टॉवर आहे. करोनाच्या संकटामुळे आयफेल टॉवर पर्यटकांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. आता आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जून पासून खुला होणार आहे AFP ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एएनआयने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

  • आयफेल टॉवरच्या पायऱ्या खुल्या करण्यात येतील. एलिव्हेटर सुरु करण्यात येणार नाही. पर्यटकांनी आयफेल टॉवर पाहण्यासाठी येताना सुरक्षित अंतर ठेवणं हे सक्तीचं असणार आहे असं आयफेल टॉवरच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलं आहे. आयफेल टॉवरची सर्वात उंच बाजू ही बंदच राहणार आहे.

  • आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये करण्यात आली. पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते. या टॉवरची उंची ३२४ मीटर आहेत. एखाद्या ८१ मजली इमारतीएवढी या टॉवरची उंची आहे. या टॉवरच्या तीन लेव्हल आहेत. या तीन लेव्हल्सला पर्यटक भेट देऊ शकतात. या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलवर रेस्तराँ आहेत. २७६ मीटरवर म्हणजेच ९०६ फुटांवर या टॉवरची तिसरी लेव्हल आहे. या ठिकाणाहून पर्यटकांना निरीक्षण करता येतं. आयफेल टॉवरला दरवर्षी साधारण ७ लाख पर्यटक भेट देतात.

अभिमानास्पद! भारतीय हवामान विभागाचं अचूक अंदाजाबद्दल जागतिक हवामान संघटनेकडून कौतुक :
  • पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटाबद्दल भारतीय हवामान विभाग अंदाज व्यक्त करतो. त्याचबरोबर धोकादायक संकट असेल, तर आधीच सूचना करून प्रशासनाला सावध करण्याच काम करतो. मात्र, पावसाच्या अंदाजावरून अनेक वेळा हवामान विभागावर विनोदही केले जातात. मात्र, अम्फान चक्रीवादळाबद्दल भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानं जागतिक हवामान संघटनाही प्रभावित झाली आहे. याबद्दल भारतीय हवामान विभागाचं संघटनेनं कौतुक केलं आहे.

  • बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं होतं. या चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना फटका बसला. या चक्रीवादळाची तीव्रता आणि त्यांच्याविषयी इतर बाबींचे निरीक्षण नोंदवत भारतीय हवामान विभागानं आधीच दोन्ही राज्यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. हे चक्रीवादळ २० मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशात धडकले होते.

  • भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अचूक अंदाजामुळे मालमत्तेचं नुकसान झालं असलं, तरी मोठ्या प्रमाणात जीवित हानी टळली. कारण दोन्ही राज्यांनी चक्रीवादळ येण्या आधीच फटका बसणाऱ्या भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.

जी म्हणजे जिनिअस - लॉकडानमध्येही पारलेची जबरदस्त कमाई, मोडला ८२ वर्षांचा रेकॉर्ड :
  • लॉकडाउनमध्ये एकीकडे अनेक कंपन्या तोट्यात असताना पारले जी बिस्किटाने मात्र आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. पाच रुपयांपासून मिळणारा पारले जी बिस्कीटाचा पुडा अनेक स्थलांतरित मजुरांसाठी दोन वेळचं अन्न ठरलं होतं. कित्येक किलोमीटर चालत निघालेल्या मजुरांना पोटाला आसरा म्हणून स्वस्तात मिळणारे पारले जी बिस्कीटाचे पुडे विकत घेतले होते.

  • याशिवाय लॉकडाउनमुळे घरात अडकल्याने भूक लागल्यावर घरात काहीतरी असावं म्हणूनही अनेकांनी पारले जी बिस्किट मोठ्या प्रमाणात विकत घेतली होती. तर काही ठिकाणी गरजूंना वाटप करण्यासाठी काही समाजसेवी संस्था तसंच इतरांनाही पारले जी बिस्किटाचा पर्यायच निवडला होता. याचा मोठा फायदा पारले जी कंपनीला झाला आहे.

  • १९३८ पासून घराघरात पोहोचलेल्या पारले जी बिस्किटाने लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे. पारले जी बिस्किटाची निर्मिती करणाऱ्या पारले प्रोडक्ट्सने नेमकी किती विक्री झाली आहे याची सविस्तर आकडेवारी देण्यास नकार दिला आहे. पण गेल्या आठ दशकातील आकडेवारी पाहता मार्च, एप्रिल आणि मे हे सर्वोत्तम महिने राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे निधन :
  • माजी खासदार, ज्येष्ठ सर्वोदयी नेते सदाशिवराव ठाकरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना आज (मंगळवार) सकाळी यवतमाळ येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच संध्याकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (बुधवार) इंजाळा, ता. घाटंजी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,आमदार आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी सपत्नीक भूदान पदयात्रा करून, विदर्भात सर्वाधिक जमिनीचे दान मिळविले होते. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना सन्मानीतही करण्यात आले होते.

  • सदाशिवराव ठाकरे हे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून सर्वोदयवादी जीवन जगत होते. अनेक वर्ष ते यवतमाळ

  • जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांचे ते समकालीन राजकीय मित्र होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचा कौटुंबिक स्नेह सर्वश्रुत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र ठाकरे यांच्यासह मोठा परिवार आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत आज अंतिम निर्णय :
  • ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी बुधवारी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आज होणाऱ्या बैठकीत विश्वचषकाच्या आयोजनाबरोबरच ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदासाठीच्या निवडप्रक्रियेविषयीही चर्चा केली जाणार आहे.

  • ‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळाची ही बहुचर्चित बैठक टेलिकॉन्फरन्सद्वारे होणार आहे. करोनाच्या साथीमुळे ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणारी विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याचीच शक्यता सर्वाधिक असून विश्वचषक लांबणीवर पडल्यास इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) होण्याची शक्यता बळावली आहे.

  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळापत्रकानुसार होणे अशक्य असल्याचे मत, काही आठवडय़ांपूर्वीच व्यक्त केले होते. परंतु ‘आयसीसी’ने मे महिन्याच्या अखेरीस होणारी बैठक १० जूनपर्यंत लांबणीवर टाकली. त्यामुळे एकीकडे टोक्यो ऑलिम्पिक, विम्बल्डन खुली टेनिस यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आलेल्या असताना विश्वचषकाविषयी बुधवारी तरी अंतिम निर्णय घेण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. विश्वचषकाच्या आयोजनाबाबत ‘आयसीसी’कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये भारतासह पुढील वर्षांच्या विश्वचषकाच्या यजमानपदाची अदलाबदली करण्याबरोबरच थेट २०२२मध्ये विश्वचषक आयोजित करण्याचाही समावेश आहे.

१० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.