चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ ऑक्टोबर २०२२

Date : 1 October, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण :
  • ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात झालेल्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

  • यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘‘अधिक चांगला समाज आणि देश घडवण्यामध्ये चित्रपटांचे योगदान मोठे असते. दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा त्याचा प्रभाव अधिक असतो.’’

  • पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना  राष्ट्रपती   मुर्मू  म्हणाल्या की, ‘‘आशा पारेख यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले.  

  • त्यांचा सत्कार हा सर्व स्वतंत्र स्त्रीशक्तीचा सन्मान आहे.’’ यावेळी अभिनेते अजय देवगण, दाक्षिणात्य अभिनेता सुरिया, त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार 5G सेवांचा शुभारंभ; ‘या’ १३ शहरांतून होणार सुरूवात :
  • भारतातील काही निवडक शहरांमध्ये आजपासून 5G सेवा सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर १ ते ४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित प्रदर्शनात आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवांचा शुभारंभ होणार आहे.

  • आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञानाचे व्यासपीठ असणारी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हे दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

  • काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात वैष्णव यांनी 5G सेवांसंदर्भात माहिती दिली होती. “5G चा प्रवास खूप बदल घेऊन येणार आहे. अनेक देशांना ४० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागली. पण भारतात कमीत कमी वेळात ८० टक्के देशवासियांना 5G ची जोडणी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच ही सेवा परवडणारी आहे. याची खात्री करू आणि उद्योग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष केंद्रीत करू”, असेही ते सांगितले होते.

  • या १३ शहरांना प्रथम वापरता येणार 5G सेवा - दूरसंचार विभागच्या माहितीनुसार, भारतात 5G लाँच केल्यानंतर, भारतातील १३ शहरांमध्ये उपलब्ध होईल. २०२२ मध्ये, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे ५जी सेवा प्राप्त करणारी पहिली शहरे असतील.

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; राज्यभरात नेमले नवे पदाधिकारी : 
  • शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. हा वाद आता न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. असे असताना एकनाथ शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

  • युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी अधिक माहिती दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेत काम करणारे तरुण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. मुंबईची जबाबदारी समाधान सरवणकर यांच्याकडे असेल. विविध विभागात वेगवेगळे तरुण काम करतील, असे पावसकर यांनी सांगितले.

  • दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन - शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाची लढाई न्यायालय, निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी मैदानावर घेण्यात येणार आहे. दोन्ही गटांनी या मेळाव्याचे टीझर, पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये आम्हीच खरी शिवसेना आहोत, याचा पुरेपूर प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्यांनी एकदा ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला तर..; पंतप्रधान मोदींचा दावा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. ही एक्स्प्रेस भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. “ही ट्रेन विमानाच्या तुलनेत १०० पट कमी आवाज करते. या ट्रेनचा अनुभव घेतल्यानंतर ज्यांना विमानाने प्रवास करायची सवय आहे ते लोक या ट्रेनला प्राध्यान्य देतील”, असा दावा या ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्यात अहमदाबादेत पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. गांधीनगर ते अहमदाबाद प्रवास करत मोदींनी प्रवासाचा आनंदही लुटला.

  • गांधीनगर आणि अहमदाबाद या जुळ्या शहरांचा विकास एक उत्तम उदाहरण आहे. याच मॉडेलप्रमाणे गुजरातमधील जुळ्या शहरांचा विकास केला जात आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. आत्तापर्यंत लोक न्यूयॉर्क, न्यूजर्सीबाबत बोलायचे. मात्र, आता या शर्यतीत माझा भारत देशदेखील मागे नाही, असे गौरवोद्गार यावेळी मोदी यांनी काढले.

  • ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये एकूण १ हजार १२८ प्रवासी क्षमता आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली होती.

ट्रेनमध्ये काय आहेत सुविधा?

  • ही ट्रेन पूर्णपणे वातानुकुलीत(एसी) आहे. याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, आरामदायी आसन व्यवस्थसह इत्यादी बाबींचा ट्रेनमध्ये समावेश करण्यात आला आहे. स्वदेशी सेमी-हायस्पीड म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन अवघ्या ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत.

०१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.