चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ सप्टेंबर २०२२

Date : 1 September, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील पहिली व्हर्चुअल शाळा सुरू; गल्लीत बसून घेऊ शकता दिल्लीतील शिक्षण :
  • दिल्ली सरकारने राबवलेल्या शैक्षणिक धोरणाचा जगभरात डंका वाजवला जातो. त्यात आता दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्चुअल शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेत कोणीही प्रवेश घेऊ शकतो. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. या शाळेच्या माध्यमातून जेईई-एनईईटीसाठी विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

  • प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, या व्हर्चुअल शाळेमध्ये ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. आजपासून शाळेच्या प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. या व्हर्चुअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात. व्हर्चुअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे.

  • करोनादरम्यान व्हर्चुअल शाळेच्या माध्यमातून अभ्यास सुरु होता. त्यातून प्रेरणा घेऊन व्हर्चुअल शाळा सुरु करण्यात आली. अनेक मुले अशी आहेत त्यांना काही कारणास्तव शाळेत जाता येत नाही. त्यांच्यासाठी ही शाळा वरदान ठरणार आहे. शाळेचे सर्व वर्ग ऑनलाइन असतील. या शाळेला ‘दिल्ली मॉडेल व्हर्चुअल स्कूल’ असे नाव देण्यात आल्याची माहिती, अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतचा सनसनाटी विजय; लक्ष्य पराभूत :
  • भारताच्या किदाम्बी श्रीकांतने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी सनसनाटी विजयाची नोंद करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपयशी ठरलेल्या श्रीकांतने जपान स्पर्धेची झोकात सुरुवात केली. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या ली झी जिया याचा २२-२०, २३-२१ असा पराभव केला. श्रीकांतने ३७ मिनिटांत विजय मिळविला. मलेशियाच्या लीविरुद्ध चार लढतींनंतर श्रीकांतचा हा पहिलाच विजय ठरला.

  • २१ वर्षीय लक्ष्यला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकून लक्ष्यने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर लक्ष्यला खेळात सातत्य राखता आले नाही. जपानच्या केंटा निशिमोटोने रंगतदार लढतीत लक्ष्यवर १८-२१, २१-१४, २१-१३ असा विजय मिळवला. महिलांमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला दोन वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुचीला फारशी झुंज देता आली नाही. यामागुचीने पहिल्याच फेरीत सायनावर ३० मिनिटांत २१-९, २१-१७ अशी मात केली.

  • पुरुष दुहेरीतही भारतीय जोडय़ांना अपयश आले. ध्रुव कपिला-एमआर अर्जुन जोडीला कोरियाच्या चोई सोल ग्यू-किम वोन हो जोडीकडून २१-१९, २१-२३, १५-२१ असा चुरशीचा लढतीत पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद-ट्रिसा जॉली यांचेही आव्हान आटोपले. थायलंडच्या जोंगकोफान किटिथाराकुल-रिवदा प्रजोनजाई जोडीने भारतीय जोडीला २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीतही जुही देवांगण-वेंकट प्रसाद जोडीलाही पराभव पत्करावा लागला.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन; दुर्मीळ नेतृत्वगुण असलेला नेता - बायडेन :
  • ‘युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक्स’चे (सोव्हिएत संघ) अखेरचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मॉस्कोतील ‘सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटल’ने या संदर्भात माहिती दिली. गोर्बाचेव्ह यांनी तत्कालीन सोव्हिएत संघात अनेक सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे सोव्हिएत संघाचे विघटन झाले. साम्यवादाचा प्रभाव खूपच कमी झाला. अमेरिकेशी असलेले शीतयुद्ध संपवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. त्यांनी सात पेक्षाही कमी वर्षांच्या कारकीर्दीत ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’ म्हणजे खुलेपणा आणि पारदर्शकतेचे धोरण अवलंबले. अनेक मोठे बदल केले. या बदलांमुळे नंतर तेही मागे पडले. सोव्हिएत संघातील पूर्व युरोपीय राष्ट्रे रशियन प्रभावातून मुक्त झाली. अणुयुद्धाच्या सावटाखालील शीतयुद्ध समाप्त झाले.

  • अमेरिेकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गोर्बाचेव्ह यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले, की दुर्मीळ नेतृत्वगुण असलेला हा नेता होता. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. वेगळय़ा भविष्याची कल्पना करण्याची त्यांची क्षमता होती. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले पूर्ण राजकीय भवितव्य पणाला लावण्याचे धाडसही गोर्बाचेव्ह यांच्याकडे होते. त्यांच्यामुळे जग अधिक सुरक्षित झाले. लाखो नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले.

  • राजकीय विश्लेषक आणि अमेरिकेचे रशियातील माजी राजदूत मायकल मॅकफॉल यांनी ‘ट्विट’ केले, की गोर्बाचेव्ह यांनी ज्या प्रकारे इतिहासाला सकारात्मक दिशा दिली आहे, तसे क्वचितच दुसऱ्या कोणी केले असेल. मात्र, गोर्बाचेव्ह यांना अपमानास्पदरीत्या सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. ऑगस्ट १९९१ मध्ये त्यांच्या विरोधात झालेल्या बंडाच्या प्रयत्नामुळे ते निष्प्रभ झाले. त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांत सोव्हिएट संघातील अनेक राष्ट्रांनी एकामागून एक आपले स्वातंत्र्य घोषित केले. २५ डिसेंबर १९९१ रोजी त्यांनी राजीनामा दिला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं? माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा :
  • लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. अगदी सुरक्षेपासून प्रवासापर्यंत मंत्र्यांवर हजारो रुपये खर्च केले जातात. याशिवाय विविध भत्तेदेखील दिले जातात. अशा स्थितीत देशाच्या पंतप्रधानांवर किती खर्च केला जातो? याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेवणाचा किंवा अन्नाचा खर्च कोण करतो? अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली असता, आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे.

  • माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी स्वतःच्या अन्नाचा खर्च स्वत: करतात. स्वत:च्या जेवणासाठी ते सरकारी बजेटमधून एक रुपयाही खर्च करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं? असा प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

  • पंतप्रधान कार्यालयाचे सचिव विनोद बिहारी सिंह यांनी आरटीआयला उत्तर दिलं की, सरकारी बजेटमधून पंतप्रधानांच्या जेवणावर एक रुपयाही खर्च केला जात नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रवेश केला होता. यानंतर २ मार्च २०१५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मोदींनी संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचून सर्वांना चकित केले होते.

पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ १३.५ टक्क्यांनी; पण आरबीआयच्या अंदाजापेक्षा कमीच :
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपी १३.५ टक्क्यांनी वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी २०.१ टक्क्यांनी वाढला होता.

  • मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली होती. त्यानंतर आता अर्थव्यवस्थेनं वेग घेतला आहे. पण आरबीआयच्या अंदाजापेक्षा ही जीडीपी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी १६.२ टक्के असेल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला होता.

  • चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी दुहेरी अंकांत वाढेल, असा अंदाज अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. वास्तविक भारताचा जीडीपी वाढीचा दर १३ ते १६.२ टक्क्यांच्या श्रेणीत वाढला आहे. दरम्यानच्या काळात रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा वेग सकारात्मक पाहायला मिळाला आहे. २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ४.१ इतका नोंदला होता.

०१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.