चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जानेवारी २०२२

Updated On : Jan 10, 2022 | Category : Current Affairs


अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा - बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद :
 • ‘एटीपी’ दौऱ्यात पहिल्यांदाच एकत्रित खेळणाऱ्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. बोपण्णाचे हे वैयक्तिक २०वे, तर रामनाथनचे पहिलेच एटीपी दुहेरी जेतेपद ठरले.

 • बोपण्णा आणि रामनाथन जोडीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इव्हान डोडिग आणि मार्सेलो मेलो या अग्रमानांकित जोडीला ७-६ (६), ६-१ असा पराभवाचा धक्का दिला.

 • एक तास आणि २१ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात बोपण्णाने प्रतिस्पर्धी जोडीच्या सव्‍‌र्हिसवर प्रतिहल्ले केले, तर रामनाथनने परिपूर्ण खेळ करत त्याला तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे बोपण्णाने सामन्यानंतर त्याच्या साथीदाराचे कौतुक केले. ‘‘तुमच्याकडून रामनाथन सव्‍‌र्हिस करत असताना तुम्हाला सुरुवातीपासून गुण जिंकण्याची संधी मिळत,’’ असे बोपण्णा म्हणाला.

 • या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली आणि सेटचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर खेळवण्यात आला. यातही ६-६ अशी बरोबरी असताना मेलोच्या सव्‍‌र्हिसवर बोपण्णाने गुण मिळवला, मग दमदार सव्‍‌र्हिस करत टायब्रेकरमध्ये ८-६ अशी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये डोडिग-मेलो जोडीला फारसा प्रतिकार करता आला नाही. बोपण्णा-रामनाथन जोडीला या कामगिरीमुळे १ लाख ८७ हजार अमेरिकन डॉलरचे रोख बक्षीस आणि प्रत्येकी २५० क्रमवारी गुण मिळाले.

मुंबई मॅरेथॉनवर यंदाही अनिश्चिततेचे सावट :
 • राज्यासह मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे.

 • २००४ सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे मोठय़ा जल्लोषात आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायानगरी गाठतात. मागील वर्षी करोनामुळे ही मॅरेथॉन स्पर्धा रद्द करणे भाग पडले होते. यंदा मुंबईतील करोनाचा धोका कमी होईल आणि मॅरेथॉनचे नियमितपणे आयोजन करता येईल, अशी संयोजकांना आशा होती. मात्र, करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परदेशी नागरिकांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

 • यंदा जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी (१६ जानेवारी) मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर संयोजकांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस असून त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्जदेखील पाठवल्याचे समजते. मात्र, मुंबईतील सध्याची करोनाची स्थिती लक्षात घेता, त्यांना परवानगी मिळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या स्पर्धेबाबत काय निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

ओमायक्रॉन नंतर, आता येत आहे डेल्टाक्रॉन! करोनाच्या नवीन प्रकाराचे आढळले २५ रुग्ण :
 • करोना व्हायरसच्या एकामागून एक येणाऱ्या प्रकाराने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. दुसऱ्या लाटेत भारतासह जगावर वाईट परिणाम करणाऱ्या डेल्टा प्रकारातून सावरल्यानंतर, ओमायक्रॉनमुळे सध्या धोका वाढत आहे. पण आता या दरम्यान आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याचे नाव आहे ‘डेल्टाक्रॉन’.

 • माध्यमांच्या वृत्तानुसार, सायप्रसमध्ये डेल्टाक्रॉन हा नवीन करोना व्हायरस प्रकार समोर आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की ‘डेल्टाक्रॉन’ ची अनुवांशिक पार्श्वभूमी डेल्टा प्रकारासारखीच आहे, तसेच काही ओमायक्रॉन सारखी उत्परिवर्तन आहे. त्यामुळे याला डेल्टाक्रॉन नाव देण्यात आले आहे.

 • जगावरील करोनाचे संकट कमी होत नसून करोना व्हायरसचा आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्याला ‘डेल्टाक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. सायप्रसमध्ये सापडलेल्या या नवीन प्रकाराची आतापर्यंत २५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

 • तज्ञ्जांच्या म्हणण्यानुसार हे चिंतेचे कारण नाही. जेरुसलेम पोस्टने सायप्रस मेलचा हवाला देत अहवाल दिला की ११ नमुने व्हायरसमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे होते, तर १४ सामान्य लोकसंख्येतील होते. सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि आण्विक विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रियाकिस म्हणाले की, रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये उत्परिवर्तन वारंवारता जास्त होती, ज्यामध्ये नवीन प्रकार आणि रुग्णालयात दाखल होणे यांच्यातील संबंध दर्शवते.

‘नीट-पीजी’ प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून ; केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांची घोषणा :
 • वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया (नीट-पीजी) येत्या बुधवारपासून (१२ जानेवारी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी रविवारी केली.  

 • सन २०२१-२२वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. या प्रवेशात इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बल गटातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी १० टक्के आरक्षणही कायम ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही प्रवेशप्रक्रिया आता १२ जानेवारीपासून सुरू होईल.

 • आरोग्य मंत्रालयाने निवासी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १२ जानेवारी २०२२ पासून वैद्यकीय समुपदेशन समितीद्वारे (एमसीसी) प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामुळे करोनाविरोधातील लढाईला आणखी बळ मिळेल, असे ट्वीट आरोग्यमंत्री मंडाविया यांनी केले.

 •  ‘नीट-पीजी’ प्रवेश परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर करण्यात आला. त्यानंतर सुमारे ४५ हजार पदव्युत्तर जागांसाठीच्या प्रवेशांची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती. गेल्या महिन्यात देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांनी त्यासाठी आंदोलन केले होते.

चिनी यानाकडून चंद्रावरील पाण्याचा थेट पुरावा :
 • चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते, याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग-५ यानास आढळला आहे. यातून पृथ्वीचा हा उपग्रह शुष्क कसा बनला, हे समजून घेणे शक्य होणार आहे.

 • याबाबतचा अभ्यास शनिवारी सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये १२० पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे. हे प्रमाण एक टन मातीमध्ये १२० ग्रॅम पाणी इतके आहे. त्याचप्रमाणे तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये १८० पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे.

 • पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे.  चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे अस्तित्व हे दूरवरून निरीक्षणातून निश्चित करण्यात आले असले तरी, या यानाने आता चांद्रभूमीवरील खडक आणि मातीमध्ये पाणी असल्याच्या खुणा शोधून काढल्या आहेत. या यानावरील एका साधनाद्वारे पृष्ठभागावरील माती आणि खडकांची स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स तपासणी करून त्याच वेळी पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. हे प्रथमच घडले आहे.

 • काही विशिष्ट काळात चंद्राच्या बाह्य आवरणातील पाणीसाठे हे वाफेच्या स्वरूपात उडून गेल्याने चांद्रभूमी ही कोरडी होत गेली असावी, असे या अभ्यासातून पुढे येत आहे.

१० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)