चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जून २०२२

Date : 1 June, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा - आनंदचा कार्लसनवर विजय; अतिजलद स्पर्धेत चौथा क्रमांक :
  • भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या अतिजलद (ब्लिड्झ) स्पर्धाप्रकारातील सातव्या फेरीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर दिमाखदार विजय मिळवला. मात्र तरीही स्पर्धेअखेरीस त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आनंदने अनिश गिरी (नेदरलँड्स) आणि मॅक्सिम वॅचिअर-लॅग्रेव्ह (फ्रान्स) यांच्याकडून अनुक्रमे चौथ्या आणि नवव्या फेरीत पराभव पत्करला. परंतु १० बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या अतिजलद स्पर्धेत आनंदला ५ गुण मिळवता आले.

  • भारतीय ग्रँडमास्टर आनंदने पहिल्या फेरीत आर्यन तारीवर (नॉर्वे) दिमाखदार विजय मिळवला. मग दुसऱ्या फेरीत वेस्ली सो याच्याशी बरोबरी साधली. नंतर तिसऱ्या फेरीत अनुभवी व्हेसेलिन टोपालोव्हवर विजय मिळवला. आनंदने पाचव्या फेरीत तैमूर राजाबोव्हविरुद्ध सहाव्या फेरीतसुद्धा त्याने हाओ वांगशी (चीन) आणि आठव्या फेरीत शाखरियार मॅमेडायारोव्हविरुद्ध गुणविभाजनावर समाधान मानले.

  • पहिल्या तीन फेऱ्यांनंतर अडीच गुण खात्यावर असणाऱ्या आनंदच्या वाटचालीला लॅग्रेव्हविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला. काही दिवसांपूर्वी भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदनेही अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला हरवण्याची किमया साधली होती.

  • अमेरिकेच्या वेस्ली सो याने साडेसहा गुणांसह अतिजलद प्रकारात अग्रस्थान मिळवले, तर साडेपाच गुणांसह कार्लसनला दुसरे स्थान मिळाले. गिरीला पाच गुणांनिशी तिसरे स्थान मिळवता आले. यानंतर सुरू होणाऱ्या परंपरागत (क्लासिकल) बुद्धिबळ स्पर्धाप्रकारात आनंदची सलामीची लढत लॅग्रेव्हशी होणार आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताच्या महिला रायफल संघाला सुवर्णपदक :
  • ईलाव्हेनिल वालारिवान, रमिता आणि श्रेया अग्रवाल यांनी अजरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक गटात सुवर्णपदक मिळवत भारताच्या पदकांचे खाते उघडले.

  • सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला त्रिकुटाने डेन्मार्कच्या अ‍ॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनला १७-५ असे नमवले. पोलंडला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. माजी अग्रमानांकित व्हालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती.

  • भारतीय महिलांनी पहिल्या टप्प्याच्या पात्रता फेरीत ९० फैरींमध्ये ९४४.४ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डेन्मार्कपाठोपाठ दुसरे स्थान मिळवत भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

“२०१४ च्या तुलनेत आता देशाच्या सीमा अधिक सुरक्षित” - पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित करताना भारतीय सीमारेषेबाबत मोठं विधान केलं आहे. २०१४ च्या तुलनेत आता भारतीय सीमारेषा अधिक सुरक्षित असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “मी देशाचा पंतप्रधान नसून देशातील जनतेचा प्रधान “सेवक” आहे. आणि यावर माझा ठाम विश्वास आहे.” यावेळी त्यांनी भाजपा सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘गरीब कल्याण संमेलन’मध्ये विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित म्हटलं की, “गेल्या ८ वर्षात मी स्वत:ला एकदाही पंतप्रधान असल्याचं जाणवू दिलं नाही. मी जेव्हा कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो, तेव्हाच माझ्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी असते. पण फाइल बंद होताच मी पंतप्रधान नसतो, मी देशातील १३० कोटी जनतेचा प्रधान सेवक असतो.”

  • यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनाथ मुलांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत, समर्पित हेल्पलाइन आणि आयुष्यमान कार्ड अंतर्गत ५ लाख रुपयांचं आरोग्य कवच, आदी योजनांचा समावेश आहे.

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधान : 
  • “योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या.”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

  • विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. 

  • यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

केंद्राकडून राज्याला १४ हजार कोटींचे जीएसटीचे अनुदान ; अजूनही १२ हजार कोटींची थकबाकी  ; सर्व रक्कम दिल्याचा केंद्राचा दावा :
  • वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची ८६,९१२ कोटींची रक्कम  केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आले आहेत. राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही १२ हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे. तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे.

  • केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची नुकसानभरपाईची वितरित केलेल्या रकमेपैकी १४,१४५ कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्राच्या वाटय़ाला आली आहे. राज्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेपैकी सर्वाधिक रक्कम ही राज्याला मिळाली आहे. केंद्र सरकारने मेपर्यंत सर्व राज्यांची नुकसानभरपाईची रक्कम वितरित केल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

  • मात्र गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीच्या वेळी राज्याची २६,५०० कोटींची रक्कम केंद्राकडून येणे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. वस्तू आणि सेवा कराच्या थकबाकीवरून केंद्र व राज्यात अधिक संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कारण राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम दिल्याचा दावा केंद्राने केला आहे. फक्त जूनची रक्कम आता देय असल्याचे केंद्राने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र २६,५०० कोटी वस्तू आणि सेवा कराची थकबाकीपोटी मिळणे शिल्लक असल्याचे म्हटले होते.

  • राज्याच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २६,५०० कोटींची थकबाकी आहे. वस्तू आणि सेवा कराची नुकसानभरपाईची रक्कम पाच वर्षे देण्याचे केंद्राने जाहीर केले होते. ही मुदत जूनमध्ये संपत आहे. राज्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी राज्यांची मागणी आहे. विशेषत: बिगर भाजपशासित राज्यांनी ही मागणी लावून धरली आहे. केंद्राने अद्याप काही स्पष्ट केलेले नसले तरी केंद्राकडून राज्यांना अनुदान दिले जाण्याची शक्यता कमीच आहे.  वस्तू आणि सेवा कर नुकसानभरपाई निधीत २५ हजार कोटी शिल्लक होते. उर्वरित ६० हजार कोटींपेक्षा अधिक हे केंद्राने आपल्या निधीतून वितरित केल्याचे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

०१ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.