चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० एप्रिल २०२१

Date : 10 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘परीक्षा पे चर्चा’तील सल्ल्याचे ट्विट संदेश अखेर मागे :
  • ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्याना अवघड प्रश्न आधी सोडवण्याच्या दिलेल्या  सल्ल्याची समाजमाध्यमावर विरोधी पक्ष व इतरांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्या हवाल्याने दिलेले ट्विट संदेश केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोने काढून टाकले आहेत.

  • ‘अल्ट न्यूज’ने याबाबत खातरजमा करून हे ट्विट काढल्यात आल्याचे म्हटले आहे.  शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याशी पंतप्रधान दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत असतात. या वेळी त्यांनी आभासी पातळीवर हा कार्यक्रम घेतला. मोदी यांच्या या संवादाची चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात त्यांनी अवघड प्रश्न आधी सोडवून त्याला जास्त वेळ देण्याचे स्पष्ट म्हटले आहे. सुरूवातीला मन ताजेतवाने असते,  त्यामुळे तुम्ही अवघड प्रश्न प्रथम सोडवा. नंतर सोप्या प्रश्नांची उत्तरे लिहा असे त्यांनी म्हटले होते.

  • नेहमी परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे सांगत असतात पण मोदी यांनी नेमका उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली.

  • मोदी यांनी सांगितले, की आपण पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घातला. मी सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतो.

भारतीय सागरी अधिकारक्षेत्रात परवानगीविना अमेरिकेची क्षेपणास्त्र चाचणी :
  • अमेरिकी नौदलाने हिंदी महासागरात भारताची परवानगी न घेता लक्षद्वीपनगरच्या भागात सागरी प्रवास दिशादर्शन निश्चिातीची चाचणी घेतली. भारताच्या या भागातील सागरी अधिकारांवर त्यामुळे अतिक्रमण झाले आहे.

  • अमेरिकेच्या सातव्या आरमाराने म्हटले आहे, की यूएसएस जॉन पॉल जोन्स जहाजावरून ७ एप्रिल रोजी आम्ही दिशादर्शक क्षेपणास्त्र सोडले होते. ७  एप्रिल २०२१ रोजी सागरी मोहिमेअंतर्गत लक्षद्वीपपासून  पश्चिामेला १३० नाविक मैल अंतरावर क्षेपणास्त्र सोडण्यात आले. प्रत्यक्षात या भागात भारताचा अधिकार असून भारतातील सागरी आर्थिक विभागातील ते क्षेत्र आहे.

  • अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही भारताची परवानगी घेतली नसली तरी आंतरराष्ट्रीय नियमांना धरून आम्ही ही दिशादर्शन चाचणी केली आहे. आर्थिक क्षेत्रात किंवा खंडीय प्रदेशात कुठल्याही चाचण्या, सागरी कसरती करताना परवानगी घेणे गरजेचे आहे, अशी भारताची अपेक्षा असली तरी ते आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत नाही.

  • सागरी क्षेत्र स्वातंत्र्याबाबतची ही मोहीम आंतरराष्ट्रीय कायद्याला धरूनच घेण्यात आली, त्यात कुणाचे हक्क व स्वातंत्र्य यावर गदा आणण्याचा प्रश्नच येत नाही,असे अमेरिकेने म्हटले असून भारताच्या या भागातील सागरी हक्क दाव्यास एक प्रकारे आव्हान दिले आहे, असे मानले जात आहे.

प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन :
  • ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन झालं आहे. बकिंगहम पॅलेसकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा १९४७ साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते.

  • अवघ्या आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलीप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून उपचारांनंतर पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. “अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये निधन झालं”, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

  • “अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कासलमध्ये निधन झालं”, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

  • प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांना चार मुलं, आठ नातू आणि १० पणतू आहेत. प्रिन्स फिलीप यांचा जन्म ग्रीकमधल्या कोर्फू या बेटावर १० जून १९२१ रोजी झाला. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी व्हायच्या ५ वर्ष आधी त्यांचा विवाह झाला.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव :
  • करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

  • महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवाची घोषणा पंतप्रधानांनी केली.

  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशाजवळ पूर्वीपेक्षा अधिक संसाधने असून, आता ‘मायक्रो- कंटेनमेंट झोन्स’वर लक्ष केंद्रित करायला हवे यावर त्यांनी भर दिला. करोना महासाथीला आळा घालण्यासाठी ‘चाचणी करा, शोध घ्या, उपचार करा’ या पद्धतीवर मोदी यांनी भर दिला.

  • जनतेच्या सहभागासह आपले कठोर परिश्रम करणारे डॉक्टर्र्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळण्यात फार मोठा हातभार लावला असून अजूनही लावत आहेत, असे ते म्हणाले. ‘अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना : 
  • टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर करोना विषाणू संसर्गाचा धोका रोखण्यासाठी आता जपान सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

  • जपानची राष्ट्रीय लसीकरण मोहीम मागे पडली असून राजधानी टोक्योमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांनी असमर्थता दर्शवली आहे. रात्रजीवनाचा तसेच खाण्यापिण्याचा आस्वाद घेत असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा संसर्ग नंतर कार्यालये, शाळा येथे होत आहे. हे लक्षात घेता बार आणि रेस्टॉरंट्स थोड्या कालावधीसाठी सुरू ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिल्या आहेत.

  • नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ११ मेपर्यंत या नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन जनतेला करावे लागणार आहे.

  • *  पश्चिम जपानमधील क्योटो आणि ओकिनावा येथे करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे सुगा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका, ह््योगो आणि मियागी या शहरांमध्येही सावधगिरीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

१० एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.